Netaji Subhas Chandra Bose Biography | नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती

Subhas Chandra Bose- भारतभूमी ही महान नररत्नांची खाण आहे. या भूमीला लाभलेले एक तेजस्वी आणि अनमोल रत्न म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. सशस्त्र क्रांतीचे समर्थक, आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि प्रखर राष्ट्रभक्त म्हणून त्यांचे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांच्या अद्वितीय धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेमुळे ते आजही भारतीयांच्या हृदयात अजरामर आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस.(Subhas Chandra Bose Biography)

‌ भारतभूमी ही नररत्नांची खाण आहे. भारतभूमीला लाभलेले एक अनमोल रत्न म्हणजे नेताजी सुभाषचंद्र होय. सशस्त्र क्रांतीचे कट्टे समर्थक व जहाल काँग्रेसवादी नेत्यांत नेताजी सुभाषबाबूंचे नाव प्रथम घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नेताजींच्या पुढे होता.

जन्म ,बालपण व शिक्षण

ओरिसातील कटक या शहरात २१ जानेवारी १८९७ रोजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस हे होते. ते एक सत्शील असे गृहस्थ व प्रख्यात वकील होते. प्रभावती देवी या नेताजींच्या मातोश्री. त्या सुशिक्षित व सुसंस्कृत होत्या. सुभाष आईचा अतिशय लाडका. साधारण हूड वृत्तीचा, क्रांतिकारक प्रवृत्तीचा पण अतिशय हुशार होता.

देशाबद्दल स्वाभिमान.

त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण प्रथम प्रोटेस्टंट युरोपीयन स्कूलमध्ये घेतले. नंतर पुढे रेव्हॅनशा कॉलेजिएट स्कूलमध्ये त्यांचे नाव घातले गेले.रेव्हॅनशा कॉलेजिएट स्कूलच्या आवारात रोज सकाळी सर्व वर्ग एकत्र जमून इंग्लंडच्या राणीची गौरव- पर प्रार्थना करायचे.

रोज एका विद्यार्थ्याने प्रार्थनेला सुरुवात करायची व इतरांनी सूर धरायचा, अशी रीत होती. प्रत्येकाची एक महिन्यांसाठी पाळी असायची. ज्या दिवशी सुभाष बाबूंची प्रार्थनेला प्रारंभ करण्याची पाळी आली, तेव्हा त्यांनी इंग्लंडच्या राणीचे गुणगान करणारी प्रार्थना म्हणायला साफ नकार दिला. प्रार्थनासभा खोळंबून राहिली.

शारीरिक शिक्षण देणारे श्रीवास्तव पुढे आले आणि त्यांनी आपल्या हातातील छडीने सुभाष बाबूंना फोडून काढले. गडबड ऐकून शाळेचे प्रिन्सिपल येथे धावत आले. त्यांनी श्रीवास्तव यांच्या तावडीतून सुभाष बाबूंची सुटका केली व त्याला घरी पाठवून दिले. पाठोपाठ शिपायासोबत सुभाषच्या वर्तनाबाबत तक्रार करणारे पत्र देऊन त्यांच्या घरी पिटाळले.

विद्यार्थीदशेत हा मुलगा जमेल तेवढी सामाजिक सेवा करीत असे. आजारी माणसांची सेवा करणे, दुःखी लोकांना जमेल तशी मदत करणे, त्यांना धीर देणे हे काम तो करीत असे. त्या कोवळ्या संवेदनशील वयातच त्याच्यावर रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव पडला होता.

१९१३ मध्ये सुभाषने कलकत्ता विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांत दुसरा क्रमांक मिळविला. सुभाष मॅट्रिकच्या निकालानंतर कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये दाखल झाला. कॉलेजमध्ये शिकत असताना प्रिन्सिपल
एफ.आय. ओरान यांनी भारतीयांविषयी तुच्छतादर्शक असे उद्गार काढले.

तत्काळ उभे राहून सुभाष बाबूंनी प्रिन्सिपल साहेबांचा कडक शब्दात निषेध केला. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांना तात्काळ कॉलेजमधून काही काळा पुरते काढून टाकण्यात आले. पुढे त्याच कॉलेजमधून सुभाष –
बाबूंनी तत्त्वज्ञान हा मुख्य विषय घेऊन पदवी प्राप्त केली.

