Tukdoji Maharaj information in Marathi | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.

Tukdoji Maharaj information in Marathi-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९०९–१९६८) हे महान संत, समाजसुधारक आणि राष्ट्रभक्त होते. त्यांनी ग्रामगीता या ग्रंथातून ग्रामविकास, सामाजिक समता आणि स्वावलंबन यांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या भजनांमधून त्यांनी जनजागृतीचे कार्य केले.

(१९०९- १९६८) एक महान संत, आणि समाज सुधारक होते. त्यांनी ‘ ग्रामगीता ‘या आपल्या ग्रंथात खेड्यांचा विकास व सामाजिक समतेचा विचार मांडला होता. त्यांनी आपल्या भजनाद्वारे ग्रामोन्नतीची, स्त्री पुरुष समानता आणि बंधुभावाचा संदेश दिला. त्यांचे विचार स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन यावर आधारित होते.

तुकडोजी महाराज जन्म, शिक्षण.

माणिक नामदेव इंगळे उर्फ तुकडोजी महाराज यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी विदर्भातील अमरावती जवळील यावली गावी झाला. भाट-ठाकूर हे त्यांचे घराणे. त्यांची आई ईश्वर भक्त होती. ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा हे असल्याने माणिक वर भजना-पूजनाचे संस्कार बालपणीच झाले.

माणिकला वडिलांनी चांदुर येथे शाळेत घातले. पण माणिकचे मन शाळेच्या अभ्यासात कधीच रमले नाही. ते शाळेला दांडी मारून मारुतीच्या मंदिरात किंवा शिवालयात जाऊन गायन, भजन करू लागले. चांदूरला व्यापारात त्यांच्या वडिलांचा जम बसला नाही म्हणून ते पुन्हा माणिकला घेऊन यावलीला आले.

तिथे त्यांनी त्याला शाळेत घातले, पण माणिक शाळेत न जाता रानात निघून जाईल व तेथे बसून भजन करी. यावलीत महादेवाच्या मंदिरात हानवंतीबुवा खंजीर वादन करीत. त्यांच्याकडून खंजिरी वादनाची कला माणिकने अवगत केली.
आपल्या आईबरोबर माणिक वरखेडला मामा गोविंदराव वानखडे यांच्याकडे गेला.

तिथे माणिकचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. वरखेडला नाथपंथीय श्री अडकोजी महाराजांचा सहवास माणिकला लाभला. महाराजांना ते आपल्या उत्तम स्वरांनी भजने गाऊन दाखवीत. अडकोजी महाराजांनी माणीकचे नाव
‘ तुकडोजी ‘ ठेवले. तुकडोजी भजन लिहून गोड आवाजात लोकांना गावून दाखवीत. तुकडोजीने सद्गुरु आडकोजी महाराजांना गुरुस्थानी मानले.

तपश्चर्या.

माणिक स्वतःला तुकड्या- दास म्हणवून घेतो, भजन गातो, म्हणून वडिलांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर तुकडोजी अवघ्या नऊ वर्षाचे असताना घराबाहेर पडले.

तुकडोजी तपश्चर्या करण्यासाठी रामटेक, ताडोबा, रामदिघी या आरण्यात हिंडले. तिथे त्यांना ध्यानधारणा, समाधिपर्यंतचे ज्ञान एका अज्ञात योगी पुरुषाकडून प्राप्त झाले.

तुकडोजी योगी होऊन सर्व- सिद्धीसंपन्न झाले. नंतर चित्तूरच्या आरण्यात काही काळ साधना केल्यानंतर त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला. पुढे समाज जागृती व देव आणि देवतांचा प्रसार ते गावोगावी करू लागले.

तुकडोजींनी लोकसेवेचे असिधाराव्रत पत्करून आपले तन, मन, धन, वाणी, लेखन सर्वकाही भारत देश व भारतीय जनता यांच्या चरणी अर्पण केले.

म. गांधी यांची भेट.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत सालबर्डी या आदिवासी खेड्यात शिवशंकराचे पवित्र जागृत स्थान आहे. तिथे नामजप यज्ञ सहा महिने चालला होता.

रुद्र- यागाची पूर्ण जबाबदारी तुकडोजी महाराजांनी स्वतःवर घेतली होती. श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर धर्माचे काम समजून सामान्य जनतेने हा यज्ञ यशस्वीपणे केला होता. या यशाचा बोलबाला ऐकून.म. गांधीजींनी तुकडोजी महाराजांना सेवाग्रामला आपल्या भेटीला बोलावले. ऑगस्ट १९३६ मध्ये घडलेली ही गोष्ट आहे.

