शारदीय नवरात्र (Navratri) 2024
देवीचे नवरात्र.(Navratri)
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस शारदीय नवरात्र (Navratri) किंवा देवीचे नवरात्र असते. नवरात्र म्हणजे नऊ दिवस नवरात्र आणि दहावे शिलंगण असे म्हणतात. यां दिवसांत स्त्रिया नवरात्राचा उपवास करतात. आपल्या घरात देवाच्या उजव्या बाजूस मातीची वेदी करून त्यावर जलाने भरलेला कलश ठेवतात. यालाच घटस्थापना म्हणतात. त्या कलशाला गंध, फुल, अक्षदा, दूर्वा, सुपारी, एक नाणे, पंचपल्लव घालतात. त्या कलशावर पूर्ण पात्र ठेवून त्यावर देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.
पहिल्या दिवशी अशी देवी ठेवली की नऊ दिवस तिला तेथून हलवायचे नसते. दररोज देवीची पंचोपचारांनी पूजा करतात. रोज एक एक माळ बांधायची असते. ही माळ शक्यतो तिळाच्या फुलांची असते. देवी जवळ नऊ दिवस अखंड दिवा नंदादीप लावायचा असतो. तो विझू द्यायचा नाही. गोड पक्वांनाचा नैवेद्य दररोज दाखविला जातो. शेवटी त्यावर कडकण्या बांधून झाल्यावर, आरती झाल्यावर नवरात्र (Navratri) उठवितात.
नवरात्रात देवीची पूजा का करावयाची याविषयीच्या काही कथा.
कथा एक.
पूर्वी दुर्गम नावाचा एक भयंकर दैत्य/राक्षस होता. ब्रह्मदेवाच्या वाराने तो उन्मत्त झाला होता. सर्व देवांना त्रास देऊन त्याने सळो की पळो करून सोडले होते. अनेक ऋषीमुनींना त्याने ठार मारले. त्यांचे यज्ञ नष्ट केले. तेव्हा सर्व ऋषीमुनींनी आदिशक्तीची/ आदीमातेची आराधना केली. प्रसन्न झालेल्या आदिशक्तीने भयंकर रूप धारण करून दुर्गम राक्षसाचा नाश केला. म्हणून तिला दुर्गा देवी असे नाव मिळाले.
कथा दोन.
महिष नावाचा एक भयंकर राक्षस होता. तो देवांना त्रास देऊ लागला. तेव्हा ब्रह्मा- विष्णू -महेश यांनी देवीची आळवणी केली. दुर्गादेवी अष्टदशाभुजा उग्ररूप धारण करून विंध्य पर्वतावर आली. तेथे दुर्गा देवीचे व महिषासुराचे मोठे युद्ध झाले. शेवटी दुर्गादेवीने महिषासुराच्या छातीवर पाय दिला व त्याला ठार मारले. म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी असे नाव मिळाले.
कथा तीन.
शुभं- निशुंभ या दोन राक्षसांनी देवांचा पराभव करून स्वर्गावर स्वारी केली. तेव्हा सर्व देव आदिमातेला शरण गेले. त्यावेळी देवीने अंबिका, चंण्डा व मुण्डा ही रूपे धारण केली. तिने वाघाचे कातडे परिधान केले. गळ्यात रुंडमाळ घातली. तिची भयंकर जीभ तोंडातून बाहेर लोंबत होती. तिने चण्ड- मुण्डांशी युद्ध करून त्यांना ठार मारले. तिच्या या पराक्रमामुळे तिला चामुंडा नाव मिळाले.
अशी आहे आदिमाता दुर्गा भवानी. या देवीने नऊ दिवस नऊ अवतार धारण करून दुष्ट दुर्जनांचा नाश केला, म्हणून नवदुर्गेचे नवरात्र साजरे करावयाचे असते. दुर्जन उन्मत्त झाली की हीच आदिशक्ती प्रगट होते व दुष्टांचे निर्दालन व सज्जनांचे संरक्षण करते. ही परमेश्वरी शक्तीच जगाचा उद्धार करते अशी लोकांची श्रद्धा आहे. नवरात्रात नऊ दिवस या देवीची महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या स्वरूपात पूजा करावयाची असते. नवरात्रीचा हा उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या उत्साहात, भक्ती भावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात कोल्हापूर येथील महालक्ष्मी, व तुळजापूर येथील आई तुळजाभवानी येथे फार मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. हजारो लाखोच्या संख्येने भाविक दर्शनाला जातात.
बंगालमधील दुर्गापूजा.
दुर्गापुजा हा बंगाली लोकांचा सर्वात मोठा सण आहे. महिषासुर मर्दिनी दुर्गादेवी सिंहासह असते. दुर्गादेवीने महिषासुराच्या छातीवर पाय दिला व त्याला ठार मारले म्हणून तिचे नाव महिषासुर मर्दिनी असे पडले.
महिषासुरमर्दिनी ही रणचंडी आहे. तिचे रूप भयंकर असते. तिने जीभ तोंडा बाहेर काढलेली असते व तिचे डोळे रागाने लाल झालेले असतात. तिच्या हातात वेगवेगळी शस्त्रे असतात. एका हातात तलवार उगारलेली दिसते तर दुसऱ्या हातात राक्षसाचे मुंडके धरलेले असते. राक्षसाच्या अंगावर पाय देऊन ती नाचते आहे अशी दुर्गा देवीची मूर्ती असते. दुर्गापूजा उत्सव बंगालचा राष्ट्रीय उत्सव मानलेला आहे.
पहिले चार दिवस देवीपुढे सजावट केली जाते. पाचव्या व सहाव्या दिवशी देवीला आवाहन करून तिची सोडशोपचाराने पूजा केली जाते.सात,आठ,नऊ हे दिवस या उत्सवाचे महत्त्वाचे दिवस मानले जातात. देवीच्या मंडपात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व चंडी- पाठ पठण नऊ दिवस चालतो.
काली माते की जय, दुर्गा देवी की जय, अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमत असतो. या काळात खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात चालतात. बंगालमध्ये या काळात आनंदाला व उत्साहाला उधाण आलेले असते. या काळात सासुरवासिनी माहेरी जातात व दुर्गा देवी उत्सवात आनंदाने भाग घेतात. दहाव्या दिवशी दुर्गादेवीची भव्य मिरवणूक काढतात व समुद्रावर वाजत गाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. नोकरी धंद्या- निमित्त बाहेर गेलेले लोक या उत्सवासाठी आपल्या घरी येतात.
Other Article: Ganpati information in Marathi गणपती उत्सव