Build Don’t Talk Book Summary in Marathi

अतिशय व्यवहारी हे पुस्तक आहे. आपली स्वतःची ओळख बनविणाऱ्या युवकांसाठी हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आहे. राज शामानी एक भारतीय उद्योजक, पॉडकास्टर,You Tuber आणि प्रेरक वक्ते. ते सुप्रसिद्ध कन्टेन्ट रायटर असून त्यांनी कमी वयात व्यवसायाला सुरुवात केली होती.(१६ व्या वर्षी) आज त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे. आज ते २०० कोटी रुपयांचे व्यावसायिक मालक आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्र व TEDx सहित 26 पेक्षा अधिक देशात त्यांनी भाषणे केली आहेत.

Build Don’t Talk Book Summary

१) आपली शिक्षण पद्धती कुचकामी आहे !

आपण ऐकूण, पाहून आणि अनुभवातून शिक्षण घेत असतो.
आपल्या पारंपरिक शिक्षण- पद्धतीतील समस्या अशी आहे की ‘ काय शिकायचं ‘ हे शिकवलं जातं; पण शिकलेलं कसं वापरायचं हे मात्र शिकवलं जात नाही. विद्यार्थी वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले असतात. त्यामुळे त्यांची प्रतिभा, कौशल्य, आणि पात्रता वेगळ्या असतात.

आपल्यापैकी काहीजण व्हिडिओ पाहून, पुस्तके वाचून, अनुभवांतून शिकत असतात. आपल्यासाठी शिकण्याचा सुयोग्य मार्ग कोणता आहे याचा शोध घेण्यावर आपल्या शिक्षण पद्धतीनं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपल्या ज्ञानाचा वापर कसा करावयाचा हे मात्र आपल्याला शिकविले जात नाही.

आपल्याला विचार करायला शिकविले जात नाही, तर फक्त पाठ करून लिहावयास शिकविले जाते. आपण जे पाठ करून ज्ञान घेतो, त्यावर काहीही प्रक्रिया न करता ते आपण पुन्हा बाहेर टाकतो. विद्यार्थ्यांच्या कल्पना व भावभावनांचा विचार पहिल्या दिवसापासून आपल्या शिक्षण संस्था मारत आहेत.

त्यामुळेच लेखक म्हणतो उच्च कामगिरी केलेले लोक सहसा उच्चशिक्षित नसतात. जी गोष्ट त्यांना चांगली येते तीच उत्कृष्टपणे करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. लेखक विनोदाने असेही म्हणतो ” जे लोक अभ्यास करतात त्यांना अनेकदा काहीही अभ्यास न केलेल्या व्यक्तीचा अभ्यास करावा लागतो”.

इस्रायली विद्यार्थ्यांना शाळेत विचार करायला आणि प्रश्न विचारायला शिकविले जाते. भारतीय विद्यार्थ्यांना मात्र गप्प बसविले जाते.

आपली शिक्षण पद्धती आपल्या सामर्थ्याकडे लक्ष देत नाही; तर आपल्या त्रुटींवर बोट ठेवून आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण करते. आपली शिक्षण व्यवस्था कुचकामी आहे. प्रश्न विचारणे, कुतूहल विकसित करणे आणि कौतुक करणे यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शिकायचं कसं ते समजून घ्या. जिज्ञासू व्हा प्रश्न विचारा. चांगल्या माणसांचं जाळ तयार करा.

Build Don’t Talk Book Summary

२) तुम्हाला अनेक गोष्टी करता येत नाहीत मान्य करा?

आपल्याला सर्वकाही कळतं या भ्रमात आपण असतो. खरंतर आपल्याला अनेक गोष्टी येत नसतात ‌. त्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजेत. पण हे स्वीकारण्यामध्ये आपला अहंकार येतो. त्यामुळे अहंकार आपला कधीही विकास होऊ देणार नाही. मला प्रत्येक गोष्ट येतेच या चुकीच्या समजूतीला काही लोक चिटकून राहतात.

स्वतःला एक संधी देण्याआधीच तुम्ही स्वतःवर टीका करायला सुरुवात करता. तर इतर लोक काय करतील? तुम्ही ‘ कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…….. हे गाणं ऐकलं असेल ना? तर त्या लोकांना बोलू द्या.

एखादी गोष्ट नीट येत नाही हे माहीत असून सुद्धा ती गोष्ट आपण सोडायला तयार होत नाही. अभ्यासाचा विषय असो किंवा नोकरीचा विषय असो जर जमत नसेल तर वस्तुस्थिती ओळखण्याची गरज असते. जर तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल, तर ते मान्य करा; पण एवढ्यावर थांबू नका. कारण त्यानंतर त्याबद्दल तुम्ही काय करता, त्यानंच खरा फरक पडतो.

