{ "@context": "https://schema.org", "@type": "FAQPage", "mainEntity": [ { "@type": "Question", "name": "सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष का म्हटले जाते?", "acceptedAnswer": { "@type": "Answer", "text": "सरदार वल्लभभाई पटेल यांना 'लोहपुरुष' म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी भारतातील ५६५ संस्थानांचे एकत्रीकरण करून एकसंघ भारत निर्माण केला. त्यांच्या दृढ इच्छाशक्ती, धैर्य आणि मुत्सद्देगिरीमुळे त्यांना ही उपाधी मिळाली." } }, { "@type": "Question", "name": "सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?", "acceptedAnswer": { "@type": "Answer", "text": "सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरात राज्यातील नाडियाद या ठिकाणी झाला." } }, { "@type": "Question", "name": "स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे?", "acceptedAnswer": { "@type": "Answer", "text": "स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असून तो गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे, सरदार सरोवर धरणाजवळ साधू बेटावर आहे." } }, { "@type": "Question", "name": "सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रमुख योगदान काय आहे?", "acceptedAnswer": { "@type": "Answer", "text": "सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर ५६५ संस्थानांचे भारतात विलीनीकरण के

Best सरदार वल्लभभाई पटेल – भारताचे लोहपुरुष | जीवनचरित्र, कार्य आणि योगदान 2025

सरदार वल्लभभाई पटेल हे एक महान स्वातंत्र्य सैनिक आणि भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर ५६५ संस्थानांना भारतात विलीन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. त्यांनी वकिली केली आणि म. गांधींच्या प्रभावाखाली स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, बार्डोलीत सत्याग्रहात भाग घेऊन आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांचा जन्मदिवस ‘ राष्ट्रीय एकता दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो.

पटेल यांचे बालपण व शिक्षण.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वडिलांचे नाव जव्हेरभाई व आईचे नाव लाडाबाई हे होते.जव्हेर भाई यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता. आई लाडाबाई स्वभावाने प्रेमळ, मृदुभाषी, कोमल हृदयाच्या होत्या. घरातील सर्व कामे उरकून त्या चरख्यावर सुत काढत. वल्लभभाईंना चार भाऊ व एक बहीण होती.

वल्लभभाई पटेल यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी नाडियाद, गुजरात मध्ये झाला होता. ८ वी पर्यंतचे त्यांचे शिक्षण गुजराती भाषेत झाले. घरची शेती होती. वल्लभ- भाई हाडाचे शेतकरी होते. निसर्ग वातावरणात रमताना, नद्या, झाडे, पशु, पक्षी यांच्या सहवासात त्यांना वेगळा अनुभव आला. शाळेत पुस्तकातील धड्यात शेतीविषयक ज्ञानाचा त्यांनी, आपल्या घरच्या शेतात श्रम करून प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त केले.

पेटलाद येथे इंग्रजी शाळा असल्याचे पटेल यांना समजले त्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी या शाळेत नाव घातले. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून शिक्षण घेतले. या शाळेमुळे इंग्रजी हा वल्लभभाईंचा आवडता विषय बनला. येथे त्यांना उत्तम शिक्षक लाभले. मुलांचे इंग्रजी उत्तम व्हावे यासाठी शिक्षक प्रयत्नशील होते.

मुलांनी अनेक इंग्रजी पुस्तके वाचावीत, त्यातील उत्तम उतारे तोंड पाठ करावेत ही शिक्षकांची इच्छा होती. वल्लभभाईंनी अनेक इंग्रजी पुस्तके वाचून व त्यातील उतारे तोंड पाठ करून या विषयात प्राविण्य मिळविले.

लहानपणापासून संघटन कौशल्य व नेतृत्व गुण.

‌ प्राथमिक शाळेत एका कडक व मारकुटा स्वभाव असलेल्या शिक्षकाला वठणीवर आणण्यासाठी विद्यार्थ्यांना संघटित करून वल्लभभाईंनी तीन दिवस संप घडवून आणला. मुलांच्या चळवळीला यश आले. हे संघटनाचातुर्य पुढे राष्ट्रीय पक्ष संघटना बांधताना दाखवून दिले. विद्यार्थी देशातच त्यांचा जव्हेरबाईंशी विवाह झाला.