इंग्लंडला प्रयाण.

१९१९ साली सुभाषबाबू ‘ तत्त्वज्ञान ‘ हा विषय घेऊन पदवीधर झाले. वडिलांना सुभाष बाबूंनी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जावे व आय.सी.एस ची पदवी मिळवावी असे वाटत होते. जर सुभाषबाबू तयार असतील तर ते त्यांच्या इंग्लंड मधील शिक्षणाचा संपूर्ण खर्च करणार होते.

त्यांना केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळाला. भारतात क्रूरपणे वागणारे भारतीयांच्यावर जुलूम करणारे, अत्याचार करणारे इंग्रजलोक इंग्लंडमध्ये खूपच चांगले वागतात हे त्यांनी पाहिले.

इंग्रजांची शिस्त, उद्योगी वृत्ती, वेळेचे महत्व, कलाप्रेम पाहून त्यांना आश्चर्यमिश्रित कौतुक वाटले. इंग्लंडमधील सामान्य माणूस सुसंस्कृत आहे, असे त्यांना वाटले. सामान्य माणसांच्या आधारावर येथील लोकशाही व्यवस्थित चालली आहे असे त्यांना वाटले.

भारतात सुद्धा असे वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. भारतातील सामान्य माणसांना पण चांगले शिक्षण मिळाले तरच हिंदुस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगू शकेल असे त्यांना वाटले. इंग्लंडमध्ये सुभाषबाबू यांची लो. टिळकांशी भेट झाली.
टिळकांचे केंब्रिज विद्यापीठातील भाषण ऐकून सुभाषबाबू प्रभावित झाले. त्या भाषणात टिळक म्हणाले भारतीय विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मोहात न पडता राष्ट्रकार्य करावे.

आय.सी.एस. परीक्षेचा अभ्यास सुभाषबाबूंनी मन लावून केला. तेही अवघड परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
ते भारतात परतले पण त्यांच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. इंग्रज सरकार अतिशय क्रूर आहे. त्या सरकारने जालियनवाला बागेत केवढे क्रूर हत्याकांड केले.

अशा सरकारचा अधिकारी होऊन देश बांधवांशी शत्रुत्व पत्करण्यात काय अर्थ आहे? सुभाषबाबूंनी सरकारकडे आय.सी.एस. परीक्षेचे त्याग पत्र पाठवून दिले. त्यात त्यांनी ‘ मी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकारची सेवा मला करता येणार नाही ‘ असा स्पष्ट उल्लेख केला.

राष्ट्रीय चळवळीत उडी व मंडलेचा तुरुंग.

काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर सुभाष बाबूंनी पक्षाच्या हरतऱ्हेच्या कार्यक्रमातून हिरीरीने भाग घ्यायला प्रारंभ केला. सेवा- दलाच्या सभासदांना प्रशिक्षण देणे, राष्ट्रीय शिक्षण योजना, कलकत्ता महानगरपालिकेचे नेतृत्व इत्यादी त्यांची प्रारंभीची कामे होती.

१९२१ साली त्यांनी नॅशनल कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून जबाबदारी स्वीकारली, परंतु त्याच सुमारास असहकार चळवळीत सहभागी झाल्याबद्दल त्यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागली. जेलमधून सुटका झाल्यावर सुभाष बाबूंनी पक्षाचे मुखपत्र ‘ फॉरवर्ड ‘चे संपादन करायला सुरुवात केली.

जेव्हा चित्तरंजन दास कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी सुभाषबाबूंची महानगरपालिकेचे कमिशनर म्हणून नियुक्ती केली. सुभाष- बाबूंनी १९२३ च्या सुमारास आपल्या मातृभाषेतच ‘ बंगलार कथा ‘ या नावाचे दैनिक काढले. सुभाषबाबूच्या प्रभावी प्रचारामुळे स्वराज्य पक्षाला कायदेमंडळाच्या निवडणुकीत विपुल यश मिळाले.

सुभाषबाबू कलकत्ता व बंगालमधील लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांची वाढती लोकप्रियता सहन न झाल्याने ब्रिटिश सरकारने १९२४ मध्ये त्यांच्यावर क्रांतिकारकांची संघटना स्थापन करत असल्याचा आरोप ठेवून त्यांना ब्रह्मदेशातील मंडले या गावी तुरंगात टाकले.

