Jagdish Khebudkar (जगदीश खेबुडक): लेखक, गीतकार जगदीश खेबुडकर माहिती

जगदीश खेबुडकर ( १०मे१९३२ — ३मे २०११ ) हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज आणि अष्टपैलू गीतकार होते. गेली ५१ वर्षे चित्रपट सृष्टीत गीत लेखक म्हणून कार्यरत होते. आज तागायत त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांसाठी ३००० गीते लिहिली. शिवाय ३५०० कवितांचे लेखन केले. लेखनाचे सर्वात जास्त राज्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

जन्म बालपण शिक्षण.

जगदीश खेबुडकर यांच्या वडिलांचे नाव गोविंद बाळकृष्ण खेबुडकर होते. तर आईचे नाव राधाबाई हे होते. खेबुडकर हे मूळचे कुलकर्णी. कुळांचे, शेतकुळांचे लिखित दस्तऐवज लिहिणारे ते कुळकर्णी. कुलकर्णी हे त्याचे सुधारित रूप. हे राहणारे खेबवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर या खेड्यातले.

जगदीश खेबुडकर यांच्या वडिलांनी खेबवडे या गाव नावाचे खेबुडकर हे सुधारित रूप करून, खेबुडकर आडनाव धारण केले. खेबुडकर यांचे वडील वारकरी पंथाचे होते. त्यांचे स्वतःचे भजनी मंडळ होते. त्यामुळे घरात भजनाचा सगळाच साज असायचा. गोविंदराव हे पेशाने प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे त्यांच्या सारख्या बदल्या होत असत.

हळदी या वडिलांच्या नोकरीच्या गावी दि.१० मे १९३२ रोजी जगदीश खेबुडकर यांचा जन्म झाला. जगदीश खेबुडकर यांचे बालपण तसं सुखा समाधानात गेले. वडील शाळेत शिक्षक असल्याने सगळे त्यांना शिक्षकाचा मुलगा, गुरुजी चा मुलगा, म्हणून आदराने ओळखत. जगदीश ला वडिलांबद्दल लहानपणापासून आदर वाटायचा.

आई भल्या पहाटेच उठून जात्यावर ज्वारी घेऊन दळायला बसायची. आईच्या मधुर आवाजातील ओव्या त्यांच्या कानावर पडायच्या. तेव्हा जगदीश अंथरुणातून उठून आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिथेच झोपायचा. आईच्या कर्णमधूर ओव्या, जात्याच्या संगीताबरोबर ऐकत पडून राहायचा. भल्या पाहटे ओव्या आणि जात्याचं नैसर्गिक संगीत ऐकायला मिळायचं. गीत आणि संगीताचा संस्कार खेबुडकर यांना आईच्या मांडीवरच झाला.

लहानपणीचा जगदीश इतर मुलांपेक्षा वेगळा होता. दंगा, मस्ती, खोड्या, मारामारी यापेक्षा निसर्गात रमान होणे, निसर्गाचे निरीक्षण करणे, भटकणे, घोड्यावर रपेट करणे, रानावनांत फिरणे असे छंद लहानपणीच त्यांना लागले होते. वडील सकाळी देवपूजा करायचे. जगदीश कुतूहलाने ती पूजा बघत बसायचा, घंटी तालात वाजवायचा. देवघरात अस्तिकाचे संस्कार घडत गेले. लहानपणी जगदीश विहिरीवरील मोटेवरील दोरीवर बसायचा, मोटकऱ्यांबरोबर मोटे वरची गाणी म्हणायचा. रानातले पेरू, चिंचा, आवळे हुडकून प्रसंगी झाडावर चढून, तो रानमेवा खायचा.

१९३९ साली आपल्या कुटुंबासह कोल्हापूरला वास्तव्याला आले. मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी हा त्यामागचा हेतू होता. जगदीश ने ‘ सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालयात ‘ इयत्ता चौथीत प्रवेश घेतला. मोठा भाऊ प्रायव्हेट स्कूलमध्ये दाखल झाला. धाकटी बहीण लता सिद्धेश्वर प्रशालेत शिकत होती.

