Ganpati information in Marathi गणपती उत्सव
भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. या देवतेचे नाव वरद मूर्ती श्री सिद्धिविनायक असे आहे. हा एक चैतन्य शील आणि अत्यंत आदरणीय उत्सव आहे. जो प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो. हा शुभ प्रसंग गणेशाचा जन्म दर्शवितो. कोकणात अत्यंत धूम धडाक्यात हा सण साजरा केला जातो.
या दिवशी गजाननाची मातीची मूर्ती आणून तिची मोठ्या थाटात पूजा केली जाते.
गणेश स्थापनेची जागा अत्यंत सुशोभित केली जाते. घराच्या दारावर घरातील सुवासिनी गणेशाचे स्वागत करतात. मग सुशोभित केलेल्या ठिकाणी चौरंगावर, पाटावर किंवा मखरात ती गणेश मूर्ती ठेवतात. पुरोहिताकडून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून तिची षोडशोपचारांनी पूजा करतात.
सगळे घर त्याच्या जयघोष यांनी भरून जाते. आरत्या उदबत्त्यांचा सुवास, टाळ मृदुंगाचानाद हेच सतत कानावर येत असतात.
भादव्यात येती गौरी गणपती ।उत्सवा येई बहार ।।
गणपती म्हणजे गणांचा पती, गणांचा नायक. गणपती हा 21 गणांचा पती म्हणजेच नायक होता. म्हणून गणेश उपासनेत 21 या संख्येला विशेष महत्त्व आहे. गणेशा मोदक प्रिय आहे. म्हणून त्याला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतात. 21 दूर्वा वाहतात. याशिवाय शमीपत्रे, तांबडी फुले, कमळ फुले,सिंदूर,अष्टगंध या वस्तू गणेशाला प्रिय आहेत. त्यामुळे त्याच्या पूजेत या वस्तू असाव्या लागतात.
हा उत्सव आपल्या घरातील परंपरेनुसार साजरा केला जातो. काही घरात दीड दिवसांचा गणपती असतो. काही घरात, पाच , सात , नऊ किंवा दहा दिवस हा उत्सव साजरा करतात. गौरी आणि गणपती यांचे एकत्र विसर्जन करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. या दिवसात सकाळ संध्याकाळ आरती, सकाळी अथर्वशीर्षाची आवर्तने, रात्री मंत्र जागर, भजन, दिवसा गणेश पुराण, गणेश कथांचे वाचन इत्यादी कार्यक्रम घरोघरी चालतात.
ज्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करावयाचे असते; त्यादिवशी प्रथम गणेशाची उत्तर पूजा करतात, व त्याला देव्हार्यातून खाली ठेवतात. मग संध्याकाळी गणेश मूर्ती वाजत गाजत बाहेर जलाशयावर, नदीवर, समुद्रावर नेतात. तेथे आरती करून गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन करतात. त्यावेळी गणपती बाप्पा मोरया| पुढच्या वर्षी लवकर या । अशी गणपतीची प्रार्थना करतात.
देवदाणवांच्या युद्धात गणेश देवांचा सेनापती होता म्हणून त्याला गणनायक किंवा गण -पती म्हणतात. तो आपल्या भक्तांची दुःखे, संकटे दूर करतो म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात. कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी गणेशाला वंदन करावे लागते.चौदा विद्या,चौसष्ट कलांचा तो स्वामी आहे, म्हणून तो विद्यादेवता आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे महत्त्व फार आहे.
गणपती उत्सव सुरुवात, ऐतिहासिक दाखले.
गणपती उत्सवाची सुरुवात कशी आणि कोणत्या वेळेपासून झाली हे नेमके सांगता येत नाही. साधारणपणे गुप्त काळापासून गजरूपातील गणेशाची मूर्ती व त्याची पूजा यांची माहिती मिळते. जैन, बौद्ध, हिंदू हे हजारो वर्षापासून त्याची भक्ती भावाने पूजा करतात. नेपाळी माणूसही गणेशाची मनापासून पूजा करतो. परंतु गणेशाचे वाहन असलेला उंदीर मात्र त्यांच्या मूर्तीत कुठे आढळत नाही. तिबेट मधील लोक गणेशाची आराधना करतात. परंतु तिथल्या गणेशाला तिबेटियन माणसाने नारीरूपात उभे केले आहे. जपानी माणूसही गजाननची भक्ती करतो. त्याची पूजा करतो. परंतु जपानी माणसांनी तीन मुखांचा गणपती आपल्यासमोर ठेवलेला असतो.