तिथे राहून तुकडोजींनी ‘ लहर की बरखा ‘ हे पुस्तक लिहिले.म. गांधींना दाखवले. साध्या शब्दात गुढ अर्थ असलेला पाहून म. गांधींनी त्यांच्या काव्य प्रतिभेचे कौतुक केले. दर सोमवारी म. गांधी मौन व्रत पाळत असत. तुकडोजी महाराजांना ते भजन म्हणण्यास सांगत.

‘ उंचा मकान तेरा, कैसी मजल चढू मै ‘ हे तुकडोजी महाराजांनी रचून गायलेले भजन म. गांधीजींचे अत्यंत आवडते होते. असेच एका सोमवारी भजन गात असता फिर एक बार गाओ असे महात्मा गांधीजी उद्गारले आणि त्यांचे मौनव्रत भंग पावले.म. गांधींच्या सहवासात सेवाग्रामात राहून तुकडोजी महाराज सुत कातीत व खादी वापरत.

लोकजागृती व स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग.

१९३६ ते १९४२ पर्यंत तुकडोजी महाराज भजन, भाषण, अभंग ,पोवाडे गाऊन लोक जागृतीचे कार्य करीत होते. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. ऑगस्ट १९४२ मध्ये आष्टी, चिमूर, यावली येथे जो स्वातंत्र्य संग्राम घडला त्यामागे तुकडोजी महाराजांची प्रेरणा होती. अमरावती, नागपूर, यवतमाळ, या ठिकाणी स्वातंत्र्याच्या लढ्याचे लोन पसरले, त्यामागे तुकडोजी महाराजांची संदेश जागृती होती.

२७ ऑगस्ट १९४२ रोजी तुकडोजी महाराजांना चंद्रपूरला अटक करण्यात आली. डिसेंबर १९४२ मध्ये त्यांना सोडून देण्यात आले.१९४३ मध्ये बंगालमध्ये दुष्काळ पडला, तेव्हा घरोघरी जाऊन धान्य गोळा करण्याचे कार्यही त्यांनी केले.

तुकडोजी महाराजांचे राष्ट्रीय विचार.

राष्ट्रसेवा हाच स्वतःचा धर्म मानणारे राष्ट्रसंत देश हाच देव मानीत. त्यांच्या मते धर्म अन देवभक्ती जर देशसेवेत अडथळा आणत असतील तर ती भक्ती नव्हे व तो धर्म ही नव्हे.

आजच्या काळात धर्माचा खरा मार्ग जर कोणी अवलंबिला असेल तर तो म. गांधींनीच. ज्यांनी राजकारणाचा कठीण पेचांचा खेळ खेळूनही देवावरील डोळस निष्ठेचा खुंट हातून निसटू दिला नाही. शूरवीरांच्या देश प्रेमाचा इतिहास कथन करून देव कार्य करणाऱ्या देश कार्याकडे तुकडोजी महाराज वळले. राष्ट्रीय आशय सांगणाऱ्या त्यांच्या साहित्याचे दोन भाग केले आहेत. पारतंत्र्यातील साहित्य आणि स्वातंत्र्योत्तर काळातील साहित्य.

राष्ट्रवादास सहकार्य

भारतात स्वातंत्र्य येऊ घातल्यावर महाराजांनी भाषणाबरोबरच भजने म्हटली व जनतेस जागृत ठेवण्याचे कार्य केले. आझाद हिंद सैनिकांचे काही मुख्य लोक महाराजांना भेटले व महाराजांनी सैनिकांच्या कवायतीवर भजन म्हणून गावोगावी फिरून जनजागृती चे काम केले. स्वातंत्र्यापूर्वी पार्श्वभूमी तयार करून देशास पूरक असेच कार्य ते करीत होते.

निरनिराळ्या संस्थानिकांशी परिचय झाला होता. त्याचा उपयोग संस्थाने विलीन करण्याच्या वेळी केला. कोल्हापूरचे संस्थान महाराजांच्या प्रयत्नांनीच विलीन झाले. महाराजांचा वल्लभभाई पटेल, नेहरू, गांधी व इतर नेत्यांशी संबंध येऊ लागला.

