गोष्ट पैशापाण्याची : प्रफुल्ल वानखेडे

गोष्ट पैशापाण्याची : प्रफुल्ल वानखेडे

प्रकाशक सकाळ मीडिया प्रथा.लि.५९५. बुधवार पेठ, पुणे
४११००२.

गोष्ट पैशापाण्याची : प्रफुल्ल वानखेडे

प्रकाशक सकाळ मीडिया प्रथा.लि.५९५. बुधवार पेठ, पुणे
४११००२.

गोष्ट पैशापाण्याची : प्रफुल्ल वानखेडे- या पुस्तकाचे सारांश लेखन

जगण्यासाठी पैसा लागतो. तो मिळवायचा कसा? तो योग्य ठिकाणी कसा गुंतवायचा हे ज्याला कळतं त्याला पैशाचं गणित उत्तम जमत. आर्थिक स्थैर्य हा आयुष्य सुखी होण्याचा मार्ग आहे. पैसा येतो आणि खर्च होतो.
तिथे हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे की आपण पैसा जपला तर पैसा आपल्याला जपतो. तुम्हाला जर शिस्तबद्ध आर्थिक नियोजन करायचे असेल तर हे पुस्तक जरूर वाचा.

पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्दे.

१) श्रीमंतीचा दिखाऊपणा व भपका टाळा.

तुम्ही श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचे जगाला दाखवणे या मधला फरक ओळखायला शिका. शिक्षण आणि आर्थिक साक्षरता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. श्रीमंत दिसण्याच्या नादात कित्येक जण गरीबच राहतात. पैशाच्या योग्य नियोजनाचे महत्त्व ओळखा. आज मितीस जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते व्यवहार ज्ञान आणि साधेपणा. योग्य वेळी केलेली पैशाची बचत योग्य ठिकाणी केलेली पैशाची गुंतवणूक आपल्याला आयुष्याचे सुख आणि आनंद देते. क्षणिक सुख आणि भपका टाळा. आयुष्यभर आनंदी रहा. पैशांची बचत सुरू करा. हा अत्यंत मोलाचा सल्ला वानखेडे आपल्याला देतात.

२) जगात उत्तम शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

मुलांना स्मार्टफोन, गॅझेटस, कपडे, देण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणावर खर्च करा. त्यांना उत्तम व्यवहार ज्ञान द्या. शिक्षण आणि वाचन ही सर्वात मोठी मुलांसाठी गुंतवणूक आहे. त्या शिक्षणासाठी बचत करा. आर्थिक साक्षरतेचे महत्व समजून घ्या. उत्तम शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

३) कामावरील श्रद्धेचे चक्रवाढ फायदे.

आपल्या कामावर आपली श्रद्धा असली पाहिजे. आनंदासाठी व समाधानासाठी काम करायला हवे. नाकी मजबुरीने व भीतीपोटी. आर्थिक प्रगती करावयाची असेल तर नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतील. असे जर आपण काम केले तर त्याचे फायदे चक्रवाढ पध्दतीने जीवनभर मिळत राहतील.

४) पैशाचा प्रवाह आणि बचतीचे धरण.

जेव्हा आपल्याकडे पैशाचा प्रवाह जोरात सुरू असतो त्यावेळी आपण पैशाचा भरमसाठ खर्च करतो. खरंतर त्यावेळी पैशाची बचत करणे महत्त्वाचे असते. पण हे काम सोपे नसते. बचत करणे म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखे असते. आपण साठवलेल्या पैशातूनच बचत करायची असते, गुंतवणूक करावयाची असते. आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो.

५) तिच्या हाती अर्थसाक्षरतेची दोरी.

आपल्या समाजात स्त्री-पुरुष असा फरक केला जातो. स्त्रियांना घर खर्च, कपडे, दागदागिने, किराणा माल, भाजीपाला इत्यादी खरेदी पलीकडे फार काही स्वातंत्र्य नसते. ही स्थिती बदलली पाहिजे. गुंतवणुकी संदर्भात, टॅक्स प्लॅनिंग संदर्भात चर्चा सुरू असेल तेव्हा स्त्रियांनी त्यात सहभाग स्वतःहून घेतला पाहिजे. आपला समाज आर्थिक साक्षर करायचा असेल तर स्त्रियांना प्रथम आर्थिक साक्षर केले पाहिजे. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य दिले पाहिजे.

