वयाच्या चौदाव्या वर्षी सशस्त्रक्रांतीने देशाचे स्वातंत्र्य मिळविण्याची प्रतिज्ञा करणारे पहिले क्रांतिकारक. उत्कृष्ट कवी, नाटककार, विज्ञाननिष्ठ समाज सुधारक ,हिंदू राष्ट्रवादाचे प्रणेते, प्रभावी वक्ते व क्रांतिकारकांचे ते संघटक होते. बॅरिस्टर म्हणून कायदेतज्ञही होते. भारताचा सांस्कृतिक इतिहास हे सावरकरांचे प्रेरणास्थान होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती

जन्म, बालपण, व शिक्षण.
वीर सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जवळील भगूर येथे झाला. सावरकर हे चित्पावन ब्राह्मण समाजातले होते. भगूर जवळ असलेले राहुरी गाव सावरकर घराण्याला इनाम मिळाले होते. त्यामुळे त्यांचे घराणे जहागीरदार घराणे म्हणून ओळखले जाई. सावरकर कुटुंब संस्कृतचे अभ्यासक म्हणून समजले जायचे. सावरकरांच्या आईचे नाव राधाबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर होते. या दाम्पत्याला एकूण चार मुले झाली. गणेश उर्फ बाबा हा पहिला मुलगा झाला. दुसरा मुलगा विनायक, तिसरी मुलगी झाली. तिचे नाव मैना होते. तिला सर्वजण माई म्हणत. चौथा नारायण. तो सर्वात लहान होता.
सावरकर दहा वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री राधाबाईंचे निधन झाले. त्यामुळे सावरकरांचे वडील दामोदर पंत यांनीच मुलांचा सांभाळ केला. राधाबाई या कॉल-याच्या साथीमध्ये मृत्यू पावल्या.(१८९२) त्यावेळी गणेश तेरा वर्षांचा, विनायक नऊ वर्षांचा मैना पाच वर्षांची तर नारायण फक्त दोन वर्षांचा होता. सर्व मुले वयाने तशी लहानच होती. विनायक घरातील दुर्गादेवीची पूजा करीत असे. रामायण, महाभारत, शिवाजी महाराज यांच्या कथा सावरकरांनी लहानपणीच वाचल्या होत्या. केसरी, गुराखी यासारखी वर्तमानपत्रे त्यांच्या घरी येत असत. विनायक या सर्वांचे वाचन करीत असे.
‘ केसरी ‘ सारखी वर्तमानपत्रे वाचून सभोवताली चाललेल्या घडामोडी याची त्यांना माहिती होत होती. लहानपणापासूनच त्यांना कविता करण्याचा छंद लागला होता.
१८९६ च्या सुमारास अण्णांना बाबाला नाशिकला पुढील शिक्षणासाठी पाठवले. विनायकने५ वी पर्यंतचे शिक्षण भगूरला पूर्ण केले. सावरकरांना त्यांच्या वडिलांनी (अण्णांनी) पुढील दोन वर्षे घरीच ठेवले. या काळात विनायकने इंग्रजी शिकून घेतले. त्यानंतर विनायकला बाबाकडे पाठविले. नाशिक येथील सरकारी हायस्कूलमध्ये त्यांचे नाव घालण्यात आले. नववीत असताना नाशिकला एकदा वक्तृत्व स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत विनायकला प्रथम क्रमांक व बक्षीस मिळाले. तो निबंध इतका उत्कृष्ट होता की त्यावेळी ‘ नाशिक वैभव ‘पत्राचे संपादक खरे यांनी विनायकाचा निबंध’ संपादकीय’ म्हणून प्रसिद्ध केला.
याच सुमारास ५-९-१८९९ रोजी दामोदर पंत प्लेगच्या साथीत मृत्यू पावले. यावेळी सावरकरांचे वय 16 वर्षांचे होते. वडिलांचा आधार गेला. थोरले बंधू बाबाराव व वहिनी येसूबाई यांनी मात्र त्यांना आई-वडिलांची उणीव भासू दिली नाही. त्या दोघांनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. सावरकरांच्या जीवनात आपल्या वहिनीचे स्थान नेहमीच श्रद्धेचे राहिले आहे.
प्लेग साथीचा परिणाम व चाफेकर बंधू.
