अनंत चतुर्दशी (anantanant chaturdashi) व हरितालिका व्रत
अनंत चतुर्दशी (Anantanant Chaturdashi).
अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते. पूजेत आनंदाचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो.
हा धागा सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.
अनंत चतुर्दशी (Anantanant Chaturdashi) व्रत.
या अनंत देवतेचे प्रतीक म्हणजे 14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा. पूर्वी ज्यांनी हे व्रत चालवलेले असेल, त्यांच्याकडून व्रत करणाऱ्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन तो देवघरात ठेवायचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावयाची असते. या पूजेची रचना व तयारी सत्यनारायण पूजेप्रमाणेच असते. चौरंगावर दर्भाच्या बनविलेल्या सात फण्यांच्या शेषस्वरूप अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून, त्याच्यापुढे अनंतदोरक ठेवतात.
त्याची पूजा केली जाते. या पूजेत यमुना नदी व शेषनाग यांचीही पूजा करावयाची असते. या अनंत पूजेत 14 या संख्येला फार महत्त्व आहे. अनंत दोरकाला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 लाडू, 14 प्रकारची फळे, 14 प्रकारचे धान्य असतात. हे व्रत किमान 14 वर्षे करावयाचे असते.
अनंत चतुर्दशी (Anantanant Chaturdashi) पांडवांची कथा.
पूर्वी पांडव द्रौपदीसह वनवासात असताना एके दिवशी श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला होता. त्यावेळी अत्यंत दुःखी असलेल्या
युधिष्ठिराने श्रीकृष्णाला वंदन करून विचारले. ‘ श्रीकृष्ण ‘ तूच आमचा सखा सोबती, कैवारी आहेस. तुझे कृपाछत्र आमच्यावर सतत आहे. असे असताना आम्ही राज्यहीन झालो आहोत. या अरण्यात अनंत दुःखे भोगत आहोत. काय केले असता आम्हाला पुन्हा राज्यप्राप्ती होईल? या दुःखातून मुक्त होण्यासाठी काय करावे? कोणते व्रत करावे ते कृपा करून आम्हाला सांग.
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले सर्व व्रतांमध्ये उत्तम असे अनंत पूजेचे व्रत तुम्ही करा म्हणजे तुम्हाला लवकर राज्यप्राप्ती होईल. अवघ्या विश्वाला व्यापून उरलेला ब्रम्हा विष्णू महेश स्वरूप असा जो अनंत तो मीच आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी अनंताची यथाविधी पूजा केली असता सर्व दुःखांचा नाश होतो, व सुख-समृद्धी प्राप्त होते.
कौंडिण्य ऋषींची कथा.
पूर्वी कौंडिण्य नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुशीला. कौंडिण्य अत्यंत गरीब, दरिद्री होते. आपले दुःख, दारिद्र्य जावे म्हणून सुशीला दररोज भगवान विष्णूंची भक्ती करत असे. एकदा वनातून जात असताना, तिला नदीकाठी काही स्त्रिया पूजाअर्चा करीत असलेल्या दिसल्या. त्या स्त्रियांजवळ जाऊन सुशीलेने त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करीत आहात? व या पूजेचे काय फळ मिळते?
त्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही भगवान अनंताची पूजा करीत आहोत. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाचे असते. यालाच अनंत चतुर्दशीचे (Anantanant Chaturdashi) व्रत म्हणतात. या पूजेने सुख-समृद्धी प्राप्त होते. भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. असे त्या स्त्रियांनी तिला सांगितले. अनंताची पूजा कशी करावयाची हे सुशीलेने त्यांच्याकडून समजावून घेतले, व ती आपल्या आश्रमात निघून गेली.
सुशीलेने अनंताची यथाविधी पूजा केली. आपल्या डाव्या हातावर अनंताचा दोरक बांधला. या व्रतामुळे अनंताची कृपा तिच्यावर झाली. तिचा आश्रम धनधान्य, गो- पशुधनाने भरून गेला. त्यामुळे घराला सुख शांती समाधान लाभले.
कौंडिण्याने एके दिवशी सुशीलेच्या हातावरील अनंत दोरा पाहिला. हे तू हातावर काय बांधले आहेस त्याने तिला विचारले. हा अनंत आहे, मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले आहे असे सुशीला म्हणाली. या व्रतामुळेच आपल्याला सुखप्राप्ती झाली आहे. या बोलण्याचा कौंडिण्याला राग आला. त्याने तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नि -कुंडात टाकला. कौंडिण्य सुशीलेला म्हणाला आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने व माझ्या ज्ञानामुळे. यात अनंताचा काडीचाही संबंध नाही.
यामुळे अनंत व्रताचा अपमान होऊन कौंडिण्याची सर्व संपत्ती, सुख नष्ट झाले. सुशीलेला अतिशय दुःख झाले. अनंत परत मिळाल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही, असा तिने ‘ पण ‘ केला.
कालांतराने आपल्या बोलण्याचा कौंडिण्याला पश्चाताप झाला. तो अतिशय दुःखी झाला. अनंताचा धावा करीत तो रानावनात फिरू लागला. भेटलेल्या प्रत्येकास तो अनंत कुठे दिसला का? असे विचारू लागला. प्रत्येक जण त्याला नाही म्हणाले. अखेर पश्चात्तापाने पोळलेला कौंल्डिण्य जमिनीवर गडाबडा लोळू लागला. अनंत, अनंत आशा हाका मारू लागला.कौंडिण्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. अनंत ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाले. कौंडिण्याने अतिशय नम्रपणे त्यांच्या पायावर डोके ठेवून विचारले, आपण अनंत कुठे पाहिला आहात का?