गणपती हा खऱ्या अर्थाने गुणपती आहे. सर्व गुणांचा स्वामी आहे.
गणेश जन्मा विषयी आख्यायिका.
गणेश जन्माच्या अनेक कथा आहेत. अशा आख्यायिका पुराणात आहेत.
एकदा शिवपार्वतीचे भांडण झाले. शिवाने आपल्या तपश्चर्येच्या बळावर एका मुलाची निर्मिती केली, ही गोष्ट पार्वतीला मुळीच आवडली नाही. तिने लागलीच शाप दिला .आणि त्या मुलाला बेडौल केले. त्यातून वक्रतुंड-महाकाय असा गणेश सिद्ध झाला. तोच हा गजानन.
पार्वतीने एक दिवस स्नान करताना एका मुलाची सुंदर मूर्ती बनवली ,व त्या मुलाला द्वाररक्षक बनविले.
माझे स्नान आटोपेपर्यंत आत कोणालाही येऊ देऊ नकोस, असे त्याला बजावले. एवढ्यात तिथे प्रत्यक्ष भगवान शंकर आले. त्या बालमूर्तीने शंकरांना अडविले. भगवान शंकर रागावले. त्यांनी ताबडतोब त्या मुलाचे डोके आपल्या त्रिशूलाने उडविले. थोड्यावेळाने पार्वती माता तिथे आल्या. त्यांना सर्व प्रकार समजला. त्या दुःखी झाल्या. शंकरांनी आपल्या सेवकांना सर्वत्र पाठवले. प्रथम जो कोणी प्राणी भेटेल त्याचे मस्तक आणा, अशी आज्ञा दिली. त्यांना प्रथम हत्ती दिसला. त्यांनी त्याचे मस्तक आणले. शिवाने नंतर त्या द्वारे रक्षक मुलाचे धड आणि हत्तीचे मस्तक जोडून दिले. शिवपार्वतीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून श्री गणेश सिद्ध झाला.
फार वर्षांपूर्वी सिंदूरासुर नावाचा एक दैत्य सगळ्यांना त्रास देत होता. त्याने स्वर्गावर हल्ला करून सर्व देवांचा पराभव केला. तसेच तो पृथ्वीवर सगळ्यांना त्रास देऊ लागला. त्याने मंदिरांचा, आश्रमांचा, यज्ञांचा विध्वंस केला. घाबरलेले देव विष्णूंना शरण गेले. मी पार्वतीच्या पोटी गजानन रूपाने अवतार घेईन व सिंधूसुराचा नाश करीन हे आश्वासन देवांना दिले.
भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला विष्णूंनी पार्वतीच्या पोटी जन्म घेतला. त्या बालकाला मस्तकच नव्हते. तेव्हा शंकरांनी
गजासुराला ठार मारले व त्याचे मस्तक त्या बालकाला बसवले.
गजासुराचे मस्तक लावल्याने त्या बालकाला गजानन असे नाव मिळाले. गजानन व सिंधूरासुर यांचे मोठे युद्ध झाले. गजाननाने सिंधूरा- सुराला ठार मारले. स्वर्गातील देवांना व लोकांना खूप आनंद झाला. ही घटना भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी घडली. सर्वांनी गजाननाला आपला अधिपती-गणपती केले. त्या दिवसापासून गणेश चतुर्थी सण सुरू झाला.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात.लो. टिळकांचे योगदान.
भाऊसाहेब रंगारी, विश्वनाथ खासगीवाले, आणि गणेश घोटावडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी
१८९३ मध्ये एक स्फुट- लेख लिहून केसरीतून घेतली होती. त्याच्या दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवाची संख्या तीन होऊन वाढवून १०० च्या वर गेली होती.
महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात पुण्यात झाली. लोकमान्य टिळकांनी १८९४ साली विंचुरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेशोत्सवामधून भाषणे व मेळे यांचे आयोजन टिळकांनी केले. या माध्यमातून जनजागृती होऊ लागली. शिवजयंती व गणेशोत्सवामुळे जनता आपले गुलामगिरीतील दुःख विसरून नव्या जोमाने कामाला लागली. शिवजयंती व गणेशोत्सव उपक्रमाद्वारे समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम टिळकांनी केले. भारतीय जनतेला गुलामगिरीतून बाहेर पडण्याची प्रेरणा सभा संमेलनातून मिळत होती.
