शाहू महाराज लौकिक अर्थाने राजे होते, तरी खऱ्या अर्थाने ते लोकराजे म्हणूनच सर्व परिचित होते. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने, प्रोत्साहनाने आणि अखंड परिश्रमाने महाराष्ट्रात अभूतपूर्व स्वरूपाची सामाजिक बदलाची प्रक्रिया सुरू झाली.
जन्म बालपण व शिक्षण
जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे हे कोल्हापूर जवळच्या कागलचे जहागीरदार होते. ते कोल्हापूर संस्थानाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. त्यांना २६ जून १८७४ रोजी मुलगा झाला. त्याचे नाव यशवंत असे ठेवण्यात आले.
कोल्हापूर संस्थानचे छत्रपती चौथे शिवाजीराजे यांना ब्रिटिश सरकार व संस्थानचे दिवाण बर्वे यांना वेडे ठरवून अहमदाबादच्या किल्ल्यामध्ये कोंडून ठेवले होते. याच किल्ल्यात त्यांना हाल हाल करून ठार मारण्यात आले. चौथे शिवाजी महाराजांचा याप्रमाणे दुर्दैवी शेवट झाला. ते निपुत्रक म्हणूनच निधन पावले.
त्यामुळे कोल्हापूरला संस्थानच्या गादीला वारस नव्हता. चौथ्या शिवाजी राजांच्या विधवा पत्नी आनंदीबाई राणीसाहेब यांनी कागलचे जहांगीरदार जयसिंगराव घाटगे यांचा थोरला मुलगा यशवंत यास दत्तक घेतले. आनंदीबाई राणीसाहेबांनी दत्तक घेतल्यावर राजपुत्राचे नाव शाहू राजे असे ठेवण्यात आले.१७ मार्च १८८४ रोजी राज्यारोहणाचा सोहळा कोल्हापूर येथे संपन्न झाला.
खास दरबार भरवून नव्या राजांना तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी शाहू राजे १२ वर्षांचे होते. त्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण देऊन भाविकाळात ते कोल्हापूरचे सामर्थ्यशाली राजे होतील यासाठी प्रयत्न सुरू झाले.
त्यांच्या शारीरिक विकासासाठी खास प्रशिक्षक नेमण्यात आले. अश्वारोहण, शिकार ,चित्रकला, कुस्ती, व्यायाम हेही क्षेत्र आत्मसात करायला शाहू राजांनी सुरुवात केली.
राजांनी शिक्षणात चांगली प्रगती लवकरच केली. पुढील शिक्षणासाठी त्यांना राजकोटच्या कॉलेजात पाठविण्यात आले. प्राचार्य मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली १८८६ पासून शाहू राजांच्या शिक्षणास सुरुवात झाली. राजकोट येथे शिकत असताना राजांनी बौद्धिक शिक्षणाइतकेच आपल्या शारीरिक, प्रगती- कडेही लक्ष दिले. कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ होता. नेमबाजी, घोडदौड, कवायत अशा मैदानी आणि मर्दानी खेळांचे ते चाहते होते. राजकोट येथे राजांच्या मनाची आणि शरीराची जडणघडण होत होती.
राजकोट येथील शिक्षणानंतर राजे पुढील शिक्षणासाठी धारवाडला आले. तेथे उदारमतवादी, सालस, प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष असेमि. फ्रेजर त्यांना गुरु म्हणून लाभले.मि. फ्रेजर यांनी शाहू राजांचा शैक्षणिक दिनक्रम अतिशय काळजीपूर्वक तयार केला होता. सुमारे चार वर्षाच्या काळात फ्रेझर यांच्या कडक आणि प्रेमळ मार्गदर्शनाखाली शाहू राजांचा बौद्धिक, मानसिक विकास घडवून आला. तशीच त्यांना निकोप शरीरसंपदाही लाभली.
शाहू महाराजांचा विवाह.