त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला. त्याचवेळी चतुर्भुज भगवान अनंद तेथे प्रगट झाले. त्यांनी कौंडिण्यास तू स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केला आहेस व सुशीलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस. गर्व अहंकार, देवाबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सारे दुःख प्राप्त झाले आहे. परंतु आता तुला पश्चाताप झाला आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल व मोक्षप्राप्ती ही मिळेल.
कौंडिण्याने घरी जाऊन आपली पत्नी सुशीला तिचे सह अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्यामुळे त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. कौंडिण्याला जसे हे व्रत केल्याने सुख समृद्धी मिळाली, तशी ती माझ्या प्रिय वाचकांनाही मिळो. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
हरितालिका व्रत.
स्त्रिया अनेक व्रते करतात. त्यातील अत्यंत महत्त्वाचे असे हे हरितालिका व्रत आहे. हे व्रत कुमारीका व सुहासिनी दोघीही करतात. या दिवशी स्त्रिया अत्यंत कडक उपवास धरतात.
हरितालिका व्रताची पार्श्वभूमी.
हिमालयकन्या पार्वती विवाहाच्या योग्य झाली होती. तिच्या विवाहाची चिंता तिच्या वडिलांना
(हिमालयाला) पडली होती. आणि त्याचवेळी नारदमुनी तेथे आले. त्यांनी आपण भगवान विष्णूंचा निरोप घेऊन आलो आहोत हे सांगितले. पार्वतीला विष्णूंनी विवाहासाठी मागणी घातली आहे ,असे नारदमुनी म्हणाले. नारदमुनींच्या सल्ल्यानुसार हिमालयाने पार्वती विष्णूंना देण्याचे निश्चित केले. तसेच नारदांनी पार्वतीला भेटून तू भगवान विष्णूंशी विवाह कर असा सल्ला दिला. हा सल्ला ऐकून पार्वतीला वाईट वाटले व ती दुःखी झाली.
कारण पार्वतीला आपला विवाह शंकरां बरोबर व्हावा असे मनोभावे वाटत होते. त्यामुळे पार्वती निराश झाली, ती घरातून दुःखी अंतःकरणाने निघून गेली. एका नदीच्या काठावर गुहा होती, तेथे ती आली. तिथे वाळूचे महादेवांचे लिंग स्थापून तिने त्याची भक्तीने पूजा केली. पार्वती ज्या ठिकाणी तपश्चर्या करीत होती ते ठिकाण निर्मनुष्य, भयानक होते. अशा ठिकाणी पार्वतीने बारा वर्षे निराहार तप केले. 64 वर्षे झाडाची पाने खाऊन तपश्चर्या केली.
पार्वती शंकर विवाह व हरितालिका व्रत.
पार्वतीच्या कठोर तपश्चर्याने व असाधारण भक्तीने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी पार्वतीशी विवाह करण्याचे मान्य केले. मग पार्वतीच्या वडिलांनीही या विवाहस मान्यता दिली. पुढे शिवपार्वतीचा विवाह झाला. एक दिवस पार्वतीने शंकरांना विचारले मी असे कोणते व्रत केले ज्यामुळे मला तुमची पती म्हणून प्राप्ती झाली. त्यावेळी भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, भाद्रपद तृतीया व्रत मला अतिशय प्रिय आहे. ज्याप्रमाणे नक्षत्रांत चंद्र, नद्यांमध्ये गंगा, वेदांमध्ये सामवेद व सर्व इंद्रियांमध्ये मन श्रेष्ठ आहे. त्याप्रमाणे सर्व व्रतांत हे भाद्रपद तृतीया हे व्रत श्रेष्ठ आहे.
याला हरितालिका किंवा हरतालिका व्रत असे म्हणतात. माझ्या प्राप्तीसाठी तू हे व्रत केलेस म्हणून मी तुला प्रसन्न झालो. प्रत्येक सुवासिनीने व कुमारीकेने हे हरितालिका व्रत मोठ्या भक्ती भावाने करावे. शिवपार्वतीची मूर्ती तयार करून तिची पूजा करावी. दिवसभर उपवास करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून पारणे करावे. दहीभात खाऊन उपवास सोडावा.
हे व्रत करणाऱ्या सुवासिनी स्त्रियांचा संसार सुखाचा होतो. याव्र- तामुळे कुमारीकांना उत्तम पती मिळतो अशी या व्रताची ख्याती आहे.आलि म्हणजे सखी, तिच्या करवी पार्वतीचे हरण झाले, म्हणून या व्रतास ‘हरितालिका ‘असे नाव पडले आहे.
अलीकडे पाटावर किंवा चौरंगावर वाळूची पिंडी तयार केली जाते. किंवा बाजारातून हरितालिकेच्या मूर्ती मिळतात, त्याही पूजेस चालतात. पाने ,फुले, पत्री यांच्या साह्याने त्यांची पूजा केली जाते. पार्वतीने केलेल्या दृढव्रताची व तपश्चर्येची स्मृती म्हणून हरितालिका व्रत केले जाते.