श्री.संत सेना महाराज

श्री.संत सेना महाराज (इ.स.१३७९ -१४४८)

संत सेना महाराजांचा जन्म मध्य प्रदेशातील बांधवगड येथे झाला. ते वारकरी संप्रदायातील एक संत असून त्यांना ज्ञानेश्वर नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा होता. त्यांचे वडील हे ज्ञानेश्वरांचे वडील विठोबा, यांचे गुरुबंधू होते. रामानंद स्वामी हे त्यांच्या गुरूंचे नाव होते. लहानपणापासून सेना यांना परमेश्वरभक्तीची आवड होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना नाभिक व्यवसाय शिकवला होता. आपला व्यवसाय सांभाळून ते पांडुरंगाचे भजन-किर्तन करीत असत.

‌ वडिलांप्रमाणे त्यांनीही रामानंदस्वामी यांचे शिष्यत्व पत्करले. लोकांचे केस व दाढी करण्यात ते प्रवीण होते. त्यांच्या हाताला मृदू मुलायम स्पर्श होता, त्यामुळे लोक त्यांच्याकडे हजामत करवून घेण्यासाठी येत असत. तसेच लोक त्यांच्या भजन-कीर्तनास आवर्जून येत होते.

पांडुरंगाचा चमत्कार.

सेना यांची कीर्ती बादशहाच्या कानावर गेली, त्यांनी सेना महाराज यांना बोलावून घेऊन आपल्याकडे नोकरीस ठेवले. घरात एकदा सेना हे पांडुरंगाची पूजा करीत बसले होते. त्यात ते तल्लीन झाले होते. त्याचवेळी बादशहाकडून त्यांना हजामतीचे निमंत्रण आले.

” ते घरात नाहीत ” असे त्यांच्या पत्नीने सांगितले. परंतु त्यांच्या शेजाऱ्याने बादशहाकडे जाऊन सांगितले की, ” सेना न्हावी घरात देवपूजा करीत बसला आहे. त्याच्या बायकोने तो घरात नसल्याचे खोटं सांगितलं “. हे ऐकून बादशहाचा क्रोध अनावर झाला. त्याने सेवकास आज्ञा केली की, ” सेना चे हातपाय बांधून नदीत टाकावे.”

तेव्हा आपल्या भक्तास वाचविण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाने सेना न्हावी यांचे रूप धारण केले व बादशहासमोर गेले. सेनाला पाहताच बादशहाचा राग शांत झाला. तो राजाची हजामत करण्यास बसला. हजामत करीत असताना बादशहा मान खाली करी त्यावेळी वाटीतील पाण्यात बादशहाला पांडुरंगाचे प्रतिबिंब दिसे, वर पाहिले की, समोर सेना न्हावी दिसू लागे. वाटीतील ते रूप पाहून बादशहा अगदी मोहित झाला. त्याचे देहभान हरपले. हजामत झाल्यावर बादशहाने त्याला ओंजळभर होन दिले. पांडुरंगाने ते धोकटीत ठेवून, ती धोकटी सेना न्हावी यांच्या घरी नेऊन ठेवली आणि आपण गुप्त झाला.

बादशहाला ते ईश्वरीय स्वरूप पाहण्याची ओढ लागली. बादशहाने दुपारी पुन्हा सेना न्हावी यांना बोलावून घेतले. त्याला पाहताच त्याने ती सकाळची वाटी आणली आणि म्हणाला
” सकाळी मला या वाटीत जे चतुर्भुज रूप दिसत होते, ते मला पुन्हा दाखव. “
बादशहाचे हे उद्गार ऐकून सेना आश्चर्यचकित झाला. प्रातःकाळी बादशहाला जे रूप दिसले तसे पुन्हा दुपारी दिसेना. तेव्हा आपल्या रूपाने पांडुरंग आला असावा असे समजून त्याने पांडुरंगाचा धावा केला. तेव्हा बादशहाला पुन्हा ते रूप दिसले. नंतर सेना यांना आपल्या धोकटीत होन /धन दिसले. ह्या चमत्कारामुळे बादशहा विरक्त होऊन पांडुरंगाचे भजन करू लागला. सेना महाराज यांना आनंद झाला.

प्रत्यक्ष पांडुरंगाने बादशहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा.

अखेरचे पर्व.

सेना महाराज यांनी मध्य भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. नंतर त्यांनी पंढरपुरात वास्तव्य केले आणि पुढे ते आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेले. माऊलींच्या समाधीवर मस्तक टेकताच त्यांना ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन झाले. निवृत्तीनाथ, सोपान देव, मुक्ताबाई यांनी जेथे समाधी घेतली, तेथे जाऊन त्यांचे दर्शन घेतले. पुन्हा ते पंढरपूरला आले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. नंतर बांधवगड या आपल्या मायभूमीत परतले.