आपल्याला एखादे काम जमत नाही, हे समजणे हा विकासाचा पहिला टप्पा आहे. एखादं काम न येणं अगदीच सर्वसामान्य असतं. जर एखादं काम जमत नसेल, तर त्याचा पाठलाग करणं सोडून द्या. आयुष्य खूप लहान आहे आणि जे जमत नाही त्यातच अडकून पडण्यापेक्षा, ज्या इतर अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यांचा पाठलाग करणं शहाणपणाचा असतं.

अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला जमत नाहीत. या वास्तवाचा स्वीकार करा. ज्या गोष्टी जमत नाहीत, त्या शिकून घ्या आणि त्यामध्ये निष्णात होण्याचा प्रयत्न करा. तुमच्या क्षमता आणि कमकुवतपणाचा शोध घ्या.

३) लोक हसतील तुमच्यावर त्याची तयारी ठेवा!

आपला विकास रोखण्यात’ लोक आपल्याला हसतील हीच एकमेव भीती असते. ‘ याच भीतीमुळे तुम्हाला मनातून जे करावयाचं असते, ते आपण करत नाही. दुसरे आपल्याला हसतील याकडे ढुंकूनही बघू नका. प्रथम तुम्ही स्वतःला स्वीकारा. लोक आपल्याला हसतील हीच भीती तुम्हाला सदैव मागे खेचत असते.

अशा नकारात्मक विचारांच्या लोकांपासून वेगाने लांब व्हा. नवनवीन गोष्टी करून पहा. घाबरू नका. तुमच्या सुरक्षित कोशातून बाहेर या आणि उंच शिखर गाठा. तरच आपण आकाशाला गवसणी घालू शकतो. स्वतःला स्वीकारा, कारण तुम्ही स्वतःच स्वतःला स्वीकारलं नाही, तर जग तुम्हाला कसं स्वीकारेल. बाहेरून मिळणाऱ्या स्वीकृतीचा शोध थांबवा. नवनवीन गोष्टी करून पहा.

Build Don’t Talk Book Summary

४) यशस्वी कसं व्हायचं?

आजच्या काळात आपल्याकडे विशिष्ट ज्ञान असले पाहिजे. आजचे युग विशिष्ट ज्ञानाचं आणि त्याच्या प्रसाराचं आहे. तुमच्याकडे असलेल्या विशिष्ट ज्ञानाचा उपयोग तुम्ही पैसे कमावण्यासाठी करू शकता. काहींना चांगले बोलता येते ते वक्ते असतात. त्यांनी जर विविध विषयावर व्हिडिओ तयार केले तर त्यातून पैसे मिळतील.

काही आपल्या अभिनयातून चांगले व्हिडिओ तयार करू शकतात. आपल्या कौशल्याचा वापर करता आला पाहिजे इतकच. बाजारात असणाऱ्या ९९ टक्के लोकांपेक्षा तुमच्याकडे जास्त ज्ञान आणि कौशल्य असतील तर तुम्ही व्हिडिओ निर्मितीच्या माध्यमातून पैसा मिळवू शकता.

तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी करत असता, त्या अधिक चांगल्या होण्यासाठी सहा महिने शिका. त्याच्यावरील पुस्तके, ब्लॉग वाचा. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांपेक्षा तुमच्याकडे कमीत कमी १० टक्के अधिक ज्ञान असले पाहिजे. आजच्या जगात प्रत्येक कौशल्याला मागणी आहे.

तुम्ही त्यात किती श्रेष्ठ आहात, ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे. आजूबाजूच्या लोकांपेक्षा १/ टक्का चांगलं होण्याची गरज आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीत निष्णात आहात याचा निर्णय तुमचा तुम्ही घ्या. ज्या गोष्टीत तुम्ही निष्णात आहात, तिच्यातून पैसा कसा कमावता येईल याचा मार्ग शोधा.

५) व्यावसाय क्षेत्र कसं ठरवायचं?

राज शामानी म्हणतात ” तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तुमचा व्यवसाय सुरू करू शकता, त्या क्षेत्रात तुम्ही किती हुशार आहात, त्यावर पुढचं सगळं अवलंबून असतं. तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल, तर तुमच्याकडे चांगल्या कल्पना असायलाच हव्या. असा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही वेळ चांगलीच असते.

तुम्ही कोणतही क्षेत्र निवडलं, तरी तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता; पण त्यासाठी तुम्हाला कोणतही एकच क्षेत्र निवडावा लागेल. तुम्हाला जे क्षेत्र आवडतं, त्याबद्दल जास्तीत जास्त वाचा त्याचे बरेचसे व्हिडिओ पहा. असेच क्षेत्र निवडा.

