Marathi Mhani (म्हणी): 100 रोजच्या वापरासाठी महत्त्वाच्या म्हणी

Marathi Mhani (म्हणी): 100 रोजच्या वापरासाठी महत्त्वाच्या म्हणी

marathi mhani

मराठी म्हणी (Marathi Mhani)

म्हणींच्या प्रसाराला स्थळाप्रमाणे काळाच्या ही मर्यादा पडतात. मराठी भाषेत संस्कृत, हिंदी, गुजराती अशा निरनिराळ्या भाषांतून म्हणी आल्या आहेत.

नवीन म्हणी(Marathi Mhani) कळण्यास या ब्लॉगचा आपणास उपयोग होईल. तसेच जुन्या म्हणी(Marathi Mhani) आपण वाचल्यास त्या म्हणींची उजळणी होईल. त्या वाचनातून आपणास आनंद मिळेल. याचा फायदा मराठीचे जाणकार वाचक यांना, तसेच शाळेपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस निश्चित होईल.

ते 00 मराठी म्हणी (Marathi Mhani)

१) अंथरून पाहून पाय पसरावे.
अर्थ: आपल्या ऐपतीप्रमाणे वर्तन ठेवावे.
२) आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते.
अर्थ: एकाने परिश्रम करावे व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
३) आपला हात जगन्नाथ.
अर्थ: मनुष्याचा उत्कर्ष त्याच्या स्वतःच्या कर्तुत्वावर अवलंबून असतो.
४) इकडे आड, तिकडे विहीर.
अर्थ: दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.
५) एका हाताने टाळी वाजत नाही.
अर्थ: भांडणाबद्दल एकट्यालाच दोष देता येत नाही.
६) उचलली जीभ लावली टाळ्याला.
अर्थ: अविचाराने बोलणे.
७) उथळ पाण्याला खळखळाट फार.
अर्थ: अंगी थोडासा गुण.
८) गाढवाला गुळाची चव काय?
अर्थ: ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
९) खाई त्याला खवखवी.
अर्थ: जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती असते.
१०) खायला काळ भुईला भार.
अर्थ: निरुपयोगी माणसे सर्वांनाच भारभूत होतात.

Other Article:Marathi Mhani Aani Arth (म्हणी व त्यांचे अर्थ.)

११ ते २० मराठी म्हणी (Marathi Mhani)


११) गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
अर्थ: मूर्ख लोक एका ठिकाणी जमले की मूर्खपणा करतात.
१२) गाड्याबरोबर नळ्याची यात्रा.
अर्थ: मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो.
१३) गरजवंताला अक्कल नसते.
अर्थ: दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे ऐकावे लागते.
१४) घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे.
अर्थ: स्वतःच्या कामाचा व्याप अतोनात असताना ,दुसऱ्याने आपलेही काम लादणे.
१५) घरोघर मातीच्या चुली.
अर्थ: सर्वसाधारण स्थिती सर्वत्र एकसारखीच असते.
१६) ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.
अर्थ: समान चारित्र्य असलेल्या माणसांनी एकमेकांचे दोष किंवा अवगुण काढण्यात अर्थ नसतो. कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना चांगलेच ओळखतात.
१७) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
अर्थ: जो आपल्यावर उपकार करतो त्याचे उपकार स्मरून गुणगान गावे.
१८) झाकली मूठ सव्वा लाखाची.
अर्थ: आपले गुणावगुण झाकून ठेवावे, तोंडाने त्याचा उच्चार करू नये.
१९) दुरून डोंगर साजरे.
अर्थ: कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.
२०) धरले तर चावते, सोडले तर पळते.
अर्थ: काहीच उपयोगाचे नसणे.


२१) धड तुला न मला, घाल कुत्र्याला.
अर्थ: काही माणसे स्वतःचा फायदा होत नसेल तर दुसऱ्याचाही लाभ होऊ नये म्हणून नासधूस करतात.
२२) नाचता येईना अंगण वाकडे.
अर्थ: आपल्यामधील कमतरता किंवा वैगून्य झाकण्यासाठी इतरांना नावे ठेवणे.
२३) भित्या पोटी ब्रह्मराक्षस.
अर्थ: भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात.
२४) भरवशाच्या म्हशीला टोणगा.
अर्थ: खूप आशा वाटणाऱ्या बाबतीत संपूर्ण निराशा.
२५) भुकेला कोंडा, निजेला धोंडा.
अर्थ: अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागवण्याची माणसाची तयारी असते.
२६) लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण.
अर्थ: लोकांना उपदेश करणे पण स्वतः मात्र त्यानुसार वागायचे नाही.
२७) शितावरून भाताची परीक्षा.
अर्थ: वस्तूच्या लहानशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे.
२८) शहाण्याला शब्दाचा मार.
अर्थ: शहाण्या माणसाला एक शब्द बोलण्यानेही तो ठिकाणावर येतो.
२९) साखरेचे खाणार त्याला देव देणार.
अर्थ: भाग्यवान माणसाला देवाची सतत साथ लाभल्यावर कशाचीही उणीव पडत नाही.
३०) हातच्या कंगनाला आरसा कशाला?
अर्थ: जी गोष्ट स्पष्ट आहे तिला सिद्ध करण्यासाठी पुराव्याची आवश्यकता नाही.