३० जानेवारी १९४८ साली म. गांधींवर जवळून पिस्तुलान गोळ्या झाडल्या गेल्या. त्यात म. गांधींचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजता खेबुडकरांच्या घरात जमाव शिरला. त्यांनी सगळ्या खेबुडकर कुटुंबाला घराच्या बाहेर ओढून रस्त्यावर आणलं. व घर पेटवून दिल. खेबुडकर कुटुंब हतबलपणे पहात होते. जगदीश दुःखी मनाने हे सर्व पाहत होता. त्याच्या मनात भावनांचा उद्रेक झाला व पहिली कविता जन्माला आली.

‘ मानवते तू विधवा झालीस. हा खेबुडकर कुटुंबावर क्रूर घाला, जगदीश च्या वडिलांना सहन झाला नाही. त्यांना मानसिक धक्का बसला आणि त्यातच वडिलांचे अकाली निधन झाले. थोरल्या भावाने कुटुंबाचा भार उचलला .त्याच काळात जगदीश मॅट्रिकची परीक्षा पास झाला.

त्याकाळी गणेशोत्सव फारच थाटात साजरे होत असत. त्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाला मेळे हा साधा शब्द असायचा. या मेळ्यात लहान मुलांची गाणी, नाटिका, संवाद, विनोद, जादूचे प्रयोग, नृत्य असे सादरीकरण होते. या मेळ्यांचा उद्देश हा कौतुक, कलागुणांना वाव व निर्भेळ आनंद होता.

जगदीश खेबुडकर यांना या मेळ्यांसाठी गाणी लिहा म्हणून मागणी असायची. त्याकाळी त्यांनी भावगीत व गाणी मेळाव्यासाठी लिहिली. यातून त्यांना थोडेफार पैसे मिळत गेले. त्यानंतर औषधाच्या कारखान्यात मॅनेजर कम क्लार्कची नोकरी त्यांना त्यांचे चुलत काका यांच्या शिफारशीने मिळाली.१९५३ ,५४,५५ असे तीन वर्षे त्यांनी ती नोकरी केली.

एस.टी.सी. कोर्स.

शिक्षकांसाठी एस.टी.सी. सेकंडरी टीचर्स सर्टिफिकेट नावाचा एक पदविका कोर्स आहे हे खेबुडकर यांना समजले. कोर्स एक वर्षाचा होता. खेबुडकरांनी त्यात रीतसर प्रवेश घेतला. कोर्स रात्रीचा घेतला कारण नोकरी व कोर्स दोन्हीही त्यांना करावयाचे होते. रात्री ७ ते ९ या वेळेत एसटीसी कोर्सला त्यांना हजर व्हावं लागायचं. त्या कोर्सला ते प्रथम श्रेणीत प्रथम आले.

एसटीसी नंतर त्यांना श्रीराम विद्यालय हायस्कूल राजारामपुरी सातवी गल्ली. या माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांना बोलावण्यात आले. तिथे त्यांनी एक वर्षभर नोकरी केली. त्यानंतर जून महिन्यात त्याच संस्थेच्या कर्नाटक हद्दीतील अक्कोळ या गावी त्यांना नोकरी मिळाली.

त्याच काळात डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्डाची एक जाहिरात आली (१९५५) तिथे त्यांना नोकरीचे बोलवणे आले. त्यांना कोल्हापूर जवळील पेठ वडगाव येथील नोकरीसाठी जावे लागले. ते कोल्हापूर ते पेठ वडगाव हा प्रवास सायकल वरून करत होते. ते अंतर २२ कि.मी. म्हणजेच जाऊन येऊन ४४ कि.मी. ते नोकरीच्या ठिकाणी जाऊन येऊन प्रवास करीत होते.

१९६० साली परत त्यांनी कोल्हापुरातच प्रायव्हेट हायस्कूल मध्ये नोकरी मिळविली. या हायस्कूल ने महाराष्ट्राला अनेक नामवंत, गुणवंत, सुसंस्कृत व्यक्ती दिल्या आहेत. अशा प्रसिद्ध हायस्कूलमध्ये खेबुडकर ज्ञानदान करू लागले. खेबुडकर यांच्या कवित्वाचा व कीर्तीचा पाया इथेच रचला गेला. मधल्या काळात खेबुडकर यांचा निरुपमा या इचलकरंजीतील मुलीशी विवाह झाला.

कोल्हापूरच्या भूमीत व्ही. शांताराम, अभिनेत्री सुलोचना आणि जगदीश खेबुडकर यांसारखी माणसं कोल्हापूरचं भूषण आहेत. यात बाबुराव पेंटर, आबालाल रहेमान, भालजी पेंढारकर, बाबुराव पेंढारकर, मास्टर विनायक इत्यादींचा समावेश करावा लागतो.

