Ratha Saptami Mahiti Marathi | रथसप्तमी
मघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीचा दिवस, हाच रथसप्तमी म्हणून साजरा केला जातो. बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात. माघ महिन्याला भाकरीमास व रथसप्तमीला भाकरी सप्तमी असेही म्हणतात. उत्तरेत या दिवसाला अचल जयंती सप्तमी असे म्हणतात. महाराष्ट्रात मात्र या दिवसाला रथसप्तमी असेच म्हणतात. महाराष्ट्रात मात्र या दिवसाला रथसप्तमी असेच म्हणतात. हे एक सौरव्रत म्हणजे सूर्याच्या उपासनेचे व्रत आहे.
सूर्याला विश्वसंचार करण्यासाठी सात घोडे असलेला रथ याच दिवशी मिळाला. म्हणून या तिथीला रथसप्तमी असे म्हणतात. दक्षिणायनात रथहीन झालेला सूर्य उत्तरायणात या दिवशी रथस्थ होतो.

सूर्याची उपासना.
सूर्य हा जगाचा आत्मा आहे असे वेदांतात म्हटले आहे. सूर्यामुळे पाऊस पडतो, शेती पिकते, आपल्याला अन्न मिळते. सूर्यामुळे वृक्षवेलींना पाने, फुले येतात. हवा पाणी शुद्ध होते. म्हणून अति प्राचीन काळापासून भारतीय लोक सूर्याला देव मानून त्याची पूजा अर्चा, प्रार्थना करतात. आकाश म्हणजे अदिती, त्याचा पुत्र म्हणजे आदित्य-सूर्य. तो आम्हाला पापमुक्त करो. अशा प्रकारच्या अनेक प्रार्थना प्राचीन ग्रंथात आहेत. सूर्य म्हणजे प्रखर तेज. सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो. सूर्य हा बुद्धी देणारा देव आहे. त्याच्या निमित्ताने ही बुद्धीची आराधनाच आहे.
सूर्याच्या उपासनेत रथसप्तमीला फार महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया प्रातःकाळी लवकर उठून स्नान करून, घराच्या अंगणात किंवा पाटावर सात घोड्यांचा रथ व त्यावर सूर्याचे चित्र काढून त्याची पूजा करतात. तुळशी वृंदावना जवळ गोव-यांचा छोटा अग्नी पेटवून त्यावर छोटेसे मातीचे पात्र( बुटकुडे/गुंडगी) ठेवून त्यात दूध ओतले जाते. या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. संक्रांती पासून सुरू झालेला हळदीकुंकू व तिळगुळ कार्यक्रम रथसप्तमीला संपतो.
सर्व रोगातून मुक्तता, पापातून मुक्तता, अखंड सौभाग्य, पुत्र- पौत्र इत्यादींची प्राप्ती, हे या व्रताचे फळ सांगितले आहे.
रथसप्तमीचे महत्त्व सांगणारी कथा :
यशोवर्मा नावाचा एक राजा कम्बोज देशात होता. त्याला मूलबाळ नव्हते. अनेक नवसानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली. राजाला पुत्र प्राप्ती झाली म्हणून प्रजेला खूप आनंद झाला. परंतु तो आनंद फार थोडा काळच टिकला. कारण तो मुलगा जन्मापासून रोगट, अशक्त व मंदबुद्धीचा होता. राजाने मुलगा बरे होण्यासाठी अनेक उपाय केले.
पण त्यात त्याला यश आले नाही. शेवटी राजाने एका ज्योतिषाला आपल्या मुलाची माहिती दिली. मग त्या ज्योतिषाने राजाला सांगितले ‘महाराज, सर्व ग्रहांमध्ये श्रेष्ठ ग्रह जो सूर्य आहे, त्याची या मुलावर कृपादृष्टी नाही.’ त्यामुळे हा मुलगा असा झाला आहे. त्यावर उपाय काय? राजाने विचारले. त्यावर ज्योतिषी म्हणाला की यावर एकच उपाय सूर्योपासना आहे. रोज सूर्यनमस्कार, सूर्यदर्शन, गायत्री मंत्राचा जप केला असता सूर्याची कृपा होईल व हा मुलगा निरोगी, बलवान, बुद्धिमान होईल. रथसप्तमीपासून मुलाला सूर्यो- पासना करण्यास सांगा. असे ज्योतिषी म्हणाला.
रथसप्तमीपासून राजपुत्राने प्रातःकाळी स्नान करून ,समंत्र सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केली. यामुळे राजपुत्राचे आरोग्य हळूहळू सुधारू लागले. शरीर सतेज झाले. अंगात ताकद येऊन त्याची बुद्धी तेजस्वी झाली. हे सगळं रथसप्तमीला सुरू केलेल्या सूर्योपासनेपासून घडत गेले.
सूर्यनमस्काराचे महत्त्व.
शरीर माद्यम् खलु धर्म साधनम असे आपण म्हणतो. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्याची जोपासना करण्यासाठी अशा सणांमुळे प्रेरणा मिळू शकते. आपल्या पूर्वजांनी सूर्यनमस्कार घालण्याचा आग्रह धरला आहे. कारण त्यामुळे आपली प्रकृती उत्तम राहते. शरीराला व्यायामाचा लाभ होतो. आपली बुद्धी तेजस्वी होते, हीच भावना यामागे आहे असे दिसते.
1 thought on “Ratha Saptami Mahiti Marathi | रथसप्तमी”