कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) in Marathi 2024
कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima)
आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पोर्णिमा असे म्हणतात. हिला कौमुदी पोर्णिमा किंवा नव्याची पुनव असेही म्हणतात. या दिवशी चंद्र सर्वात मोठा, अधिक आकर्षक असतो. या दिवशी चंद्र अधिक शांत, शीतल व उपकारक असतो.
कोजागिरी (Kojagiri Purnima) नाव पडले त्याचा इतिहास.
१) देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे. कृपाळू आहे. ती हितं करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते. त्रास देते. कटकटी निर्माण करते, या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात.
तिची अवकृपा झाली, की लोक म्हणतात ‘ आक्काबाईचा फेरा आला.’ ही आक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांवरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे, ते ती पाहते. झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते; पण जे जागतात, त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय? को जागर्ति ?
यावरून या पौर्णिमेला कोजागिरी(Kojagiri Purnima) हे नाव पडले.
२) देवांचा राजा इंद्र.
या पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर हिंडत असतो ,आणि आपली पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. तो लोकांना ‘ को जागर्ति ‘असे विचारतो, त्यावरून कोजागिरी हे नाव रूढ झाले आहे. ज्या घरात इंद्राची पूजा सुरू असते त्याच्यावर तो कृपादृष्टी करतो, असे पुराणात सांगितले आहे.
३) लक्ष्मीदेवीची कथा.
या दिवशी रात्री वरदा लक्ष्मी पृथ्वीवर सगळीकडे संचार करीत असते. जो कोणी जागे असून बुद्धिबळ इत्यादी खेळात मग्न असतील त्यांच्यावर ती प्रसन्न होते. मध्यरात्री लक्ष्मी देवी विचारते, ‘ कोण जागा आहे?’
म्हणजे कोण आपल्या कर्तव्याला जागतो? कोण कोण आपली काम नीट करतो? शेतकरी शेतात काम करतो का? विद्यार्थी अभ्यास करतात का? शिक्षक विद्यार्थ्यांना मनापासून शिकवतात का? आईवडील, पालक आपल्या पाल्यांकडे नीट लक्ष देतात का? आणि जो कोणी जागा असेल जागरूक असेल, दक्ष असेल त्याला मी द्रव्य संपत्ती देणार आहे असे म्हणत लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते. ‘ को जागर्ति ‘? या शब्दावरूनच या पौर्णिमेला आणि देवीलाही कोजागरी असे नाव पडले.
कोजागिरीव्रत एक कथा.
एका गावात एक गरीब माणूस होता. एक दिवस पत्नी बरोबर त्याचे भांडण झाले. तो माणूस पैसे मिळवून आणण्यासाठी घराबाहेर पडला. दिवसभर उपाशीपोटीच फिरत होता. संध्याकाळी समुद्राच्या काठाने तो एका आरण्यात आला. तिथे त्याला तीन नागकन्या दिसल्या. त्या विचार करीत होत्या. चिंतेत होत्या.
त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी चौथ्या भिडूची गरज होती. त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांनाआनंद झाला. त्यांनी त्याला सोंगट्या खेळायला बोलविले. तो दिवसभर भटकंती झाल्याने फार दमला होता. नागकन्यांनी त्याला नारळाचे पाणी पिण्यास दिले. त्याला बरे वाटले. त्या कन्यांबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला.
पण खेळताना तो सारखा हरत असतो. त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र गार वारा सुटला होता. सगळीकडे पिठासारखे शुभ्र चांदणे पसरले होते. इतक्यात आक्काबाईचा फेरा आला. लक्ष्मी देवी आली.
त्या माणसाला गरिबीमुळे दिवसभर उपवास घडलाच होता आणि खेळामुळे जागरण चालूच होते. त्याच्या हातून सहजपणे कोजागिरी व्रताचे पालन झाले होते. लक्ष्मी त्या गरिबावर प्रसन्न झाली. तो गरीब खेळात जिंकू लागला. तो देखणा, उत्साही, राजबिंडा, तेजस्वी दिसू लागला. नागकन्यांनी त्याला अमाप संपत्ती दिली. नागकन्यांबरोबर त्याचा व्यवहार झाला. सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला. तेव्हापासून तो कोजागिरी व्रताचे पालन करू लागला. अशी कथा आहे.
या दिवशी लक्ष्मीच्या स्वागतासाठी रस्ते, घर, मंदिरे, नद्यांचे घाट स्वच्छ करून त्या ठिकाणी दिवे लावतात. लक्ष्मीला नीटनेटकेपणा, स्वच्छता, पावित्र्य आवडते. जेथे या गोष्टी असतात तेथेच लक्ष्मी वास्तव्य करते. या पौर्णिमेला शरद्त्पौर्णिमा असे म्हणतात. जो आपल्या कर्तव्याच्या बाबतीत सदैव जागृत असतो त्यालाच सर्व प्रकारची लक्ष्मी मिळते. आळशी, झोपाळू, कामचुकार अशा माणसावर लक्ष्मीची कृपा होत नाही.
दुधाचा प्रसाद.
दुधात गृहिणी केशर, बदाम काप, चारोळ्या, पिस्ते टाकतात व गट्ट आटवीतात. असे आटीव दूध चंद्रप्रकाशात ठेवतात. मध्यरात्री चंद्राला त्याचा नैवेद्य दाखवितात. त्यानंतर ते दूध प्रसाद म्हणून सर्वांना वाटले जाते. ते सर्वजण पितात. हे दूध आरोग्यवर्धक, अमृतमय आहे असे समजले जाते.
रसिकता जागी ठेवा. आनंदाचे वाटेकरी व्हा. लक्ष्मीची पूजा करा. जो शुद्ध व पवित्र अंतःकरणाने जीवनाचा आनंद मिळवतो, कर्तव्य कर्म करतो तोच जीवनात यशस्वी होतो, हाच संदेश आपणाला कोजागिरी उत्सवातून मिळतो.