कवी, गीतकार जगदीश खेबुडकर.

कविता लिहिण्यापेक्षा गीत लिहित जा असा सल्ला खेबुडकर यांच्या थोरल्या भावाने दिला. आणि खेबुडकर यांचे गीत लेखन सुरू झाले. असेच एकदा खेबुडकरांनी आकाशवाणी पुणे केंद्राला आपल्या कविता व गीतांची वही पाठवून दिली.

आकाशवाणी पुणे केंद्राने त्यांच्या सर्व कविता व गीते स्वीकारली.१९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रावरून जगदीश खेबुडकर यांच्या कविता व गीते प्रसारित होऊ लागली. यामध्ये कविता, गीते, भजने ,लोकगीते यांचा समावेश होता. जगदीश खेबुडकर यांचे नाव आकाशवाणी वरून रोज लोकांना ऐकू येऊ लागले.

चित्रपट सृष्टीत प्रवेश.

वसंत पवारांनी प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक अनंत माने यांच्याकडे खेबुडकरांची शिफारस केली. त्यावेळी अनंत माने ‘ नार निर्मिते नरा ‘ हा चित्रपट करीत होते. कथा ग .दी. माडगूळकरांची होती. माडगूळकरांनी तीन गाणी या चित्रपटासाठी लिहिली होती. चार गाणी खेबुडकर यांनी लिहिली. त्याआधी खेबुडकर यांनी तीन लावण्या लिहिल्या होत्या.

१) नाव गाव कशाला पुसता?
मी हाय कोल्हापूरची
मला म्हणतात लवंगी मिरची.
२) लाडी नको, गोडी नको.
३) तरुणपणाचं, कौतिक म्हणून
किती नटू मी किती नटू?

या लावण्यांना ‘ रसरंग फाळके पुरस्कार ‘मिळाला. या लावण्यांना संगीत वसंत पवार यांनी दिले होते. जगदीश खेबुडकरांचा हा क्षण त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट मानतात.

तसंच वसंत पवार यांना आपला गॉड फादर मानतात. त्यानंतर खेबुडकर यांना काय हो चमत्कार हा चित्रपट मिळाला. त्यात खेबुडकर यांची सर्व गाणी होती. वासुदेव आला, हो वासुदेव आला, आज गुलाबी पत्र आले मला आणि नको रे वाजवू पावा, ही गाणी लोकांना खूपच आवडली. खेबुडकर यांना पूर्ण महाराष्ट्र गीतकार म्हणून ओळखू लागला.

त्यानंतर ‘ सवाल माझा ऐका’ यातली सगळीच गीते लिहायला मिळाली. त्यानंतर केला इशारा जाता जाता, गणगौळण सुशीला असे एक एक चित्रपट मिळत गेले. सुशीला मधील कुण्या गावाचं आलं पाखरू या गाण्याने सगळ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. अशा रीतीने खेबुडकरांना एक एक चित्रपट मिळत गेले. थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातील गाणी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात देवघरात जाऊन पोहोचली.

दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, शुभंकरोती म्हणा, मुलांनो, शुभंकरोती म्हणा.
हे गीत इतके गाजले की महाराष्ट्रातील मुलं रोज देवघरात संध्याकाळी हे गीत म्हणू लागली.

आम्ही जातो आमच्या गावा हा चित्रपट कमलाकर तोरणे करत होते. तोरणेंनी या चित्रपटातील सर्व गाणी खेबुडकरांना लिहावयास दिली. खेबुडकरांनी खूप सुंदर गाणी लिहिली. यातलं देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले.

स्वप्नात रंगले मी, हवास तू मज, हवास तू ही चार गीते तर त्या काळात खूपच गाजली. शाळा, कॉलेजात, स्नेहसंमेलनात गायिली जाऊ लागली. जगदीश खेबुडकर या गीतकाराचे शब्दावरील प्रभुत्व, हवा का आता सर्वांच्याच लक्षात आला. या चित्रपटाच्या गीत लेखनाबद्दल त्यांना उत्कृष्ट गीतकार म्हणून शासनाने पारितोषिक दिले.

