जिवाजी महाले हे छ. शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक, पराक्रमी शिलेदार आणि एकनिष्ठ योद्धे होते. प्रतापगडच्या युद्धात त्यांनी छ. शिवाजी महाराजांचे प्राण वाचविले होते.
जन्म : जीवा महाले यांचा जन्म ९ ऑक्टोबर १६३५ रोजी, कोंडवली ता. वाई.जि. सातारा येथे झाला.
जीवा महाले यांचे वडील.
जीवा महाला हा मूळचा कोंडवली या गावचा रहिवासी होता. ते जातीने न्हावी असून, कान्होजी जेधे यांचे संरक्षण/देखरेख करणाऱ्या इतिहास प्रसिद्ध देव महाला यांचा मुलगा होता. जीवाचे मूळ आडनाव सकपाळ असे होते.
वाई-महाबळेश्वरकडे पूर्वी महाला हा शब्द न्हावी याअर्थी वापरला जात असे. त्यामुळेच महाल आहे त्याचे नाव तोंडी व बखरीत नोंदविल्याने हे आडनाव कायम झाले असावे.
जीवा महाला यांचे वडील देव महाला हे कारीच्या जेद्यांचे एकनिष्ठ सेवक होते. हे नाईकजी जेथे म्हणजे इतिहास पुरुष कान्होजी जेधे यांचे वडील होय.
शिवछत्रपतींच्या चाकरीत दाखल.
शहाजीराजांच्या आज्ञाने सन १६४७ साली कान्होजी बंगळूरहून पुण्यात आले व शिवछत्रपतींच्या चाकरीत दाखल झाले, तेव्हा त्यांच्यासोबत तान व जीवा महाला या उभयतांनीही स्वराज्याची चाकरी पत्करली.
जिवाजी महाला यांचे वडील देवमहाला पैलवान होते. त्यांनीच जीवा महाले यांना पैलवानकीचे धडे दिले होते.
जिवा महाला हा शरीराने अतिशय धिप्पाड, धाडसी व बेडर होता.
तान व जीवा महाले हे मोठे मर्दाने व एकनिष्ठ सेवक असल्याचा उल्लेख सातारच्या शाहू महाराजांनी त्यांच्या वंशज दिलेल्या एका सनदापत्रात आढळतो.
प्रतापगडाची लढाई.
छ. शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील मावळ प्रांत आपल्या अखत्यारीत आणला होता. त्यावेळी हा प्रांत आदिलशाहीच्या अखात्यारीत होता. त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे होते, म्हणून शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते.
विजापूरच्या दरबारात शिवाजीचा बंदोबस्त करण्याची मोहीम अफजलखानाकडे देण्यात आली. आदिलशाही दरबारात शहाजी व अफजलखानाचे वैर होते.
अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधू संभाजी यांची दगाफटका करून हत्या घडवून आणली होती. अफजल खान मोठा फौज फाटा घेऊन विजापूरहूनजून १६५९ मध्ये निघाला.
येताना अनेक देवळे व मूर्ती भंग करीत तो निघाला . शिवाजी महाराजांनी खान आपल्याला पकडण्यासाठी येत आहे हे कळल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील दुर्गम असलेल्या प्रतापगडावर हलवला.
अफजल खान शिवछत्रपतींच्या भेटीसाठी जावळीत येऊन दाखल झाला. शिर्याच्या कस्तुरी- रंगास कपटाने ठार मारणारा अफजल खान हा आपणासही ठार मारण्याचा दुष्ट हेतू मनी धरूनच जावळीत डेरे दाखल झाला आहे व भेटीदरम्यान तो निश्चितपणे दगा फटका करणार याची पुरेपूर खात्री असल्याने शिवछत्रपतींनी जावळीच्या निबीड आरण्यातच खानाची कबर खोदण्याचा निर्धार केला, व स्वतःच्या संरक्षणाची भक्कम व्यवस्था उभी केली.
भेटीच्या आदल्या दिवशी स्वराज्यातील इतर ठिकाणी जुजबी सैन्य ठेवून शिवछत्रपतींनी आपली सारी फौज जावळीत एकत्र आणली. नेताजी, तानाजी, येसाजी, मोरोपंत, रामजी यासारख्या आपल्या प्रमुख सेनानायकांच्या नेतृत्वाखालील फौज गडाभोवतालच्या आसमंतात मोक्याच्या ठिकाणी पेरून ठेवली.
होता जीवा म्हणून वाचला शिवा.
