या लेखात आपण Lokmanya Tilak Information in Marathi म्हणजेच लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण जीवनकार्य जाणून घेणार आहोत.

Lokmanya Tilak Information in Marathi | जन्म व शिक्षण.
लो. टिळकांचा जन्म रत्नागिरीत २३ जुलै १८५६ रोजी झाला. त्यांचे खरे नाव केशव असे होते. पण त्यांना लहानपणी बाळ असे म्हणत. त्यामुळे पुढेही बाळ हेच त्यांचे नाव पडले. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. गंगाधरपंत शिक्षण खात्यात नोकरीस होते. गंगाधरपंत गणित व संस्कृत या विषयांचे गाढे पंडित होते. त्यामुळे या दोन्ही विषयात बाळ चांगलाच पारंगत झाला. त्याला वाचनाची आवड बालपणापासून लागली.
बाळला आईचे सुख फार काळ मिळाले नाही. बाळ अवघ्या दहा वर्षाचा असताना त्यांची आई देवा घरी गेली. मॅट्रिकच्या वर्गात शिकत असताना दुर्दैवाने गंगाधरपंतांचे निधन झाले. त्यामुळे बाळ आपल्या काका काकूंकडे राहू लागला. त्यांनी बाळला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले.
मृत्यूपूर्वी त्यांच्या वडिलांनी (गंगाधरपंतांनी) बाळचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई याच्याबरोबर लावून दिला. यावेळी बाळचे वय पंधरा वर्षे होते. असा हा बाळ शिकत शिकत १८७२ साली मॅट्रिक झाला.
कॉलेज शिक्षणासाठी टिळक पुण्याला आले.१८७३ साली डेक्कन कॉलेजमध्ये दाखल झाले.
शरीरसंपदेला प्राधान्य.
टिळकांना महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला असताना, त्यांना आपली शरीर प्रकृती साथ देत नाही हे जाणवले. ते आजारी पडल्यामुळे त्याचा परिणाम अभ्यासावर होऊ लागला. त्यावेळी टिळकांनी डेक्कन महाविद्यालयात प्रथम वर्षी अभ्यासाकडे कमी लक्ष देऊन पौष्टिक खाणे, पिणे व व्यायाम याचेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.
प्रथम वर्षाच्या परीक्षेला न बसता त्यांनी वर्षभर व्यायाम शाळेत व्यायाम करून शरीर संपदा कमावली. त्यांचे शिक्षणातील एक मौल्यवान वर्ष वाया गेले. परंतु पुढील आयुष्यासाठी त्यांनी उत्तम शरीर- संपदा कमावली. त्याचा त्यांना आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यासाठी याचा उपयोग झाला.
व्यायाम आणि अभ्यास करत असतानाच टिळक १८७६ साली बी.ए. ची परीक्षा पास झाले. एम.ए. होऊन कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हावे असे बाळला वाटत होते. पण तेव्हा जमले नाही. मग त्यांनी कायद्याचा अभ्यास केला.१८८९ साली टिळक एल.एल.बी. म्हणजे वकील झाले.
शिक्षण क्षेत्रात प्रवेश.
टिळक, आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर हे देशाच्या प्रगतीचा सतत विचार करत असत. देशभक्त तरुणांची पिढी तयार व्हावी असे तिघांनाही वाटत होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणारी ‘ न्यू इंग्लिश स्कूल ‘ ही शाळा पुणे येथे सुरू केली. टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य घालवायचे मनात पक्के केले आणि त्याच शाळेत थोड्या पगारावर शिक्षकाची नोकरी करू लागले.
त्याचा परिणाम म्हणजे देशभक्तीने भारलेले तरुण तयार होऊ लागले. टिळक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होतेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढावे म्हणून विद्यार्थ्यांमध्ये बसून शिकवत असत. त्यामुळे लवकरच टिळक विद्यार्थी प्रिय शिक्षक झाले.