अनंत माने यांनी तर त्यांच्याशी अलिखित करारच केला. माझ्या चित्रपटांची सर्व गाणी तुझ्याकडे असतील असे ते खेबुडकर यांना म्हणाले.अनंत माने मराठी चित्रपट सृष्टीतील एक बडेप्रस्त. खेबुडकर तर त्यांचे गीत लेखकच होते. अनंत माने म्हणजे तमाशा चित्रपटाचा हुकमी एक्का होते.

मराठी सिनेमाच्या पडत्या काळात मराठी सिनेमा, मराठी कलाकार, पडद्यामागचे तंत्रज्ञ, कामगार, एकट्या अनंत माने यांनी जगवले होते. हे त्यांचे मराठी सृष्टीसाठी फार मोठे योगदान आहे. अनंत माने यांनी ६० च्या आसपास चित्रपट काढले. शंकर पाटील कथाकार, खेबुडकर गीतकार, वसंत पवार, राम कदम संगीतकार, निर्माता दिग्दर्शक अनंत माने हा संचच कार्यरत होता.

अनंत माने, कमलाकर तोरणे, दत्ताराम गायकवाड यांच्या चित्रपटात गाणी लिहिणारे खेबुडकर कोल्हापूरचेआहेत हे भालजींच्या कानावर गेले होते. भालजी पेंढारकर मोहित्यांची मंजुळा नावाचा चित्रपट करीत होते. त्याची गाणी लिहिण्यासाठी त्यांनी खेबुडकरांना बोलावलं. हा खरं तर खेबुडकर यांचा सन्मान होता. खेबुडकरांनी मोहित्यांची मंजुळाची सर्व गाणी लिहिली. ही सर्व गाणी गाजली.

त्यानंतर भालजींनी साधी माणसं नावाचा चित्रपट हातात घेतला. चित्रपट अत्यंत साधा पण भावपूर्ण होता. चित्रपटाची कथा, संवाद, पटकथा, गाणी भालजींनीच लिहिली.

पण एका गाण्याला बालाजी थांबले. काही केल्या त्या प्रसंगाला साजेस गाणं त्यांना लिहिता येईना. शेवटी खेबुडकर यांना बोलावलं आणि म्हणाले खेबुडकर, एक गाणं पाहिजे. खेबुडकरांनी चित्रपटातील प्रसंग विचारला. आणि त्याच ठिकाणी त्यांनी ते गीत लिहून दिलं.

ऐरणीच्या देवा तुला, ठिणगी, ठिणगी वहू दे.
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

हे गाणं लता मंगेशकर यांनी गायले व याला संगीतही दिले. खेबुडकरांनी हे गीत लिहून फार मोठ लौकिक धन मिळवलं आहे. ऐरणीच्या देवानंतर गीतांचा पाऊसच खेबुडकरांनी पाडला.

  • * कल्पनेचा कुंचला, स्वप्न रंगी रंगला
    चित्र मी काढू कशी सजना सांग ना सांग ना.
    .* दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
    सत्य शिवाहून सुंदर हे…….
    .* धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
    शब्दरूप आले, मुक्या भावनांना..
    .* पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला
    चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला.
    द्वंद्व गीते, एकट्याची गीते, लावणी, भारुड, लोकगीत, भक्ती गीते, भजन, प्रार्थना देवघरातील, माज घरातील, राना वनातील. सगळ्या प्रकारच्या गीतासाठी, खेबुडकर यांची लेखणी चौफेर फिरू लागली.

जगदीश खेबुडकर व व्ही. शांताराम.

व्ही. शांताराम यांच्या कानावर जगदीश खेबुडकर यांचे नाव गेले. शांताराम बापूंनी खेबुडकर यांची हस्ते पर हस्ते माहिती मिळविली व त्यांना आपणास भेटावयास बोलावलं.

व्ही. शांताराम हे एक परीस होते. त्यांच्याजवळ गेलेल्यांच्या आयुष्याचं सोनं झालं होतं.व्ही. शांताराम व खेबुडकर यांची भेट झाली. शांताराम बापूंनी खेबुडकर यांना चार वर्षे गीते व कथा लिहावयाच्या आहेत हे सांगितले. त्यासाठी तुम्हाला इथं चार वर्षे बसायचे आहे.

