मकर संक्रांत.(Makar Sankranti)
सूर्याचा मकर राशितप्रवेश करण्याचा हा दिवस. संक्रांत म्हणजे संक्रमण, सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याच्या क्रियेस संक्रमण म्हणतात. मकर संक्रांत हा सण १४ जानेवारीला येतो. या दिवसानंतर सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो.
मकरसंक्रांत (Makar Sankranti) सणाची प्राचीन परंपरा.
या सणाला खूप प्राचीन परंपरा आहे. जेव्हा आर्यलोक ध्रुव प्रदेशात राहत होते, तेव्हापासून हा सण सुरू झाला असे मानले जाते. सहा महिन्यांची रात्र संपवून उत्तरायणाच्या प्रारंभी ज्या दिवशी सूर्याचे किरण पृथ्वीवर पडतात तेव्हा लोक अतिशय आनंदित होतात. त्या आनंदा- प्रित्यर्थ हा सण सुरू झाला. हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ असतो म्हणून संक्रांतीला ‘अयन संक्रांती ‘ असे म्हणतात. मकर संक्रांत (Makar Sankranti) हा पर्वकाळ म्हणजे विशेष पुण्यकाळ मानलेला आहे. म्हणून या दिवशी तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. म्हणून लोक गंगास्नानाला जातात. नव्या वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते असे मानण्यात येते.
मकर संक्रांतीची धार्मिक कथा (Makar Sankranti).
संकासुर व किंकासुर नावाचे दोन महाभयंकर दैत्य होते. त्यांनी देवांनाही त्रास दिला व त्यांचा पराभव केला. त्यांनी तिन्ही लोकांस त्रास दिला. सर्व देवांनी आदिशक्तीला प्रार्थना करून या संकटातून वाचविण्याची विनंती केली.
आदिशक्तीने संकासुरास ठार मारून त्रैलोक्यावरील संकट दूर केले. त्यावेळी लोकांनी आनंदोत्सव साजरा केला, तोच हा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण. दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासुराचा वध केला म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते.
संक्रांत सण तीन दिवसांचा.
संक्रातीचा हा सण तीन दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत व किंक्रांत असे हे तीन सण. हा सण तृप्तीचा-भोगाचा आहे.
मार्गशीर्ष पौष हे महिने शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस असतात. गहू-शाळू पिकलेला असतो. शेतात हरभरा, वाल- पापडी, ओल्या शेंगा आलेल्या असतात.
संक्रांतीच्या दिवशी सुवासिनींना हळदीकुंकू.
संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी पाटावर संक्रांतीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.
गुळ- खोबऱ्याचा नैवेद्य दाखवितात. त्यादिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संध्याकाळी आयोजित करून महिलांना हळदी कुंकवाचे निमंत्रण देतात.
एका मातीच्या मडक्यात भुईमूग, गाजर, उसाचे पेरे, शेंगा, पैसे, सुपारी इ. ठेवून त्याची पूजा करतात. सुवासिनी ‘ सुकडे ‘ देतात. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन एकमेकींना तिळगुळ देतात.
नववधूचा महत्त्वाचा सण.
संक्रांत हा नववधूचा सजण्याचा सण. लग्नानंतर संक्रांतीला पहिल्या वर्षी तिळवणीचा सण करण्याची महाराष्ट्रात पद्धत आहे. नव्याने लग्न झालेल्या मुलीला हलव्याचे दागिने घालून सजवितात. जावयाला भेटवस्तू देतात.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी तीळ पाण्यात टाकून स्नान करतात. या दिवशी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी, लोणी, वांग्याचे भरीत, मुगाची गरमागरम खिचडी, त्यावर खोबरे व तूप, गाजर, वांगे, सोलाणे
( शेंगसोला) यांची भाजी हे पदार्थ जेवणात असतात. हे सर्व पदार्थ पौष्टिक, स्निग्ध व आरोग्यदायक असतात.
किंक्रांतीला लहान मुलांना बोराने स्नान.
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांतीचा असतो. त्यादिवशी प्रवास वर्ज करावा असे मानले जाते. संक्रांत येणे म्हणजे अनर्थ ओढवणे. अनिष्ट परिणामाची बाधा होऊ नये म्हणून लहान मुलांना ‘ बोर- नहाण ‘ घालण्याची पद्धत आहे.
आरोग्याचा विचार.
मकर संक्रांत हा केवळ धार्मिक सण नाही. त्याच्या मागे सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्याचा विचार आहे. संक्रांत हिवाळ्याच्या दिवसात असते. सुगीचा हंगाम असतो. नवीन तीळ, नवीन गुळ तयार झालेला असतो. या काळात आपल्याला स्निग्ध, उष्ण, पौष्टिक पदार्थाची आवश्यकता असते. म्हणून या सणाच्या दिवशी गुळाची पोळी हे मुख्य पक्वान्न करतात. या दिवशी तिळगुळ किंवा तिळाचे लाडू यांना फार महत्त्व आहे.
तिळगुळ घ्या गोड बोला.
या दिवशी संध्याकाळी घरोघरी जाऊन नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांना तिळगुळ द्यावयाचे असतात. तिळगुळ देताना म्हणतात तिळगुळ घ्या गोड बोला.
भांडणे, एकमेकांवरील राग विसरून परस्परांवर प्रेम करणे, बंधुभाव वाढविणे यातच संक्रांतीचे महत्त्व आहे. असा हा परस्पर स्नेह वाढविणारा, सर्वांना आनंद देणारा सण आहे. काही ठिकाणी या दिवशी पतंग उडविण्याचा कार्यक्रम असतो. लहान थोर पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. शेवटी असे म्हणावेसे वाटते.
” सन संक्रांतीचा मोठा, नाही आनंदाला तोटा.! “
Other Articles – Christmas information in Marathi | ख्रिसमसची माहिती 2025