पुण्यात व महाराष्ट्रात प्लेगची भयंकर साथ आली. घरोघरी माणसे मृत्यू पावू लागली. सावरकर व त्यांच्या मित्रांनी अनेक घरी जाऊन आजारी माणसांची सेवा सुश्रुषा केली. पण इंग्रज अधिकाऱ्यांनी मात्र प्लेगच्या निमित्ताने लोकांवर अनेक अत्याचार केले. घरात घुसून लोकांना हाकलून लावले. घरातील सामान, धान्य इत्यादी फेकून दिले.
चाफेकर बंधूंनी जीवावर उदार होऊन इंग्रज अधिकारी रँड व आर्यस्ट यांचा पिस्तुलाने गोळ्या झाडून खून केला. त्यामुळे इंग्रज अधिकारी अधिकच खवळले. आता तर ते लोकांना जास्तच छळू लागले.
लो. टिळकांनी केसरीतून लेख लिहून सरकारवर टीका केली. चाफेकर बंधू पकडले गेले. त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्यात त्यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा देण्यात आली. या सर्व घटनांचा सावरकरांवर फार खोल परिणाम झाला. त्यांना इंग्रजांची भयंकर चीड आली.
इंग्रज सरकार भारतातून हद्दपार केले पाहिजे व भारत स्वतंत्र झाला पाहिजे असे विचार सावरकरांच्या मनात आले. चाफेकर बंधूंच्या बलिदानाने स्वातंत्र्याचे यज्ञकुंड पेटले आहे. या स्वातंत्र्ययज्ञाला धगधगत ठेवले पाहिजे. आपण देशासाठी काहीतरी केले तरच आपले जीवन सार्थकी लागेल असे त्यांना वाटले.” यापुढे मी माझ्या देशाला
स्वातंत्र्य मिळेपर्यंत सशस्त्र क्रांतीच्या लढा उभारून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत लढेन .” ही प्रतिज्ञा सावरकरांनी केली.
मित्रमेळ्याची स्थापना.
मित्रांना घेऊन सावरकरांनी १ जानेवारी १९०० ‘ मित्रमेळा ‘ या नावाची राष्ट्र कार्य करणारी संघटना स्थापन केली.
तेथे विनायक पागे, म्हसकर, दरेकर असे देश प्रेमी मित्र मिळाले. मित्र मेळाव्यात देशभक्ती व क्रांतिकारक विषयांवर चर्चा होत असे. सर्व मित्रांमध्ये देशप्रेम व क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवण्यात विनायक सावरकर अग्रणी होते. असंख्य वासुदेव बळवंत फडके, निर्माण व्हायला पाहिजेत. क्रांतीकारकांची चरित्रे लोकांपुढे आली पाहिजेत. ब्रिटिश सरकार विरुद्ध समाजात असंतोष निर्माण करणे, स्वातंत्र्य मिळविण्यासंबंधी समाजात जागृती निर्माण करणे हे काम मित्र मेळाव्यात होत असे. ब्रिटिशांशी कसा लढा द्यावयाचा यासंबंधी गुप्त भेट अखित असे. मित्रमेळावा गट शिवजयंती उत्सव व गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे करू लागला.
सावरकर यांचा विवाह.
सावरकरांचे लग्न त्यांचे थोरले भाऊ बाबा व मामा यांनी जव्हार येथील भाऊसाहेब चिपळूणकर यांची मुलगी यमुना हिच्याशी ठरविले.१९०१ साली नाशिक येथे हे लग्न झाले. लग्नात सासर्यांनी विनायक च्या शिक्षणासाठी मदत करावी असे ठरले. लग्नानंतर सहा महिन्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाल लागला. विनायकने पुढील शिक्षणासाठी ‘ फर्ग्युसन कॉलेजमध्ये ‘ प्रवेश घेतला.
फर्ग्युसन कॉलेज.
त्यावेळी पुण्यात लो. टिळक व शि.म. परांजपे यांचे जनजागृतीचे कार्य खूप जोरात चालले होते.लो. टिळक ‘ केसरी ‘
तर शि.म. परांजपे ‘काळ ‘ हे वृत्तपत्र चालवत होते. सावरकरांना समाजातल्या स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची चीड होती. सावरकरांनी १९०२ साली लिहिलेल्या ‘ विधवांची दुःखे ‘ या कवितेला बक्षीस मिळाले. ‘ स्वातंत्र्याचे स्तोत्र ‘ ही आजही प्रसिद्ध असलेली कविता त्यांनी १९०३ साली रचली. ‘ जयोस्तुते श्री महान्मंगले!
