गौरी सण (Gauri) 2024

भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला जोडूनच गौरीचा सण येतो. त्यामुळेच “गवरगणपती” हा शब्द रूढ झाला आहे. गौरी सणाला हरितालिका असेही म्हणतात. भाद्रपदात ज्या दिवशी ‘ज्येष्ठा’ नक्षत्र उगवते त्यादिवशी घरोघर गौरीची पूजा करतात. पहिल्या दिवशी गौरीची (Gauri) स्थापना केली जाते. दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते. आणि तिसऱ्या दिवशी त्या गौरीचे विसर्जन करावे अशी एक रूढी आहे.

काही ठिकाणी गणेशाच्या मूर्तीजवळ थोडे तांदूळ पसरून त्यावर गौरीची स्थापना करतात. काहींच्या घरी तांब्याची गौर बसवितात. गेरुने तांब्या रंगवून त्यावर चुन्याने मंगळसूत्र, चंद्र सूर्य, शंख, गदा, पद्म, स्वस्तिक, गाईची पावले, लक्ष्मीची पावले इत्यादी रेखाटतात.

पार्वतीची तपश्चर्या.

पार्वतीलाच गौरी असे दुसरे नाव आहे. पार्वती ही गिरिजा म्हणजेच हिमालय कन्या होय.
तिचा विवाह पित्याने विष्णू बरोबर निश्चित केला होता. परंतु पार्वतीला विष्णू ऐवजी श्री महादेव हाच पती या नात्याने अधिक पसंत होता. आपल्या वडिलांनी आपल्या मनाविरुद्ध पती ठरविला म्हणून ती रुसली आणि रागाने दूर अरण्यात निघून गेली.

तिने खडतर तप केले. उपवास केला. तेथे वाळूचे शिवलिंग करून त्याची तिने नित्य पूजा केली. पार्वतीची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी पार्वतीला तिच्याशी विवाह करण्याचे वचन दिले. मग गौरी-हराच्या या लग्नास पार्वतीच्या पित्यानेही मान्यता दिली. त्यांचा विवाह थाटात पार पडला. पार्वतीने हरितालिकेचे व्रत निष्ठापूर्वक केले. म्हणून तिला मनासारखा पती मिळाला. हेच व्रत पुढील काळात रूढ झाले. अनेक कुमारीका या व्रताचे पालन करतात.

हरितालिकेचे व्रत.

स्त्रियांच्या अनेक व्रतात हरितालिकेच्या या व्रताला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. स्नान करून आपल्या मैत्रिणींबरोबर नदीच्या किंवा ओढ्याच्या काठावर जातात. महादेवाची वाळूची पिंड तयार करून त्याची दुर्वा, फुले वाहून पूजा करतात. हळद कुंकू बेल वाहतात. आपल्याला इष्ट पती, सुख समृद्धी लाभावी यासाठी प्रार्थना करतात.

काली मातेची गौरी माता.

एकदा भगवान श्री शंकराने पार्वतीला  "काली" म्हटले. तेव्हा पार्वतीला दुःख झाले. तपश्चर्येच्या बळावर तीने गौरवर्ण प्राप्त केला. त्या वेळेपासून पार्वतीला गौरी हे नाव पडले. 

गणपती बरोबर गौरीचे (Gauri) आगमन होते. गौरीची स्थापना केली जाते. काही ठिकाणी गौरीचा उल्लेख लक्ष्मी असा करतात. आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे कुणी धातूच्या, तर कुणी मातीच्या मूर्तीची पूजा करतात; तर काही ठिकाणी नदीतील पाच किंवा सात खडे आणून त्याची पूजा करतात. अनेकांच्या घरी मुखवट्यांच्या गौरी असतात. एखाद्या लोखंडी पट्ट्यावर, आडणीवर किंवा तेरड्याच्या झाडाच्या जुडीवर हे मुखवटे घट्ट बसवितात. त्याला साडी, खण नेसविता. बाजूस कापडी हात बसवितात. कमरपट्टा, नाकात नथ, बिंदी, भैरव, जुबे, तोडे व कानातील नाकातील अलंकारांनी सुशोभित झालेल्या लक्ष्मी अत्यंत सुंदर मोहक आणि आकर्षक दिसतात.