धारवाड येथे शिक्षण चालू असताना १८९१ मध्ये त्यांचा विवाह पार पडला. बडोद्याच्या गुणाजी राव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (अक्कासाहेब ) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. प्रजेच्या कुटुंबाबरोबरच शाहू राजांवर आता स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली.
समर्थ राजा.
राजांनी पहिल्या दोन वर्षातच अनेक लोककल्याणकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी जिद्दीने केली. प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी वेठबिगारीची जुलमी पद्धत बंद केली. बाजारपेठेत लोकांची फसवणूक आणि व्यापाऱ्यांचा काळाबाजार थांबविला.
सावकारी कर्जातून लोकांची मुक्तता व्हावी म्हणून त्यांना कमी व्याजाने कर्ज पुरवठा करण्यात आला. राज्याच्या मालकीच्या चराऊ कुरणात गोरगरीब जनतेच्या जनावरांना चरण्याची परवानगी देण्यात आली. गरीब लोकांच्या आजारी जनावरांना औषध, चारापाणी याची खास व्यवस्था करण्यात आली. गुळाची नवीन बाजारपेठ सुरू केली. राज्यातील संपूर्ण उद्योगधंद्यांची पाहणी करण्यात आली. डोंगराळ आणि वनभागातील आदिवासींना राज्याच्या सेवेत नोकऱ्या देण्याची व्यवस्था करण्यात आली.
दुष्काळ व प्लेगची साथ, उपाय योजना.
शाहू राजे नेहमी आपल्या प्रजेत मिळून मिसळून राहत. प्रजेची सुखदुःखे जाणून घेण्यासाठी ते स्वतः खेड्यातून हिंडत, सामान्य प्रजेशी संवाद साधत. प्रजेची गाऱ्हाणी ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करीत असत.
तीर्थस्थळी असहाय्य अवस्थेत भीक मागणाऱ्या महारोग्यांची दयनीय दशा पाहिल्यावर त्यांनी १८९७ साली कोल्हापूर येथे
महारोग्यांची वेगळी वसाहत स्थापन केली. गारगोटी येथे लोकांच्या मागणीवरून मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली.
कोल्हापूर संस्थानात मोठा दुष्काळ पडला असता त्यांनी लोकांना स्वस्त धान्य, पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा याची चांगली व्यवस्था केली.
दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी त्याकाळी रोजगार हमी योजना सुरू केली. रस्ते, पूल, तलाव बांधून घेतले. मजुरांच्या लहान मुलांसाठी शिशुसंगोपन गृहे उघडली.
अपंग, अनाथ, आजारी, वृद्ध लोकांसाठी अनेक ठिकाणी निराधार आश्रम सुरू केले. देशभर दुष्काळाने लाखो लोक मरत असताना शाहू राजांच्या संस्थानात मात्र भुकेने एकही व्यक्ती दगावली नाही.
दुष्काळ संपल्यावर प्लेग या भयानक रोगाने थैमान घातले. या रोगापासून कसा बचाव करावा, त्यावर काय उपाय योजना कराव्यात याची माहिती देणारी पत्रके राजांनी ठीक ठिकाणी लावली. गावाबाहेर झोपड्या बांधून राहण्यासाठी लोकांना साहित्य पुरवण्यात आले. या काळात लोकांच्या घरांचे, मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सेवक नेमले. लोकांना निर्जंतुकीकरणाची औषधे मोफत पुरविली.
लेगच्या आजारी लोकांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात आले. अशाप्रकारे अवघे पंचवीस वर्षे वय असलेला राजा दुष्काळ, प्लेग, भ्रष्ट नोकरशाही, मस्तवाल अधिकारी, जुनाट रूढी परंपरा, या संकटांशी सामना करीत होते.
वेदोक्त प्रकरण.