शिवास्पदे शुभदे ‘ही होय. सिंहगडचा पोवाडा व बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा याच काळात लिहिला. संस्कृत व इंग्रजी साहित्यांचे सावरकरांनी भरपूर वाचन याच काळात केले.
भवभूती, कालिदास यांचे नाटके वाचली. शेक्सपियर यांचे साहित्यही वाचले. मराठी, इंग्रजी व संस्कृतच्या अनेक महाकाव्यांचा त्यांनी अभ्यास व वाचन केले. या सर्व वाचनाचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव पडला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेताना त्यांनी साऱ्या महाराष्ट्रात स्वातंत्र्याबद्दल जागृती निर्माण केली.
ते या कॉलेजमधून बी.ए. झाले. काळ या वर्तमानपत्रातून ते लिहीत असत. गावोगावी जाऊन ते व्याख्याने देत असत.
परदेशी कपड्यांचे होळी.
या काळात स्वदेशीचे आंदोलन जोरात सुरू होते. परदेशी मालावर बहिष्कार टाकला जात होता. एका सभेतील भाषणात सावरकरांनी परदेशी कपड्यांची होळी करण्याची कल्पना मांडली. सभेला जमलेल्या लोकांनी ही कल्पना उचलून धरली.लो. टिळकांनी या कल्पनेला प्रोत्साहन दिले. मग सावरकरांनी मोठी गाडीभर परदेशी कपडे गोळा केले. मिरवणुकीने ही गाडी पुण्यातील लकडी पुलाजवळ आणण्यात आली.
लो. टिळकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. होळी पेटवण्यात आली. त्यात सर्व कपडे टाकले गेले. येथे एक सभा भरविण्यात आली. टिळक, परांजपे व सावरकरांनी या सभेत भाषणे केली. सर्वांच्या जहाल भाषणाने तरुणांची हृदये पेटून उठली. संपूर्ण भारतात प्रथमच परदेशी कापडाची होळी पुण्यात करण्यात आली. हे सर्व सावरकरांच्या प्रयत्नामुळे घडून आले. पुढे ते वकिलीच्या शिक्षणासाठी मुंबईत राहिले. तेथे त्यांनी एल.एल.बी. चा अभ्यास केला. त्या काळात त्यांनी ‘ विहारी ‘ या साप्ताहिकात खूप लेख लिहिले.
बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला प्रयाण.
पं. श्याम कृष्ण वर्मा हे राष्ट्रीय चळवळीतील नेते होते. ते इंग्लंडमध्ये राहून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करीत होते. भारतीय तरुणांनी लंडनमध्ये राहून अभ्यास व देशकार्य करता यावे म्हणून त्यांनी शिष्यवृत्ती सुरू केली. त्यांनी लंडनमध्ये ‘ इंडिया हाऊस ‘ नावाचे एक केंद्र उघडले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अनेक चळवळींचे ते मुख्य स्थान होते. सावरकर बोटीने लंडनला निघाले. लंडनला पोचल्यावर त्यांनी इंडिया हाऊस येथे राहण्याचे ठरविले. बॅरिस्टर चा अभ्यास करण्यासाठी ‘ ग्रेज इन’
येथे प्रवेश घेतला.
लंडनला जाताना त्यांनी बोटीतच इतर तरुणांना आपल्या अभिनव भारत संस्थेची ओळख करून दिली. रमेशचंद्र दत्त व हरनाम सिंग या दोन तरुणांनी क्रांतिकार्याची शपथ घेतली. दर रविवारी या संस्थेची सभा होऊन तरुणांनी आधुनिक शस्त्रे वापरण्याचे ज्ञान घेतले पाहिजे. बॉम्ब बनविण्यास शिकले पाहिजे असे सावरकर सांगत. भारताला स्वातंत्र्य क्रांतिकारी चळवळीने मिळेल यावर सावरकरांचा विश्वास होता.
क्रांतिकार्यास सुरुवात.
