Sharad Tandale | द आंत्रप्रेन्युअर ले. शरद तांदळे. या पुस्तकाची समरी

Sharad Tandale | द आंत्रप्रेन्युअर या पुस्तकाची समरी

Sharad Tandale
द आंत्रप्रेन्युअर

Sharad Tandale | द आंत्रप्रेन्युअर -ले. शरद तांदळे. या पुस्तकाची समरी.

द आंत्रप्रेन्युअर हे पुस्तक शरद तांदळे(Sharad Tandale) यांचे एक प्रकारचे आत्मचरित्रचआहे. यात त्यांनी आपल्या आयुष्यातील वास्तवतेचे कथन केले आहे. त्यात कुठेही अतिशयोक्ती दिसून येत नाही येत नाही. जे कष्ट प्राय आयुष्य वाट्याला आले ते न कुरकुरता अगदी सहजतेने त्यांनी स्वीकारले. यात कल्पना रंजकतेला अजिबात वाव नाही.
दहावीपासून अकरावी सायन्स व त्यानंतर इंजीनियरिंग कॉलेज मधील शिक्षण, व विद्यार्थी देशात येणारे अनुभवांचे प्रामाणिक चित्रण आहे.

यात शालेय जीवनापासून इंजिनिअरिंग कॉलेजमधील शिक्षणात आलेले यशापयश, होस्टेल लाईफ, विद्यार्थी संघटना, अपयशातून आलेले निराशत्व. त्यातून येणारी व्यसनाधीनता त्यांनी आपल्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिली. २००९-१० साली त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. यातही त्यांना कटू अनुभव आले, पण हार न मानता त्यांनी व्यवसाय सुरू ठेवून त्यात यश मिळविले. तो व्यवसाय त्यांनी जिद्दीने यशस्वी करून दाखवला.

त्यामुळेच त्यांना २०१३ मध्ये यूथ इंटरनॅशनल या संस्थेचा आंत्रप्रेन्युअर हा पुरस्कार लंडनमध्ये प्रिन्स चार्लस यांच्या हस्ते देण्यात आला. हा त्यांच्या जीवनातील सर्वोच्च बहुमान आहे. हा पुरस्कार मिळवण्यासाठी अट अशी होती की, कुटुंबातील तुम्ही पहिली व्यावसायिक व्यक्ती असणे आवश्यक होते.

या पुस्तकात त्यांनी त्यांचे व्यावसायिक अनुभव लिहिले आहेत. नवीन व्यावसायिकांना, तरुण पिढीसाठी व वाचकांसाठी हे अनुभव निश्चितच मार्गदर्शक ठरतील. एक लाख प्रतींची विक्री झाल्याने ,मराठी साहित्यात या पुस्तकांने यशोशिखर गाठले आहे.

1) रॅट रेस

देशाने ग्लोबलायझेशनचे धोरण स्वीकारल्याने अनेक परदेशी कंपण्या आपल्या देशात आल्या.
कॉम्प्युटरमुळे नोकऱ्यांसाठी एक नवीन क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे अनेक तरुणांनी कॉम्प्युटर व इंजीनियरिंगला प्रवेश घेतला. डिग्री कोणतीही असो एमबीए केलं की चांगल्या पगाराची नोकरी मिळणार ,हे समीकरण एकविसाव्या शतकात सुरू झाले. खाजगी क्लास वाल्यांनी दहावीपासून मार्कांची स्पर्धा सुरू आणि ही स्पर्धा पुढे आयुष्यात अनेक दिवस (रॅट रेस) सुरू राहते. या स्पर्धेमुळे चित्रकला, साहित्य, नाटक, गाणं, नृत्य ,क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्यांकडे समाजात दुय्यम नजरेने पाहणे सुरू झाले.

2)गुरु / सल्लागार /मेंटर

औरंगाबाद येथे इंजिनियरिंग कॉलेजला मेकॅनिकलला लेखकाला ऍडमिशन मिळाले. पण हे ऍडमिशन मिळवताना लेखकाने विद्यार्थी दशेत चीटिंग केले होते. चीटिंग करून मिळवलेले मार्क्स तुम्हाला कधीच यशापर्यंत घेऊन जाऊ देत नाहीत. परिणामी इंजिनिअरिंगला कमी मार्क मिळाले. तांदळे म्हणतात यातच तुम्हाला कुणीतरी सांगत, विद्यापीठातून खरे विद्यार्थी नेते तयार होतात. या विचारात अनेक जण अडकतात. यामुळेच आपण गुरूच्या किंवा सल्लागाराच्या शोधात राहतो. या नेत्यांच्या मागे अनेक जण जातात व कोणत्यातरी चळवळीत भाग घेतात. तसा तो सहभाग त्यांनीही घेतला. त्यामुळे लेखक पुढे म्हणतात अशा चळवळीत काम केल्याने व भाग घेतल्याने आपल्या आयुष्याचे वाटोळे होते. हा सावधानतेचा इशारा पुढच्या पिढीसाठी आहे. यासाठी या टप्प्यावर योग्य गुरू किंवा मार्गदर्शक शोधून निर्णय घेतले पाहिजेत.

