Gudi Padwa Information in Marathi | गुढीपाडवा माहिती मराठी 2025
हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.
महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूला कडूलिंबाची डहाळे, काठीच्या वरच्या टोकाला रेशमीवस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गुढी (गाठी) बांधून त्यावर तांब्या/धातूचे भांडे बसवले जाते. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात, उंच गच्चीवर लावतात . गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुलं वाहून गुढी उतरवली जाते.

Gudi Padwa Information in Marathi
शालिवाहन राजा.
प्राचीन काळी शालीवाहन नावाचा राजा होऊन गेला. याच वेळी भारतात शक नावाचे परकीय राजे होते. शक राजे लोकांना त्रास देत असत. सर्व लोकांना ते छळत. शकांना सुंदर मुलींची खंडणी द्यावी लागत असे. शकांचा विजय साजरा करण्यासाठी आपल्या मुलींची साडी चोळीची गुढी उभी करावी लागत असे. या शक राजांना प्रथम विरोध केला तो पैठणच्या शालिवाहन राजाने. असे मानले जाते की त्याने (शालिवाहन राजाने) मातीचे सैन्य तयार केले व त्यात प्राण भरला.
त्याचा अर्थ असा की त्या काळात लोक चेतनाहीन, भ्याड-भेकड, स्वाभिमानशून्य होते. शालीवाहनाने त्यांच्यात पराक्रम व देशप्रेम जागे केले. शालिवाहनाने स्वकीययांना बरोबर घेऊन शकांची जुलमी राजवट नष्ट केली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. लोकांनी आपली घरे सजवली. विजयाचा ध्वज उभा केला. या दिवसापासून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू केली. हा दिवस म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा. यालाच आपण वर्षप्रतिपदा किंवा गुढीपाडवा असे म्हणतो.
पुराण ग्रंथातील वसू राजाची कथा.
प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याने आपल्या राज्याचा त्याग केला व आरण्यात जाऊन तप करू लागला. त्याची तपश्चर्या पाहून स्वर्गाचा राजा इंद्र घाबरला. आता हा वसुराजा आपले स्वर्गाचे राज्य घेणार अशी त्याला भीती वाटू लागली. मग इंद्र व इतर देव वसूराजाकडे आले व त्याला म्हणाले ‘वसुराजा, तू स्वर्गाचे राज्य करण्यास योग्य आहेस. परंतु पृथ्वीचा सांभाळ करण्यास तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. काही वर्षे तरी तू पृथ्वीवर राज्य कर.’ असे बोलून देवांनी वसुराजाला अनेक उत्तम शस्त्रे दिली. मग इंद्र म्हणाला “हे वसुराजा, या पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय एकही मित्र नाही. मी तुला एक वैजयंती माळ देतो.
हिचा मला काय उपयोग असे वसुराजांनी विचारले. इंद्र म्हणाला ‘ही जपमाळ तू गळ्यात घातलीस की कोणत्याही युद्धात तुला एकही जखम होणार नाही. तुला सर्वत्र विजय मिळेल. “
मग इंद्राने वसुराजाच्या गळ्यात वैजयंती माळ घातली व साधू लोकांच्या रक्षणासाठी वेळूची एक काठी दिली. वसु राजाने सुंदर वस्त्रे, अलंकार व फुलांच्या माळा यांनी ती काठी सुशोभित केली. तिची स्थापना केली व गंध अक्षता फुलांनी तिची पूजा केली. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. तोच हा गुढीपाडवा सण. याच दिवशी ब्रह्मदेवाने हे जग प्रथम निर्माण केले असे मानले जाते.
रामायणातील कथा.
प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी 14 वर्षे वनवासात काढली. केवळ वडील बंधू ची प्रेमळ आज्ञा म्हणून भरत अयोध्येचे राज्य चालवीत होता. तो श्री रामचंद्राच्या येण्याची वाट पाहत होता. 14 वर्षे पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरवले. तशी त्याने तयारी पण केली. दुसऱ्या दिवशी भरत भल्या पहाटे उठला. श्रीरामांच्या पादुकांची पूजा केली. मनोमन सीतामाई व श्री लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला. एवढ्यात तेथे हनुमान पुढे आला.
भरतास वंदन करून त्याने प्रभू रामचंद्र येत असल्याची वर्दी दिली. भरताला खूप आनंद झाला. त्याने शत्रुघ्नला सांगितले ‘आयोध्या नगरी सजवा! श्रीरामाच्या स्वागताची तयारी करा! ‘सर्वत्र आनंदी आनंद झाला.
नंदिग्रामपासून आयोध्या नगरी पर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. श्रीरामाचे पुष्पक विमान खाली आले. श्रीरामाच्या जयनादांनी आयोध्या दणाणून गेली. डोक्यावर श्रीरामाच्या पादुका घेऊन भरत पुढे गेला. तो देखावा पाहून अयोध्यावासीयांच्या डोळ्याचे पारणे फिटले. लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणे बांधली. गुड्या उभारल्या गेल्या.
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुढीवर अक्षदा टाकून ती व्यवस्थित उतरवावी. ही गुढी म्हणजे आपल्या पूर्वजांच्या विजयाची गुढी,आनंदाची गुढी.
ही गुढी म्हणजे आपल्या मनातील विकारांवर, वाईट वासनांवर, आळसावर मिळवलेल्या विजयाची पताका.
या दिवशी सकाळी स्नानानंतर कडुलिंबाची पाने गुळासोबत वाटून खाण्याची प्रथा आहे. कडुलिंबाला अमृत वृक्ष म्हणतात. त्याची पाने खाल्ल्याने सर्व रोगांचा नाश होतो. सुख, आरोग्य, विद्या, बळ, आयुष्य, बुद्धी व संपत्ती यांचा लाभ होतो. हा दिवस अत्यंत पवित्र व शुभ समजला जातो. आपल्या प्रसिद्ध साडेतीन मुहूर्तांत एक पूर्ण मुहूर्त म्हणून याची गणना केली जाते.
Read More – महाशिवरात्रीचे महत्व काय आहे
1 thought on “Gudi Padwa Information in Marathi |गुढीपाडवा माहिती मराठी 2025”