१८५७ चे स्वातंत्र्य युद्ध हे बंड नव्हते. योजना तयार करून केलेले ते पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. ज्यांनी हे केले ते कोणी बदमाश नव्हते, तर ते ध्येयवादी स्वातंत्र्ययोद्धे होते, असे सिद्ध करणारा ग्रंथ सावरकरांनी लिहिला. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे त्या ग्रंथाचे नाव. पुढे हा ग्रंथ जगभर गाजला. न्यूयॉर्कच्या एका नियतकालिकात भारतीय स्वातंत्र्याचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले.
क्रांतिकार्याला प्रेरक असे साहित्य लिहून ते भारतात पाठवीत असत. पुस्तकांमध्ये पिस्तुले लपवून ती गुप्तपणे भारतात पाठविणे, बॉम्ब कसा तयार करावा याची माहिती घेऊन ती क्रांतिकारकांपर्यंत पोहोचविणे, अशा अनेक प्रकारांनी सावरकरांनी क्रांतीची ज्योत पेटत ठेवली. सावरकरांच्या प्रयत्नाने, हेमचंद्र दास, सेनापती बापट व होतीलाल वर्मा यांनी बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली. या कलेची माहिती असलेली पुस्तके तयार केली. या तिघांना त्यांनी भारतात पाठवून दिले. यामुळेच भारतात पुढे अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्यामागे सावरकरांचे मोठे प्रयत्न होते.
सावरकर बॅरिस्टर झाले पण सनद मिळाली ?
क्रांतिकार्य सुरू असताना सुद्धा ते अभ्यासाकडे लक्षपुरवीत होते. ते बॅरिस्टरची परीक्षा पास झाले, पण त्यांना सनद देण्यास न्यायमंडळाने नकार दिला. जर सावरकर राजकारणात भाग घेणार नसतील ,असे लिहून देत असतील तर त्यांना सनद देण्यात येईल ,असे न्यायमंडळाने ठरविले. तसे सावरकरांना कळविले. सावरकरांनी या अटीला नकार दिला. सनद नाही मिळाली तरी चालेल, पण मी राजकारणात भाग घेऊन स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटेन असे त्यांनी मनाशी ठरविले होते.
स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचे प्रयत्न.
१ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीवर गोळ्या झाडून त्याला ठार मारले. कर्झनला वाचवण्यासाठी धावून आलेला आणखी एक मनुष्य मारला गेला.
मदनलाल धिंग्राला पकडण्यात आले. नाशिकच्या अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला २१ डिसेंबर १९०९ मध्ये गोळ्या घालून ठार केले. कान्हेरेंना पकडून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. व्हाईस- रॉय लॉर्ड मिंटो यांच्यावर अहमदाबाद मध्ये बॉम्ब टाकण्यात आला. या घटनेला सावरकरांच्या धाकट्या भावाला जबाबदार धरून त्यांना पकडण्यात आले. परंतु त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
इकडे भारतात जॅक्सनच्या खुनाचा खटला उभा राहिला. त्यात असे आढळून आले की, जॅक्सनला मारण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल सावरकरांनी कान्हेरेला दिले होते. तसेच सर्व क्रांतिकारी चळवळीचे तेच प्रमुख आहेत. कटाचे मूळ प्रेरणास्थान सावरकरच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पकड वॉरंट काढण्यात आले. कट रचने, हिंदुस्थानच्या बादशहाविरुद्ध युद्ध चालविणे, शस्त्रे पुरवून खुनाला मदत करणे, लंडन व भारतात राजद्रोही भाषणे करणे इत्यादी आरोप सावरकरांवर ठेवण्यात आले.
१३ मार्च १९१० रोजी लंडनला एका रेल्वे स्टेशनवर सावरकरांना अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या सामानाची झडती घेण्यात आली. यात काही वृत्तपत्रांची कात्रणे, संस्थानिकांना उद्देशून काढलेल्या पत्रकाच्या सात प्रती, 57 चे स्वातंत्र्यसमर त्याच्या दोन प्रती, मॅझिनीच्या चरित्राची एक प्रत हे सर्व साहित्य मिळाले.
बोटीवरून समुद्रात उडी.
