भारतरत्न लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri)
२ ऑक्टोबर १९०४ साली लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचा जन्म एका गरीब कुटुंबात, उत्तर प्रदेशातील मोगलसराई येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रामदुलारीदेवी. त्या मोगलसराई येथील रेल्वेच्या शाळेतील मुख्याध्यापक व इंग्रजीचे शिक्षक मुन्शी हजारीमल यांच्या कन्या होत्या. लालबहादूर हे रामदुलारींचं दुसर अपत्य. लालबहादूर दीड वर्षाचे असतानाच १९०६ साली त्यांचे वडील प्लेगच्या साथीत दगावले.तेवीस वर्षाची पत्नी, साडेपाच वर्षाची कन्या व दीड वर्षाचा मुलगा मागे ठेवून घरातील कर्ता पुरुष निघून गेला.
यानंतर मुन्शी हजारीलाल यांनी आपल्या मुलीला नातवंडासह आपल्या घरी आणले. वडिलांनी आधार दिल्याने रामदुलारीवरील संकट काही काळतरी टळले. परंतु दुर्दैव असं की दोनच वर्षांनी १९०८ साली हजारी लाल यांना अर्धांगवायूचा जबरदस्त झटका आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रामदुलारी, लालबहादूर (Lal Bahadur Shastri) व त्यांच्या दोन बहिणी यांच्यावर जणू आकाशच कोसळले. परंतु या वेळेला त्यांच्या मदतीला रामदुलारीचे चुलते मुन्शी दरबारीलाल धावून आले. त्यांनी साऱ्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी उचलली.
शिक्षणाला सुरुवात
दरबारीलाल यांच्या घरात मौलवीच्या हाताखाली मुलांना शिक्षणाचे पहिले धडे देण्याचा रिवाज होता. त्यामुळे मुलांना आधी उर्दू शिकावं लागे. शिक्षणाची दीक्षा देण्याचा मोठा समारंभ असे. त्याला ‘बिस्मिल्ला’ म्हणत. लालबहादूर यांचा बिस्मिल्ला समारंभ नजीकच्या पढझा गावचे मौलवी बुढामिया यांच्या हस्ते पार पडला.
त्यांच्या हाताखाली केवळ उर्दूचेच नव्हे तर ‘ तहजीब ‘ चंही शिक्षण लालबहादूर यांनी घेतलं. तहजीब म्हणजे सामाजिक शिष्टाचार व कॉस्मोपॉलिटिन संस्कृती यांचं मिश्रण. उर्दू साहित्याची विशेषतः कवितेची खास गोडी लाल- बहादूर यांना वाटू लागली. मिर्झा गालिब यांच्या कवितांवरच त्यांचं प्रेम तर अखेरपर्यंत टिकून राहिलं. चुलत आजोबा, आजी, काका यांनी त्याला शिक्षणाची गोडी लावली. त्यामुळे वडील नसले तरी लाल बहादूर यांच्या शिक्षणात अडथळा आला नाही. वडील हयात नसल्याचा त्यांच्या जीवनावर फारसा परिणाम झाला नाही.
१९२५ साली बनारस येथील काशी विद्यापीठातील शास्त्री ही पदवी लाल बहादूर यांनी मिळवली व तेव्हापासून त्यांच्या नावाला ‘शास्त्री’ ही उपाधी जोडली गेली. शाळेच्या हजेरीत त्यांचे नाव लालबहादूर वर्मा असे होते. परंतु वर्मा हे जातीवाचक नाव लावण्याची लालबहादूर यांची इच्छा नव्हती. त्यांनी हेडमास्तरांना अर्ज करून वर्मा आडनाव हजेरीपटातून काढून टाका असे कळविले. हेडमास्तरांनीही त्यांचे आडनाव वगळले, व फक्त लालबहादूर हेच नाव हजेरीपटावर ठेवले.