६) एका उणीवेची जाणीव

आपल्या मराठी माणसांत सेल्स आणि मार्केटिंग बाबत अनामिक भीती, दबाव, न्यूनगंड किंवा एक वेगळीच कमीपणाची भावना जाणवते. सेल्स आणि मार्केटिंग अवघड वाटले तरी ते शिकले पाहिजे. तरच आपल्याकडे उद्योग व्यवसाय संस्कृती रुजेल.

७) संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग.

आपल्यावर आर्थिक संकट कधीही येऊ शकते. अशावेळी आपल्याकडे पैसे असतील तरच आपण अशा संकटावर मात करू शकू. यासाठी आपल्याकडे आपत्कालीन फंड असला पाहिजे. तो जर नसेल तर तो आपण तयार केला पाहिजे. आपण आर्थिक दृष्ट्या साक्षर झालो तर या जगात आपला टिकाव लागेल. आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने केल्याने ९९ टक्के लोक संकटात येतात.

८) पुस्तक वाचनातून अर्थसाक्षरतेकडे.

वाचन केल्याने तुम्ही ज्ञानी होता. म्हणून व चिंतन केल्याने त्या ज्ञानाचा कसा उपयोग करायचा हे तुम्हाला समजते. पुस्तक वाचन ही आपल्यातील बदलाची पहिली पायरी आहे आणि प्रगतीचा मार्गही. या धावपळीच्या युगात पुस्तकांसारखा खरा मार्गदर्शक आणि दुसरा मित्र नाही.

९) डाऊन टू अर्थ.

काही लोक नोकरीतून तर काही व्यवसायातून प्रचंड पैसे मिळवतात. असे मिळालेले पैसे ते कसेही खर्च करतात. इतके पैसे खर्च करणे गरजेचे आहे का?
याचा विचारही ते करत नाहीत. खरंतर साधेपणातच सुख समाधान असते. जास्त पैसे आल्यावर आपल्याला नक्की कसे वागायचे आहे, हे कळणे गरजेचे आहे.

१०) वेळेचे महत्व.

वेळेचे आणि कामाचे नियोजन उत्तम प्रकारे करावे लागते.
प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास असतात. त्या वेळेचा आपण कसा सदुपयोग करून घेतो हे महत्त्वाचे आहे. लेखक म्हणतात वेळेचे नियोजन आणि पैसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपला वेळ खूप महत्त्वाचा असून त्याचा आपण कसा वापर करतो, हे फार महत्त्वाचे आहे.

११) कॅश इज किंग.

आपल्याकडे असलेल्या बचतीचा पैसाच आपल्याला प्रचंड ताकद देतो. आपण पैशाचे नियोजन करून योग्य गोष्टी त्याची गुंतवणूक केली पाहिजे. तसेच आपल्या पैशाचे व खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले पाहिजे. लक्षात ठेवा कॅश इज किंग.

१२) समाज माध्यमांचा नियंत्रित वापर.

समाज माध्यमांचा नियंत्रित वापर करावा. त्यात वाहवत जाऊ नये. याने आपला खूप वेळ खर्च होतो. समाज माध्यमातून ओळखी वाढवून आपले पोट भरणार आहे का? नवीन गोष्टी शिकण्याऐवजी आपण समाज माध्यमांच्या मागे धावू लागतो हे मृगजळासारखे आहे. करियर घडविण्यासाठी ज्ञान आणि स्किल्सची आवश्यकता असते.

१३) संकटांचा अंदाज असावा.

प्रत्येक गोष्टीत आपली बुद्धिमत्ता उपयोगी पडतेच असे नाही. अशावेळी योग्य तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. असे मार्गदर्शन जर घेतले नाही तर आपण अनेक संकटात सापडू शकतो. खरंतर आपले ज्ञान हे जुजबी माहितीवर आधारित असते ‌. त्यामुळे आर्थिक व्यवहारात, व्यवसायात तोटा होण्याची जास्त शक्यता असते. त्यासाठी वेळीच मार्गदर्शन घ्या. आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक वेळी दक्ष राहणे खूप गरजेचे असते. पैशांचे खेळ सोपे नसतात, प्रफुल्ल वानखेडे आपणास येथे सावध करतात.