त्या काळात निझामाने विदर्भाला आपल्याकडे घेण्याचा धूर्त प्रयत्न चालविला होता. त्यावेळी तुकडोजींनी मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये जागृती निर्माण करून ब्रिटिश पंतप्रधान ॲटली व गव्हर्नर जनरलला तारा केल्या. वऱ्हाड हा निजामाला देऊ नये म्हणून महाराजांनी सुचविले. त्यावेळी तुकडोजी महाराजांनी निजाम हद्दीवर जागोजागी 43 व्यायाम वर्ग घेऊन जनतेस तयार ठेवले.

डॉ. राजेंद्र प्रसाद व तुकडोजी महाराज भेट.

तुकडोजी महाराज यांनी भारतभर भ्रमण केले. अनेक पुस्तके लिहिली. गीते ,पदे, भजने रचली.१९४९ मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद तुकडोजी महाराजांना भेटण्यास गुरुकुंज आले.

त्यांचे कार्य, तळमळ, उत्साह, संघटन शक्ती, सर्वधर्मसमभाव इत्यादी गुण पाहून ते भारावून गेले व त्यांना
” राष्ट्रसंत ” ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला.

‘ ग्रामगीता ‘ ग्रंथाची निर्मिती

तुकडोजी महाराजांनी धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर होणारे वाद थांबविण्याकरिता, अंधश्रद्धा दूर करण्याकरिता भजने गायिली, भाषणे दिली.

१९५३ साली आषाढी एकादशी क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात तुकडोजी महाराजांना ध्यानस्थ स्थितीत पांडुरंगाने स्फूर्ती देताच विश्वाची चिंता वाहणारी विदर्भीय भाषेत गीतेसमान ‘ ग्रामगीता ‘ निर्माण झाली. यात महाराजांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. ग्रामगीतेतून निष्काम कर्मयोग सांगितला आहे. राष्ट्रसंतांचा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यात 41 अध्याय आहेत.

संत तुकडोजींचे शैक्षणिक विचार.

शिक्षण हे मनुष्याचा तिसरा डोळा असून माणसाचे भूषण आहे असे तुकडोजी म्हणत. तरुणांना सुदृढ व सशक्त बनविण्याचे शिक्षण देणारे प्रगल्भ विचार त्यांनी तरुणांसमोर मांडले.

सर्वांना समान शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. ज्या शिक्षणाने शरीर, मन व आरोग्य यांचा विकास होईल असे शिक्षण तरुणांना दिले पाहिजे. अशा प्रकारचे धोरण डोळ्यासमोर ठेवून ‘ वर्धा शिक्षण योजना ‘ आखण्यात आली, या अभिनव योजनेने संपूर्ण शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलवून टाकला.

लोकांना श्रमदानाचे व कृतीनिष्ठतेचे महत्व पटवून दिले. केवळ वाचता लिहिता येणे एवढाच शिक्षणाचा अर्थ नव्हे तर मुलांचा मानसिक विकास होणे हे खरे शिक्षण होय. महाराजांच्या मते प्रमाणपत्राची प्राप्ती म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षण हे सभ्यतेवर संस्कारावर अवलंबून असते.

विश्व धर्म परिषद.

२३ जुलै १९५५ रोजी जपानमध्ये भरणाऱ्या विश्वधर्म परिषदेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भारतातून निवड करण्यात आली. महाराजांनी परिषदेचे उद्घाटन केले. खंजिरीच्या आवाजाने, भजनाने त्यांनी जपानमध्ये लोकांना आपलेसे करून घेतले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे प्राचीन संस्कृतीचे अभिमानी होते, तरीसुद्धा त्यांचा दृष्टिकोन अद्यावत होता.

१९६२ मध्ये देशावर परत चक्र आले तेव्हा सीमेवर सैनिकांमध्ये भाषणाद्वारे, भजन गाऊन नवचैतन्य, धैर्य व शौर्य निर्माण करण्याकरिता संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर ते गेले.
११ ऑक्टोबर १९६८ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ब्रह्मलीन झाले.
३० एप्रिल १९०९ ही त्यांची जन्मतारीख आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Other Articles:
Savitribai Phule | भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व स्त्री शिक्षणाची जननी

Mahatma Jyotiba Phule Biography in Marathi | समाजक्रांतीचे जनक पूर्ण माहिती

Best सरदार वल्लभभाई पटेल – भारताचे लोहपुरुष | जीवनचरित्र, कार्य आणि योगदान

Leave a Comment