स्वातंत्र्य आंदोलनाची वैचारिक पायाभरणी :
१९१७ साली लालबहादूर यांनी हरिश्चंद्र हायस्कूल मध्ये सातवीच्या वर्गात प्रवेश घेतला. लालबहादूर यांचे शिक्षक निष्कामेश्वर मिश्रा हे कट्टर देशभक्त होते. शाळेचे काम संपल्यावर ते विद्यार्थ्यांना भारताच्या संपन्न सांस्कृतिक परंपरेची माहिती देत. आपला देश ब्रिटिश लोक येण्यापूर्वी किती संपन्न होता, ब्रिटिशांनी आपलं कसं शोषण केलं हे ते विद्यार्थ्यांना सांगत.
महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तीदायक गोष्टी ऐकावीत. गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, अरविंद घोष, लाला लजपतराय या नेत्यांनी हाती घेतलेल्या चळवळीची ते माहिती देत. स्वातंत्र्य आंदोलनासाठी देशाला तरुणांची गरज आहे असं ते सांगत.
बकीम चंद्रांची ‘आनंदमठ’ही कादंबरी वाचून लाल बहादूर यांना खूप आनंद झाला. डॉ.ॲनी बेझंट यांच्या विचारांचा प्रभावही त्यांच्यावर पडला. यामुळे त्यांच्या मनात देशभक्ती- चा स्फुल्लिंग धगधगू लागला. भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी चळवळीत झोकून द्यायला हवे असं त्यांना वाटू लागले.
लालबहादूर शास्त्री book
स्वातंत्र्य चळवळीत सहभाग.
१९२१ साली गांधीजींची बनारसला मोठी सभा भरली होती. अलगू राय, त्रिभुवन नारायण सिंग या आपल्या मित्रांबरोबर लालबहादूर या सभेला हजर होते.
“तरुणांनी सरकारी शाळेवर बहिष्कार घालावा. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेत शिकावे आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यावा. भारत मातेला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी देशाला तुमची गरज आहे. ते तुमचे कर्तव्य आहे,”असे गांधीजींनी तरुणांना आवाहन केले. दुसऱ्याच दिवशी शास्त्रींनी शाळेतून नाव काढले व भारत मातेची सेवा करणे हाच आपला धर्म, तेच आपले कर्तव्य मानले.
गांधीजींच्या आदेशानुसार जे.बी. कृपलानी यांनी सरकारी नोकरी सोडून खादीचा प्रसार करण्यासाठी आश्रम काढला. लालबहादूर व त्यांचे मित्र खादीची विक्री करू लागले.
गांधीजींच्या प्रेरणेने बनारस येथे काशी विद्यापीठाची स्थापना झाली. हिंदी माध्यमातून शिक्षण देणारे ते देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले.हे विद्यापीठ असहकार चळवळीचे प्रतीक आहे. तेथे राष्ट्रीय शिक्षण दिले जाईल. मुलांनी या राष्ट्रीय विद्यापीठात प्रवेश घेऊन राष्ट्रकार्याला हातभार लावावा असे आवाहन म. गांधी यांनी केले लाल बहादूर व त्यांच्या मित्रांनी या विद्यापीठात प्रवेश घेतला. अशाप्रकारे लालबहादूर स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले. लालबहादूर काशी विद्यापीठात रमू लागले.
१९२५ साली ते पदवी अभ्यासक्रम पहिल्या वर्गात पास झाले. त्यांनी ‘शास्त्री ‘ही पदवी मिळविली. ही पदवीच त्यांचे कायमचे आडनाव होऊन बसली.
पं. नेहरूंचे मदतनीस.
असहकार आंदोलनात लाला लजपत राय यांनी भाग घेतला. त्यामुळे त्यांना इंग्रज शिपायांनी लाठीने झोडपून काढले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेने शास्त्रींना फार दुःख झाले.
१६ मे १९२८ रोजी लाल बहादुर व ललिता यांचा विवाह झाला. हुंडा म्हणून काहीही घेण्यास शास्त्रींनी नकार दिला केवळ चरखा व खादीच कापड त्यांनी स्वीकारलं. शास्त्रींपेक्षा ललितादेवी सात वर्षांनी तरुण असल्या तरी समजूतदार होत्या. त्यांनी आपल्या पतीचा सल्ला मानला.