Follow us on youtube- Marathi Antarang

अनेक प्रकारची खेळणी, मेवा मिठाई, सुगंधी द्रव्ये, सुवासिक पुष्पे यांच्या मदतीने गौरीपुढे आरास केली जाते.
गौरीची स्थापना केली जाते तो पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी त्या घरातील बाल गोपाळांबरोबर जेवतात आणि तिसऱ्या दिवशी त्या जातात. असे मानण्यात येते.

गौरी पूजनाच्या दिवशी घरोघर गोडधोड करतात. खिरपुरी हे त्या दिवशीचे मुख्य पक्वान्न असते. सुवासिनींना प्रेमाने बोलावून आग्रहाने जेऊ घालतात. काही ठिकाणी कुमारीका, सुवासिनींना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात. नवविवाहिता असेल तर तिची खणा नारळाने ओटी भरण्यात येते.

गौरी जागवणे.

ज्याच्या घरी गौरीची आरास मांडली जाते, तिथे आसपासच्या स्त्रिया एकत्र जमतात. निरनिराळे खेळ खेळतात. नाचतात, फेर धरतात, फुगड्या घालतात. स्त्रिया विविध गीते गातात ,यात सर्व रात्र संपून जाते. गौरी जागवण्याचा हा कार्यक्रम असतो. तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन होते. नदीचे किंवा तळ्याच्या काठावर वाजत गाजत जातात. काही ठिकाणी गणपती आणि गौरी यांची एकत्र मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. कोकणात हा गौरी पूजनाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात असतो.

पुराणातील कथा.

पूर्वी कोलासूर नावाचा एक दैत्य होता. त्याच्या मुलाचे नाव करवीर होते. तो अत्यंत उन्मत्त झाला होता. तो सगळ्यांना छळत होता. त्याने मंदिरे नष्ट केली. तेव्हा सगळे देव व मानव शंकराला शरण गेले. भगवान शंकराने करवीराला युद्धात ठार मारले. ही घटना जिथे घडली त्या गावाला करवीर असे नाव पडले.

करवीराच्या मृत्यूनंतर कोलासुर राज्यकारभार पाहू लागला. आपल्या मुलाच्या मृत्यूला कारण महालक्ष्मीच आहे, असे मानून कोलासुराने सर्व स्त्रियांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने महालक्ष्मीला सांगितले, तू शंभर वर्षे या ठिकाणी राहू नकोस. महालक्ष्मी निघून गेल्यावर कोलासुर अधिकच उन्मत्त झाला. त्याने सर्वांचा छळ मांडला. अनेक स्त्रियांना त्याने पळवून नेले. देवांचेही त्याच्यापुढे काही चालेना. शंभर वर्षे झाल्यानंतर महालक्ष्मी परत आली. कोलासुराच्या छळाला कंटाळलेल्या सर्व स्त्रियांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना कोलासुराचा वध करण्याची प्रार्थना केली.

तेव्हा त्या तीन देवांनी महालक्ष्मीला आवाहन करून कोलासुरास ठार मारण्यास सांगितले. महालक्ष्मी व कोलासुर यांचे प्रचंड युद्ध झाले. त्या युद्धात देवीने कोलासुरास ठार मारले. त्यामुळे सर्व स्त्रियांची सुटका झाली. देवीच्या या उपकाराचे स्मरण म्हणून सर्व स्त्रिया गौरीचा मोठ्या प्रेमाने उत्सव साजरा करतात. कोलासुराच्या इच्छेप्रमाणे करवीर गावाचे नाव कोलासुर- कोल्हापूर असे झाले असे म्हणतात.

या देवीचे नाव गौरी म्हणजेच शिवाची पत्नी ,असे असले तरी ही देवी म्हणजे महालक्ष्मी आहे. दारिद्र्य जाऊन घरात लक्ष्मी म्हणजेच ऐश्वर्य नांदावे यासाठीच या गौरीची आराधना केली जाते.
ही महालक्ष्मी आपणा सर्वांस सुख समृद्धी देवो. हीच प्रार्थना.

Leave a Comment