प्रत्यक्ष भेटीच्या वेळी खानाकडून दगा होण्याची शक्यता विचारात घेऊन शिवछत्रपतींनी स्वतःच्या रक्षणासाठी दहा अंगरक्षकांची निवड केली होती. या दहा अंगरक्षकांमध्ये जीवा महाला होता. जीवा महाला हा अंगरक्षक म्हणून शिवरायांच्या समावेत असल्याचा उल्लेख सभासद बखरीत आढळतो.
अफजलखानाच्या भेटीसाठी शिवछत्रपती ज्यावेळी भेटीच्या शामियान्यात आले, त्यावेळी त्यांच्यासोबत जीवा महाला होता. भेटीच्या शामियाण्यात दाखल झालेल्या शिवरायांना पाहताच त्यांचा विश्वास संपादन करण्याच्या उद्देशाने खानाने आपली तलवार कृष्णाजी भास्कर यांच्याकडे दिली. तेव्हा शिवाजी- महाराजांनी आपल्या हातातील पट्टा जीवा महालाच्या हाती दिल्याचा उल्लेख सभासद बखरीत मिळतो.
प्रत्यक्ष अफजलखानाची भेट( १० नोव्हेंबर १६५९)
प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठा शामियाना शिवाजी महाराजांनी उभारला होता. येथे ते अफजलखानाची भेट घेणार होते. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मात्र जीवा महाला भेटीच्या शामियान्यापासून जवळच्या अंतरावर टप्प्यात उभा होता.
भेटीच्या वेळी अफजलखानाने आपल्या कट्यारीने शिवरायांच्या पाठीवर वार केला पण अंगात चिलखत असल्यामुळे खानाचा वार प्रभावशाली झाला नाही.
खानाचा कुटील डाव जाणून शिवाजी महाराजांनी आपल्या डाव्या हातातील वाघनख्यांचा मारा खानाच्या पोटावर चालवून खानाची आतडी ओढून बाहेर काढली.
शिवरायांनी केलेल्या प्राणांतिक वारामुळे दगा, दगा, धावा, धावा असा ओरडा खानाने केला. खानाची ही आरडाओरड ऐकून बाहेर उभा असलेला त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा हा भेटीच्या शामियान्याच्या दिशेने त्वरित धावला.
शामियान्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अफजल खानास पाहून सय्यद बंडा शिवरायांच्यावर चालून गेला. सय्यद बंडा शिवरायांच्यावर वार करणार तोच जिवा महाले चपळाईने पुढे झाला, व सय्यद बंडाचा हात त्याच्या पट्ट्यासह खांद्यापासून वेगळा करून आस्मानी उडविला.
जीवा महालाने आणीबाणीच्या याप्रसंगी एका क्षणाचाही विलंब केला असता तर शिवरायांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता. या पार्श्वभूमीवर जीवा महालाने जी कामगिरी बजावली तिला मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
प्रसिद्ध म्हण.
या ऐतिहासिक प्रसंगामुळे मराठीत ” होता जीवा म्हणून वाचला शिवा ” ही प्रसिद्ध म्हण रुजली.
जीवा महाले यांचा सन्मान.
प्रतापगडच्या रणसंग्रामात जीवा महालाने जी मर्दुमकी गाजवली त्याबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांचा सन्मान केला. तसेच त्यास मावळातील साखर हे गाव इनाम दिले. जीवा महालाच्या घराण्याने शिवछत्रपतींच्या चार पिढ्यांची इनामइतबारे चाकरी बजावल्याचे इतिहासात नमूद आहे.
मृत्यू
जीवा महाले यांचा मृत्यू
१३ जानेवारी १७०९ रोजी झाला. त्यांची समाधी रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आंबवडे गावी आहे.
1. जीवा महाले कोण होते?
जीवा महाले (जिवाजी महाले) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक होते. प्रतापगडच्या भेटीत त्यांनी महाराजांचे प्राण वाचवले.
2. “होता जीवा म्हणून वाचला शिवा” या म्हणीचा अर्थ काय?
अफजलखानाच्या भेटीत सय्यद बंडाने महाराजांवर वार करण्याआधी जीवा महालांनी त्याचा हात छाटला. त्यामुळे वेळेवर मदत करणाऱ्या व्यक्तीमुळे संकट टळले, अशा अर्थी ही म्हण वापरली जाते.
3. जीवा महाले यांनी कोणाला मारले?
त्यांनी अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून त्याचा हात तोडला.
4. जीवा महाले यांची समाधी कुठे आहे?
आंबवडे गावी, रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी.
5. जीवा महाले यांना कोणते गाव इनाम मिळाले?
मावळातील साखर हे गाव.