Vasubaras (वसुबारस) सणाचे महत्त्व 2024
वसुबारस (Vasubaras )
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras ). संस्कृत मध्ये त्याला गोवत्स द्वादशी म्हणतात. गो म्हणजे गाय व वत्स म्हणजे वासरू. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त होण्याआधी गायीचा गोठा स्वच्छ केला जातो.
रांगोळ्या, हार, तोरणांनी गोठा सजवला जातो. गाय वासरांना आंघोळ घालून हळद कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते. त्यांना ओवाळले जाते. पूजा झाल्यानंतर त्यांना उडदाचे वडे, भात व गोड पदार्थ खाण्यास देतात.
सर्वांना आनंद देणाऱ्या हे नंदिनीमाते सर्व देव तुझ्या ठाई वास करतात म्हणून तू सर्व देवमयी आहेस. तेव्हा हे माते तू आमच्या सेवेचा स्वीकार कर आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर, अशी प्रार्थना गाईचे पूजन करताना करतात. अशा रीतीने दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस (Vasubaras ) साजरा करतात.
प्राचीन काळी देव-
दानवांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले, त्यावेळी गायीची उत्पत्ती क्षीरसागरातून झाली. त्यावेळी समुद्रातून चौदा रत्ने वर आली. त्यात नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला व बहुला अशा पाच कामधेनू होत्या. गाईला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत असे म्हटले जाते. गाईपासून मिळणारे गोमूत्र, दूध, दही, तूप या वस्तू अत्यंत पवित्र व आरोग्यदायी मानल्या जातात.
शेती करण्यासाठी बैलाचा उपयोग होतो, त्याची उत्पत्ती गाईपासूनच होते. गायी ही लोकमाता आहे, पूज्य आहे व वंदनीय आहे. अशा गाईची वर्षातून एकदा तरी पूजा करावी यासाठी आपल्या पूर्वजांनी वसुबारस (Vasubaras )/गोवत्स द्वादशी हे व्रत सुरू केले असावे.
गोवत्स द्वादशीचे महत्त्व सांगणारी कथा : १
फार वर्षांपूर्वी ऋषी -मुनी भगवान शंकराचे दर्शन घडावे म्हणून तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्यांना दर्शन देण्याचे ठरविले. मग शंकरांनी अत्यंत म्हाताऱ्या ब्राह्मणाचे व सवत्स गाईचे रूप घेतले.
तो वृद्ध ब्राह्मण त्या गाईला घेऊन तपश्चर्या करीत असलेल्या त्या ऋषीमुनींच्या जवळ आला व त्यांना हात जोडून म्हणाला, मी जंबूक्षेत्राला जात आहे. दोन दिवसांनी परत येईन, तोपर्यंत माझ्या या गाईचे रक्षण करा. ऋषींनी ते आनंदाने मान्य केले. ब्राह्मण रूपात असलेले शंकर गुप्त झाले व त्यांनी वाघाचे रूप धारण केले. वाघाचे रूप घेऊन ते ऋषीमुनींकडे आले. वाघाला बघताच तेथे असलेली गाय घाबरली.
तो वाघ गाईचा पाठलाग करू लागल्याने ते ऋषी संतापले. त्यांनी मोठा आवाज करणाऱ्या घंटा वाजविण्यास सुरुवात केली. त्या आवाजाने घाबरलेला वाघ तेथून पळून गेला. थोड्यावेळाने पार्वती देवी सह शंकर तेथे प्रकट झाले. त्यावेळी ऋषींच्या बायकांनी सवत्स धेनूचे रूप घेणाऱ्या पार्वतीमातेचे नंदिनी या नावाने भक्तीभावाने पूजन केले. तो दिवस होता आश्विन वद्य द्वादशी. तेव्हापासून गोवत्स द्वादशी व्रत सुरू झाले.
वसुबारस (Vasubaras ) महत्व सांगणारी कथा: २
उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला सुरुची व सुनीती नावाच्या दोन राण्या होत्या.
सुनीतीला ध्रुव नावाचा एक मुलगा होता. सुरुचीला मात्र अपत्य नव्हते, त्यामुळे तिच्यात सवतीमत्सर निर्माण झाला होता. एकदा सुनीती सुरूचीला म्हणाली, तू माझ्या मुलाचा सांभाळ कर. मी इतर कामे करीन. सुरुचीने ते मान्य केले.
सुनीती नेहमीच आपल्या मुलाला आपल्या सवतीजवळ ठेवत असे. एके दिवशी सुरुची ने आपल्या सवतीच्या मुलाला म्हणजे ध्रुवाला ठार मारले. काय आश्चर्य!
दुसऱ्याचं क्षणी ध्रुव जिवंत झाला. सुरुचीने ध्रुवाला अनेक वेळा ठार मारले पण प्रत्येक वेळी तो जिवंत होत राहिला. सुरुची- ला याचे आश्चर्य वाटले. तिने सुनीतीला सर्वकाही सांगितले व तिला विचारले ‘तुझा मुलगा पुन: पुन्हा जिवंत होत होता, हे कशामुळे? तू कोणते व्रत केले आहेस? तुला संजीवनी विद्या येते ‘ काय?
सुरुचीने असे विचारले असता सुनीती म्हणाली ‘ हा सगळा प्रताप मी केलेल्या गोवत्स द्वादशी व्रताचा आहे.
दरवर्षी मी अश्विन वद्य द्वादशीला गोवत्स द्वादशीचे व्रत करते. त्यामुळे माझ्या पुत्राच्या जीविताला कसलाही धोका प्राप्त होत नाही.
मी आठवण काढताच तो माझ्याजवळ येतो. हे सुरुची, तू सुद्धा गोवत्स द्वादशीचे व्रत कर म्हणजे तुला पुत्र, धन, सौख्य सगळे काही प्राप्त होईल.’ सुरूने भक्ती भावाने ते व्रत केले. त्यामुळे ती पूर्ण सुखी झाली. तेव्हापासून स्त्रिया हे गोवत्स द्वादशीचे व्रत करतात. या वृत्तामुळे सर्व सुखांची प्राप्ती होते. घराला सुख समृद्धी मिळते.
या दिवशी विशेषतः दत्तक्षेत्री नरसोबावाडी मध्ये दीपोत्सव साजरा केला जातो.गुरुचरित्राची पारायणे केली जातात. वसुबारस (Vasubaras ) याचा अर्थ. वसु म्हणजे द्रव्य, त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी.
Other Articles: कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) in Marathi