” तू तुझ्या सर्व रेशमी साड्या वाटून टाक आणि खादी वापरायला लाग,” असं शास्त्रींनी त्यांना सांगितले. तेव्हा त्याच दिवसापासून त्यांनी खादीच्या साड्या वापरायला सुरुवात केली ती अखेरपर्यंत. जीवनातील भल्याबुऱ्या दिवसांना, सुखाच्या व कसोटीच्या क्षणांना दोघेही आनंदाने सामोरे गेले. शास्त्री नऊ वर्षे तुरुंगात होते. त्या काळात ललितादेवींनी घर सांभाळलं. मुलाबाळांचं संगोपन केलं.
१९२३ पासून पुरुषोत्तम- दास टंडन यांच्या हाताखाली शास्त्रीजी काम करू लागले अलाहाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करण्याची जबाबदारी टंडन यांनी शास्त्रींवर सोपविली. शास्त्रींचा अत्यंतिक वक्तशीरपणा व कामाला अखंडपणे वाहून घेण्याची त्यांची वृत्ती पाहून टंडन प्रभावित झाले. टंडन यांनी हळूहळू काँग्रेस पक्षाची कामेही शास्त्रींकडे सोपविली.
पं. नेहरू १९२९साली काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांचा कामाचा व्याप वाढला. पत्रव्यवहाराची सर्व कामे त्यांनी शास्त्रींवर सोपविली. हिंदी, इंग्रजी, उर्दू, अशा तिन्ही भाषांतील पत्रव्यवहार शास्त्रीजी चोखपणे पार पाडीत.
शास्त्रीजींचा कामातील उरक, त्यांचा प्रामाणिकपणा पाहून नेहरूंचा त्यांच्यावरील विश्वास वाढू लागला. अडचणीची कामे ते शास्त्रींवर सोपवू लागले.
शास्त्री स्वातंत्र्य सैनिक.
गांधींनी दांडी यात्रा काढून मिठाचा कायदेभंग केला. त्यामुळे गावोगावी कायदेभंगाच्या चळवळी सुरू झाल्या. गावोगावी सरकारला भाडे न देण्याच्या चळवळीत शास्त्रींनी भाग घेतला. त्यामुळे इंग्रज सरकार खवळले. शास्त्रीजींना अटक होऊन अडीच वर्षांची कारावासाची शिक्षा झाली.
त्यानंतर गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. परदेशी मालावर जनतेने बहिष्कार घातला. शास्त्रींनी या चळवळीत भाग घेतला. शास्त्रींना पुन्हा तुरुंगात पाठविण्यात आले.
1930 ते 1945 या काळात स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल शास्त्रींना सात वेळा तुरुंगवास भोगाव लागला. त्यांनी आपल्या जीवनातील नऊ वर्षे तुरुंगवासात काढली. तुरुंगातील सहकारी काँग्रेसजणांना शक्य ती मदत ते करीत. तुरुंगात ते भरपूर वाचनही करीत. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा भाग असलेल्या विविध आंदोलनात शास्त्री हिरीरीने सहभागी झाले.१९३०,१९३२ ते १९३४ मध्ये विविध मुदतीच्या कारावासाची त्यांना शिक्षा झाली.
मंत्री ते पंतप्रधान.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.पं. नेहरू देशाचे पंतप्रधान झाले.१९४६ साली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या संसदीय सचिव- पदी त्यांची नियुक्ती झाली. नंतर ते गृह व वाहतूक खात्याचे मंत्री झाले. १९५१ मध्ये पं. नेहरूंनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं व काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस- पदी त्यांची नेमणूक केली.
त्यामुळे १९५१-५२ मध्ये भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी त्यांच्यावर येऊन नंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे व वाहतूक, दळणवळण व वाहतूक वाणिज्य व उद्योग आणि गृहमंत्री पद ही भूषविले
रेल्वेमंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य.
