Bhagwan Mahavir | शालेय विद्यार्थ्यांसाठी महावीरांची थोडक्यात माहिती.

भगवान महावीर(Bhagwan Mahavir) जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर असून, ते अहिंसा व शांतीचे प्रतीक मानले जातात.

भगवान महावीर (Bhagwan Mahavir) जन्मापूर्वीची सामाजिक स्थिती.

समाजात बहुसंख्य लोक दरिद्री होते. स्त्रिया आणि क्षुद्रांना समाजात कोणतेही स्थान नव्हते ‌. धर्माच्या नावाखाली अनेक वाईट प्रथा होत्या. संपूर्ण समाज रुढीपरंपरांच्या विळख्यात अडकला होता. लोक चमत्कारांना महत्त्व देत होते. अशा सामाजिक परिस्थितीत मानवजातीला कल्याणचा मार्ग दाखविण्यासाठी महावीरांचा जन्म झाला.इ.स.पू.५९९.

भगवान महावीरांचा जन्म व बालपण.

प्राचीन काळी बिहार प्रांत अतिशय संपन्न होता. या प्रांताला सांस्कृतिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व होते. या प्रांतात असलेली राज्ये प्राचीन भारतात प्रगत मानली जात असत. वैशाली नावाच्या साम्राज्यात कुंडलपूर येथे राजधानीत महाराज सिद्धार्थ हे अत्यंत परोपकारी राजे होते. त्यांच्या पत्नी महाराणी त्रिशला या प्रजेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या होत्या.

या दाम्पत्याच्या पोटी भगवान महावीरांचा जन्म झाला. त्रिशला देवींनी एका दैवी पुत्राला जन्म दिला. अखिल मानव जातीला सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी व कल्याणासाठी ” वर्धमान ” पृथ्वीतलावर अवतरला होता. वर्धमानाच्या जन्माच्या वेळी एक पवित्र प्रकाश पडला होता. वर्धमान जन्माची वार्ता ऐकून देव, देवता, गंधर्व, किन्नर हर्षभराने गाऊ व नाचू लागले. मानवतेचा तारणहार जन्माला आल्याने प्रत्येकजण हर्षभरीत झाला होता.

महावीरांनी बालपणी पाळलेली पाच तत्वे.

महावीरांचे जीवन अनुकरणीय असल्याचे अनेक पुरावे इतिहासात मिळतात. ते जितके शक्तिशाली होते, तितकेच ज्ञानीही होते. बालवयात त्यांनी पाच संकल्प केले आणि ते शेवटपर्यंत पाळले. प्राणीमात्रावर दया, सत्यप्रियता, परवस्तूची अभिलाषा त्याज्य, ब्रह्मचर्य पालन व कामनांवर संयम ही ती पाच तत्वे होती.

संसाराचा त्याग.

एकदा राजपुत्र वर्धमान त्यांच्या आईच्या जवळ बसले असताना तिने त्यांच्याजवळ विवाहाचा विषय काढला. ती म्हणाली ” वर्धमाना , “मी कलिंगनरेश जितशत्रूची कन्या यशोदेचा विवाह तुझ्याशी करू इच्छिते.

मातेचे बोलणे ऐकून वर्धमान आईला शांतपणे म्हणाले, माते, तुझी ही इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. मी विवाह बंधनात अडकू इच्छित नाही. पुढे ते मातेला म्हणाले मी समाज कल्याणचे व्रत हाती घेतले आहे. समाजात सर्वत्र अज्ञान आणि अधर्म पसरला आहे. या अंध:कारातून मी समाजाची मुक्तता करेन. हे काम मी जीवन- भर करणार आहे. महावीरांचा ठाम निर्धार पाहून तिने त्यांच्या विचारांना संमती दर्शवली.

