Best नागपंचमी(Nag Panchami) माहिती 2024

नागपंचमी (Nag Panchami) माहिती 2024

Nag Panchami

आपल्या हिंदू धर्मातील सर्व सणांना, रुढींना फार महत्त्व आहे.
आपले सण आणि उत्सव हे सांस्कृतिक चैतन्याचे प्रतीक आहेत. ते समाज जीवनात जागृतीची, कर्तव्याची प्रेरणा देतात. ते आनंदाचे, उत्साहाचे, कौटुंबिक व सामाजिक प्रेमाचे स्त्रोत आहेत. रामनवमी, दसरा, नागपंचमी, दिवाळी, संक्रांत इत्यादी सण उत्सव भारताच्या सर्व भागात साजरे होतात. त्यातून भारताची राष्ट्रीय एकात्मता, अखंडता दिसून येते.


हे सण उत्सव आपल्या मनावर सुसंस्कार करतात. परमेश्वराची विराट शक्ती, आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्याग, देश प्रेम, बंधुता, कौटुंबिक स्नेह, सामाजिक एकता, निसर्गाचे वृक्षवेलीचे मानवी जीवनातील महत्त्व. इत्यादींचा परिचय या सण उत्सवांतून होत असतो.


सण हे प्रत्येक कुटुंबातसाजरे केले जातात .तर उत्सव हे अनेक लोक एकत्र येऊन साजरे करतात. काही सण हे उत्सवही असतात तर काही उत्सव म्हटले तर सणही असतात.
आपण उत्सव प्रिय आहोत. सण, उत्सव, समारंभ स्वरूपात आपल्याला थोर , दीर्घकालीन असा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासणे, यथाशक्ती तो समृद्ध करणे हे आपले कर्तव्यच आहे. सणांच्या माध्यमातून उत्सवांच्या सहाय्याने आपण चराचराशी नाते जोडतो.

नागपंचमीचा (Nag Panchami) सण.

श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी असे म्हणतात. हा सण मुख्यतः स्त्रियांचा आहे. भारताच्या सर्व भागात या दिवशी नागाची पूजा करतात. आपल्या महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळे या गावात तर हा सण फार मोठा असतो. या दिवशी खूप मोठी यात्रा भरते.

नाग विषारी असला तरी आपण त्याला देव मानले आहे. नाग शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतीचे रक्षण करतो. म्हणून त्याच्याविषयी आदर दाखवण्यासाठी नागपंचमीच्या सणाची थोर परंपरा सांगणारी प्रथा सुरू झाली.
फार वर्षांपूर्वी येथे नाग नावाचे लोक होते. या नाग लोकांचे व भारतातील आर्य लोकांचे सारखे झगडे होत असत. युद्धे होत असत. मग आस्तिक ऋषींनी नाग व आर्य यांचे भांडण मिटवले. सगळ्यांना आनंद झाला. या आनंदाचे स्मरण म्हणून नागपंचमी साजरी करण्यात येते.

नागोबाचे मंदिर. कृष्णा घाट.

या दिवशी मातीच्या नागमूर्तिची किंवा आपल्या देवघराच्या बाहेरच्या भिंतीवर काही भाग गायीच्या शेणाने सारवून त्यावर पिवळ्या मातीने किंवा चंदनाने नागाची आकृती काढून तिची पूजा करावयाची असते. काही लोक गहू आणि तांदूळ यांच्या पिठाची नागमुर्ती करतात. किंवा पाटावर रक्तचंदनाने नागमूर्ती काढतात व तिची पूजा करतात. महाराष्ट्रात मात्र चिखलापासून तयार केलेल्या नागमूर्तीची पूजा करतात. नवनागदेवता किंवा अनंतादिनागदेवता असे या देवतेचे नाव आहे. दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी नागाची पूजा करावयाची असते. नागाला दूर्वा, आघाडा, दूध व लाह्या या वस्तू आवडतात म्हणून पूजेत या वस्तू असाव्या लागतात. नागाला दूध लाह्याचा नैवेद्य दाखवितात. व नागदेवतेची प्रार्थना करतात

घरात नागपूजा केल्यावर ज्या ठिकाणी सर्प राहण्याचा संभव असतो अशा घराजवळच्या वारुळात गंध, फुले वाहून तेथे दुधाचा नैवेद्य ठेवण्याची चाल पुष्कळ ठिकाणी आहे. नागपूजा केल्यामुळे सर्प बाधा होत नाही, अशी लोकांची श्रद्धा आहे.
नाग घरीदारी शेतात, कुठेही असू शकतो. म्हणून नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतात नांगर कुळव घालत नाही. जमीन उकरत नाही. गवत वगैरे काहीही कापत नाही.