एखाद्या राज लेखनिकाला जी व्यवस्था मिळते ती व्यवस्था खेबुडकर यांची करण्यात आली. लिहायला स्वतंत्र खोली, फॅन, फोन, दारात एक शिपाई, मदतनीस, जेवण खान, चहा, नाश्ता, फिरायला मोटर आणि पाहिजे तिथे मुक्त संचार स्वातंत्र्य. शांताराम बापूंनी आपलं वजन खर्ची घातलं.

खेबुडकर यांना चार वर्षाची सलग रजा मंजूर करून घेतली. चार वर्षाचा, प्रत्येक महिन्याचा, पगार वाढीसह पगार प्रत्येक महिन्याला मिळायचा. गीत लेखनाचे वेगळे पैसे. बाकी व्यवस्था फ्री ऑफ चार्ज.

राजकमल कला मंदिरातल्या स्वतंत्र खोलीत खेबुडकर भराभर गीत लिहू लागले. एका मागून एक ११० गीत लिहिली . त्यातली फक्त दहा गीत बापूंनी निवडली.
नायकाच्या मनावर नायिकेला ताबा मिळवायचा आहे. इथे नृत्य नाही. लावणीचा बाज हवा, पण लावणी नको, प्रेम गीताचे भाव हवेत पण प्रेम गीत नको. गीतात विरह जाणवावा पण विरहगीत नको.

गीतात शृंगार हवा पण शृंगार गीत नको. अशी ४९ गीत खेबुडकरांनी लिहिली व शांताराम बापूंना दाखविली. खेबुडकर गीत लिहून द्यायचे बापू म्हणायचे छान! पण खेबुडकर काळजात शिरत नाही. काळजात घुसणारे गीत पाहिजे. खेबुडकर तो कागद परत घ्यायचे व पुन्हा दुसरे गीत लिहावयास घ्यायचे.

त्यादिवशी खेबुडकर शांताराम बापूंना म्हणाले मी गीत लिहिल्याशिवाय झोपणार नाही. त्या रात्री दोन वाजता खेबुडकर अस्वस्थ मनाने राजकमल स्टुडिओ भोवती फेऱ्या मारत होते. शेवटी दमून ते इमारतीच्या पायऱ्या चढत असताना एकदम वीज चमकावी असे काही तरी झालं आणि पटकन शब्द डोळ्यांपुढे आले. खेबुडकर पळतच खोलीत गेले. भराभर शब्द कागदावर लिहिले.

तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ, रंग महाल.

खेबुडकर यांचे 50 वे गीत आणि राम कदम यांची चाल
व्ही. शांताराम यांना पसंत पडली. एका प्रसंगासाठी ४९ गीते लिहूनही एकही गीत शांताराम बापूंना पसंत पडले नाही. पिंजरा चित्रपटासाठी एकूण 112 गीते लिहिली होती., हे एक रेकॉर्डच होते.

तुम्हावरी केली मी मर्जी बहाल ही लावणी, खेबुडकरच्या लावणी गीताचं सरताज होऊन बसली आहे. आजही याचे शब्द, भाव, अर्थ, सुरावट जुनी झाली नाही.

कशी नशिबाने आज थट्टा मांडली हे गीतच चित्रपटात नव्हतं. हे गीत, शेवटी चित्रपटाचं कथासार सांगत पाठीमागील घटनांना उजाळा देत. बाई आणि बाटलीच्या नादान एका आदर्श शिक्षकाची काय दशा होते. ते बघून आणि ऐकून प्रेक्षक सुन्न होतो. अंतर्मुख होऊन चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो. हे या गीताचे श्रेष्ठत्व आहे. हे गीत चित्रपटाला तारक झाले.

१९७३ ते १९७७ अखेर खेबुडकर राजकमल स्टुडिओत होते. या पाच वर्षाच्या काळात त्यांनी पिंजरा, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, झुंज, असला नवरा नको ग बाई या बापूंच्या चार चित्रपटांचं काम केलं. चित्रपटाच्या तीन पिढ्यांचे साक्षीदार, चित्रपट सृष्टीतील तीन पिढ्या त्यांनी पाहिल्या. अनेक घटनांचे ते साक्षीदार होते.

द्वंद्वगीते, सोलो गीते, भारुड, भक्ती गीते, लोकगीते, प्रार्थना, स्वागत व समारंभाची गीते, गणगौळण, लावणी, वग, गौराई व गणपती गीते, डोंबारी, कुडमुड्या जोशी, माकडवाला, नंदीबैल हे असे कितीतरी प्रकार त्यांनी हाताळले. एकनाथ महाराजांच्या नंतर लोक- जीवनातील अशी गीते खेबुडकर यांचीच आहेत.