३१) ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.
अर्थ: कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये.
३२) ऐकावे जनाचे करावे मनाचे.
अर्थ: लोकांचे ऐकून घ्यावे व स्वमताने वागावे.
३३) एक ना धड भाराभर चिंध्या.
अर्थ: कोणतेही एक काम पूर्ण न करता अनेक लहानसहान कामे अर्धवट सोडून देणे.
३४) उठता लाथ बसता बुक्की.
अर्थ: करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल अद्दल घडविण्यासाठी सदा सर्वदा मार.
३५) गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
अर्थ: एखाद्या गोष्टीपासून फायदा झाला तर ठीकच आहे नाहीतर तोटा होणारच नाही.
३६) काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
अर्थ: अंत होण्याची वेळ आली होती, पण थोडक्यात निभावले.
३७) कडू कारले तुपान तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच.
अर्थ: दुर्जन कशानेही सुधारत नाहीत. वाईट गोष्ट चांगली करण्याचा प्रयत्न फुकट जातो.
३८) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
अर्थ: मनुष्याला जी खोड लागली असेल ती जिवंत असेपर्यंत जात नाही.
३९) ज्याच्या हाती ससा तो पारधी.
अर्थ: कर्तुत्व करायचे एकाने आणि त्याचे श्रेय किंवा फळ दुसऱ्याने लाटणे.
४०) चोराची पावले चोरालाच ठाऊक.
अर्थ: वाईट माणसाला वाईट माणसाच्या युक्त्या कळतात.

४१ ते ५० मराठी म्हणी (Marathi Mhani)

४१) चोर सोडून संन्याशाला फाशी.
अर्थ: खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
४२) डोंगर पोखरून उंदीर काढणे.
अर्थ: मोठ्या प्रमाणावर आरंभ करायचा पण त्या मानाने अत्यल्पच यश मिळणे.
४३) डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.
अर्थ: कोणतीच गोष्ट साध्य होत नाही.
४४) तळे राखील तो पाणी चाखील.
अर्थ: आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडातरी फायदा करून घेतोच.
४५) तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
अर्थ: एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे ,आणि त्याबद्दल त्याला तक्रार करण्यास मार्गही मोकळा न ठेवणे.
४६) नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा.
अर्थ: नाव मोठे पण कर्तुत्व अगदीच कमी प्रतीचे.
४७) नाक दाबले की तोंड उघडते.
अर्थ: दुसरा पर्याय किंवा मार्ग नाही अशी एखाद्याची कुटुचंबना केली तरच त्याला वठणीवर आणता येते.
४८) नाकापेक्षा मोती जड.
अर्थ: एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होणे.
४९) पळसाला पाणी तीनच.
अर्थ: कुठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.
५०) बळी तो कान पिळी.
अर्थ: बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो.

५१) बुडत्याचा पाय खोलात.
अर्थ: ज्याचा -हास किंवा अपकर्ष व्हायचा असेल ,त्याची वाईट प्रवृत्तीकडे आपोआपच घसरण होते.
५२) फुल ना फुलाची पाकळी.
अर्थ: वस्तुतः जेवढे द्यावयास पाहिजे तेवढे देण्याची क्षमता किंवा कुवत नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे.
५३) हत्ती गेला शेपूट राहिले.
अर्थ: कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि थोडासा व्हायचा राहिला अशी स्थिती.
५४) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
अर्थ: परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे व त्यासाठी स्वतःला मुळीच झीज लागू न देणे.
५५) हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये.
अर्थ: दूरचे मिळण्याच्या आशेवर जवळचे किंवा हातात असलेले गमावू नये.
५६) हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.
अर्थ: ज्या घरी स्वच्छता व उद्योग असतो त्या घरी धनधान्य असते व सुबत्ता नांदते.
५७) हत्तीचे ओझे हत्तीनेच उचलावे.
अर्थ: थोर लोकांची कामे थोर लोकच करू जाणे.
५८) अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
अर्थ: जो मनुष्य स्वतःला जास्त शहाणा समजतो तोच शेवटी फसतो.
५९) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
अर्थ: भलत्या माणसाशी आपली मैत्री झाली तर प्रसंगी प्राण गमवावे लागतात.
६०) आधी पोटोबा मग विठोबा.
अर्थ: प्रथम स्वार्थ नंतर परमार्थ.