काँग्रेसचे अध्यक्षपद.

बिहारचे किसान नेते स्वामी सहजानंद भारती व आंध्र प्रांतातील किसान नेते प्रा.एन.जी. रंगा हे दोघेही मिळून गांधीजींना भेटले ‘ येत्या काँग्रेस अधिवेशनात सुभाष बाबूंना काँग्रेसचे अध्यक्ष करा ‘ असे त्यांनी गांधीजींना आग्रहपूर्वक सांगितले. देशभरातील काँग्रेस- जनांतर्फे, अध्यक्षपदी सुभाष बाबूंची नियुक्ती व्हावी म्हणून गांधीजींवर दडपण घेऊ लागले.

हरिपूर येथे भरणाऱ्या काँग्रेस अधिवेशनात सुभाष बाबूंना अध्यक्ष करणार, असे गांधीजींनी जाहीर केले.
‌ अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर अल्पसंख्याकांच्या बाबतच्या काँग्रेस धोरणाचा सुभाष बाबूंनी जोरदार पुरस्कार केला. आपल्या कुटील कारस्थानाने धर्मद्वेषावर आधारित देशाची फाळणी ब्रिटिश करणार असल्याची कुणकुण आपल्याला लागलेली आहे असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्य, समता, कायद्यासमोर समानता व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार अशा प्रकारचे मूलभूत हक्क ब्रिटिशांना आपल्याला द्यायचे नाहीत असे स्पष्ट केले. देशातील दारिद्र्य, निरक्षरता दूर करणे, रोगराई व अंधश्रद्धेपासून समाजाला वाचवणे असे कार्यक्रम काँग्रेस पक्षाला हाती घ्यावे लागतील. स्वतंत्र भारताच्या औद्योगिक विकासाचा जोरदार आग्रह धरून कुटीरोद्योगाला उर्जित अवस्थेत आणावे लागेल असे विचार त्यांनी मांडले.

सुभाष बाबूंनी अधिवेशनात खूप प्रभावी भाषण केले. तरुणांच्या मनात देशाभिमान जागृत झाला. त्यांच्या भाषणाच्या प्रभावामुळे तरुणवर्ग देशासाठी कोणताही त्याग करण्यास तयार झाला.

सुभाष बाबूंनी इंग्रजांशी मुकाबला करण्यासाठी शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची संघटना पाहिजे, असे विचार व्यक्त केले. त्या कार्यकर्त्यांना शिक्षण देऊन त्यांची एक सेना उभी करावी लागेल असे सांगितले.

१९३९ मध्ये चिपुरीच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष- पदही त्यांना मिळाले. ते बहुमताने निवडून आले, त्यांचा योग्य तो सन्मान झाला. सर्व- सामान्य काँग्रेसजन खुश झाले.पण त्यांचे गांधीवाद्यांशी खूप मतभेद होऊ लागले. मतभेदामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा त्याग केला.

ऐतिहासिक पलायन.

लोकक्षोभाच्या भीतीने तसेच प्रकृतीच्या कारणासाठी ब्रिटिश सरकारने सुभाष बाबूंना त्यांच्याच घरी स्थानबद्ध करून ठेवले होते.१६ जानेवारी १९४२ च्या रात्री त्यांनी पठाणाचा वेश धारण केला. नजर कैदेतून निसटले व अफगाणीस्तानात प्रवेश मिळवला. काबुलला काही दिवस राहून ते मास्कोला पोहोचले. तेथून जर्मनीची राजधानी बर्लिनला पोहोचले.

बर्लिन येथील वास्तव्य व हिटलर भेट.

ज्यावेळी सुभाष बाबू जर्मनीची राजधानी बर्लिनला पोचले. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाचा भडका जगभर पसरला होता. सर्वत्र जर्मनीचा विजय होत होता. ते बर्लिनला ज्या दिवशी पोहोचले त्याच दिवशी त्यांचे बर्लिन आकाशवाणीवरून भारतीयांना उद्देशून केलेले भाषण प्रसारित झाले.

त्यांनी भाषणात, आपला स्वातंत्र्याचा दिवस जवळ येत चालला आहे, सध्या चालू असलेले युद्ध हे भारताचे अखेरचेच युद्ध आहे. आपण भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढू या. हे युद्ध इंग्रज व जर्मनी यांच्यातील आहे. तुम्ही इंग्रजांच्या बाजूने लढू नका. असा संदेश दिला. या भाषणाने सारे जग आश्चर्यचकित झाले.