वेदोक्त प्रकरण हे उच्चवर्गीय आणि क्षत्रिय यांच्यातील श्रेष्ठ कोण यावर चाललेला संघर्ष होता. वेदशास्त्रानुसार धार्मिक संस्कार करण्याचा, धार्मिक आचरण पूजापाठ करण्याचा अधिकार खालच्या कनिष्ठ वर्गातील लोकांना नाही ,असे वरिष्ठ सनातनी लोकांचे म्हणणे होते.
वेदोक्त प्रकरण म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात उठलेले प्रचंड वादळ होते. या प्रकरणाने शाहू राजांच्या जीवनातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात मोठी क्रांती घडून आली. उच्च वर्गातील सनातनी लोकांच्या वर्चस्वाविरुद्ध शाहू महाराजांना मोठा लढा द्यावा लागला.
छ. शाहू क्षत्रिय कुळातील होते. तरीसुद्धा तुम्ही शूद्र कुळातील आहात. तुम्हाला वेदोक्त पद्धतीने पूजा पाठ किंवा आचरण आणि धार्मिक संस्कार करण्याचा अधिकार नाही ,असे सांगत सनातनी उच्चवर्गीय लोकांनी शाहू राजांचा भयंकर अपमान केला. शाहू राजांकडे धार्मिक कार्य करणाऱ्या पुरोहितांचा छळ केला गेला.
राजांची बदनामी होईल असा मजकूर वृत्तपत्रातून छापून आणला. हे प्रकरण ब्रिटिश सरकारकडे गेले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली व सनातनी लोकांची भूमिका चुकीचे असल्याचा निर्णय दिला. शेवटी शास्त्री पंडितांची एक धर्मसभा भरली. शाहू छत्रपती असून त्यांना वेदोक्त आचरण करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे पत्र शाहू महाराजांना देण्यात आले.
वसतिगृहांची निर्मिती.
बहुजन जातीच्या मुलांना शिक्षण घेता यावे व त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी या हेतूने त्यांनी कोल्हापुरात विविध वसती गृह सुरू केली. सुरुवातीला त्यांनी व्हिक्टोरिया वसतिगृह सुरू केले. त्यासाठी जागा व आवश्यक ती आर्थिक मदत दिली. जैन वसतिगृह, मुस्लिम बोर्डिंग ,लिंगायत वसतिगृह ,अस्पृश्य वसतिगृह, दैवज्ञ बोर्डिंग, श्री नामदेव वसतिगृह, पांचाळ ब्राह्मण समाज वसतिगृह, सारस्वत ब्राह्मण वसतिगृह ,इत्यादी विविध समाजातील मुलांसाठी वसतिगृह सुरू केली. त्यामुळे कोल्हापूर नगरीला शाहू महाराजांनी वसतिगृहाची सुवर्णभूमी व दक्षिण महाराष्ट्रातील शैक्षणिक केंद्र बनविले.
खासबाग मैदान.
१९०२ साली छ. शाहू महाराज इंग्लंडच्या राजाच्या राज्यरोहण समारंभ निमित्त इंग्लंडला गेले होते. त्यावेळी त्यांना रोमला जाण्याचा प्रसंग आला. त्यावेळी त्यांनी ऑलिंपिक कुस्ती मैदानास भेट दिली. हे भव्य मैदान शाहू महाराजांना आवडले. त्यांनी कोल्हापुरात अशा प्रकारचे कुस्तीचे मैदान तयार करण्याचे ठरवले.
त्यांनी कोल्हापूर मध्ये जागा निवडून मैदानाचा उत्कृष्ट आराखडा तयार केला. भारतामध्ये पहिल्या नंबरचे कुस्तीचे मैदान तयार केले. हे ठिकाण कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचे प्रमुख केंद्र बनले.२०१२ मध्ये या ठिकाणी ४६ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली होती.
बहिष्कृत समाज परिषद.
३० मे१९२० ला अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची परिषद नागपुर येथे संपन्न झाली. तेव्हा एक लाख दलित बांधवांनी सजवलेल्या रथातून स्वतः ओढत छत्रपती शाहू महाराजांची मिरवणूक काढली, त्यावेळी दलित समाजाने आपल्या आवडत्या राजाविषयी उस्फूर्तपणे मत व्यक्त केले.
