Guru Nanak Jayanti गुरुदेव नानक जयंती
गुरुदेव नानाकांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी लाहोर जवळील रावी नदीच्या तीरावर तळवंडी या गावी झाला. दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti) साजरी केली जाते.
यावर्षी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी ती साजरी केली जात आहे. यावर्षी गुरु नानक (Guru Nanak Jayanti) यांची ५५५ वी जयंती साजरी होत आहे. नानकांच्या वडिलांचे नाव काळूचंद व आईचे नाव तृप्ता हे होते. त्यांचा जन्म खत्री म्हणजेच क्षत्रिय कुलात झाला होता. गुरुनानकांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजेच नानकांकडे झाला म्हणून त्यांना नानक असे म्हणतात.
जन्मवेळे संबंधी आख्यायिका.
नानकांच्या जन्माच्या वेळी सहा योगी, नवनाथ, बावन पीर, चौसष्ट योगिनी, चौ-याऐशी सिद्धी व
तेहतीस कोटी देव त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
त्यावेळी हा मुलगा छत्रधारी, चक्रधारी होणार असून सर्वांनी याची पूजा करावी असा होणार आहे. हा एका परमेश्वराशिवाय कोणाचीही पूजा करणार नाही असे भविष्य सांगण्यात आले होते.
नानकांचे उपनयन.
नानक सात वर्षाचे होतात त्यांना पाठशाळेत त पाठविण्यात आले, पण त्यांचे मन लिहिण्या वाचण्यात लागत नसे. उपनयनाच्या (मुंजीच्या) वेळी, यांनी गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) घालण्यास नकार दिला.
त्यावेळी स्वतःचे आदर्श जाणवे कसे असावे, याची व्याख्या त्यांनी सांगितली. ते म्हणाले ‘ दया हाच कापूस, संतोष हेच सूत व संयम हीच त्या यज्ञोपववीताची ब्रह्मगाठ ‘ असे जानवे आपल्याजवळ असेल तरच मी ते गळ्यात घालू शकतो. असे
यज्ञोपवीत कधी तुटत नाही.
शिक्षणात नानाकांचे लक्ष नाही हे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यास घरची गुरे राखण्यास सांगितले. परंतु नानक रानात गुरांना सोडून द्यायचे व देवाचे भजन करीत बसायचे. त्यानंतर त्यांना व्यापारात गुंतविण्यात आले. पण व्यापारासाठी दिलेले पैसे नानक गोरगरिबांना दान करीत असे. विक्रीसाठी आणलेल्या वस्तू गरजू लोकांना फुकट देत असे. त्यांच्या या अशा वागण्यामुळे लोक त्यांना वेडा समजू लागले.
नानकांचा विवाह.
नानक बालपणापासून अध्यात्मात रमत असत.त्यांचे मन संसारात रमावे म्हणून त्यांच्या वडिलांनी ‘ सुलक्षणी’
नावाच्या मुली बरोबर त्यांचा विवाह लावून दिला. यानंतर दहा वर्षे निघून गेली.
नानक दोन मुलांचे पिता बनले. एक दिवस नदीवर स्नान करण्यासाठी आले असता, त्यांनी पाण्यात बुडी मारली. तीन दिवस त्यांचा पत्ता लागेना. तिसऱ्या दिवशी ते आकस्मान प्रकट झाले व त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले ‘ न कोणी हिंदू, न कोणी मुसलमान,’ आता त्यांच्या जीवनात बरेच परिवर्तन झाले.
भारत व अन्य देशात तीर्थयात्रा.
गुरुनानिकांनी सुमारे ३० वर्षे भारतात आणि अन्य काही देशात अशी अखंड तीर्थयात्रा केली. या काळात त्यांनी लाहोर, यमनाबाद, सियालकोट ,दिल्ली ,काशी, पाटणा ,गया, डाक्का ,जगन्नाथ पुरी, हरिद्वार अशी शहरे आणि बंगाल ,आसाम ,राजस्थान, मध्य प्रदेश या प्रांतात भ्रमंती केली.
या भटकंतीत त्यांनी सर्व समाजाला आपल्या नव्या धर्माची ओळख करून दिली. मर्दाना हा श्री गुरुनानकांचा पहिला शिष्य होय. नानकांनी रचलेली पदे मर्दाना आपल्या स्पष्ट मधुर आवाजात गाऊन दाखवीत असे.