नाग ही क्षेत्रदेवता आहे. म्हणून त्याला त्रास होईल असे काहीही करावयाचे नसते.
नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया गावाबाहेरच्या वारुळाची पूजा करण्यासाठी समारंभपूर्वक गाणी म्हणत जातात. वारुळाची पूजा करतात. नागोबाला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवितात. या सणाच्या वेळी नवविवाहित मुली माहेरी येतात. झाडाच्या फांद्यांना दोरीचे झोपाळे बांधतात. त्यावर झोके घेतात. फुगड्या झिम्मा खेळतात. निदान खेड्यात तरी ही चाल अद्याप आहे. मंगळागौरी प्रमाणे या दिवशी नाच गाणी, झोपाळे, उखाणे इत्यादींची धमाल असते. या दिवशी भाजी चिरणे, कुटणे, कापणे या गोष्टी करीत नाहीत. या सणाला दिंडे, मोदक असे उकडलेले मिष्टांन्न करतात. महाराष्ट्रात या दिवशी दिंडे करतात. नागपंचमीचा सण सर्वांना सुख व आनंद देणारा आहे.

नागपंचमी (Nag Panchami) : बत्तीसशिराळा.

महाराष्ट्रात नागपंचमीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नागपंचमी म्हटलं की
” बत्तीस शिराळा” या गावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. सांगली पासून 60 किमी. अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव. ह्या गावात खऱ्या नागांना पकडून पूजा केली जायची. नागांच्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. त्यामुळे या सणाच्या दिवशी बत्तीस शिराळा गावात एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये पहायला मिळायचा.

या गावाचे पूर्वी नाव “श्रीयालय” असे होते. शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील 32 खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता, म्हणून शिराळा गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले. या गावापासून जवळच चांदोली अभयारण्य आणि धरण आहे.

फुगडी खेळणाऱ्या स्त्रिया

नागपंचमी सणाकरिता पूर्वीच्याकाळी शिराळा गावातील लोक, एक महिना अगोदर नागमंडळे स्थापन करून नाग पकडण्यासाठी जायचे. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन ५-६ तरुणांचा ग्रुप नाग पकडण्यासाठी जंगलात व गावाबाहेर जायचे. पकडलेला नाग, साप, धामणी यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई.

नागपंचमीच्या दिवशी गावातील ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे १००-
१२५ नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजित केले जात. खेळामध्ये उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळांना बक्षिसे देत असत. हे नागांचे खेळ पाहण्यासाठी महाराष्ट्रातून व गावाबाहेरून हजारो लोक येत असत.

परंतु २०१२ मध्ये मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशाने सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच त्यांची मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरविण्यावर बंदी केली.

परंतु त्यानंतर नागाची प्रतीकात्मक मूर्ती घेऊन त्यांची मिरवणूक काढून गावाने ही आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा जपली आहे. आजही तितक्याच आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा केला जात आहे. त्यात कोणताही खंड नाही.
सुमारे तीस वर्षापासून प्रसार माध्यमांनी मोठ्या स्वरूपात प्रसिद्धी दिल्याने उत्सवाची माहिती सर्व दूर पोहोचली. त्यामुळे नागपंचमीस जगविख्यात स्वरूप आले. त्यामुळे देश परदेशातील लाखो लोक येथे दरवर्षी येत होते.

नागपंचमीचा (Nag Panchami) पौराणिक संदर्भ.

श्रावणातील शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी(Nag Panchami). वास्तविक नाग हे द्रविडांचे दैवत, परंतु द्रविड आणि आर्य यांच्या संस्कृती संगमापासून नागपूजा सर्वांनीच सुरू केली.आस्तिक नावाचे एक महान ऋषी होते. त्यांची आई नागवंशातील होती.
पूर्वी द्रविड आणि आर्य यांच्यात खूप वितुष्ट होते. या आस्तिक ऋषींनी त्यांच्यातील भांडणे मिटवून आर्य आणि द्रविड यांच्यात दिल जमाई घडवून आणली. त्यावेळी द्रवडांचे दैवत असलेल्या नागाला आर्यांनी मान दिला. त्याची पूजा केली. त्याला खायला लाह्या आणि प्यायला दूध दिले. त्या वेळेपासून हा सण प्रचलित आहे, असे सांगतात.

सर्वसामान्यपणे वेदकाळापासून ही पूजा प्रचलित आहे असे मानतात. नागापासून वाटणाऱ्या भयातून ही पूजा सुरू झाली असावी. ऋग्वेदात नागाचा
” अहि”असा उल्लेख असून क्रूर, घातकी, महाभयंकर असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.