महावीर २८ वर्षाचा असताना महाराज सिद्धार्थ आणि महाराणी त्रिशला देवी यांनी अन्नत्याग करून संथाराव्रत धारण केले. त्यांनी इहलोकचा निरोप घेतला. त्यानंतर महावीरांचा मोठा भाऊ नंदीवर्धन सिंहासरावर बसला. महावीर यांनी संन्यास घेण्याचा निर्णय नंदीवर्धनास सांगितला हे ऐकून नंदीवर्धनाला खूप दुःख झाले.

मार्गशीर्ष वद्य दशमीचा दिवस, वर्धमान महावीरांचा गृह त्यागाचा पवित्र दिन. महावीरांच्या संन्यास कार्यक्रमासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिव्य सोहळ्यासाठी प्रजाजन, आप्त- मित्र सगे- सोयरे उपस्थित होते. महावीरांसाठी ‘ चंद्रप्रभा ‘ नावाची सुंदर पालखी तयार करण्यात आली. वर्धमान या पालखीत बसले आणि पालखी राजपथाने चालू लागली. मार्गाच्या दुतर्फा नागरिक जमले होते. सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्यांचा प्रिय राजकुमार त्यांना सोडून निघाला होता. पालखी वन उद्यानात पोहोचली. महावीरांनी अंगावरील आभूषणे उतरवून ठेवली आणि ते अज्ञाताच्या दिशेने निघाले.

तपश्चर्या

भगवान महावीरांचा नवीन जीवन प्रवास सुरू झाला होता. त्यांनी तपस्येला प्रारंभ केला. सर्वप्रथम महावीरांनी अडीच दिवसांचा उपवास केला. त्यानंतर त्यांनी राजधानी कुंडलपूरचा त्याग करून कुल्यपूरकडे प्रयाण केले. तब्बल बारा वर्षे भगवानांनी या आरण्यात तपश्चर्या केली. या तपाचा एक नियम होता.

तीन दिवसांपेक्षा जास्त काळ एका ठिकाणी ते थांबत नव्हते. मात्र पावसाळ्यात त्यांचे वास्तव्य एकाच ठिकाणी राहायचे. तपसाधनेच्या काळात महावीरांचे चातुर्मास चंपापुरी, पुष्पचंपा, राजगृह, कौसंबी, लाढ, कुमारग्राम व उज्जैन येथे झाले. तपसाधनेनंतर भगवान महावीर सर्व प्रकारच्या चिंतनांपासून मुक्त झाले.

त्यांनी तहान आणि भुकेवर संपूर्ण विजय प्राप्त केला. अमर्याद कालापर्यंत अन्नपाणी मिळाले नाही तरी त्यांना कष्ट होत नसत. जंगलातील प्रत्येक वृक्ष त्यांचे निवासस्थान झाला होता.

अनार्यांचा त्रास.

ज्या प्रदेशात भगवान महावीरांचे दैवी तप सुरू होते, त्या भागात अनार्यांचे वर्चस्व होते. या अनार्यांना सत्तेचा मद चढला होता. महावीरांचा वाढता महिमा संकुचित वृत्तीच्या अनार्यांना सहन झाला नाही. महावीरांच्या तपश्चर्येमुळे अनार्य क्रोधीत झाले. महावीरांच्या सत्य, अहिंसा व सदाचाराच्या तत्त्वांना त्यांचा विरोध होता. अनार्यांनी महावीरांना खूप त्रास दिला.

शिकारी कुत्रे त्यांच्या अंगावर सोडले. प्राण घातक शास्त्रांनी शरीराला टोचून रक्त बंबाळ केले. मात्र भगवानांनी धैर्य सोडले नाही. शेवटी अहिंसेचा विजय झाला.

अनार्यांनी महावीरांच्या समोर शरणागती पत्करली. त्यांच्यासारख्या महान पुरुषाला छळल्याबद्दल अनार्यांना अखेर पश्चाताप झाला. त्यांनी महावीरांची क्षमा मागितली. महावीर दया व शांतीचे मूर्तिमंत अवतार असल्याने त्यांनीही उदार अंत:करणाने अनार्यांना माफ केले.