3)नोकरी

योगी इंजिनियरिंग या छोट्या कंपनीत लेखकाला जॉब मिळाला. यावेळी मेहनत कशी करावी हे बिहारी वर्कर्सकडून लेखकाला कळले. त्यातील एक बिहारी लेखकाच्या आयुष्यातील पहिला गुरु झाला. मेहनत घेणे म्हणजे काय असते हे त्याने कृतीतून दाखवून दिले. जॉब/नोकरी मिळविण्यासाठी चांगले मार्क्स व फ्लुएंट इंग्रजी बोलता येणे आवश्यक आहे. या गोष्टींची तयारी तरुणांनी कॉलेज जीवनापासून केली पाहिजे. तरच चांगल्या कंपनीत नोकरी मिळू शकते.

4)संघर्ष

तुमचं नैराश्य, दुःख समजून घ्यायला कुणालाच वेळ नाही. इथे फक्त यशाचीच भाषा चालते. तुमच्या निराशेच्या काळात पुस्तक हे तुमचा चांगला मित्र बनते. या काळातच लेखकाला वाचनाची सवय जडली, की जी पुढील आयुष्यात फार उपयोगी आली.
प्रेरित होऊन सकाळी उठणे, दर दिवशी उत्साहाने कामाला सुरुवात करून ऊर्जामय राहणं.
आपल्या आवडत्या कामात स्वतःला झोकून देणे ,व सतत काम करीत राहणं म्हणजे यश.

5)प्रेरणा:

मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण नैराश्याच्या खाईत गेलेला आहे. जीवनात यश मिळविण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी, आपला घोर अपमान झाला पाहिजे असा विचार सोडून दिला पाहिजे.
दुसऱ्याने व्यवसायात यश मिळवले, ते पाहून आपल्यालाही व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा येईल. पण इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, व्यवसायात यश मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची ,आपली तयारी असली पाहिजे. घरच्यांनी बचत करून ठेवलेले पैसे, घेऊन जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर सावधान. आपल्या अकर्तृत्वाने असे पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणताही व्यवसाय घरच्यांचे पैसे घेऊन सुरू करू नका ,असा सल्ला लेखक आपल्याला देत आहे.
कारण व्यावसायिक जगात फक्त पैशाचीच भाषा बोलली जाते.

Other Book Summary: गोष्ट पैशापाण्याची : प्रफुल्ल वानखेडे

स्टार्ट अप :

व्यवसायात सातत्याने आपण अपग्रेड राहिले पाहिजे. व्यवसायातील थोड्याशा यशाने आपल्यात ॲटिट्यूट यावयास लागतो. दुसऱ्यांना कमी लेखण्याची वृत्ती वाढीस लागते. परिणामी मित्रपरिवार व इतर लोक आपल्यापासून दूर जाऊ लागतात. यासाठी आपण नेहमी डाऊन टू अर्थ असले पाहिजे. प्रत्येक छोट यश हे व्यवसायात आपल्याला मोठ्या यशाकडे घेऊन जाते. व्यवसाय सुरू करताना आपल्याला काय करावयाचे आहे हे माहीत असणं गरजेचे आहे. आपल्याला अनेक गोष्टी शिकाव्या लागतात व माहित करून घ्याव्या लागतात. तरच आपण व्यवसाय करू शकू.

व्हिजन फक्त उघड्या डोळ्यांनी तयार होत असतं. काय केल्यावर आपण काय होऊ शकतो किंवा करू शकतो. व्हिजन ठरवताना आपल्याला वास्तवाचं भान असावं लागत.

जबरदस्त महत्वकांक्षा / ॲस्पिरेशन :

सुरुवातीला लेखकाला केबल, स्टीट लाईट, ट्रांसफार्मरची कामे मिळाली. त्यानंतर त्यांना एमएसईबीची कामे मिळाली. पण त्यानंतर रोड, पाणीपुरवठा, लेबर सप्लाय इत्यादी प्रकारची कामे लेखकाने मिळवली व आपल्या व्यवसायाची वृद्धी केली. काम मिळाविताना लेखकाने दिलेला सल्ला मोलाचा आहे. लेखक म्हणतात काम मिळवताना ,व ती पूर्णत्वास नेताना आपल्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असला पाहिजे. पण गरज पडेल तेथे कडू आणि स्पष्टच बोलले पाहिजे. सतत गोड बोलत राहिलं तर लोक आपलं दिवाळं काढतील.