सावरकरांवर भारतात खटला चालवावा असा निर्णय दंडाधिकारी -याने दिला. त्यामुळे त्यांना ब्रिकस्टन येथील तुरुंगात ठेवण्यात आले. भारतात नेण्यासाठी सावरकरांना एका बोटीवर चढविण्यात आले.१ जुलै १९१० काही बिघाड झाल्याने बोट फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात दुरुस्तीसाठी थांबली. यावेळी सावरकरांनी गोऱ्या शिपाया सांगितले मला शौचालयाकडे घेऊन चला. त्याप्रमाणे गोरा शिपाई त्यांना शौचालयाच्या दारापर्यंत घेऊन गेला. सावरकरांनी आपला कोट शौचालयाच्या दारावर टाकला.
पोर्टहोलच्या लहानशा छिद्रातून थेट समुद्रात उडी टाकली व फ्रेंच किनारा गाठला. त्यांच्या मागे इंग्रज शिपाई लागले. ते रस्त्यावर येऊन पळू लागले. पळता पळता त्यांना एक फ्रेंच शिपाई दिसला. त्याला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याची विनंती केली. पण तोपर्यंत इंग्रज शिपाई सावरकरांजवळ पोहोचले. त्यांनी सावरकरांना पकडून पुन्हा बोटीवर आणले. ब्रिटिश पोलिसांनी सावरकरांना फ्रान्सच्या हद्दीत पकडले होते. हा सरळ सरळ आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग होता. एडन बंदरात पुन्हा सावरकारांना दुसऱ्या एका बोटीत नेण्यात आले.२२ जुलैला बोट मुंबई बंदराला लागली.
काळे पाणी.
३१ ऑगस्ट १९१० ला सावरकरांवर खटला भरण्याचा निर्णय घेण्यात १५ सप्टेंबरला खटल्याचे काम सुरू झाले. सावरकरांबरोबर त्यांच्या 38 सहकाऱ्यांना आरोपी करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सावरकरांचे अटक कायदेशीर नव्हती. सरकारने सावरकरांवर दोन खटले भरले होते. ते वेगवेगळे चालविण्यात आले. पहिल्या खटल्यात त्यांना 25 वर्षे जन्मठेपेची सजा देण्यात आली. या शिक्षेला तेव्हा काळ्यापाण्याची सजा असे म्हणत. ही शिक्षा फारच महाभयंकर समजली जाई. तसेच त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा हुकूम देण्यात आला. दुसऱ्या खटल्याचा निकाल ३० जानेवारी १९११ रोजी लागला.
पुन्हा त्यांना पंचवीस वर्षांची जन्मठेप काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. एकूण 50 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा. ही शिक्षा कमालीची क्रूर होती.
सावरकरांवर जन्मठेपेची कारवाई सुरू झाली. त्यांचे कपडे बदलण्यात आले. त्यांना कैद्याचा पोशाख देण्यात आला. सावरकरांना कडेकोट बंदोबस्तात मद्रासला आणण्यात आले. तेथून त्यांना महाराजा बोटीने २७ जून १९११ ला अंदमानला आणण्यात आले. अंदमानचा सेल्युलर जेल म्हणजे पृथ्वीवरील नरकच होता. या जेलचा जेलर क्रूरकर्मा होता.
कैद्यांचा अनेक प्रकारे छळ करण्यात त्याला आनंद वाटे. त्यासाठी त्याने (जेलर बारी) छळ करण्याची अनेक साधने बनवली होती. त्याने तेलाचा कोलू ओढण्याचे काम सावरकरांना लावले. या तुरुंगात आणलेले अनेक कैदी सावरकरांचे अनुयायी बनले. सावरकरांना ते आपला नेता मानू लागले. अंदमानचा तुरुंगवास भोगणे म्हणजे एक अग्निदिव्य होते.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही सावरकरांची काव्यप्रतिभा फुलून आली. त्यांनी ‘ गोमंतक ‘ ‘कमला’ व ‘ विरहोछ्वास ‘ ही खंडकाव्ये लिहली. मरणोन्मुख शय्येवर ‘ निद्रेस ‘ या तत्त्वचिंतनपर कविता लिहिल्या. खिळ्याने किंवा एखाद्या काट्याने ते कोठडीच्या भिंतीवर लिखाण करीत. दहा वर्षे सावरकर अंदमानच्या तुरुंगात होते. भारतातील सावरकरांच्या अनेक सहकाऱ्यांनी या तुरुंगातून त्यांची सुटका व्हावी, असे प्रयत्न केले.
