Narali Purnima नारळी पौर्णिमा & Raksha Bandhan रक्षा बंधन Mahiti
रक्षा बंधन (Raksha Bandhan)
रक्षा बंधन (Raksha Bandhan) हा भारतातील लोकप्रिय सण आहे. हा भाऊ -बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. बहिण आपल्या भावाची ओवाळणी करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला भेट वस्तू देतो. आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. या दिवशी सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते.
रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण स्नेहाचे प्रतीक मानला जातो.
रक्षाबंधन सण येण्याच्या काही दिवस आधीपासूनच बाजारात रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराच्या, डिझाईनच्या राख्या आपल्याला पाहायला मिळतात. लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या कार्टूनच्या अशा वेगळ्या राख्या बघायला मिळतात .या राख्या घेण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते.
या दिवशी घरात सर्व कुटुंब एकत्र येऊन सण साजरा करतात. आई आपल्या
माहेरवाशीण मुलीची वाट पाहत असते. लहान मुलांचा उत्साह तर वेगळाच असतो. या दिवशी घरात गोडाचे पदार्थ बनत असतात. सर्व ठिकाणी आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.
(Raksha Bandhan) धार्मिक संदर्भ :
रक्षाबंधन हा सण साजरा करण्यामागेसुद्धा अख्यायिका आहे. द्रोपदीने श्रीकृष्णाच्या हातावर बांधलेली राखी. असुर आणि देवांच्या युद्धात देवांचा विजय व्हावा यासाठी, इंद्रदेव याची पत्नी इंद्राणीने ( शचिने) इंद्राच्या हाताला धागा बांधला होता. आणि दुसऱ्या दिवशी देवांचा विजय झाला होता. अभिमन्यूच्या रक्षणासाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती. पूर्वी कोणी युद्धासाठी निघेल तेव्हा त्याच्या रक्षणासाठी मनगटावर राखी बांधली जाई.
(Raksha Bandhan) ऐतिहासिक संदर्भ :
मेवाडची वीरांगणा कर्मवती हिने आपले व आपल्या राज्याचे रक्षण व्हावे यासाठी दिल्लीचा बादशहा हुमायून यास राखी पाठवली होती. हुमायूनाने आपले जुने शत्रुत्व विसरून कर्मवतीच्या राज्याचे रक्षण करून राखीचा मान राखला. सिकंदराच्या पत्नीने महाराजा पुरुच्या हातावर राखी बांधली होती. सिकंदर पुरुच्या तावडीत सापडला असतानाही त्याने सिकंदरला सोडून देऊन राखीचा मान राखला. अनेक रजपूत स्त्रिया शत्रूच्या गोटात जाऊन आपल्या पतीविरुद्ध लढणाऱ्या वीरांच्या हातावर राखी बांधत असत. त्यामुळे कित्येकदा युद्धप्रसंग टळत असत.
या सणाचा उद्देश एकच आहे की, समाजातील कोणतेही स्त्री ही आपल्या बहिणीप्रमाणे आहे. तिच्याकडे वाईट नजरेने न बघता तिच्या रक्षणासाठी सदैव उभे राहिले पाहिजे. तिच्याकडे बघण्याची प्रत्येकाची दृष्टी ही निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहिली पाहिजे.
भावा बहिणीचे नाते हे परस्पर पूरक, स्नेहपूर्ण व पवित्र आहे. हा संदेश देणारा रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे.
राखी पौर्णिमा रक्षाबंधनाच्या विधीमुळे श्रावण पौर्णिमेला मिळालेले एक नाव.
‘ रक्षा ‘या संस्कृत शब्दाचा ‘ रक्षण’ असा अर्थ असून राखी हे त्या शब्दाचेच मराठी रूपांतर होय. अलीकडच्या प्रथेनुसार या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. ही राखी अक्षता, मोह-या व सोने एकत्र बांधून तयार करतात.
आपल्यापेक्षा श्रेष्ठ, बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाची विनंती करणे हीच या सणामागची भावना आहे.
नारळी पौर्णिमा Narali Purnima :
श्रावण महिन्यातील पौर्णिमा हा दिवस नारळी पौर्णिमा (Narali Purnima) म्हणून साजरा केला जातो. श्रावणात पावसाचा जोर कमी होतो. वादळे हळूहळू शांत होत जातात. समुद्रावरील थांबलेली वाहतूक या दिवसापासून सुरू होते. या दिवशी समुद्राच्या काठी राहणारे कोळी बांधव वाजत गाजत समुद्रावर जातात. समुद्रावर जाऊन समुद्राची पूजा करतात. समुद्राला चांदीने मढविलेला किंवा सुवर्णाच्या पत्र्याने तयार केलेला नारळ समुद्रात सोडतात. सागराची पूजा व नारळ सोडण्याचा हेतू हा असतो की सागराने शांत व्हावे. सागर शांत झाल्यास कोळी बांधवांना समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी जाता येते. मच्छीमारी हे कोळी बांधवांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. नारळी पौर्णिमेपासून वादळे, संकटे यांचा जोर कमी होतो. त्यामुळे समुद्रावरील प्रवास सुखकर होतो अशी कल्पना यामागे आहे.
वरुण देवतेची पूजा.
वरुण ही समुद्रदेवता आहे. ज्यांचे जीवन सागरावर अवलंबून आहे, ते लोक या दिवशी वरुण देवाची पूजा करून तिला प्रसन्न करून घेतले जाते. यासाठी समुद्राला नारळ अर्पण केला जातो.
(Narali Purnima) नारळी पौर्णिमेनंतर समुद्र प्रवास.
नारळी पौर्णिमेनंतर समुद्र प्रवास, व्यापार सुरू केला जातो ही परंपरा.
वरुणदेवतेने समुद्रातून मालाची वाहतूक करणाऱ्या नावा, जहाजे समुद्रात बुडवू नये, त्यांचे नुकसान करू नये, यासाठी समुद्रदेवतेची पूजा करून तिला नारळ अर्पण केला जातो.
श्रावणी पौर्णिमे अगोदर समुद्र खवळलेला असतो. समुद्रात प्रचंड लाटा उसळत असतात. या काळात समुद्रात कोळी नावा घालत नाहीत. समुद्र- मार्गे होणारा व्यापार बंद असतो. मच्छीमारी बंद असते.
श्रावणी पौर्णिमेच्या सुमारास समुद्र शांत होऊ लागतो.
मग गलबतातून, नावांतून माणसांची, मालाची ने आण पुन्हा सुरू केली जाते. समुद्रातून प्रवास करताना आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून नारळ अर्पण करून, नावा, गलबते, होड्या समुद्रात लोटल्या जातात.
नारळी पौर्णिमा हा सण मुंबई, रत्नागिरी, गोवा इत्यादी ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. जेथे समुद्र नाही तेथील लोक या दिवशी नदीला नारळ अर्पण करतात. पौर्णिमेला नारळी भात हे पक्वान्न घरोघरी केले जाते.