गुरुनानकांच्या जीवनात राजापासून रंकापर्यंत अनेक लोक त्यांना भेटले. त्या सर्वांना आपल्या आचार विचाराने नानकांनी प्रभावित केले. तत्कालीन वेगवेगळ्या पंथातील लोकांना नानकांनी भक्तीमार्गाचे महत्व समजावून सांगितले.
आपले प्रथम शिष्य मर्दाना यांच्यासह गुरुनानक इटली, इजिप्त, इराण, बुखारा, अफगाणिस्तान, काबुल, कंदाहार,इ. प्रांतात फिरून पेशावर मार्गे ते आपल्या देशात परत आले. त्यांनी करतारपूर येथे आपले शेवटचे दिवस घालविले. त्यांना हिंदू-मुस्लिम, गरीब -श्रीमंत अशा अनेक वर्गातून शिष्य मिळाले. शेवटी त्यांनी अन्नछत्र ( लंगर ) सुरू केले. त्यात सर्वजण एका पंक्तीत बसून भोजन करीत असत. त्यांनी सहकारी शेतीची सुरुवात केली.
परमेश्वराचे ज्ञान प्राप्त.
एके दिवशी नानक घरादाराचा त्याग करून घरातून एकाएकी निघून गेले. वैन नदीच्या तीरावर ते तीन दिवस चिंतन करीत बसले. या तीन दिवसात त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला. परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे त्यांना ज्ञान ज्ञान झाले. परमेश्वराने त्यांना नामपठणाचा, जय करण्याचा व ओम हेच सत् – नाम आहे असा संदेश दिला.
त्यानंतर नानकांनी कायमचा गृहत्याग केला. भारतभर प्रवास करून त्यांनी सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. लोकांना उपदेश केला. प्रवचने केली. त्यांच्या दर्शनासाठी सर्व धर्म, पंथाचे जातीपातीचे लोक येत. लोकांचे दुःख दूर करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. मी हिंदू नाही- मुसलमान नाही, असे ते सांगत.
जगात परमेश्वर एकच आहे. त्याचे नाव सत् -नाम. तोच या सृष्टीचा निर्माता दिग्दर्शक आहे. तो स्वयंभू आहे. परमेश्वर मूर्तीत नाही, म्हणून मूर्ती पूजा व्यर्थ आहे. त्याचे खरे रूप हृदयातच आहे.
जातीभेद ,धर्मभेद ,पंथभेद खरे नाहीत. हा मूलमंत्र सांगून त्यांनी शीख धर्म स्थापन केला. नाम व गान, दान, स्नान, देवाची व मानवाची सेवा व ईश्वराचे स्मरण या पाच तत्वांवर नानकांनी भर दिला होता.
परमेश्वर निर्गुण, निराकार, ओंकारस्वरूप आहे. तो सत् श्री अकाल म्हणजे सर्व शक्तिमान आदिपुरुष आहे. तो सत्य स्वरूप असून अकाल म्हणजे कालातीत आहे. अनंत आहे. सर्वव्यापी आहे. यावर शीख बांधवांची गाढ श्रद्धा आहे.शिखांचा ग्रंथ ग्रंथसाहिब यात नानक देवांची ९४७ पदे आहेत.
भगवत् -भक्तीची शिकवण.
आपल्या जीवनात भगवत्- भक्तीची साधी , सोपी शिकवण समाजाला त्यांनी दिली. कर्मकांडाच्या चिखलात अडकलेल्या भोळ्या भाविक समाजाला हरिनामाचा संदेश त्यांनी दिला. आपल्या जीवनात ते मक्केलाही जाऊन आले. इथेही त्यांनी हिंदू-मुस्लिम असा भेद मी करीत नाही, तर मी सर्वांकडे माणूस म्हणून पाहतो असे सांगितले.
नागपूर जवळ रामटेकलाही ते आले होते. संत नामदेवांची आणि त्यांची भेट झाली होती. गुरुनानक आयुष्यभर कर्मच करीत राहिले. नानकदेवांनी तळवंडी गावाला मोठा तलाव बांधला.त्याला लोक ‘नानक सरोवर’ म्हणू लागले.
७ सप्टेंबर १५३९ रोजी गुरुनानकांनी आपल्या शरीराचा त्याग केला. गुरुनानक कोणत्याही संकुचित विचारांचे समर्थक नव्हते, तर त्यांनी समाज जीवनात ऐक्य व शांतता निर्माण केली.
Other Articles: (Lakshmi Puja) लक्ष्मीपूजन in Marathi