तरुणांना महाविद्यालयीन शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुरू करून त्या मार्फत ‘ फर्ग्युसन महाविद्यालय ‘ सुरू केले. विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर हे या कॉलेजमध्ये प्राध्यापकांबरोबर विनावेतन शिकवत होते. त्यामुळे देशभक्त विद्यार्थ्यांची पिढी तयार होण्यास मदत झाली. टिळक, आगरकर व चिपळूणकर यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळे न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज मधून राष्ट्रीय वृत्तीचे तरुण तयार झाले. इंग्रजांच्या अन्यायी वागणुकीबद्दल जाब विचारण्यास तरुण मंडळी प्रवृत्त झाली. हे राष्ट्रीय शिक्षणाचे फळ होते.
केसरी- मराठा वर्तमानपत्रातून जनजागृती.
१८८० साली टिळक आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ‘ केसरी ‘ नावाचे पत्र चालू केले. त्याचबरोबर ‘ मराठा ‘ हेही इंग्रजी पत्र चालू केले. अन्यायाविरुद्ध जोरदार टीका करायला ‘ केसरी’ हे साधन मिळाले. टिळकांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. त्यांचे विचार लोकांना पटू लागले. जनतेमध्ये उत्साह आला. परकीय सत्ते बद्दल चीड उत्पन्न झाली.
आपण एकत्र आलो तर या ब्रिटिशांविरुद्ध लढू शकू असा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख वाचण्यासाठी लोक उत्सुक असायचे. टिळक, आगरकर ,चिपळूणकर व नाम जोशी या वर्तमानपत्रात लिखाण करीत असत.१८८१ ते १९२० या 40 वर्षात ५१३ अग्रलेख टिळकांनी लिहिले. ‘ सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय,’
‘ उजाडले पण सूर्य कोठे आहे ‘ ‘ टिळक सुटले पुढे काय,’ ‘ प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल ‘, टोणग्याचे आचळ ‘ हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.
गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव.
गणेशोत्सव.
गणेश उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येतील. त्यांच्यात विचार विनिमय होईल असे टिळकांना वाटले. तेव्हापासून सार्वजनिक गणेशोत्सव प्रथम सुरू झाला. पुण्यात कसबा गणपती, गायकवाडवाडा गणपती व इतर पेठांतून सार्वजनिक गणेश उत्सव सुरू झाले. सार्वजनिक गणेशोत्सवामुळे अनेक हिंदू संघटनांना मदत झाली.
विचार विनिमय करण्यासाठी लोकांना एक व्यासपीठ मिळाले. मेळ्यांच्या कार्यक्रमात सरकारवर टीका केली जाई. त्यातून लोकशिक्षण होत असे. मोठ्या मोठ्या माणसांच्या व्याख्यानातून लोकांना ज्ञान प्राप्त झाले. राष्ट्रीय विचारसरणी सामान्य लोकांपर्यंत पोहोचली.
शिवजयंती उत्सव.
इंग्रजांच्या नीतीमुळे महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम विसरत गेली होती. त्यासाठी टिळकांनी प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण टिळकांनी महाराष्ट्रातील जनतेला करून दिली.
त्यामुळे जनतेमध्ये स्फुरण व प्रेरणा निर्माण झाली. त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी लोकांचा स्वाभिमान वाढू लागला. इंग्रज सरकारची त्यांना चीड येऊ लागली. या जुलमी सत्तेचा शेवट झाला पाहिजे, भारत स्वतंत्र झाला पाहिजे, हिंदी लोकांचे राज्य आले पाहिजे, असे सर्व लोकांना वाटू लागले. अशाप्रकारे टिळकांनी या उत्सवांच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचे मोठे महान कार्य केले.
राजद्रोहाचा खटला व मंडलेचा कारावास.
संपूर्ण देशातले वातावरण तापले होते. लोक इंग्रज सरकारवर भयंकर चिडले होते. राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे टिळकांना नवा उत्साह भरला होता. केसरीतून सरकारवर टीका केली जात होती. जळजळीत लेख छापले जात होते. यामुळे टिळकांना अटक झाली. टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला. त्यांना सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली.
