उत्तम वक्तृत्व शैलीचे रहस्य

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कै. भगवान कोंडीबा खरात या विद्यालयात १ ते १० वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात डॉ. नितीन कदम हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, माजी नगराध्यक्ष सौ. नीलिमा ताई खरात, माजी नगरसेवक बुवा खरात, वाई नगरपालिका प्रशासन अधिकारी वाळेकर, उद्योजक पी.के. यादव, निलेश खरात, प्रियंका जाधव, वरिष्ठ मुख्याध्यापक अरागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सभेचे अध्यक्ष नितीन कदम व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. सतीश सूर्यवंशी यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे.

विषय : उत्तम वक्तृत्व शैलीचे रहस्य.

१) भाषा व पाठांतर.

” शब्द म्हणजे कागदावर चित्रित केलेले तुमचे विचार. शब्द फुलांसारखे सुगंधी आणि रत्नांसारखे लावण्यवान असू शकतात.”
-वि.वा. शिरवाडकर.

लहान मुलांना देखील कळेल अशी भाषा आपण आपल्या भाषणात वापरली पाहिजे. जी भाषा तुमच्या श्रोत्यांना समजू शकते त्याच भाषेत तुम्ही भाषण केले पाहिजे. याचाच अर्थ असा की जर वाक्यांची आणि श्रोत्यांची म्हणजेच बोलणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची भाषा एकच असेल तरच भाषा चमत्कार करू शकते.

भाषा हे एकमेव असं माध्यम आहे ज्यामुळे आपण खूपच चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो. योग्य क्रमाने केलेली शब्दांची आणि संकल्पनांची मांडणी सहजतेने कोणताही विषय समजायला मदत करते.

बोलीभाषा व पुस्तकी भाषा या दोन भिन्न भाषा असतात. आपण जी बोलीभाषा वापरतो आणि लिखाणाची शैली असते यामध्ये खूपच फरक असतो. लोकांना आपल्या बोली भाषेतील संभाषण आवडते.

आपले भाषण तोंडपाठ केल्याप्रमाणे म्हणू नका. ते आपण उस्फूर्तपणे सांगत आहोत असे लोकांसमोर मांडा. तुम्ही काय सांगता यापेक्षा ते कसं सांगता हे अधिक महत्त्वाचं असतं.

” विषयाच्या ज्ञानापेक्षा अधिक काहीतरी आवश्यक असते. तुमच्या सादरीकरणात तळमळ असायला हवी. तुम्हाला असे वाटायला हवी की, तुमच्यापाशी सांगण्यासारखे काहीतरी आहे जे लोकांनी खरोखर ऐकलेच पाहिजे.”
-विल्यम जेनिंग्ज.

“प्रभावीपणे बोलता येणे ही मिळालेली नैसर्गिक देणगी नसून प्रयत्नपूर्वक मिळवलेले साध्य आहे.”
-विल्यम जेनिंग्ज बायन..

” आत्मविश्वास मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला ज्याविषयी बोलायचे आहे, त्याची तयारी इतक्या उत्तम प्रकारे करणे की त्यात अपयशाला संधीच सापडणार नाही.”
– लॉकवूड थॉर्प.

2) वाचनासंदर्भात :

आपण अनेक पुस्तके वाचतो त्यामुळे नकळत त्याचे भरपूर वाचन होते. वाचनाचा आनंदही मोठा असतो .”वाचनाने मनुष्य बहुश्रुत होतो. वाचन माणसाला पूर्णत्व देते.” बेकन.

आपली शब्द संपदा वाढवण्यासाठी विविध पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. तुम्ही जितकी पुस्तके वाचाल तितकी मनाची योग्य रचना बनायला, योग्य वाक्ये वापरण्यासाठी आणि उच्चार चांगले व्हायला मदत होईल. तुम्हाला हवी असलेली बौद्धिक पुस्तके वाचणे. जी पुस्तके वाचायची तुमची इच्छा आहे ती वाचायला सुरुवात करा. दररोज एक ठराविक वेळ वाचा आणि कालांतराने तुम्हाला वाचनाची सवय लागेल.

३) लेखन :

तुम्ही जे बोलणार आहात ते लिहून काढण्याची ही पद्धत तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे तुमचे विचार स्पष्ट होतात. ते विचार तुमच्या स्मरणात राहण्यास मदत होते. तुमची भाषा शैली सुधारते.
जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण आपल्या मेंदूला सर्वात महत्त्वाचे विचार निवडायचे प्रशिक्षण देत असतो. जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण मूलतः आपल्या मेंदूला सांगतो हा विचार सर्वात महत्त्वाचा आहे. मला लिहून घेऊ द्या. ज्यांना चांगले व्यक्त व्हायचे आहे, त्यांनी लिहिलेच पाहिजे.

जे लिहाल त्याची टिपणे फार आवश्यक आहेत. टिपणे काढणे म्हणजे व्यक्तीतील किंवा घटनेतील नेमकेपणा टिपणे होय.
लिहिताना तुमचे विचार स्पष्ट असावेत. वाक्ये अर्थपूर्ण असावीत.