२९ मे१९४१ रोजी सुभाष बाबूंनी जर्मनीचे प्रमुख हिटलर यांची भेट घेतली. हिटलरने सुभाष बाबूंची तेथे सर्व सोय केली. त्यांचा गौरव केला. त्यांनी आपला हेतू हिटलरला स्पष्ट सांगितला. हिटलरने त्यांना सर्व प्रकारचे मदत देण्याचे कबूल केले.

ते जर्मनीत दोन वर्षे होते. जर्मन तरुणी एमिला शैकेल हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना पतीला प्रोत्साहन देणारी, सुंदर सहचरणी मिळाली. त्यांना अनिता नावाची गोंडस मुलगी झाली. ती फक्त २७ दिवसांची असताना त्यांनी जर्मन देश सोडला व ते जपानला गेले. पुन्हा त्यांची पत्नी व मुलीशी कधीच भेट झाली नाही. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नी व मुलीची सर्व व्यवस्था करून ठेवली होती.

आझाद हिंद रेडिओ.

सुभाष बाबू काबुलला पोहोचले, तेव्हा मास्को ला जाऊन रशियन नेत्यांशी वाटाघाटी कराव्यात, असा त्यांचा मानस होता. पण अनेक कारणांमुळे ते शक्य झाले नाही. म्हणून ते हिटलरला भेटण्यासाठी बर्लिन कडे निघाले. काबुलहून जर्मनीला पोहोचेपर्यंत त्यांना अगणित अशा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. हिटलरने सुभाष बाबूंचे भव्य स्वागत केले. व त्यांना ‘ रायभारी ‘ पदाचा दर्जा प्रदान केला.

हिटलरच्या व सुभाष बाबूंच्या अनेक बैठका झाल्या, परंतु भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायला मात्र हिटलरने सपशेल नकार दिला. तेव्हा सुभाष बाबूंनी, आपणास स्वतंत्र रेडिओ स्टेशन सुरू करावयाचे आहे व त्याबाबत सर्व तऱ्हेची मदत करावी, अशी विनंती केली. हिटलरने त्या गोष्टीला ताबडतोब मान्यता दिली व ऑगस्ट १९४५ मध्ये आझाद हिंद रेडिओ ने नियमितपणे प्रसारण करायला सुरुवात केली.

आझाद हिंद सेनेची स्थापना.

क्रांतिकारक सरदार भगतसिंहांचे काका अजितसिंह यांनी पूर्वीच जर्मनीत १९०७ च्या सुमारास आझाद हिंद सेना स्थापन केली होती. या सेनेत १५०० सैनिक होते. हे भारतीय सैनिक होते. सुभाष बाबूंनी ही संख्या १२००० पर्यंत नेली. सुभाष बाबूंनी या सैनिकांना उत्तम तयार करून जर्मनीच्या तोडीची फौज बनवली.

एकदा या फौजेचे संचालन पाहण्यासाठी स्वतः हिटलर आला. त्याच्या शेजारी लष्करी वेशात स्वतः सुभाषचंद्र उभे होते. त्यावेळी सुभाष बाबूंनी स्फूर्तीदायक भाषण केले. त्या भाषणात ते म्हणाले, ‘ तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूॅगा हिटलरने त्यांची खूप स्तुती केली. ‘ सुभाष बाबू मोठे पुढारी व उत्कृष्ट सेनानी आहेत, ‘ असे हिटलर म्हणाला.

आझाद हिंद सेनेची सर्व सत्ता सुभाष बाबूंच्या हातात होती. या सेनेच्या हालचाली त्यांच्या हुकुमाशिवाय होत नसत. पुढे आझाद सत्तेची संख्या 96 हजारापर्यंत गेली. त्या संख्येची योग्य विभागणी करून अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या.

ब्रिटिशांशी लढा.१९४३ रोजी आजाद हिंद सरकारने ब्रिटिश व अमेरिके विरुद्ध युद्ध पुकारल्याचे जाहीर केले. त्यावेळी. ‘ चलो दिल्ली ‘ चा नारा पुकारला गेला. सुभाष बाबूंनी सुभाष ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, स्त्रियांच्या झाशीची राणी ब्रिगेड अशी पथके स्थापन केली. ब्रह्मदेशातून या सेनेने मोर्चा बांधून कुच केले व भारताच्या इम्फाळ भागात शिरले. इम्फाळ सीमेवरील कॉक्सटाऊन ताब्यात घेतले. मुक्ती मोर्चा आगे कूच करीत होता.