१३ मे १९५२ रोजी रेल्वे व वाहतूक खात्याचे मंत्री म्हणून शास्त्रींचा शपथविधी झाला. रेल्वेच्या सुधारणेच्या सर्व योजनांना त्यांनी उत्तेजन दिले. दूर अंतरावरील गाड्यांतून तिसऱ्या वर्गातील उतारूंसाठी शायिकांची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. सामान्य माणसाच्या दृष्टीने ही महत्त्वाची सोय होती.
त्यांनी भोजनालय व कंडक्टर यांची सोय असलेली जनता ‘ कॅरीडॉर ट्रेन ‘सुरू केली. त्यांच्याच काळात कमी अंतरावरील गाड्यांना पहिल्या वर्गाच्या डब्यांची जोड सोय आणि दिल्ली मुंबई ,मद्रास व कलकत्ता या स्टेशनांदरम्यान वातानुकूलित द्रुतगतीने धावणाऱ्या गाड्या सुरू झाल्या. तिसरा वर्ग रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली. रेल्वे खात्याकडे रेल्वेवरील खानपान सेवा सोपवून त्यांनी खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारला.
रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा.
१९५६ मध्ये मेहबूबनगर इथं रेल्वे अपघात होऊन ११२ जण ठार झाले. त्यामुळे शास्त्रीजी बेचेन झाले. रेल्वेमंत्री या नात्याने या अपघाताची जबाबदारी पत्करून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवून दिला. परंतु पंतप्रधानांनी तो स्वीकारला नाही. दुर्दैवाने नोव्हेंबर १९५६ मध्ये दक्षिण भारतातील अरिवाळूर इथं दुसरा रेल्वे अपघात झाला.
त्यात १४४ प्रवासी मरण पावले . त्याची नैतिक जबाबदारी पत्करून शास्त्रींनी पुन्हा राजीनामा दिला. यावेळी राजीनामा मंजूर करण्याचा आग्रह शास्त्रींनी नेहरूंना केला. नाईलाजाने नेहरूंनी तो मंजूर केला. मंत्र्यांच्या तसा थेट संबंध नसूनही नैतिक जबाबदारी पत्करून कॅबिनेट मंत्र्यांन राजीनामा देण्याची ही पहिलीच घटना होती.
शास्त्रींच्या राजीनामामुळे त्यांची नैतिक प्रतिमा अधिकच उंचावली. राजकीय वर्तनाचा नवा पायंडाच त्यांनी घालून दिला. या राजीनाम्यामुळे पं. नेहरूंशी त्यांचीअधिकच जवळीक निर्माण झाली.
चीनच आक्रमण.
ऑक्टोबर १९६२ मध्ये चीननं भारतावर आक्रमण केलं व देशात आणीबाणी लागू करण्यात आली. गृहमंत्री या नात्याने शास्त्रींवर आणीबाणी अमलात आणण्याची जबाबदारी होती. या आणीबाणीत सरकारने अनेक अधिकार स्वतःकडे घेतले असले तरी लोकांच्या स्वातंत्र्याला धक्का पोहोचणार नाही अशी काळजी शास्त्रींनी घेतली.
डिसेंबर १९६२ मध्ये चीननं फौजा काढून घेतल्या तरी भारतात आणीबाणी काही काळ चालूच ठेवण्यात आली होती.
भारत नेपाळ संबंध.
पं. नेहरूंनी शास्त्रींना मार्च १९६३ मध्ये नेपाळला पाठविले. चीन व पाकिस्तान यांच्या बाजूने झुकत आहे अशी चिन्ह दिसू लागली होती. शास्त्रींनी आपल्या सौजन्यपूर्ण वागणुकीने त्यांची मने जिंकली. नेपाळशी मित्रत्वाचे आणि विश्वासाचे संबंध निर्माण करण्यात शास्त्रीजी यशस्वी ठरले.
नेहरूंचा मृत्यू व शास्त्रींची पंतप्रधानपदी नियुक्ती.
२७ मे१९६४ रोजी पहाटे पंडितजींना हृदयविकाराचा झटका आला. व त्यात त्यांचे निधन झाले.