वकिलीचे शिक्षण.

मॅट्रिक परीक्षेत चांगले यश मिळाले, पण पुढील शिक्षणाचे काय? घरची परिस्थिती हालाकीची. वल्लभ भाईंना बॅरिस्टर होण्याची इच्छा होती पण पैशाअभावी त्यांनी तो निर्णय बदलला. प्रथम वकिली करावी व नंतर पैसे साठवून इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरची पदवी घ्यावी असे त्यांनी ठरविले. तीन वर्षे अभ्यास करून त्यांनी डिस्ट्रिक्ट प्लिडरची परीक्षा उत्तीर्ण करून, वकिली करण्याचा निर्णय घेतला.

वकिली व्यवसायात उत्तम यश.

वल्लभभाईंनी वकिलीचे कचेरी थाटली. ते फौजदारी खटले घेत. खून, मारामारी, गुन्हेगारी खटले ते चालवत. या घटना सतत घडत असल्यामुळे त्यांच्याकडे सारखे खटले असत. शिवाय पैसा झटपट व भरपूर मिळे. हे अशा पद्धतीचे खटले चालवायचे तर वृत्ती निडर आणि निर्भय हवी व ही ताकद वल्लभभाईंकडे होती.

अगदी खोलात जाऊन ते खटल्याचा अभ्यास करीत. त्यांच्या कुशाग्र बुद्धीची छाप न्यायाधीशांवर पडे. पोलीसही वल्लभभाईंना घाबरून असत. वकिली व्यवसायात त्यांना यश मिळाले, इंग्लंडला जाण्यासाठीचे पैसे उभे राहिले.

बॅरिस्टर होण्यासाठी प्रयत्न पण मोठ्या भावाला पाठविले.

इंग्लंडला जाण्याची वल्लभभाईंनी तयारी केली. नवीन कपडे शिवले. ते इंग्लंडमधील कंपनीच्या उत्तराची वाट पाहत होते. एक दिवस त्यांचे मोठे भाऊ विठ्ठलभाई हातात एक पाकीट घेऊन दारात उभे राहिले. वल्लभ भाईंना ते म्हणाले ” मी इंग्लंडला निघालोय, बॅरिस्टर होण्यासाठी .

” पाकीटवर पत्ता व्ही.जे. पटेल. दोघा भावांची अद्याक्षरे ‘ व्ही ‘पासूनच सुरू होती. त्यामुळे ते पत्र विठ्ठल भाईंच्या घरी गेले. विठ्ठल भाई वल्लभ भाईला म्हणाले ” मी तुझा मोठा भाऊ आहे. बॅरिस्टर होण्यासाठी मला आधी जाऊ दे.”

वल्लभभाईंनी मोठ्या उदार मनाने आपल्या थोरल्या भावाला इंग्लंडला जाऊ दिले. व त्यांना मदतही केली. हे खरे बंधुप्रेम. पण आपल्याला जायला मिळाले नाही याचे कणभरही दुःख त्यांनी मानले नाही. त्यांचे बंधू विठ्ठलभाई बॅरिस्टर झाले.

बॅरिस्टर होण्यासाठी वल्लभ भाईंचे इंग्लंडला प्रयाण.

१९१० साली ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. ग्रंथालयात जाऊन त्यांनी नऊ नऊ तास अभ्यास केला. परिणामी त्यांची कुषाग्रबुद्धी, मनाची एकाग्रता, यामुळे त्यांनी तीन वर्षांचा बॅरिस्टरचा अभ्यासक्रम, दीड वर्षातच पूर्ण केला. वल्लभभाई पहिल्या वर्गात पहिले आले. त्यासाठी त्यांना पन्नास पौंडाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी केलेल्या परिश्रमाचे चीज झाले.

बॅरिस्टर वल्लभभाईंची वकिली.