तुम्हाला कोणती गोष्ट चांगली करता येते? बोलणं, निरीक्षण करणे, इमारती उभारणे, विक्री करणं, कोडींग करणे, चित्र काढणे, अशा गोष्टीतून तुम्ही चांगली कमाई करू शकाल अशी एखादी गोष्ट निवडा. तुम्हाला आवडत असलेले क्षेत्र शोधा. तुमची ताकद काय आहे हे ओळखा. तुमचं उत्पादन बाजारात आणा.

६) मी माझं कन्टेन्ट कसं ठरवतो?

कोणत्या प्रकारचं कन्टेंन्ट लोकांना आवडतं हे समजण्याचं कौशल्य आपल्याकडे असले पाहिजे. लेखक म्हणतो मी डेटा, अर्थात माहिती वाचतो, लोकांच्या प्रतिक्रिया बघतो, म्हणून मला कोणत्या प्रकारचं कन्टेन्ट रातोरात व्हायरल होईल हे कळतं. जे वाचल्यावर किंवा बघितल्यावर माझ्या आयुष्यात लक्षणीय सुधारणा झाली असती, अशा प्रकारचे कन्टेन्ट मी लोकांसाठी तयार करतो.

लोक पॉडकास्ट, रील, ब्लॉग्ज, ट्विटर यापैकी कोणत्याही कन्टेन्ट बघण्यापूर्वी किंवा वाचण्यापूर्वी , तुम्ही जे होता, त्यापैकी १ टक्का सुधारणा तुमच्यात माझे कन्टेन्ट बघितल्यानंतर व्हावी इतकीच माझी इच्छा असते.

जे लोक स्वतःला जगापासून वेगळे करतात, त्यांना जगही लवकर बाजूला करतं. जे स्वतःचा आणि आजूबाजूच्या जगाचा स्वीकार करतात, तेच लोकांपर्यंत पोहोचतात. तुम्ही कन्टेन्ट तयार करताना हुशार असण्याची गरज नाहीये.

तुम्ही फक्त सामान्य राहण्याची गरज आहे. कारण हुशार लोकांना फक्त बुद्धिमान कन्टेन्ट समजतो ,सामान्य जनता त्यांना जवळच्या वाटणाऱ्या कन्टेन्टला प्राधान्य देते. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती हुशार आहात याचा विचार करण्यापेक्षा लोकांना तुम्ही कशा प्रकारचे जवळचे वाटू शकता, याचा विचार करण्याची गरज आहे.

७) अपयशावर मात कशी करावी?

अपयशावर मात, करण्यासाठी उठून कामाला लागणे हा एकमेव मार्ग आहे असे लेखक आपल्याला सांगतो. विचार करा अपयश का आलं?

कारणावर लक्ष द्या, त्यात सुधारणा करा आणि पुन्हा सुरुवात करा. आपल्याला असे वाटते की आपण तर सर्व बरोबर केलं होतं. मग अपयश का आलं? तर तुम्हाला सत्य परिस्थिती पडताळून बघण्याची गरज आहे. आयुष्य तुमच्यासाठी घडतं, तुमच्यासोबत नाही हे टोनी रॉबिन्स यांचं वाक्य आहे. तुम्ही बाह्य गोष्टी बदलू शकत नाही.

हे जरी खरं असलं तर अपयशाचं खरं कारण हे तुम्ही आणि तुमची अपूर्ण तयारी हेच असतं. एखाद्या गोष्टीत अपयश आलं तर याचा अर्थ आयुष्य संपलं असा होत नाही. जीवनात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मेहनत किंवा कष्टाशिवाय कोणताही पर्याय नसतो. अपयश येणे ठीक आहे; पण त्यावर थांबणं ठीक नाही. विचार करा आपल्याला अपयश का आलं? आपल्या प्रयत्नांनी त्यावर मात करा.

८) कोणाशी कसं बोलायचं?

कोणाशी कसं बोलायचं हे कौशल्य प्रत्येकानं शिकण्याची गरज आहे. या कौशल्याच्या असण्यामुळे किंवा नसल्यामुळे तुमचं खाजगी आणि व्यावसायिक आयुष्य घडत असतं किंवा बिघडत असतं. तुम्हाला बोलायला आवडत असो किंवा नसो, चांगलं बोलता येणे हे एक अत्यावश्यक कौशल्य आहे.

तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे, असे तुमच्या प्रश्नापासून प्रतीत व्हायला हवं. तुम्हाला तिच्याबद्दल जाणून घेण्यात रस आहे, हे समोरच्या व्यक्तीला जेव्हा कळतं, तेव्हा ती देखील थोडी सैलावते. तुमच्या प्रश्नांची उत्तर ती देते. त्यावरून तिला तुमच्याशी बोलण्यात रस आहे की नाही याची तुम्हाला कल्पना येईल.

ज्यावेळी तुम्ही एखाद्या- मध्ये रस दाखवता, त्यावेळेस तुमचे हावभाव नैसर्गिक असतात. तुमचा चेहरा उजळलेला असतो आणि या मार्फत तुम्हाला खरंच तिच्यामध्ये रस आहे, हे समोरच्या व्यक्तीला कळत. म्हणून तुम्हाला मनापासून इच्छा असेल, तेव्हाच इतरांशी बोलायला जा. लोकांना सन्मान द्या. लोकांना सहजपणा वाटू द्या.

९) संपत्ती कशी निर्माण करावी?

आपण आयुष्यभर कष्ट करून जो पैसा कमवितो त्याला आपण ‘ संपत्ती ‘ म्हणत नाही. लेखक राज शामानी यांनी संपत्तीची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. ” तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणतेही कष्ट न घेता, वेळ आणि तुमचं कौशल्य न वापरता, तुम्हाला हवी असलेली जीवनशैली जगण्यासाठी लागणारा जो पुरेसा पैसा कमावता, त्याला संपत्ती असं म्हणतात. ” अशी संपत्ती जेव्हा तुमच्याकडे असते तेव्हा तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहात असे मानले जाईल. त्यावेळी तुमच्याकडे तुम्ही जेवढे पैसे खर्च करता त्यापेक्षा जास्त पैसे तुमच्याकडे असतात.

लेखक म्हणतो पैसे प्रथम कमवा व त्यातील काही पैशांची गुंतवणूक करा. असे गुंतवलेले पैसे आपोआप वाढत जाऊन संपत्ती निर्माण करता येईल. आपण जो पैसा मिळवतो त्यातील २० ते ३० टक्के पैसे गुंतवले पाहिजेत. विशेषतः ६० वर्षानंतर जेव्हा आपण पैसे कमविणार नाही म्हणून पैसा गुंतवा. हा पैसा म्युच्युअल फंड्स, दुसऱ्या कंपनीचे इक्विटी शेअर्समध्ये गुंतवा. या गुंतवणुकीतून पैसा निर्माण होईल. संपत्ती निर्माण करण्याचा हा सुवर्ण मार्ग आहे. पैसा तुमच्यासाठी काम करेल, असा मार्ग शोधा.

१०) स्वतःचा ब्रँड कसा निर्माण कराल.

तुम्ही ब्रॅण्डिंगविषयी विचार करता त्यावेळेस तुम्ही उत्पादनाच्या वेस्टनाबद्दल विचार करता. पण जेव्हा तुम्ही वैयक्तिक ब्रॅण्डिंग बद्दल विचार करता तेव्हा तुम्ही स्वतःला जगासमोर आणत असता. स्वतःला उघड केलं की मगच तुमची प्रगती होते. कारण त्यानंतर लोकांपुढे कसं बोलायचं किंवा लोकांपुढे स्वतःला कसं सादर करायचं याचा विचार करण्याची गरज भासत नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल विचार करण्याची गरज पडत नाही, कारण तुम्ही फक्त तुम्ही असता. लोकांना सतत किंमत देऊन तुम्ही विश्वास निर्माण करता. तुम्ही असं केल्याने, लोक तुम्हाला अधिकाराचं स्थान देतात. जोपर्यंत तुम्ही अधिकारी होत नाही, तोपर्यंत लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत.

समारोप

अतिशय व्यवहारी हे पुस्तक आहे. आपली स्वतःची ओळख बनविणाऱ्या युवकांसाठी हे अतिशय प्रेरणादायी पुस्तक आहे. राज शामानी एक भारतीय उद्योजक, पॉडकास्टर, YouTube आणि प्रेरक वक्ते व कन्टेन्ट रायटर असून त्यांनी कमी वयात घरगुती साबण विकून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. आज त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे. आज ते २०० कोटी रुपयांचे व्यावसायिक मालक आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्र व
TEDx सहित 26 पेक्षा अधिक देशात भाषणे केली आहेत.. या पुस्तकात त्यांनी अनेक प्रभावी सल्ले दिले आहेत.

Other Articles-

Don’t Sweat the Small Stuff Book Summary in Marathi

Think Straight Book Summary in Marathi

Sharad Tandale | द आंत्रप्रेन्युअर ले. शरद तांदळे. या पुस्तकाची समरी

Do It Today Book Summary in Marathi

Follow us on YouTube- Marathi Antarang

Leave a Comment