६१) वराती मागून घोडे.
अर्थ: एखादी गोष्ट होऊन गेल्यावर नंतर त्याविषयीची सामग्री जमविणे व्यर्थ.
६२) वासरात लंगडी गाय शहाणी.
अर्थ: मूर्ख माणसांमध्ये थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो.
६३) भीक नको पण कुत्रा आवर.
अर्थ: मदत करायची नसल्यास करू नये, पण आपल्या कार्यात विघ्न तरी आणू नये असे सांगण्याची स्थिती.
६४) मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.
अर्थ: कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा भरमसाठ फायदा घेऊ नये.
६५) रात्र थोडी सोंगे फार.
अर्थ: कामे भरपूर पण वेळ थोडा.
६६) रोज मरे त्याला कोण रडे.
अर्थ: तिच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यात स्वारस्य राहत नाही व कोणी तिकडे लक्षदेखील देत नाही.
६७) लेकी बोले सुने लागे.
अर्थ: एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
६८) दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.
अर्थ: दुसऱ्याचा लहानसा दोषही आपल्याला दिसतो, पण स्वार्थी वृत्तीमुळे स्वतःच्या मोठ्या दोषाकडेही लक्ष जात नाही.
६९) देखल्या देवाला दंडवत.
अर्थ: एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून तिला नमस्कार करणे.
७०) दुभत्या गायीच्या लाथा गोड.
अर्थ: ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो.

७१) पालथ्या घड्यावर पाणी.
अर्थ: केलेला उपदेश निष्फळ ठरणे.
७२) तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले.
अर्थ: मूर्खपणामुळे दोन्ही बाजूंनी नुकसान होऊन हाती काहीच न लागणे.
७३) थोरा घरचे श्वान त्याला सर्व देतील मान.
अर्थ: मोठ्या माणसाच्या आश्रयाखाली राहणारा मनुष्य प्रभावी ठरतो.
७४) दिव्याखाली अंधार.
अर्थ: मोठ्या माणसात देखील काही दोष असतो.
७५) चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
अर्थ: प्रत्येकाला केव्हातरी अधिकार गाजविण्याची परिस्थिती अनुकूल होतेच.
७६) चोराच्या मनात चांदणे.
अर्थ: वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीस येईल, अशी सतत भीती वाटत असणे.
७७) चोराच्या उलट्या बोंबा.
अर्थ: स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे.
७८) घर फिरले की घराचे वासही फिरतात.
अर्थ: एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सगळेच त्याच्याशी उलटे बोलू लागतात.
७९) गरज सरो , वैद्य मरो.
अर्थ: एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्या पुढे पुढे करणे, व गरज संपली की त्याला ओळखही न देणे.
८०) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.
अर्थ: मूर्खाला हवा तेवढा किंवा कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही.

८१) कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
अर्थ: आपणच आपल्या विनाशास कारणीभूत होणे.
८२) कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
अर्थ: क्षुद्र माणसांनी दिलेल्या दोषाने थोरांचे नुकसान होत नसते.
८३) कोल्हा काकडीला राजी.
अर्थ: मिळेल ते पदरात पाडून घेणे.
८४) ओळखीचा चोर जीवे न सोडी.
अर्थ: ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
८५) कर नाही त्याला डर कशाला.
अर्थ: ज्याच्या हातून पाप घडले नाही त्याला भीती कसली?
८६) कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच.
अर्थ: देह स्वभाव कधीही बदलत नाही.
८७) काखेत कळसा गावाला वळसा.
अर्थ: भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यास तयार होणे.
८८) करावे तसे भरावे.
अर्थ: ज्या प्रकारचे कृत्य केले असेल त्या प्रकारचे परिणाम भोगण्यास तयार होणे.
८९) आईजीच्या जीवावर बाईजी उदार.
अर्थ: दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
९०) आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला.
अर्थ: ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे.

९१) आपला तो बाळ्या दुसऱ्याचे ते कार्टे.
अर्थ: आपल्या माणसाचे कौतुक आणि दुसऱ्या माणसाला नावे ठेवण्याची वृत्ती.
९२) असतील शिते तर जमतील भूते.
अर्थ: एखाद्या व्यक्तीकडून लाभ होणार असेल तर त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
९३) अडला नारायण गाढवाचे पाय धरी.
अर्थ: प्रसंगी शहाणा मनुष्यदेखील मूर्ख किंवा क्षुद्र माणसाचे आर्जव करतात.
९४) आयत्या बिळात नागोबा.
अर्थ: दुसऱ्याने श्रम करावे व फळ आपण खावे.
९५) आपलेच दात, आपलेच ओठ.
अर्थ: शिक्षा करणारे आपणच आणि ज्याला शिक्षा करायची तो सुद्धा आपल्यातलाच अशी अडचणीची अवस्था.
९६) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
अर्थ: अतिउतावळेपणामुळे मूर्खपणाचे वर्तन करणे.
९७) हसतील त्याचे दात दिसतील.
अर्थ: लोकांच्या निंदेची पर्वा न करणे.
९८) पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
अर्थ: दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यापासून मनुष्य काही बोध घेतो, व सावधगिरीने दक्षता घेऊन वागतो.
९९) धनाची करी माया, उडत्या पक्षाची छाया.
अर्थ: पैसा आज आहे, उद्या नाही.
१००) खोट्याच्या कपाळी गोटा.
अर्थ: खोटेपणा अथवा वाईट काम करणाऱ्या माणसाचे नुकसानच होते.

Buy Book मराठी म्हणी व वाक्यप्रचार कोश

Leave a Comment