लेखकांना मदत.
समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी काही लेखक मंडळी ग्रंथ लेखन करीत होती. अशा लेखकांना शाहूराजे आर्थिक मदत करीत असत. अनेक ग्रंथ लेखनासाठी त्यांनी त्या त्या लेखकाला आर्थिक मदत दिली. सत्यशोधक चळवळीतील सर्वच कलाकारांना राजांनी उदार आश्रय दिला होता. इतिहासकार, पत्रकार यांनी त्यांचे कार्य व्यवस्थित पार पाडावे म्हणून अनेक प्रकारची मदत राजेंनी दिली.
हरितक्रांती घडवून आणली.
शेतीला पाणी पुरवण्याच्या नवीन योजना, सुधारित बी बियाणे, खतांचा वापर, शेतकऱ्यांना कमी व्याजाने अर्थ पुरवठा, सावकारी कर्जातून शेतकऱ्यांचे मुक्तता, गरीब शेतकरी आणि शेतमजुरांना श्रमाचा योग्य मोबदला, शेतीला पूरक उद्योगधंदे, उत्तम जनावरांची पैदास अशा नाना प्रकारच्या योजना शाहू राजांनी सुरू केल्या.
कर्जफेड करण्यासाठी सावकाराला शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करता येणार नाहीत, कर्जाचे व्यवहार लेखी आणि सरकारी नियमानुसार व्हावेत यासाठी त्यांनी नवे कायदे केले. जलसंपत्तीचा योग्य उपयोग व्हावा, शेतीला कायमचा पाणीपुरवठा व्हावा म्हणून राजांनी नद्यांवर धरणे बांधण्याचा उपाय शोधला.
धरणे बांधून शेतीला कालव्याद्वारे पाणी पुरवण्याच्या योजना सुरू केल्या.१९०९ साली त्यांनी राधानगरी धरण बांधायला सुरुवात केली. हे धरण त्यांच्या मुलाच्या काळात बांधून पूर्ण झाले.
कलाप्रेमी राजा.
किर्लोस्कर चे नटवर्य गणपतराव जोशी, चित्रकार आबालाल, नटसम्राट बालगंधर्व इत्यादी अनेक कलाकारांवर शाहू महाराजांनी निरपेक्ष प्रेम केले. यांच्या कलेला जगामध्ये मोठे केले. त्यामुळे शाहू राजांच्या कोल्हापूरला कलानगरी असेही म्हटले जाते.
नटसम्राट घडविण्याचे कार्य.
नारायणच्या आजोबांच्या विनंतीवरून शाहू राजांनी लहान नारायणचे गाणे ऐकले. त्यास मोठा कलाकार घडवण्यासाठी प्रोत्साहन दिले. नारायणला एका कानाने कमी ऐकू येत होते. तेव्हा मिरजेतील डॉक्टरांकडून त्यांच्या कानावर उपचार करून घेतले. किर्लोस्कर कंपनीमध्ये नारायण ला घेण्यासाठी प्रयत्न केले. हाच नारायण ‘ नटसम्राट बालगंधर्व ‘ झाले.
पॅलेस थिअटर.
नाटकासाठी राजांनी पॅलेस थिएटर हे नाट्यगृह बांधले. सध्या त्या नाट्यगृहाचे नाव केशवराव भोसले नाट्यगृह असे आहे.
त्यांच्या या महान कार्याचा गौरव म्हणून कानपूरच्या ‘ कुर्मी
क्षत्रिय सभेने ‘त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली. ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. जनतेचा सेवक म्हणून त्यांनी २८वर्षे राज्यकारभार केला.
वक्तृत्व (vaktrutva) एक प्रयत्नसाध्य कला.शालेय विद्यार्थ्यांसाठी.
Tukdoji Maharaj information in Marathi | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.