अखेर २ मे १९२१ रोजी सेल्युलर जेलमधून त्यांना भारतात महाराजा बोटीवरून आणण्यात आले. सावरकरांबरोबर त्यांचे बंधू बाबाराव हेही याच जेलमध्ये होते. त्यांनाही बोटीवर घेण्यात आले. त्यांना भारतात आणल्यावर बाबाराव सावरकरांना विजापूरच्या तुरुंगात हलविण्यात आले तर सावरकरांना रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले.
रत्नागिरीच्या तुरुंगात असताना देशात काय चालले आहे, राजकारणात काय चालले आहे हे त्यांना हळूहळू समजू लागले. रत्नागिरीच्या तुरुंगात त्यांनी ‘ हिंदुत्व ‘ हा ग्रंथ लिहून काढला. सावरकरांना पुन्हा एकदा रत्नागिरीच्या तुरुंगात हलविण्यात आले. त्यांना येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले.
१९२३ साली रत्नागिरीच्या जिल्हा राजकीय परिषदेने त्यांच्या सुटकेचा ठराव करून तशी मागणी सरकारकडे केली.काकीनाडा येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सावरकरांच्या सुटकेची जोरदार मागणी लावून धरली. अनेक बाजूंनी सरकारवर दडपण आणण्यात आले. शेवटी ६ जानेवारी १९२४ ला सावरकरांची येरवडा जेलमधून मुक्तता झाली.
सावरकर रत्नागिरीला आले. तुरुंगातून सुटका झाली तरी ते स्थानबद्ध होते. राजकारणात भाग घेण्यास त्यांना बंदी होती. सरकारने राजकारणात भाग घेण्यास बंदी केली, म्हणून मग त्यांनी समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले.
हिंदू महासभेच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. हिंदू समाजात जातीभेद होते. अस्पृश्यता होती. जातिभेद व अस्पृश्यता निवारण्याचे कार्य सावरकरांनी सुरू केले. कविता ,नाटके ,निबंध यांच्या लेखनातून त्यांनी आपले विचार मांडायला सुरुवात केली.
हे विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी काही चळवळी सुरू केल्या. सावरकरांची ‘ हिंदू ‘ या शब्दाची व्याख्या फार विशाल होती. त्यांनी आपल्या ‘ हिंदुत्व ‘ या पुस्तकात हिंदुत्वाची अधिक व्यापक व राष्ट्रीय व्याख्या केली आहे. ते म्हणतात ” सिंध प्रांतापासून समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या देशाला जो पितृभूमी व मातृभूमी मानतो तो खरा हिंदू होय. “
स्पृश्य व अस्पृश्य लोकांना ते एकत्र आणीत. त्यांना उपदेश करीत. शाळेमध्ये सर्व मुलांना मिळून मिसळून बसवण्याचा आग्रह त्यांनी धरला. अस्पृश्य मुलांना वेगळे बसू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गणेश उत्सवात स्पृश्य व अस्पृश्यांचे एकत्र कार्यक्रम घेण्यास त्यांनी सुरुवात केली. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात अस्पृश्य स्त्रियांना सहभागी करून घेतले. सत्यनारायण पूजेला अस्पृश्याला बसविले. सर्वांचे एकत्र भोजन आयोजित केले. भजन कीर्तन अशा प्रकारचे कार्यक्रम ते अस्पृश्यांच्या वस्तीत करू लागले.
लोकांना विज्ञानवादी होण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले, व समाजाचे प्रबोधन केले.
समारोप
सावरकर खूप बुद्धिमान होते. हे थोर साहित्यिक होते. काव्य, नाटके ,वैचारिक निबंध, अनेक ग्रंथ ,आत्मचरित्र लिहिले. भारतीय जनतेने त्यांना ‘ स्वातंत्र्यवीर ‘ ही पदवी बहाल केली. ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले.२६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे देहावसान झाले.
Other Article-
Rabindranath Tagore (रवींद्रनाथ टागोर)
Best Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi
Follow us on Youtube – Marathi Antarang
2 thoughts on “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती 2025”