१८ मार्चला आसाम मध्ये कोहिमा सीमेवर सैन्य पोहोचले त्यावेळी मोठा ह्रृद्य व रोमांचकारी प्रसंग घडला. सैनिकांनी भारतीय मातृभूमीची माती माथ्याला लावली. साष्टांग नमस्कार घातला. आनंदाने नाचले, गायले. मणिपूर येथे आझाद हिंद सेनेचा ध्वज फडकविला. हजारो सैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

अराकान, इम्फाळ आणि पालेल या तिन्ही युद्धात विजय मिळवला. अफाट पराक्रम केला. झाशीची राणी या आझाद हिंद सेनेच्या स्त्रियांच्या पथकाने सुभाषचंद्रांकडे आघाडीवर जाऊन लढण्याची परवानगी मागितली. त्यांनी प्रत्यक्ष लढाईत भाग घेतला. शौर्याने लढल्या.

१९४४ साली पावसाळा सुरू झाल्याने आजाद हिंद सेनेचे काम थंडावले. जानेवारी १९४५ मध्ये परत जोमाने सुरू झाले. ठिकठिकाणी आझाद हिंद सेना ब्रिटिश सैन्याला नामोहरण करत होती.

सुभाष बाबांचा अपघाती मृत्यू.

दुसऱ्या महायुद्धात जर्मनी, इटली, जपान या देशांचे जगभर मोठमोठे पराभव होऊ लागले. त्याचवेळी अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून राख केली.

१६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानी सरकारशी वाटाघाटी करण्याकरता सिंगापूरहून टोकियोला जाण्याकरिता सुभाष बाबू विमान मार्गे निघाले.१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमानात मोठा स्फोट झाला व विमान कोसळले. सुभाष चंद्र जखमी झाले. त्यांना लष्करी दवाखान्यात हलवण्यात आले. पण तेथे त्यांचे निधन झाले.

२३ ऑगस्ट १९४५ रोजी रेडिओवरून भारतीयांना त्यांच्या निधनाचे वृत्त समजले. संपूर्ण भारत दुःख सागरात बुडाला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 48 वर्षे होते.

समारोप.

नेताजींचे संपूर्ण आयुष्य म्हणजे अनेक रोमांचक, रंगीबेरंगी व नाट्यमय घडामोडींचा असा विशाल जीवनपट आहे. त्यातच त्यांचा झालेला रहस्यमय शेवट. यामुळे नेताजी एका चिरशोकांतिकेचे महानायक बनले.

नेताजी कट्टर राष्ट्रभक्त होते. त्यांचे जीवन अपूर्व त्यागाने भरलेले होते. त्यांनी देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला. असामान्य बुद्धिमत्ता, अपूर्व साहस, धाडसी वृत्ती, स्वातंत्र्यलढ्यात अविस्मरणीय कामगिरी या अलौकिक गुणांमुळे सुभाष बाबूंचे नाव इतिहासात ‘अजरामर ‘झाले.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी व कुठे झाला?

त्यांचा जन्म २१ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा राज्यातील कटक येथे झाला.

२) सुभाषचंद्र बोस यांनी आय.सी.एस. पदाचा त्याग का केला?

ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक कारभारामुळे आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी आय.सी.एस. पदाचा त्याग केला.

३) आझाद हिंद सेना म्हणजे काय?

आझाद हिंद सेना ही ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली सेना होती.

४) “तुम मुझे खून दो…” हा नारा कोणी दिला?

हा प्रसिद्ध नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला.

५) नेताजींचा मृत्यू कसा झाला?

१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते; मात्र आजही त्याबाबत वाद आहे.

Other Articles:
Savitribai Phule | भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व स्त्री शिक्षणाची जननी

Mahatma Jyotiba Phule Biography in Marathi | समाजक्रांतीचे जनक पूर्ण माहिती

Best सरदार वल्लभभाई पटेल – भारताचे लोहपुरुष | जीवनचरित्र, कार्य आणि योगदान

Leave a Comment