बालगीता बरोबर नांदी, भक्ती व स्फूर्ती गीतांचा त्यांनी पाऊस पडला. हादग्याची गाणी, झगडा, सवाल-जबाब, कोळीगीते, दिंडी वारकरी ,
एकतारी हे भजनाचे सर्व प्रकार हाताळले. खेबुडकर सर्व प्रकारच्या गीतांचे बहरलेले झाड होते.
‌. आतापर्यंत सुमारे १४ पुस्तके यांच्या नावावर आहेत. संजय खान, कमल हसन यांच्याकडे हिंदीतून गीत रचना केली. थिएटर्स संस्थेतर्फे गावरान मेवा चे त्यांनी ३०० प्रयोग केले. गुलाबी गोंधळ, जीवाची मुंबई ह्या नाटकांचे प्रयोग त्यांनी केले.

ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात दहा शाखा निर्माण केल्या. दिग्विजय खानविलकर, डॉ. भुतादिया भूषण गजरानी, विश्वास पाटील यांच्यासारखे अनंत विद्यार्थी समाजामध्ये कीर्तीवंत झाले आहेत. अभंग महिला भजनी मंडळ या नावाचे भजनी मंडळ त्यांनी स्थापन केलं. त्यात ७५ महिलांचा सहभाग होता.

एकदाही कोठे तमाशा न पाहता त्यांनी तमाशाप्रधान चित्रपट गाजविले. गणपतीच्या स्थळांना न भेट देता अष्टविनायक ह्या चित्रपटातील गणेश महिमा त्यांनी गाजविला पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा ही रसिक लावणी लिहिली.

वास्तवाचे भान ठेवून गीत रचना करणारे खेबुडकर, काव्यात्मक हळुवार अंतःकरणाची गाणी लिहिणारे खेबुडकर, लबाड लांडगा ढोंग करतय असं बालकांसाठी रंजन गीत लिहिणारी खेबुडकर, न्याऊलीत मूर्ती विठ्ठलाची अशी मातृ प्रेमाची गरिमा गाणारे खेबुडकर, सत्व शिवाहून सुंदर हे असे विचार प्रधान गीत लिहून शुभंकर झालेले खेबुडकर, येरे कान्हा, ऐरणीच्या देवासारखे प्रभुची आळवणी करणारे गीत लिहून देणारे खेबुडकर सौंदर्यवादी होते. त्यांच्या मनाला वासल्याचे भान होते.

खेबुडकर यांचे अनेक रंगी विश्वस्वरूप त्यांच्या गीतामध्ये पसरलेले आहे. तरीही खेबुडकरांची कीर्ती गावरान मेव्यासारखी आहे.

३ मे२०११ रोजी महाराष्ट्रातील गीत सृष्टीतील इतिहासातील एक सोनेरी पान हरपले.

जगदीश खेबुडकर यांचे विक्रम व महत्त्वाचे कार्य.
* सर्वात जास्त चित्रपट गीते लिहिली आहेत, सुमारे ३००० गीते.
** सर्वात जास्त चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत ३०० चित्रपट.
** सर्वात जास्त संगीतकारांनी खेबुडकर यांच्या गीतांना संगीत दिले आहे.४८ संगीतकार.
** चित्रपट गीते लिहिण्याची प्रदीर्घ कारकीर्द १९६० पासून जवळजवळ ५० वर्षे.
** गीत लेखनाचे सर्वात जास्त राज्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.११ पुरस्कार.
** सुधीर फडके, भीमसेन जोशी, आशा भोसले पासून सोनू निगम, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत इ. सुमारे ४० गायक.
**जवळजवळ ३६ चित्रपट दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटात त्यांची गीते घेतली असून, व्ही. शांताराम , राजा ठाकूर, भालजी पेंढारकरांपासून आजच्या महेश कोठारे, सचिन पर्यंतच्या नावांचा त्यात समावेश आहे.
**अभंग थिएटर्स ही नाट्य संस्था स्थापून संस्थेमार्फत त्यांनी गावरान मेवा या कार्यक्रमाचे ३००० च्या वर प्रयोग महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर सादर केले आहेत .

Other Articles:
Savitribai Phule | भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व स्त्री शिक्षणाची जननी

Leave a Comment