टिळकांना ब्रह्मदेशातील मंडले येथील तुरुंगात पाठविण्यात आले. ब्रिटिश सरकारला वाटले, आता सहा वर्षे काही जनता त्रास देणार नाही. जनता टिळकांना विसरून जाईल. पण झाले उलटेच. स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी लोकांमधील एकी जास्तच वाढली आणि चळवळ अधिकच जोमाने फोफावली.
मंडलेचा तुरुंग.
टिळक तुरुंगात पहाटे लवकर उठत. तोंड धुवून ते संस्कृत श्लोकाचे पठण करीत. नंतर ते ध्यानस्थ बसत. त्यांनी अनेक ग्रंथांचे तुरुंगात असताना वाचन केले. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असतानाच ‘ गीता रहस्य ‘ नावाचा ग्रंथ लिहिला. शिवाय
‘ ओरायन ‘ व ‘आर्यांचे वेदकालीन वसतीस्थान ‘ हे दोन ग्रंथ इंग्रजीत लिहिले.
मंडलेच्या तुरुंगात टिळक असताना त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचे निधन झाले. टिळकांना फार दुःख झाले. तरीही त्यांनी आपल्या देशसेवेत कर्तव्यात खंड पडू दिला नाही.
( १९०८ ते १९१४ ) सहा वर्षानंतर टिळकांची तुरुंगातून सुटका झाली. पुण्यात त्यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले.
टिळकांनी शेवटची वर्षे स्वराज्याचा मंत्र शिकवण्यात घालवली. स्वराज्याचा संदेश त्यांनी सोप्या भाषेत दिला. ते म्हणत, ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ! ‘ अशी जिद्द प्रत्येक व्यक्तीमध्ये आली की स्वराज्य मिळवणे काहीही अवघड नाही.
महानिर्वाण.
लो. टिळक देशाची सेवा करता करता थकत चालले होते, देशाची फार मोठी चिंता त्यांना लागली होती. मुंबईतील सरदार-
गृहात लो. टिळक १ ऑगस्ट १९२० रोजी देवाघरी निघून गेले. सगळा देश दुखात बुडाला. मुंबईत चार लाख लोक अंत्य- यात्रेला जमले होते. त्यांच्या अंत्ययात्रेत म. गांधी, पंडित नेहरू, लाला लजपत राय, अल्लीबंधू इत्यादी थोर नेते सामील झाले होते.
म. गांधींनी आपल्या ‘ यंग इंडिया ‘ या साप्ताहिकात टिळकांचा यथोचित असा गौरव केला. आपल्या लेखात म. गांधी म्हणतात ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ‘ हा मंत्र त्यांनी दूर खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवला होता. “त्यांच्या इतक्या चिकाटीने व धैर्याने स्वराज्याची आक्रमक मागणी दुसऱ्या कोणाही पुढार्यांनी केली नाही.
स्वातंत्र्याच्या युद्धात त्यांनी कोणावरही दया माया दाखवली नाही व कोणाकडून दयेची अपेक्षाही केली नाही. राष्ट्र जनक या नात्याने भावी पिढ्या त्यांच्याकडे सदैव आदरानेच पाहतील. अशा थोर विभूतीला मृत्यू आला, असे म्हणणे योग्य होणार नाही. त्यांचे धैर्य, त्यांची उद्योगशीलता, त्यांचे साधेपण आणि त्यांची राष्ट्रभक्ती या त्यांच्या गुणांचा आपण अंगीकार करणे हेच लोकमान्य टिळकांचे शाश्वत स्मारक होय “. अशाप्रकारे महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव केला.
वरील माहितीच्या आधारे आपण पाहिले की Lokmanya Tilak Information in Marathi ही केवळ ऐतिहासिक माहिती नसून, प्रेरणादायी देखील आहे.
Other Articles
अहिल्याबाई होळकर: एक आदर्श राणीची प्रेरणादायी कहाणी
Rabindranath Tagore (रवींद्रनाथ टागोर)
Best Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi 2025
Follow us on YouTube – Marathi Antarang