बॅरिस्टर होऊन परत आलेल्या वल्लभभाईंची वकिली अधिकच चालू लागली. वकिली साठी लागणारे बुद्धीचातुर्य, धडाडी, निडरपणा, वक्तृत्वकला, आपली बाजू आत्मविश्वासाने मांडण्याची पद्धत, प्रत्येक केसचा काळजीपूर्वक केलेला अभ्यास. त्यामुळे वल्लभभाई म्हणजे यश हे ठरलेलेच होते.१९०९ साली वल्लभभाईंची पत्नी वारली, तेव्हा ते कोर्टात केस लढवीत होते. केस पूर्ण झाल्यावर ते घरी आले. स्थितप्रज्ञ वृत्तीचे हे उदाहरण आहे.

म. गांधींची भेट व राजकारणात प्रवेश.

म. गांधींनी त्यांना राष्ट्र सेवेस प्रवृत्त केले. गुजरात क्लब मध्ये त्यांची म. गांधींची ओळख झाली. गांधीजींच्या विचारांचा वल्लभभाईंवर प्रभाव पडला. त्यांच्यात अमुलाग्र बदल झाला. इंग्रजी पद्धतीचा पोशाख जाऊन तिथे खादी आली.१९२१ साली अहमदाबाद येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले.

त्याचे अध्यक्षपद वल्लभभाईंकडे आले. उत्कृष्ट आरोग्यसेवा, राहण्याची उत्तम व आरामशीर सोय. रुचकर भोजन, आकर्षक मंडप रचना, स्वदेशी वस्तूंचे प्रदर्शन, यांने परिषद परिपूर्ण करून वल्लभभाईंनी सर्वांकडून वाहवा मिळवली. शिवाय सगळीकडे खादीचा वापर करून अनेक गरीब लोकांना रोजगार मिळवून दिला. हे अधिवेशन त्यांनी यशस्वी करून दाखविले.

१९२७ साली गुजरातच्या जलप्रलयाच्या वेळी त्यांनी पूरग्रस्तांना सहाय्य केले.

बार्डोली सत्याग्रह.

१९२८ मध्ये गुजरात मधील बार्डोली भागात हा सविनय कायदेभंग सत्याग्रह होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हा एक महत्त्वाचा सत्याग्रह मानला जातो. त्याचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. बार्डोली तालुका हा शेतीप्रधान होता. त्यातील ७६ टक्के जनता ही शेतीच्या उत्पन्नावर जगत होती.

इंग्रज सरकारने जानेवारी १९२६ मध्ये शेतसाऱ्याची रक्कम 30 टक्के वाढवली होती. शेवटी ब्रिटिश सरकारने 22 टक्के शेतसारा वाढविला . त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष वाढला होता. ज्या शेतकऱ्यांना शेतसारा भरता आला नाही त्यांची जमीन सरकारने जप्त करण्यास सुरुवात केली होती.

वल्लभभाई पटेल यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारला पत्र लिहून कळवल्या. पूर्वी अस्तित्वात असणारा शेतसारा सरकारने वसूल करावा असा प्रस्ताव बार्डोली मधील शेतकऱ्यांनी मंजूर केला. मुंबईच्या प्रांतिक सरकारने हा सत्याग्रह दमन करण्याचे अनेक उपाय योजले. जमीन व पिकांची जप्ती करणे, गुरांचा आणि जंगम मालमत्तेचा ताबा घेणे असे कडक उपाय ब्रिटिश सरकारने राबविले.

सुमारे 50 हजार जमिनींचा ताबा सरकारने घेतला. या अन्यायाला लोकांनी विरोध केला. सरकारी अधिकाऱ्यांचा बहिष्कार तसेच लिलावामध्ये जमीन विकत घेण्यास नकार असे मार्ग अवलंबून सत्याग्रही शेतकऱ्यांनी सरकारला जेरीस आणले.२ ऑगस्ट १९२८ रोजी म. गांधी स्वतः बार्डोलीला आले. त्यामुळे सत्याग्रहाचा जोर वाढला.१८ जुलै १९२८ रोजी ब्रिटिश सरकारने पटेलांना सत्याग्रह मागे घेण्याचे आवाहन केले.