व्यवसायात पैसा फिरवता आला पाहिजे. जसं रक्त जमा झाले की गोठतं आणि खराब होतं, तसंच पैसा एका जागी जमा झाला की तो वाढत नाही तो इतर व्यवसायात फिरला तरच वाढेल. व्यवसायात काहीच फुकटात मिळत नाही.

बॉस/ मालक :

व्यवसायात आपल्या वैयक्तिक दुःखाचं भांडवल करणे चांगलं नसतं. व्यवसायात काही वेळा लेखकाला अपयश आले तरी लेखक नैराश्यात गेला नाही. कारण लेखक सतत पुस्तकांचे वाचन करीत होता. काम आणि वाचन या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की दुःखाची तीव्रता कमी होत असते. याच काळात शरद तांदळे (Sharad Tandale) यांनी आपल्या व्यवसायातून जास्त रोजगार निर्माण केला होता. त्यांचे हे कार्य पाहून बँक ऑफ बडोदा, आणि बीवायएसटीने त्यांना २०१२ मध्ये एक्सलन्स अवॉर्ड दिला.

व्यवसाय आपल्याजागी आणि आपले मित्र त्यांच्या जागी हे सूत्र व्यावसायात कधीही विसरू नये. तरुण उद्योजक झालो की लगेचच विविध संघटनांमार्फत सामाजिक कार्य करणे, युवा नेते होणे टाळावे. आपल्या शब्दावर दुसऱ्या कुणाला मटेरियल किंवा मध्यस्थीने पैसे देऊ नयेत. कारण यात आपल्यालाच दुसऱ्याचे पैसे भरावे लागतात. तेव्हा सावधान!

पॅशन/विशेष आवड :

पाश्चिमात्य ते लेखक जसे स्वतःच्या पुस्तकाचं मार्केटिंग करतात. तसे आपणही मार्केटिंग करणे शिकले पाहिजे. लेखकाला कमी पैसे मिळतात हा समाज आता नव्या पिढीतील लेखकांनी मोडून काढला पाहिजे. पुस्तक कोण वाचतं हा समाजात पसरलेला गैरसमज आहे.

अब्दुल कलाम, छ. शिवाजी महाराज, म. फुले,रतन टाटा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,म. गांधी यांची चरित्रे आपण वाचली पाहिजेत. असा सल्लाही ते देतात.

एक योगायोग :
लो. टिळक ग्रंथालय आयोजित तिसरे पंचक्रोशी साहित्य संमेलन रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी, रमेश गरवारे सभागृहात आयोजित केले होते. या साहित्य संमेलनास शरद तांदळे (Sharad Tandale) हजर होते. त्यांनी अतिशय चांगले मार्गदर्शनपर भाषण केले. मीही या कार्यक्रमास हजर होतो. तसं पाहिलं तर शरद तांदळे(Sharad Tandale) यांना प्रत्यक्ष पाहण्याचा व ऐकण्याचा माझा तो पहिलाच प्रसंग. त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांना लगेचच पुण्याला जायचे असल्याने ते थोडाच वेळ ग्रंथालयाच्या ऑफिसमध्ये थांबले. त्यांना भेटायला येणाऱ्यांची गर्दीही बऱ्यापैकी होती. या गर्दीतही मला त्यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता आले याचे मला समाधान आहे. माझ्याजवळ असलेल्या

” द आंत्रप्रेन्युअर “ या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यांनीही ती खुशीने दिली.

एवढ्या मोठ्या लेखकाला ( जरी मी लेखक असलो तरी ) भेटण्याचा आनंद काही औरच होता. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

त्यांचे रावण राक्षसांचा राजा ही कादंबरी मी अजून वाचली नाही पण लवकरच ती वाचेन. वाचल्यावर त्यावरही लिहिणार आहे. द आंत्रप्रेन्युअर व रावण राक्षसांचा राजा ही शरद तांदळे(Sharad Tandale) यांची पुस्तके प्रत्येकी लाखांच्यावर विक्री झालेली आहेत. या पुस्तकांचे तमिळ, हिंदी व इंग्रजी भाषेतही ट्रान्सलेशन झाले आहे. ते स्वतःच आपल्या पुस्तकांचे मार्केटिंग करतात ही खरोखर कौतुकाची बाब आहे.

द आंत्रप्रेन्युअर हे पुस्तक माझ्या वाढदिवशी माझे पुण्याचे नातेवाईक निखिल मोरे यांनी सप्रेम भेट दिले होते. शरद तांदळे(Sharad Tandale) यांची भेट होईपर्यंत मी ते वाचून पूर्ण केले होते. त्यामुळेच पुस्तकावर त्यांची सही घेऊ शकलो, हा एक योगायोग म्हणावा लागेल.

View On Amazon: द आंत्रप्रेन्युअर

Leave a Comment