उत्कृष्ट मराठी कविता (Marathi Kavita) 2024

माझे आवडते लेखक डॉ. सुनील कुमार लवटे यांच्या पुस्तकातील मराठी कविता (Marathi Kavita) मी नुकत्याच वाचल्या. मला त्या खूप आवडल्या. माझ्या वाचकांसाठी मी त्या पुढे देत आहे. सदर कविता (Marathi Kavita) ‘पुस्तकांवर’ लिहिलेल्या आहेत. आपणास नक्की आवडतील अशी आशा आहे. ( डॉ. सुनीलकुमार लवटे साभार.)

मराठी कविता

उत्कृष्ट मराठी कविता (Marathi Kavita)

1) कठीण समय येता
हात देतात पुस्तके
बोट धरूनही
बुडणाऱ्यास वाचवतात पुस्तके
घर पेटेल तेव्हा
पुस्तके स्वतःसही पेटवून घेतात.

2) पुस्तके नसतात धोका देत
नि शब्द ही नसतात फिरवत
धीर देतात संकट समयी पुस्तके
संकटमोचक असतात खरी!

3) पुस्तके युद्धाची कारणे झाली तरी
ती कधीच लढत नसतात
पुस्तके फक्त विचार पेरतात.
अर्थ तुमचा वकूब
शहाणीसुरती माणसं
पुस्तके नसतात वाचत
तंतोतंत.
तत्व सार सर्वस्व
नुसती नजर फिरवली तरी
हाती येत पाथेय.

4)पुस्तके असतात
सश्रद्ध, अश्रद्धा
नि अंधश्रद्धाही!
निरपेक्ष, निर्मोही
पुरोगामी, प्रतिगामी
गांधीवादी, मार्क्सवादी;
पण ती आपसात मात्र
कधीच करत नसतात
वादावादी
माणसांसारखी!

5) पुस्तकांना नसते जात,
नसतो धर्म ,पंथ,
असतो विचार केवळ
असतो आशय, अर्थ
माणसं मात्र
आपापल्या सोयीने
लावतात अर्थ,
करतात अर्थाचा अनर्थ
पुस्तकांमुळे अनर्थ घडल्याचा इतिहास नाही
अनर्थाचा सारा इतिहास मात्र
मानवी कर्मफळ!

6) तू रुसलीस जेव्हा
मी पुस्तक घेऊन आलो,
कळी खुलली
गाठ सुटली.

7) मी आजारी पडलो तेव्हा
तुझ्या ‘त्या’ पुस्तकाने
मला बरे केले.

8) पुस्तके काही
न लिहीताही वाचता येतात.

9) पुस्तके चक्रव्यूह
आत जाणं सहज,
बाहेर पडणं
अशक्य.

10)वारंवार आठवणारी पुस्तके
वारंवार वाचली जाणारी पुस्तके
चिंध्या झालेली पुस्तके
परत न येणारी पुस्तके
अस्वस्थ करणारी पुस्तके
अंतर्मुख करणारी पुस्तके
ललित, मनोहर पुस्तके
अभिजात पुस्तके.

11) पुस्तक असते आई
बाप- भाऊ कधी
ताई, माई, मावशी
कवितेआडून
समजावते चार गोष्टी
जीवाभावाच्या,
सबुरीच्या
सल्ल्याच्या
सभ्यता नि शहाणपणाच्या
म्हणून वाचायची असतात
पुस्तके! पुस्तके! आणि पुस्तकेच!

12) पुस्तकांच्या
शब्दशब्दांत
ओळीओळीत
असतात
रिकाम्या जागा
भरायच्या असतात
शहाणपणाने
आणि सबुरीने
जीवनभर आलेल्या
अनुभवाने.

13) पुस्तकात कधी
कविता, तर
कधी कथा
कधी कादंबरी, नाटकेही
जीवनात येणाऱ्या
माणसांसारखी
कधी भावुक, तर
कधी औपचारिक
कधी जीव लावणारी
नि कधी कधी तर
जीवघेणीही!

Other Articles: 50 Amazing Motivational Quotes in Marathi

Leave a Comment