रामायणकाळात नागांचा उल्लेख फारसा आढळत नाही. पण महाभारतकाळात अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख आढळतो. कृष्ण जन्मला त्यावेळी वासुदेव त्याला मथुरेतून गोकुळात नेत होता. वाटेत त्या बाळकृष्णाला पावसाचा त्रास होऊ नये म्हणून नागाने त्यावर फणा उभारून त्याचे रक्षण केले, अशी माहिती मिळते. गोकुळात एका डोहात कालिया नावाचा महाभयंकर नाग राहत होता. कृष्णाने त्या डोहात उडी टाकून कालियाचे मर्दन केले, व तो डोहातून विजयी होऊन नागासह पाण्याच्या वर आला. त्यावेळी लोकांनी श्रीकृष्णाची व त्या नागाची पूजा केली, तो हाच दिवस होय.

नागोबाचे दर्शनासाठी मंदिराजवळ महिलांनी केलेली गर्दी.

कौरवांनी भिमाला ज्यावेळी विष घातले, त्यावेळी एका डोहातील नागांनी ते विष शोषून घेऊन भीमाला बारा हत्तींचे बळ दिले. अर्जुनाने नागकन्या उलुपी हिच्याशी विवाह केला. परीक्षिताने नागांचा खूप अपमान केला, म्हणून त्याला नागाने ठार मारले. नंतर जनमेजयाने सर्पसत्र केले. नाग कुळ परत संकटात सापडले, त्यावेळी अगस्तीने नागकुळाचे रक्षण केले.

नाग बिळात राहतो. कारण तो भूमीगत धनाचा स्वामी आहे. नाग आपल्या देवांचे प्रतीक असून तो पूजास्थाने, थडगी यांचे रक्षण करतो.

नागपंचमी (Nag Panchami) कोकणातील.

कोकणामध्ये आपल्या घरातच छोट्याशा पाटावर गंध, कुंकू हळद यांचे साह्याने नागाची प्रतिमा काढतात, व त्याची दूध लाह्या तसेच भाजलेले वाल वगैरे वाहून पूजा करतात. या दिवशी तवा, कढई, विळी, कोयता वगैरे वापरत नाहीत. शेतकरी शेतामध्ये नांगरही चालवत नाहीत. या दिवशी कढई वापरावयाची नाही, म्हणून तळलेले पदार्थ नैवेद्यासाठी करीत नाहीत. कोकणात कणकेच्या पिठाचे, डाळीच्या पुरणाचे कडबू हा उकडून केलेला पदार्थ करतात. देशावर कणकेमध्ये गुळाचे व डाळीचे पुरण घालून दिंडे हा पदार्थ करण्याची पद्धत आहे. दिंडे हे उकडून तयार केले जाते. नागपंचमीच्या सणाला माहेरवाशीणीला चुडा भरून ओटी भरण्याची पद्धत आहे.

ग्रामीण भागातील नागपंचमी (Nag Panchami).

नागपंचमीच्या (Nag Panchami) दिवशी शेतकरी शेतात काम करीत नाहीत. जमीन नांगरत नाहीत. या दिवशी भाजी चिरायची नाही. चुलीवर तवा ठेवायचा नाही. पोळ्या करावयाच्या नाहीत. फक्त पुरणाची दिंडी करण्याची प्रथा आहे. नागपंचमीच्या दिवशी सासुरवाशीणीनी माहेरी येण्याची प्रथा आहे.

दक्षिण काशी वाई येथील नागपंचमी

या सणाच्या दिवशी वैदू लोक वेताच्या करंडीत नाग घेऊन शहरात, ‘नागाला दूध पाजा’ म्हणत नागदर्शन घडवीत घरोघर फिरतात. खेड्यातील स्त्रिया पाटावर हळद आणि रक्तचंदनाने नागाची आकृती काढून त्याची पूजा करतात. अनेक स्त्रिया मिळून मिसळून वारुळाला जातात. गावात नागोबाचे देऊळ असेल तर देवळा भोवती फेर धरतात. गाणी गातात, नाचतात.
चल ग सये वारुळाला ! नागोबाला पुजायला !!

अशी गाणी गाऊन नागाला (वारुळाला) फुले, दूर्वा वाहतात. लाह्या दूध वाहतात. अशा गाण्यात / कार्यक्रमात अनेक प्रौढ स्त्रिया सहभागी होतात. एकमेकींचे सुखदुःखे एकमेकींना सांगतात. समाजात एकता बंधुता स्थापन होण्यास अशा सणांचा उपयोग होतो.

Other Articles: Marathi Ukhane – मराठी उखाणे idea

Marathi Ukhane – मराठी उखाणे for both Men & Women

1 thought on “Best नागपंचमी(Nag Panchami) माहिती 2024”

Leave a Comment