ब्रिटिश सरकार फोडा व झोडा हे तत्व वापरून भारतामधील निरनिराळ्या समाजामध्ये भांडणे लावून देऊन आपण सुखाने राज्य करत होते. हे टिळकांनी अभ्यास व निरीक्षणाने ओळखले होते. इंग्रज सरकारच्या धोरणामुळे जनता आपले सत्व विसरली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहण्याचा आनंद मानू लागली.
त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी टिळकांनी अभिनव उपक्रम सुरू केला.
पुण्यातील गणेशोत्सव.
लोकमान्य टिळकांनी विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली होती हे आपण वर पाहिले आहे. नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्यात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
पेशव्यांचे सरदार त्यांचं अनुकरण करू लागले. इंग्रजांची सत्ता आल्यावर १८१९-२० सली दप्तर -खाण्यात गणपती बसवण्यात आल्याची नोंद आहे. ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर पुण्यातल्या घराघरात गणपती बसत होते. श्रीमंत सरदारांकडे गणपती बसत होते.
पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात पेशव्यांनी केल्याचे संदर्भ सापडतात. प्रारंभीच्या वर्षी पुण्यात तीन ठिकाणी आणि मुंबईत दोन ठिकाणी असे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले होते. या उत्सवाच्या आयोजनासाठी लोकमान्य टिळकांना विरोधाला आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर हा उत्सव नागपूर, वर्धा अमरावती येथेही सुरू झाला.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या गणपती समोर दिवसाच्या वेळी भजन कार्यक्रम, रात्री किर्तन, शाहिरांचे पोवाडे, समई नृत्य, जादूचे प्रयोग असे कार्यक्रम होत. देशभक्तीपर गीते म्हणणारे मेळे पुण्यात संध्याकाळी होत असत.
” गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केले.”इतिहासकार बिपिन चंद्रा.
पुण्यातील मानाचे गणपती.
१) कसबा गणपती.
२) तांबडी जोगेश्वरी गणपती.
३) गुरुजी तालीम गणपती.
४) तुळशीबाग गणपती.
५) केसरी वाडा गणपती.
पुण्यातील इतर महत्त्वाचे गणपती.
१) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती.
२) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती.
३) मंडईचा गणपती.
मुंबईतील प्रसिद्ध गणपती.
१) चिंचपोकळीचा चिंतामणी.- स्थापना १९२०.
२) गिरगावचा राजा.- स्थापना १९२८.
३) लालबागचा राजा.- स्थापना १९३४.
सार्वजनिक गणेशोत्सव व गणेश मूर्ती असलेल्या लालबागच्या राजाला दरवर्षी किमान दीड कोटी भाविक दर्शन घेतात.
४) जी एस बी. गणपती.- स्थापना १९५५. गोल्ड गणेश या नावाने हा बाप्पा प्रसिद्ध आहे. याला 60 किलो सोन्याचे दागिने व हिरे मानके यांनी हा गणपती सजवला जातो.
५) खेतवाडीचा राजा.- स्थापना १९५९.
स्थापन केलेल्या वर्षापासून या गणपतीचा आकार एक सारखाच आज तागायत ठेवला जातो हे त्याचे वैशिष्ट्य. खेतवाडीचा गणराज हा मुंबईतील सर्वात नेत्र दीपक गणपती मानला जातो. या मंडळाने २००० मध्ये 40 फूट उंच भारतातील इतिहासातील सर्वोच्च गणेश मूर्ती बनविली. मूर्ती अस्सल सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली आहे आणि हि-यांनी सजलेली आहे.
६) अंधेरीचा राजा.
स्थापना १९६६ अंधेरी पश्चिम.
७) फोर्टचा इच्छापूर्ती गणेश.- स्थापना १९८२.
गणेश वंदना करूनच कामाची सुरुवात करतात. त्यामुळे श्री गणेशा म्हणजेच सुरुवात असा अर्थ रुढ झाला आहे.
श्री गणेशा हा बुद्धिदाता आहे. त्याच्या पूजेला भारतीय परंपरेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. व्यासांनी महाभारताची रचना केली त्यावेळी ते लिहून काढण्याचे काम गणेशाने केले असे सांगतात. व्यासांनी त्याला प्रेमाने आशीर्वाद दिला.
मराठी माणसाच्या लोक जीवनात समाजमनात गणपती उत्सवाला मानाचे व महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रीयन माणूस माय -भूमीपासून दूर साता- समुद्रापलीकडे केला तरी तो तिथल्या मित्रांना बोलावून हा सण आनंदाने साजरा करतो.