दत्त जयंती.Datta Jayanti Mahiti in Marathi
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला मृग नक्षत्र असताना संध्याकाळी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. या अवताराचा मुख्य गुण म्हणजे क्षमा. त्याने यज्ञक्रियांसहित वेदांचे पुनरुज्जीवन करून चातुर्वरण्याची पुनर्घटना केली. त्यामुळे या अवताराला अविनाशी समजण्यात आले. दत्त जयंतीला दत्ताचे उपासक उपवास करून श्री गुरुचरित्राचे पारायण करतात. गावातील दत्त मंदिरात दत्त जन्माचे किर्तन, भजन, पूजन, पालखी सोहळा इत्यादी कार्यक्रम केले जातात. या दिवशी गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, माहूर या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते.
दत्त जयंती.Datta Jayanti Mahiti in Marathi
दत्तात्रय अवताराची कथा.
अत्रीऋषींची पत्नी अनुसया ही महान पतीव्रता होती. ती आपल्या पतीची अगदी मनोभावे सेवा करीत असे. आपल्याला देवतुल्य पुत्र व्हावा असे त्या दोघांना वाटत होते. अत्रीऋषी व अनुसया पुत्रप्राप्तीसाठी त्र्यक्ष पर्वतावर गेले व तेथे त्यांनी भगवान विष्णूंची आराधना सुरू केली.
एके दिवशीअत्री स्नानसंध्या करण्यासाठी नदीवर गेले. आश्रमात अनुसया एकटीच होती. ती आपल्या पतीची वाट पहात होती. याचवेळी तीन गोसावी आत्रींच्या आश्रमात आले. आम्हाला भिक्षा वाढ असे ते अनुसयेला म्हणाले. अनुसयेने त्यांचे पाय धुतले, बसायला आसणे दिली. ती हात जोडून त्यांना म्हणाली माझे पतीदेव अनुष्ठानासाठी गेले आहेत. आपण थोडा वेळ थांबा. आम्हाला खूप भूक लागली आहे.
आम्हाला असे साधे भोजन नको आहे. इच्छा भोजन हवे. अंगावर वस्त्र न घालता आम्हाला भोजन वाढ असे ते गोसावी म्हणाले.हे ऐकताच अनुसयेने अंतरज्ञानाने ओळखले. हे कोणी साधे गोसावी, भिक्षेकरी नाहीत. प्रत्यक्ष त्रैयमूर्तीच आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत.
अनुसयेने आपल्या पतीचे स्मरण करून पूजा केली. हातातील तीर्थाच्या भांड्यातील काही तीर्थ त्या गोसाव्यांच्या अंगावर शिंपडले. त्या क्षणी त्या तीन गोसाव्यांची तीन सुंदर तेजस्वी बाळे झाली. त्यांना इच्छा भोजन तिने भरविले.
दुपारनंतर अत्री परत आले. अनुसयाने त्यांना सगळी हकीगत सांगितली. ही तीन बाळे म्हणजे प्रत्यक्ष ब्रम्हा ,विष्णू व महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रींनी ओळखले. अत्रींनी त्या बालकांना साष्टांग नमस्कार घातला, तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश प्रकट झाले. वर मग असे ते म्हणाले. अनुसया हात जोडून म्हणाली ” ही तिन्ही बाळे आपल्या आश्रमात पुत्ररूपाने राहावीत “. त्रिमूर्तींनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला.
त्यानंतर ब्रह्मदेव चंद्र झाला. श्री विष्णू दत्त झाला व महेश दुर्वास झाला. मग चंद्र व दुर्वास अनुसयेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा हा दत्त येथेच राहील. तोच त्रिमूर्ती आहे. त्रिमूर्ती दत्तांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. अत्रे म्हणून अत्रेय व अत्री ऋषींना तो देवांनी दिला म्हणून तो दत्त. यावरून दत्तात्रय हे नाव पडले. दत्ताच्या ठायी ब्रह्मा, विष्णू ,महेश यांचे स्वरूप आहे, म्हणून दत्ताला तीन शिरे, सहा हात आहेत.
दत्त संप्रदाय हा गुरु मार्ग आहे. परंपरेने चालत आलेल्या दत्तोपासनेतच हा गुरू मार्ग सिद्ध झाला. मध्ययुगात यावानी आक्रमणाच्या काळात मूर्तिभंजन झाले, अशावेळी मूर्ती ऐवजी पादुकांची पूजा सुरू झाली. वैदिक धर्मातील अद्वैती तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी या पंथाला लाभली.
ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा समन्वय दाखविणारी श्री दत्तात्रेयांची मूर्ती आज सर्वत्र आहे. शिव आणि विष्णूचे भक्त या प्रांतात एकत्र आले. जनार्दन स्वामी, संत एकनाथ, दासोपंत, माणिक प्रभू इत्यादी विचारवंतांनी या पंथाला संघटित रूप आणले.
दत्त जयंतीच्या आधी सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण करण अत्यंत शुभ मानले जात. गुरुचरित्र वाचल्याने भगवान दत्तात्रयांच्या कृपेची प्राप्ती होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. यासाठी ,विशेषतः दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्राची सांगता होईल, अशा प्रकारचे सात दिवसांचे पारायण केले जाते.