प्रफुल्ल वानखेडे यांच्या विषयी

प्रफुल्ल वानखेडे

हे पुस्तक एका प्रस्थापित लेखकाने लिहिलेले नाही.
केल्व्हिन व लिक्विगॅस सह पाच कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष प्रफुल्ल वानखेडे यांनी लिहिले आहे. भारतात आणि 18 देशात त्यांच्या कंपन्या व्यवसाय करतात. भारतात टाटा, महिंद्रा, वेदांता, बजाज, गोदरेज, एल अँड टी, मर्सिडीज बेंन्झ, ब्रिटानिया, सिप्ला, कोलगेट, डाबर इत्यादी कंपन्या वानखेडे यांच्या कंपन्यांचे ग्राहक आहेत. जागतिक एल पी जी असोसिएशनचे ते सदस्य आहेत.

एका सामान्य कुटुंबातून येणारा मुलगा एक यशस्वी उद्योजक कसा होतो हा प्रवास त्यांनी ‘ गोष्ट पैशापाण्याची ‘ पुस्तकात मांडला आहे.

उद्योग करण्यासाठी कोणता गृहपाठ करणे गरजेचे आहे.? एका मुलाखतीत ते म्हणतात उद्योग व्यवसायासाठी रिस्क ही नेहमी असते. तुमच्याकडे कॅल्क्युलेटेड रिस्क नसेल तर उद्योगात अपयशी होण्याची शक्यता जास्त असते. यश आणि अपयश चालूच राहते. ती प्रोसेस आहे. यशाचा ग्राफ दोन प्रकारे असतो. एक सरळ रेषेत वर जाणारा तर दुसरा टप्प्या टप्प्याने वर जाणारा. उद्योग हा पैसा कमावण्यासाठी केला जातो. उद्योग करण्यासाठी होमवर्क आहे, बेसिक शिक्षण आहे. अनेक गोष्टी समजून घेऊन मगच तुम्ही उद्योग सुरू करावा. तसेच यात मॅच्युरिटी आल्यावर नंतर आपण स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा.

मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात वानखेडे म्हणाले मी लिहिणारा माणूस नाही. समाज माध्यमात सुद्धा आत्ता सहा महिन्यांपासून आहे. या पुस्तकातील कन्टेन्ट जिवंत होता. तो आपल्या मातीतील आहे. त्यामुळेच सहा महिन्यात या पुस्तकांने एक लाख प्रतींचा टप्पा ओलांडला. वाचकांचे हे यश आहे असे ते मानतात.

जगातल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थेत सध्या आपला समावेश होतो ,आणि पुढच्या पाच वर्षांमध्ये जगातल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्थेत आपला समावेश होईल. प्रत्येक गोष्ट ही शक्य तितकी सोपी करावी हा अल्बर्ट आईन्स्टाईन चा सिद्धांत प्रफुल्ल वानखेडे यांनी मांडला. बऱ्याच मुलाखतींमध्ये वानखेडे यांनी या सिद्धांताचा पुनरुच्चार केलेला आपल्याला दिसून येतो.

हे पुस्तक वाचून तुम्ही हमखास श्रीमंत व्हाल, यशस्वी व्हाल किंवा भरपूर पैसे कमवायला लागाल असे मी अजिबात म्हणणार नाही. पण हे पुस्तक वाचल्यावर आपल्यासाठी पैसा नक्की का गरजेचा आहे, आलेल्या पैशाचं नक्की काय करायला हवं. जीवनात आनंदी राहण्याचे उपाय यात नक्की मिळतील.

3 thoughts on “गोष्ट पैशापाण्याची : प्रफुल्ल वानखेडे”

  1. खूप सुंदर पणे पुस्तकाचे सारांश लेखन व विवेचन केले आहे.

    Reply

Leave a Comment