Narak Chaturdashi नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी.(Narak Chaturdashi)
अश्विन वद्य चतुर्दशी या दिवसाला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) असे म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडविले. जगातील एक मोठे संकट दूर झाले. नरकासुराचे प्रतीक म्हणून कारीटीचे फळ पायाखाली तुडविण्याची प्रथा आहे.
नरकासुराची कथा.
नरकासुर हा प्राग्ज्योतिपूरचा राजा होता. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा वर मागून घेतला होता. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले. तो देव मानवांचा छळ करीत असे. सुमारे सोळा हजार स्त्रियांना त्याने पळवून नेले. त्याने मणिपर्वतावर एक नगर बसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले होते. तसेच त्याने अगणित संपत्ती लुटली होती. अशा हव्यासापोटी त्याने देवमाता आदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले.
देव, गंधर्व, मानवांना नरकासुर अतिशय तापदायक झाला होता.स्वर्गलोकावर हल्ला करून ते बळकाविण्याचा त्याचा बेत होता. त्याच्याकडे असलेल्या प्रचंड सैन्यामुळे देवही हतबल झाले होते.
श्रीकृष्ण नरकासुर युद्ध.
देव, गंधर्व, मानव यांचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने आपली सेना सज्ज केली. नरकासुराचा वध करण्यासाठी तो गरुडावर आरुड झाला. त्यावेळी ” मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार “असा सत्यभामेने हट्ट केला. स्त्री बरोबर युद्ध केल्याशिवाय नरकासुराला मरण येणार नाही, अशी भविष्यवाणी असल्यामुळे श्रीकृष्णाने सत्यभामेला आपल्याबरोबर घेतले.
श्रीकृष्णाने आपल्या सेनेसह नरकासुराच्या राज्यावर आक्रमण केले. दोन्हींकडून घनघोर युद्ध सुरू झाले. दोन्हीकडून बाणांचा व शस्त्रांचा वर्षाव सुरू झाला.
या वेळी श्रीकृष्णाच्या हातातील शारंगधनुष्य सत्यभामेने स्वतःकडे घेतले. सत्यभामा नरकासुरावर बाणांचा वर्षाव करू लागली. सत्यभामेला समोर पाहताच नरकासुर गोंधळाला. त्याला श्रीकृष्णाचा राग आला. त्याने श्रीकृष्णावर वजरास्त्र सोडले. श्रीकृष्णाने सत्यभामेला पाठीशी घालून नरकासुरावर आपले सुदर्शन चक्र सोडले.
सुदर्शन चक्राने नरकासुराच्या मस्तकाचा वेध घेऊन मस्तक धडापासून वेगळे केले. अश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी रात्री तीन प्रहरी चंद्रोदय होताच श्रीकृष्णाने नरकासुराला ठार केले. सगळीकडे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सोळा हजारो स्त्रिया नरकासुराच्या बंदीवासातून मुक्त करण्यात आल्या. प्रजेने दिवे लावून हा आनंदोत्सव साजरा केला.
नरकासुराच्या बंदीवासातील कुमारीकांना स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून श्रीकृष्णाने या सोळा हजार कन्यांसोबत सोबत विवाह केला. व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. अशी ही एक आख्यायिका आहे.
मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला ” आजच्या या तिथीला जो मंगल- स्नान करून दिवे लावेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. ” श्रीकृष्णाने नरकासुराला तो वर दिला.
कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या (Narak Chaturdashi) दिवशी अलक्ष्मी चे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरुपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करावयाचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे.
या दिवशी अभंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.
Other Articles –