‌ सर्व सत्याग्रहींची सुटका, जप्त केलेल्या तसेच लिलाव केलेल्या सर्व जमिनी मूळ मालकांना परत करणे तसेच निपक्ष आयोगाची नेमणूक अशा अटी सरदार पटेल यांनी सरकारला सादर केल्या. ब्रिटिश सरकारने सत्याग्रहाची चौकशी करण्यासाठी ब्रुमफील्ड आणि मॅक्सवेल या दोन ब्रिटिश न्यायिक अधिकाऱ्यांचा आयोग नेमला.

या आयोगाने केलेली करवाढ अन्याय्य असल्याचा निष्कर्ष काढला. सरदार पटेल यांनी सर्व जमिनी मूळ जमीन मालकांना मिळतील याची दक्षता घेतली. ज्या जमिनी विकल्या होत्या त्या मुंबईतील धनिक लोकांनी खरेदी करून पुन्हा मूळ मालकांना ताब्यात दिल्या. पुढे अनेक सत्याग्रहांना बार्डोलीतील यशाने स्फूर्ती दिली. गांधीवादी मार्गाचा अवलंब करून यशस्वी झालेला हा पहिला लढा होता.

सत्याग्रहामुळे अन्याय करवाढ रद्द करण्यात आली आणि या आंदोलनामुळे वल्लभ भाई पटेल यांना ‘” सरदार ” ही उपाधी मिळाली. सरदार ही पदवी त्यांच्या लोकप्रियतेचीच साक्ष ठरली.म. गांधींनी वल्लभ भाईंचा जाहीर गौरव केला.
१९३१ साली कराची काँग्रेसचे पटेल हे अध्यक्ष निवडले गेले.१९४६ साली हंगामी मंत्रिमंडळात गृहमंत्री व नंतर उपप्रंतप्रधान झाले.

भारताचे लोहपुरुष.

१९४६ साली हंगामी मंत्रिमंडळात गृहमंत्री नंतर उपपंतप्रधान झाले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वयत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून घेणे हे पटेल यांचे सर्वात मोठे कार्य होते. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून पटेल यांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. भारतीय संस्थानिक व गोवा यांचे मोठ्या मुसद्देगिरीने भारतात विलीनीकरण केले.

सरदार पटेल यांचा मृत्यू.

१५ डिसेंबर १९५० रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांनी आपले जीवन राष्ट्रासाठी अर्पण केले.

सरदार पटेल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक कणखर व्यक्तिमत्व. देशातील ५६५ संस्थानं विलीन करून घेऊन सामर्थ्यशाली एकसंघ भारत उभा करणे हे पटेल यांचं महत्त्वाचं योगदान म्हणता येईल.

पटेल यांचं बालपण, त्यांचा राजकारणातला प्रवेश, गांधीजींबद्दल त्यांची आस्था, नेहरूंन सोबतच त्यांचं मित्रत्वाचं नातं तसेच त्यांच्यासोबतचे मतभेद, संस्थानिकांबरोबरच्या वाटाघाटी व संस्थानांचं यशस्वी विलीनीकरण, पटेल यांचे राजकीय विचार व त्यांनी वेळोवेळी घेतलेले ठाम कठोर निर्णय हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विविध पैलू आहेत.

” सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते. सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरिकाने तुम्ही एवढे नेभळट बनता की, अन्यायाशी लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही. व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात.”


वल्लभभाई पटेल.

सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखला जातो. आणि तो जगातील सर्वात उंच पुतळा आहे, ज्याची उंची १८२ मीटर
(५९७ फुट) आहे. हा पुतळा गुजरात मधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे सरदार सरोवर धरणाजवळ साधू बेटावर आहे.

प्रश्न १: सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष का म्हटले जाते?
उत्तर: कारण त्यांनी स्वातंत्र्यानंतर भारतातील ५६५ संस्थानांचे विलीनीकरण करून एकसंघ भारत निर्माण केला.

प्रश्न २: सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कधी झाला?
उत्तर: त्यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी नाडियाद, गुजरात येथे झाला.

प्रश्न ३: स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे?
उत्तर: हा पुतळा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे सरदार सरोवर धरणाजवळ आहे.

Other Articles

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती 

Best Lokmanya Tilak Information in Marathi

Follow us on YouTube- Marathi Antarang

Leave a Comment