बांधवगडला त्यांचे राजा बीरसिंहांनी स्वागत केले. गावी आल्यानंतर ते फारसे कोणात रमले नाही. पंढरपूरहून येताना त्यांनी पांडुरंगाचे रूप डोळ्यात साठवले होते. ते घरातच चिंतनमग्न राहिले. विठ्ठलाचे नामस्मरण करत त्यांची समाधी लागली, व कुडीतील आत्मसत्व आनंतात विलीन झाले. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा होता. या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते.

एका हिंदी भाषिक संताची मराठी भक्ती रचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराज श्रेष्ठ मानले जातात. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरून सिद्ध होते. अतिशय उच्च विचारसरणी व पांडुरंगावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घडले महाराष्ट्रीय संतांच्या सहवासात.

संत सेना महाराज यांचे महत्वाचे अभंग.
म्हणवितो विठोबाचा दास ||१||
शरण जाईन संतास।
सदा सुकाळ प्रेमाचा ।
नासेदृष्ट मळ बुद्धीचा ।। २||
ऐकता हरीचे कीर्तन |
अभक्त भक्ती लागे जाण ।।३||
उभा राहे कीर्तनात ।
हर्षे डुले पंढरीनाथ ।। ४ ।।
सेना म्हणे हेची सुख |
नाही ब्रह्मासि देख ।। ५||

संतसंग आणि कीर्तनभक्ती या दोघांच्या बळावर आपले जीवन सफल होत, हे सेना महाराजांनी इथे सांगितले आहे. तसा त्यांचा स्वानुभव आहे. संत सहवासात, कीर्तनात दंग होऊन जाण्याचे सुख केवळ अपूर्व आहे.

सेना महाराज म्हणतात, मी स्वतःला विठ्ठलाचा दास म्हणवितो. देवदर्शन घडावं म्हणून संतसज्जनांना मी नम्र भावांन शरण जाईन. संतांच्या ठाई उदंड प्रेमाचा आढळ होतो. त्यांच्या संगतीत राहिल्याने मनोबुद्धीतली दुष्ट वासना नष्ट होते. संतांनी मांडलेल हरिकीर्तन ऐकताना ज्ञान लाभो होतो. जे अभक्त आहेत, तेही भक्तीच्या मार्गाने जातात. संत जनकथा कीर्तन करू लागले की, प्रत्यक्ष पांडुरंग हाही आनंदाने डुलु लागतो. किर्तन भक्तीतून लाभणार हे सुख, प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही मिळत नाही.

आम्ही वारीक वारीक।
करू हजामत बारीक ।।१||
विवेक दर्पण आयना दावू ।
वैराग्य चिमटा हालऊ ।।२||
उदक शांती डोई घोळू |
अहंकाराची शेंडी पिळू ।| ३||
भावार्थाच्या बगला झाडू।
काम क्रोध नखे काढू ।।४||
चौवर्णा देऊनी हात।
सेना राहिला निवांत ।।५||
विठ्ठलभक्ती प्रपंचात राहून करता येते. आपला व्यवसाय परमार्थरूप होऊ शकतो. सेना महाराज म्हणतात, भावार्थरूपी बगला झाडून, काखेतील केस काढून टाकू. तसंच इच्छा आणि रागरूपी वाढलेली नखं कापून बारीक करू. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णातील लोकांना अशी मदत करून, सेना महाराजांनी मनाची शांती अनुभवी आहे.

केशकर्तन नीट झाला आहे किंवा नाही, हे गिऱ्हाईकाला कळावं, म्हणून न्हावी शेवटी गिऱ्हाईकाच्या डोक्याच्या मागील बाजूस आरसा धरतात. त्यात पाहून गिऱ्हाईकानं समाधान व्यक्त केलं, म्हणजे त्या कारागिराला आपलं काम चांगलं झालं आहे याची पावती मिळते. असं साफल्य सेना महाराजांना लाभलं आहे. प्रस्तुत अभंगात सेना महाराजांनी आपल्या केसकर्तनाच्या व्यवसायावर एक पारमार्थिक रूपक रचल आहे.

प्रा. सतीश सूर्यवंशी. वाई.

Other Articles
लोकराजा राजर्षी शाहू महाराज. | Shahu-maharaj

Bhagwan Mahavir | शालेय विद्यार्थ्यांसाठी महावीरांची थोडक्यात माहिती.Netaji Subhas Chandra Bose Biography | नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती

Leave a Comment