४) सराव :

तुमचं भाषण प्रभावी आणि चांगलं करण्यासाठीची सर्वात चांगली पद्धत म्हणजे पुन्हा पुन्हा सराव करणे. तुमच्या मित्रांसमवेत सराव करा. एकटे असताना करा. बागेत फिरताना करा. बाकड्यावर बसलेले असताना करा. डोळे बंद करून करा आणि डोळे उघडे ठेवूनही करा. सरावाची एकही संधी सोडू नका.

मुख्य भाषण देण्या अगोदर पाच सहा वेळा तरी तुमच्या भाषणाचा सराव करा. भाषण तोंडपाठ करण्यापेक्षा त्यातील मुद्दे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही भाषण करताना अडखळला तर तुम्ही पुढचा मुद्दा बोलायला सुरुवात करा. भाषांण मध्येच थांबवू नका.
तुमचे भाषण पूर्ण करा. पाठांतरापेक्षा आपण भाषणाच्या सरावाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

५) बॉडी लँग्वेज.

तुमची देहबोली प्रभावीपणे वापरा.
आपल्या भाषणात देहबोलीचा फार मोठा प्रभाव पडतो. संशोधनाने हे सिद्ध केलं आहे की आपल्या देहबोलीचा श्रोत्यांवर ५५ टक्के प्रभाव पडत असतो.३८ टक्के प्रभाव तुमच्या बोलण्यातील चढउतारांचा असतो. भाषणात शब्दांचे महत्त्व फक्त ७ टक्के असते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

* भाषणामध्ये तुम्ही कोणते शब्द बोललात ते महत्त्वाचे नाही तर त्या मागची तुमची भावना अत्यंत महत्त्वाची असते.
* तुम्हाला आस्था आणि उत्साह वाढवायचा असेल तर ताटपणे उभे रहा. तुमच्या श्रोत्यांकडे सरळ पहा, प्रभावी हावभाव करा. आस्थेने व उत्साहाने कृती करण्यास सुरुवात करा.
* यापेक्षा सर्वात महत्त्वाचे तुम्ही तुमचे तोंड उघडा आणि बोला.
” निराश होऊ नका, परंतु जर झालात तर त्या निराशेत कार्यरत रहा.”
एडमंड बर्क.
बोलताना पाळावयाची पथ्ये .
* श्रोत्यांना तुमची भीती किंवा अस्वस्थता कळू देऊ नका.
* बोलताना आपले हावभाव आत्मविश्वासपूर्वक असले पाहिजेत.
* नकारात्मक हावभाव टाळा. एक सारखे चेहऱ्याला हात लावू नका.
* लेक्चर स्टॅन्डला फार घट्ट पकडून ठेवू नका.
* बोलताना तुमची देहबोली बोलकी असली पाहिजे. पण त्याचा अतिरेक टाळा. हातवारे करताना हात फारच उंचावू नका.
* तुमच्या चेहऱ्यावर स्मित असले पाहिजे. चेहरा आनंदी दिसला पाहिजे.
* आपला चेहरा हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असते. तुम्ही जे बोलत आहात त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर थोडाफार दिसू द्या.
* बोलताना दोन पायात थोडासं अंतर ठेवून बोला.

6)भाषण करताना आवाजाची लय बदला:

जेव्हा तुम्हाला आढळेल की तुम्ही एक सुरी बोलत आहात. आणि बहुतेकदा ते तारस्वरात असेल, तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःला सांगा मी एखाद्या दगडी पुतळ्याप्रमाणे बोलत आहे.
संभाषण करताना आपल्या आवाजाची लय प्रमाणामध्ये खालीवर होत असते. आपले भाषण नैसर्गिक वाटले पाहिजे.

7) इतर मुद्दे

* लोकांना समजणाऱ्या शब्दांमध्ये/भाषेमध्ये भाषण द्या.
* स्पष्टीकरणामुळे लोकांच्या विचारात परिवर्तन होऊन त्यांना जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो.
* ज्या भाषणात संदर्भ स्पष्टीकरण असल्यामुळे ती भाषणे दीर्घकाळ टिकतात.
* आपल्या विचारांविषयी आणि ध्येयाविषयीची असलेली स्पष्टता हेच भाषण यशस्वी होण्याचं सर्वात मुख्य कारण आहे. आपण काहीतरी महत्त्वपूर्ण सांगायला हवं .हा प्रत्येक भाषणाचा मुख्य उद्देश असतो. पण फारच कमी भाषणांमध्ये हा उद्देश पूर्ण होताना दिसतो.

संदर्भ पुस्तके. * टेड टॉक्स . क्रिस
अँडरसन अनु. प्रसाद ढापरे.*गेट एपिक शिट डन. अंकुर वारीकू अनु. विनिता माने पिसाळ. * खूप लिहा पैसा कमवा शशिकांत
कोनकर.* कार्यालयीन देहबोली
ॲलन आणि बार्बरा पीज अनु. रेवती पैठणकर. * प्रभावी वक्ता प्रभावी व्यक्ती डेल कार्नेगी अनु.
व्यंकटेश उपाध्ये.

Leave a Comment