धर्मप्रसार

ध्यानधारणेनंतर त्यांच्या हृदयात दिव्य ज्ञानाचा सूर्योदय झाला. सम्यक ज्ञानाने भगवान महावीरांचे अंतःकरण उजळून निघाले. जीवनाची सारी रहस्ये महावीर यांनी जाणली होती. त्यांच्या तपश्चर्येचा उद्देश सफल झाला होता. ज्ञानप्राप्तीनंतर महावीरांनी सर्वप्रथम मगध देशात अहिंसा धर्माची ध्वजा फडकविली.

बिहारनंतर महावीरांनी संपूर्ण भारताची यात्रा केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी इराण आणि अरबस्थानापर्यंत ज्ञानाची मशाल नेली. सर्वत्र त्यांचे मोठे स्वागत झाले. त्यांच्या विचारांना जगत्- मान्यता मिळाली.

अनेक सत्ताधीशांनी महावीरांना आपले गुरु मानले. महावीरांच्या रूपाने अखिल विश्वाच्या क्षितिजावर ज्ञान सूर्याचा उदय झाला. महावीरांच्या उपदेशामुळे अज्ञानाच्या अंध:कारात चाचपडणाऱ्या समाजाला नवी दिशा सापडली.

महानिर्वाण

भगवान महावीरांनी २९ वर्षे परदेशात धर्माचा प्रचार केला. दरम्यानच्या काळात त्यांचा शिष्य संप्रदाय अफाट वाढला होता. अनेक स्थानांची यात्रा करत भगवान महावीर पावापुरी येथे पोहोचले. तेथे त्यांनी उपवासाच्या काळात अंतिम प्रवचन केले. पद्मासन घालून अखेरच्या प्रवासाला प्रारंभ केला.इ.स.पू.५२७ कार्तिक वद्य एकादशीला महावीरांचे महानिर्वाण झाले. तेव्हापासून पावापुरी हे पवित्र तीर्थ बनले आहे. जैन बांधवांनी पावापुरीस भव्य मंदिर उभारले आहे.

महावीरांची महत्त्वाची वचने.

सत्य-महावीर म्हणतात हे मानवा तुम्ही खरेला खरेसार मानतात. जो ज्ञानी सत्याचे पालन करतो, तो मृत्यूला पाहतो आणि पार करतो.

अहिंसा-या जगातील प्राण्यांची हिंसा करू नका. त्यांच्याबद्दल आपल्या अंतकरणात करण्याची भावना ठेवा. त्यांचे संरक्षण करा. हाच आहे अहिंसेचा संदेश होय.

अग्रस्थ-दुसऱ्याच्या वस्तू न देता स्वीकारणे याला जैन ग्रंथात चोरी म्हणतात.

अपरिग्रह-भगवान महावीर स्वामीत्वावर म्हणतात, जो माणूस स्वतः सजीव किंवा निर्जीव वस्तू गोळा करतो तसेच इतरांकडून असा संग्रह करतो किंवा इतरांना ते गोळा करण्याची परवानगी देतो, तो कधीही दुःखापासून मुक्त होऊ शकत नाही.

ब्रह्मचर्य-महावीर यांचे ब्रह्मचर्याबद्दल अत्यंत अमूल्य उपदेश आहेत.

ब्रह्मचर्य हे परिपूर्ण तपस्या, नियम, ज्ञान, तत्त्वज्ञान, चारित्र्य, संयम आणि नम्रता यांचे मूळ आहे. तपस्येमध्ये ब्रह्मचर्य हे श्रेष्ठ तप आहे. जे पुरुष स्त्रियांशी संबंध ठेवत नाहीत, ते मोक्षाकडे वाटचाल करतात.

Other Articles-

Mahatma Jyotiba Phule Biography in Marathi | समाजक्रांतीचे जनक पूर्ण माहिती

Best सरदार वल्लभभाई पटेल – भारताचे लोहपुरुष | जीवनचरित्र, कार्य आणि योगदान

Leave a Comment