आता देशाचा नेता कोण होणार. आता पुढे काय होणार असे प्रश्न कित्येक भारतीयांच्या मनात उभे राहिले.३० मे रोजी लालबहादूर यांनी इंदिरा गांधींची भेट घेतली व त्यांनी देशाचं नेतृत्व करावे असं सुचविले. परंतु इंदिराजींनी याला नकार दिला.
२ जून १९६४ रोजी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत गुलझारीलाल नंदा यांनी शास्त्रांच नाव सुचविले. त्याला मोरारजी देसाईंनी अनुमोदन दिल. दुसरं कोणाचेच नाव नेते पदासाठी सुचवलेलं नसल्याने शास्त्रींची निवड बिनविरोध झाली.
त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती.
देशाची परिस्थिती कशी आहे, देशापुढे कोणत्या अडचणी, प्रश्न आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव होती. सर्वांच्या सहकार्याने अडचणीतून मार्ग काढून देशाला प्रगतीपथावर नेण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
देशाच्या संरक्षण यंत्रणेचे आधुनिकीकरण, संरक्षण- सिद्धतेसाठी अनेक उपाययोजना, त्यासाठी परदेशातून मदत मिळवणे, अन्नधान्याची टंचाई दूर करणे, महागाई आटोक्यात ठेवणे, अशा महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला.
भारत पाकिस्तान युद्ध.
पाकिस्तानी सैन्याने १ सप्टेंबर १९६५ ला पहाटे भारतावर आक्रमण ३सप्टेंबर रोजी प्रतिहल्ला करण्यास शास्त्रींनी आपल्या लष्कराला अनुमती दिली आक्रमकाच्या भूमीत जाऊन लढा करण्याचा भारताच्या इतिहासातील तो पहिलाच प्रसंग होता.६ सप्टेंबरला भारतीय फौजदांनी लाहोरच्या दिशेने आगेकूच केल्याचा नाट्यपूर्ण परिणाम झाला. अखनूर पुलाच्या दिशेने निघालेल्या पाकिस्तानी तुकड्यांवर भारतीय फौजांनी अचूक वेळी मात केली. भारतीय फौजांनी पश्चिम पाकिस्तानवर प्रतिहल्ला केल्यामुळे पाकिस्तानी सैन्याने आखनूर पूल काबीज करण्याचा नाद सोडून दिला. असं पाकिस्तानचे जनरल मोहम्मद मुसा यांनी म्हटलं.
भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची दाणादाण उडविली. या काळात भारतीय लोकांना आणि लढणाऱ्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा देशाभिमान जागृत करण्यासाठी शास्त्रीजींनी “जय जवान, जय किसान “अशी घोषणा दिली. सारा देश सैनिकांच्या पाठीशी उभा राहिला. या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानचा मोठा भूभाग ताब्यात घेऊन एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली भारताला दैदिप्यमान विजय मिळाला.
पुढे भारत आणि पाकिस्तान यांच्यात रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी शांतता करार झाला. हा करार घडवून आणण्यात रशियाचे पंतप्रधान कोसिजिन यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. ताश्कंद वाटाघाटी इतक्या यशस्वी होतील अशी अपेक्षा कोणीही बाळगली नव्हती. याचे श्रेय पंतप्रधान कोसिजीन यांचं पाठपुरावा करण्याचं कौशल्य आणि लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) व पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान यांनी दाखवलेलं सामंजस्य व सदिच्छा यांना जातं.
लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचे निधन.
१० ते ११ जानेवारी १९६६ च्या रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. व त्यात त्यांचे दुःखद निधन झाले. शास्त्रीजींना त्यापूर्वी १९५९ व जून १९६४ मध्ये हृदयविकाराचे झटके आले होते. हे सर्वांना माहीत असल्याने शास्त्रींना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं या डॉक्टरांच्या अहवालाबद्दल भारतीय शिष्टमंडळाच्या मनात काही शंका येण्याचं कारण नव्हतं. त्याच रात्री ताश्कंद येथे त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांना विजयाचे सुख लाभले नाही असेच आपण म्हणू शकतो.
समारोप.
लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) हे देशाच्या खेड्यात जन्मलेले व साधारण परिस्थितीत वाढलेले होते. पण वैयक्तिक गुणांच्या सामर्थ्यावर ते सत्तेच्या सर्वोच्च पदावर जाऊन पोहोचले, ते भारताचे पंतप्रधान झाले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व जागतिक घडामोडीत त्यांनी प्रचंड यश संपादन केलं.
एक व्यक्ती म्हणून पाहिलं तर शास्त्रीजींमध्ये एखाद्या महात्म्याची नैतिक लक्षण होती. सत्याचा मार्ग त्यांनी कधी सोडला नाही. वैयक्तिक वा व्यावसायिक संबंधांमध्ये ते नेहमीच विनयशील, स्वाभिमानी, दुसऱ्याचा विचार करणारे, शालीन, उदार, निस्वार्थी, सुसंस्कृत व मृदूभाषी असत.
सरकारचे प्रमुख व देशाचे नेते या दृष्टीने पाहिल्यास ते बुद्धिमान, दूरदृष्टीचे, हेतू व निर्णय यांत खंबीर आणि जबर इच्छाशक्ती असलेले होते. सर्व- सामान्य माणसाच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. ते स्वप्नात वावरणारी नव्हते, तर वास्तवतेच त्यांना भान होतं. सत्ता त्यांना भ्रष्टाचारी करू शकत नव्हती. क्षणैक भावनेच्या आहारी जाऊन नव्हे, तर सखोल विचार करूनच ते केव्हाही निर्णय घेत. कोणीही त्यांच्यावर दडपण आणू शकत नव्हतं.
ते परम देशभक्त होते. वयाच्या 16 व्या वर्षापासून त्यांनी आपलं जीवन देशसेवेला वाहिलं होतं. जगातील सर्व धर्माच्या मूलभूत ऐक्यावर त्यांचा विश्वास होता, त्यांची तशी निष्ठा होती. आपल्या देशातील सर्व लोकांनी एक राष्ट्र या भावनेनं राहावं असं त्यांना वाटे.
जगाचा एक नागरिक या नात्याने आंतरराष्ट्रीय शांतता व सलोखा यांचे ते ठाम पुरस्कर्ते होते. अर्थात शांतता हवी, पण सन्मानपूर्वक असा त्यांचा आग्रह असे. जेव्हा भारतावर आक्रमण झालं तेव्हा शांतता प्रेमी शास्त्रींनी देशाचं सार्वभौमत्व व प्रादेशिक एकात्मता यांचं निर्धाराने रक्षण केलं. आणि युद्ध आक्रमकाच्या प्रदेशात नेऊन भिडवलं. देशाच्या सीमेचं रक्षण करण्याचं उद्दिष्ट सफल झालं, तेव्हा त्याच प्रतिस्पर्ध्यांशी शांतता व मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी ते मनःपूर्वक झटले. एक उदात्त आणि अनुकरणीय राजपुरुष म्हणून सारं जग त्यांच्याकडे पाहू लागलं.
शास्त्रींचे निधन झालं तेव्हा त्यांचा सारा जीवनपट निष्कलंक होता. त्यांच्यामागे ना पैसे होते, ना जमीन, ना घर. सत्य व प्रामाणिकपणा यांना वाहिलेलं स्वजीवन हाच राष्ट्रीय जीवनाचा पाया असतो. असं मानणाऱ्या सर्व जाती-जमातींच्या लोकांना प्रोत्साहित करणार, स्फूर्ती देणारं असं शास्त्रींचं जीवन होतं. आपल्यावर अतिशयोक्त विशेषणांची स्तुतीसुमने उधळीत जावीत अशी इच्छा त्यांनी कधीच बाळगली नाही.१९६२ च्या चीन युद्धातील मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर, १९६५ च्या भारत -पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झाकाळून निघाली. “जय जवान, जय किसान” च्या मंत्राने सारा देश भरून गेला.
ताश्कंद शिखर परिषदेत, मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर आयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक निधनाने त्यांचे कार्यकर्तृत्व संपुष्टात आले.
Other Article: