म. जोतिबा (Mahatma Jyotiba Phule) यांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्रात जातीवादाचा प्रभाव समाजावर होता. ब्राह्मणांचे सर्वत्र वर्चस्व होते. वर्ण, वर्ग श्रेष्ठत्व, विषमता, अस्पृश्यता, जातीभेद, यामुळे समाज पोखरला होता. स्त्रिया आणि शूद्र यांना माणूस म्हणूनही लेखले जात नव्हते. याच काळात ‘ समाजक्रांतीचे जनक ‘ म. जोतिबा फुले यांचा जन्म झाला.

जोतिबा फुले यांचा जन्म व घराण्याची पूर्वपीठिका.
गोविंदराव व चिमणाबाई हे माळी समाजातील कुटुंब शेती व माळीकाम पुण्यात करत होते. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. यांचे पूर्वज पुण्यामध्ये येऊन राहिले. त्यांचे पूर्वीचे नाव गोरे होते. पुण्यात फुल बागेचे काम गोविंदराव व त्यांचे पूर्वज करत होते. त्यामुळे त्यांचे नाव फुले असे पडले. गोविंदराव फुले व चिमणाबाई कष्टाळू होत्या.
त्या सात्विक वृत्तीच्या धर्मनिष्ठ आणि ईश्वरपारायण होत्या.११ एप्रिल १८२७ रोजी गोविंदराव व चिमणाबाई यांच्या पोटी जोतिबाचा जन्म झाला. जोतिबा (Mahatma Jyotiba Phule) आठ महिन्यांचा असताना त्यांची आई चिमणाबाई मृत्यू पावल्या. गोविंदरावांना आपल्या पत्नीच्या अवेळी जाण्याने अत्यंत दुःख झाले.
मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी एक दाई ठेवली. या दाईने अत्यंत प्रेमाने आणि मायाळूपणे दोन्ही मुलांचे संगोपन केले. चिमणाबाईंना राजाराम व ज्योतिबा असे दोन पुत्र होते. गोविंद रावांनी दुसरे लग्न न करता दाईला ज्योतिबाच्या पालन पोषणासाठी नेमले.
(Mahatma Jyotiba Phule) ज्योतिबांचे शिक्षण.
गोविंदरावांनी ७ वर्षे वयाच्या ज्योतिरावांना मराठी शाळेत टाकले. पुढील चार वर्षे शिक्षण घेतल्यावर ब्राह्मण कारकुनाच्या सल्ल्यावरून गोविंदरावांनी ज्योतीला शाळेतून काढून टाकले. ब्राह्मण वर्चस्वासाठी शूद्र जातींवर लागलेली ज्ञान बंदी टिकविणे ब्राह्मणांना आवश्यक वाटत होते. त्यामुळे ब्राह्मण कारकून आणि गोविंदरावांना हा बदसल्ला दिला असावा.
फुले कुटुंबीयांच्या शेजारी गफार बेग मुन्शी व लिजिट- साहेब रहात होते. या दोन्ही उदार वृत्तीच्या गृहस्थांनी जोतिबाच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व ज्योतिबाला पुढे शिकायला लावण्याचा आग्रह धरला.
मुलाच्या शिक्षणात आपण उगीचच व्यत्यय आणला, त्याची तीन वर्षे वाया घालवली असे ज्योतिबांच्या वडिलांना वाटू लागले. सनातनी लोकांना न घाबरतात गोविंदरावांनी ज्योतिबाला पुढील शिक्षण देण्याचे ठरविले. वयाच्या १४ व्या वर्षी १८४१ साली ज्योतिबांना स्कॉटिश इंग्लिश शाळेत घातले.
९ व्या वर्षी शाळा सोडलेला ज्योतिबा पुन्हा १४ व्या वर्षी उत्साहाने शाळेत शिकू लागला. त्या शाळेत त्याला अनेक ब्राह्मण मित्र मिळाले. ज्योतिबाच्या मित्रांमध्ये सर्व जातीची व धर्माची मुले होती. त्यामुळे जातीभेद व खोट्याश्रद्धा यापासून ज्योतिबा नेहमी दूर राहिला.
ज्योतिरावांचे इंग्रजी शिक्षण स्कॉटिश व नंतर सरकारी शाळेत झाले. स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये शिकताना ज्योतिरावांवर ख्रिस्तप्रणित मानवतावादाचा प्रभाव पडला.
विद्यार्थी देशात असताना ज्योतिरावांना सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर व सखाराम यशवंत परांजपे असे मित्र लाभले. या मित्रांच्या संगतीमध्येच त्यांना पाश्चात्य उदारमतवादाचा जवळून परिचय झाला. व्यक्तिवाद, मानवी हक्क, प्रजासत्ताक, लोकशाही या तत्त्वावर त्यांची निष्ठा बसली.
विवाह.
सावित्रीबाईंचे ज्योतीरावांशी १८४४ मध्ये लग्न झाले. सावित्रीबाई या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवासे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. लग्नाच्या वेळी त्या अवघ्या नऊ वर्षाच्या होत्या, तर ज्योतिबा 13 वर्षाचे होते. पुण्याचे फुले कुटुंब व नायगावचे नेवसे पाटील कुटुंब एकमेकांच्या तोलामोलाचे व सधन होते. त्यामुळे नायगावला लग्न थाटामाटात झाले.
समाज सुधारणा.
ज्योतिबा शाळेत शिकत असले तरी समाजातील असंख्य मुले अशिक्षित होती. हे पाहून ज्योतिबांना वाईट वाटे. ज्योतिबांच्या गुरुजींना नऊ वर्षाची विधवा मुलगी होती. तिचे केशव पण केलेले पाहिल्यावर ते अतिशय दुःखी झाले. ज्योतिबाच्या एका ब्राह्मण मित्राचे लग्न होते. लग्नाच्या आधी नवरदेवाची मिरवणूक होती.
त्या मिरवणुकीत बरेच ब्राह्मण होते. त्या मिरवणुकीत आपल्याबरोबर ज्योतिबा चाललेला बघून एका ब्राह्मणाला राग आला. त्या ब्राह्मणाने ज्योतिबाचा अपमान भर मिरवणुकीत केला. तो ब्राह्मण ज्योतिबाला म्हणाला ” अरे तू कोण, आम्ही कोण? तू शूद्र, आम्ही ब्राह्मण. जातीपातीची सारी बंधने धुडकावून आमच्याबरोबरीने चालून आमचा अपमान करतोस काय? जा माघारी, सर्वांच्या मागून ये. ” हा अपमान ज्योतिबाच्या जिव्हारी लागला. तो मिरवणूक सोडून सरळ घरी आला. त्यावेळी वडिलांनी जोतिबाची खूप समजूत घातली.
वडिलांचा उपदेश ज्योतिबाने शांतपणे ऐकून घेतला. ज्योतिबा विचार करू लागला. ब्राह्मण आणि मी एकाच हिंदू धर्माचे. मग मी कमी दर्जाचा कसा? आपण अपमान का सहन करायचा? जातिभेद माणसांनी निर्माण केले आहेत, देवाने नाही. ब्राह्मण समाजाने आपला मोठेपणा कायम टिकवण्यासाठी हे सारे केले.
जातीभेद हा मानवाचा शत्रू आहे, तो समाजातून नष्ट केला पाहिजे. माणसामाणसांत समता आणण्यासाठी सामाजिक क्रांती घडवून आणली पाहिजे, तसेच प्रसंगी उच्चवर्गीयांशी संघर्ष करण्याची तयारी ही केली पाहिजे असे क्रांतिकारक विचार ज्योतिबांच्या मनात आले.
मुलींच्या शाळेची स्थापना.
महाराष्ट्राच्या सामाजिक धार्मिक इतिहासात १८४८ या वर्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या काळात बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग तर्खडकर, जगन्नाथ शंकर शेठ, गो.ह. देशमुख.न्या. रानडे इत्यादी समाज सुधारकांनी आर्थिक, सामाजिक, धार्मिक सुधारणांचे कार्य जोमाने सुरू केले होते आणि या कार्याला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ज्योतिबांनी याच काळात समाज सुधारणेच्या कार्याला सुरुवात केली होती.
ज्ञान व शिक्षण समाज- परिवर्तनाच्या प्रेरक शक्ती असल्याच्या निष्ठेतून ज्योतिबा व सावित्रीबाई यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले. मानवी अधिकार नाकारलेल्या समाजघटकांच्या बाबत दोघांनाही विलक्षण कळवळा वाटत होता.
सर्वाधिक दडपल्या गेलेल्या समाज घटकांचे दुःख- हरण शिक्षण प्रसारातून होईल, याबाबत त्यांना विश्वास वाटत होता. त्यांनी स्त्रियांना व अस्पृश्यांना शिक्षण देण्याचे ठरवले. सदाशिवराव गोवंडे बरोबर अहमदनगरला जाऊन मिशन मधील मिस फारारा मॅडमच्या कन्या शाळा ज्योतिबा व सावित्रीबाई यांनी जवळून पाहिल्या.
तशी शाळा काढण्याचे ज्योतिबांनी ठरविले. अनेक प्रतिकूल अडचणींना तोंड देत १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यामधील भिडे वाडा बुधवार पेठ येथे पहिली मुलींची शाळा सुरू करून इतिहास घडविला. भारतीयांनी सुरू केलेली ही पहिलीच मुलींची शाळा होय.
स्त्रियांना शिक्षण देण्यास कर्मठ ब्राह्मणी परंपरा कडाडून विरोध करत होती, तेव्हा ज्योतिबा व सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे पाऊल उचलले होते.
ज्योतिबांनी सावित्रीबाईंना घरी शिक्षण देऊन शिक्षका बनविले. सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतिबांचे (Mahatma Jyotiba Phule) मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांनी घेतली.
अहमदनगर येथे फाराराबाईंच्या व पुण्यात मिचेल
बाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये सावित्रीबाईंनी अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले. स्त्रियांना व अस्पृश्यांना शिकवण्यासाठी सावित्रीबाईंनी घराचा उंबरठा ओलांडला. त्यामुळे भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई ठरतात.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १८४८ ते १८५२ या काळात ज्योतिबांनी पुण्यामध्ये 18 शाळा सुरू करून उत्तम प्रकारे चालवल्या. ज्या लोकांना ज्योतिबांच्या कामाचे महत्त्व पटले ते त्यांच्या शाळेसाठी मदत करत. शासनाचे अधिकारीही शाळांना भेट देऊन शासकीय मदत देत असत.
सावित्रीबाई शाळेत शिकविण्यासाठी जात असताना त्यांच्या अंगावर सनातन्यांनी शेण फेकण्यासही मागेपुढे पाहिले नाही. इतकेच नव्हे तर गोविंद रावांना आपली सून व मुलगा यांना घराबाहेर काढण्यासाठी दबावही सनातली लोकांनी आणला. ज्योतिबांच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी त्यांना ठार मारण्याचा कटही सनातन्यांनी रचला होता.
त्यासाठी त्यांनी धोंडीराम कुंभार व रोडे या गुंडांना ज्योतिबांना ठार मारण्यासाठी पाठविले होते. परंतु या दोघांचेही मन परिवर्तन ज्योतिबा ने केले. पुढे हे दोघे ज्योतिबांचे अंगरक्षक बनले.
सत्यशोधक समाजाची स्थापना.
ज्योतिबांनी समाजातील समविचाराचे लोक एकत्र आणले.२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुणे येथे बैठक आयोजित केली. त्या बैठकीस 50 ते 60 सामाजिक कार्यकर्ते हजर होते. त्या बैठकीत ‘ सत्यशोधक समाजाची ‘ स्थापना करण्यात आली. पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणून ज्योतिबांची निवड झाली.
सत्यशोधक समाजामुळे बहुजन समाजातील सुशिक्षितांवर खूप परिणाम होऊन त्यांच्यात जागृती निर्माण झाली. छत्रपती शाहू महाराज, ना. भास्करराव जाधव, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, माधवराव बागल अशी अनेक कर्तबगार माणसे सत्यशोधक समाजाच्या झेंड्याखाली आली आणि अठरापगड बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी प्रयत्न केले.
सत्यशोधक समाजाचे कार्य.
सत्यशोधक समाज लोकांना पुढील प्रमाणे शिकवण देत असे.
१) देव एकच आहे.
२) सर्वांना देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे.
३) कोणीही जातीने श्रेष्ठ ठरत नाही. गुणांनी व कर्तुत्वाने थोर होतो. ही शिकवण देऊन हिंदू धर्मातील दुष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
आपल्या घरातील मुलींना शिक्षण देणे देवाधर्माच्या नावावर खर्च न करणे, विधवांना वाईट वागणूक न देता आदराने वागणे. विधवांशी विवाह पाप न समजता विवाह करणे, अशा बाबी करण्यावर ज्योतिबा आणि त्यांचे सहकारी यांनी भर दिला.
शूद्रांशी समानतेने वागणे, जातीभेद न पाळणे या बाबी स्वतः आचरणात आणत होते . त्यामुळे सनातनी लोकांना न घाबरता सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते काम करत होते. सत्यशोधक समाजामुळे शूद्र समाजात बरीच जागृती झाली. अंधश्रद्धा व धर्माचे अवडंबर कमी झाले.
” महात्मा “पदवीने सन्मान.
ज्योतिबांनी आपले सर्व आयुष्य शूद्रातीशूद्र, शेतकरी, कामगार, स्त्रिया यांच्या कल्याणासाठी खर्ची घातले. सावित्रीबाईंचीही ज्योतिबांना या कार्यासाठी साथ लाभली होती. शिक्षणातील कार्य व समाज सुधारणा याबद्दल ब्रिटिश सरकारने ज्योतिबांचा अनेक वेळा सन्मान केला. त्यांचा सर्वात मोठा सन्मान कोळीवाडा सभागृहात करण्यासाठी जनता जमली होती.
रावबहादूर लोखंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी ज्योतिबांना हिंदुस्तानचे ‘ बुकर टी वॉशिंग्टन ‘ ही पदवी द्यावी असा निरोप पाठवला होता. ज्योतिबा यांच्या सेवाभावी कार्याच्या गौरवार्थ उस्फूर्तपणे लोकांनी त्यांना ‘ महात्मा ‘ ही पदवी ११ मे १८८८ रोजी दिली. तेव्हापासून लोक आदराने महात्मा ज्योतिबा फुले म्हणू लागले.
(Mahatma Jyotiba Phule) ज्योतिबांचे साहित्य.
ज्योतिबांनी ब्राह्मणी स्वार्थावर आधारित पोवाड्याचे पुस्तक लिहून प्रकाशित केले.१८६८ मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांवर प्रदीर्घ पोवाडा लिहून प्रकाशित केला.१८६९ साली त्यांनी ‘ ब्राह्मणांचे कसब ‘ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.१८७३ साली त्यांनी
‘ गुलामगिरी ‘ हा ग्रंथ प्रसिद्ध केला.१८८३ साली शेतकऱ्यांचा आसूड हा आणखी एक ग्रंथ त्यांनी लिहिला.
दत्तकपुत्र यशवंत.
काशीबाई नावाची विधवा स्त्री मुठा नदीमध्ये जीव देण्यासाठी गेली होती. परंतु तिला सावित्रीबाई व ज्योतिबा यांनी वाचविले. तिला आपल्या घरी आणले. विशेष म्हणजे ती स्त्री गरोदर होती. काही दिवसांनी ती स्त्री बाळंतीण झाली, तिने का मुलाला जन्म दिला. फुले दांपत्याने त्याचे नाव यशवंत ठेवले.
फुले दांपत्याला मूळबाल नव्हते, तेव्हा त्यांनी या मुलाला दत्तक घेतले. त्याचा अत्यंत चांगला सांभाळ केला पुढे हा मुलगा शिकून डॉक्टर झाला. ज्योतिबा व सावित्रीबाईंनी ग्यानबा ससाने यांची मुलगी राधाशी यशवंतचा विवाह केला. ज्योतिबा केवळ मुलींच्या शाळा काढून थांबले नाहीत, तर अनाथ मुलगा सांभाळून त्याचा संसार उभा केला. अशा प्रकारचे धाडस त्या काळात ज्योतिबा व सावित्रीबाईंनी करून इतिहास घडविला.
आपल्या वाड्यातील आडावर पाणी भरण्यासाठी दलित बांधवांना मोठ्या प्रेमाणे बोलवले . त्यांना स्वतः पाणी भरण्यासाठी दिले. यापुढे आमच्या आडावर पाणी रोज भरत जा असेही त्यांनी अस्पृश्यांना सांगितले. या गोष्टीचा सनातनी लोकांना अतिशय राग आला होता.
समारोप.
२८ नोव्हेंबर १८९० रोजी पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले. शेवटची दोन वर्षे ते अर्धांग वायूमुळे आजारी होते तरीसुद्धा त्यांनी डाव्या हाताने सत्यधर्म ग्रंथ लिहिला.
ज्योतिबांच्या विचारसरणीने व कार्यकर्तृत्वाने जाती विद्रोहाचे व मानव मुक्तीच्या लढ्याचे युग घडवले आहे. त्यामुळेच मृत्यूनंतर शंभर वर्षे लोटूनही ज्योतिबांचे व्यक्तित्व, विचार व चरित्र सामाजिक प्रेरणेचा अक्षय्य स्त्रोत बनून अखंडपणे कार्य करत राहिले.
आधुनिक काळातील शिवरायांचा पहिला पोवाडा त्यांनी लिहिला.
पहिले आधुनिक नाटक, पहिली आधुनिक कविता त्यांनी लिहिली. अशा अनेक गोष्टी भारतीय इतिहासात प्रथमच घडत होत्या. जोतिबांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी करण्याचा विचार अनेकांना सुचला नाही, तर अनेकांनी समाजाचा रोष पत्करून तसे कृत्य करण्याचे धैर्य दाखवले नाही. लोकांमध्ये राहणारे, परंतु लोक विलक्षण असे ज्योतिरावांचे व्यक्तित्व त्यांच्या काळामध्ये एकमेवाद्वितीय होते.
FAQ
1. महात्मा ज्योतिबा फुले कोण होते?
समाजक्रांतीचे जनक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक.
2. ज्योतिबा फुले यांनी कोणते महत्त्वाचे कार्य केले?
मुलींच्या शाळा, विधवाश्रम, सत्यशोधक समाज, जातीभेदाविरुद्ध लढा.
3. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली?
२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात.
4. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचे योगदान काय?
भारतातील पहिली मुलींची शाळा, स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यांसाठी हक्क.
Other Articles
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती
Best Lokmanya Tilak Information in Marathi
Follow us on YouTube- Marathi Antarang