(Annabhau Sathe)-तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे

जन्म ,शिक्षण ,बालपण.

अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगावात मातंग कुटुंबात झाला. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. त्यावेळी मातंग समाजाला ब्रिटिशांनी गुन्हेगार म्हणून नोंदविले होते. कुठेही काहीही झाले तरीही पोलीस सर्वप्रथम गुन्हेगार म्हणून नोंद असलेल्या समाजाच्या घरांवर धाड टाकत असत.

अण्णांच्या गावांमध्ये एकच शाळा होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे शाळेमध्ये दलित मुलांना प्रवेश नव्हता. अण्णाभाऊंच्या शाळेत सुद्धा दलितांना शिकायचे असेल तर त्यांनी शाळेच्या व्हरांड्यात बसले पाहिजे किंवा शाळेसमोर मोठे लिंबाचे झाड होते, त्या झाडाखाली बसून शिक्षण घेतले पाहिजे. शाळेतील शिक्षक उच्चवर्णीय असायचे.

दलित मुलांना असे शिक्षक मारझोड करीत असत. हातात येईल ती वस्तू फेकून मारायचे. याचा अनुभव अण्णाभाऊंना आला. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला व आपल्या आईला सांगितला. परंतु नंतर त्यांनी महतप्रयत्नांनी शब्द ओळख करून घेतली व ते पुस्तक वाचण्यास शिकले.

तुकाराम, भागुबाई, शंकर आणि जाई ही चार भावंडे अण्णा भाऊंच्या कुटुंबात होती. शाळा शिकण्याच्या काळात त्यांना आपल्या लहान भावंडांना सांभाळावे लागले.

अण्णाभाऊंना लहानपणापासून डोंगरदऱ्यांमध्ये, जंगलामध्ये गुहांमध्ये तसेच नदीच्या काठाकाठाने भटकणे खूप आवडत असे. असे भटकता भटकता त्याने अनेक वेळा अनेक नद्यांचा परिसर पालथा घातला होता. कृष्णा, कोयना, वेरळा या नद्यांचा भाग तुकारामाला चांगलाच परिचित झालेला होता.

नद्यांच्या काठाकाठाने फिरताना तो झाडाझुडपांचे निरीक्षण करीत असे. लहानपणी तुकारामला यात्रेत किंवा जत्रेत जाणे खूप आवडत असे. जवळच्या कोणत्याही गावांमध्ये यात्रा असली की तुकाराम आपली हजेरी न चुकता तेथे लावीत. यात्रेतील गर्दी, माणसे, दुकाने यांचे त्याला आकर्षण होते. कुस्त्या, तमाशे, पोवाडे, पालख्या, नाच गाणे या सर्वांकडे तो बारकाईने लक्ष देत असे. त्यात त्याला खऱ्या अर्थाने रुचीअसल्याने तो प्रत्येक गोष्टीचे आकलन करून घेत असे.

मुंबईकडे प्रयाण.

१९३१ साली ग्रामीण भागात दुष्काळ पडला होता. तुकारामाचे वडील मुंबईला कामाला होते. त्यांना त्यांच्या पत्नीने दुष्काळा विषयी कळविले. यांच्या वडिलांकडे मुंबईला जाण्यासाठी लागणारा पैसा नव्हता. सुगी तोंडावर आली होती. साठे कुटुंब मुंबईच्या दिशेने पाई चालू लागले.

तेरा वर्षाची भागुबाई, तुकाराम, शंकर आणि छोटी जाई असा तांडा चालू लागला. शंकर आणि जाई हे दोघेही तुकाराम आणि भागुबाईच्या कडेवर, पाठीवर किंवा थोडेसे पायी असे आलटून पालटून चालत होते. अण्णांचे वडील भाऊ व आई मुंबईच्या दिशेने चालू लागले. अशीच मजल दरमजल करत पाटावर काम करीत, रस्त्यावर हमाली करून, खडी टाकून, कोळसा भरण्याच्या कामावर हजर राहून ते सर्वजण सहा महिन्यानंतर मुंबईला पोहोचले. मुंबईला त्यांचा मुक्काम भायखळ्याच्या एका चाळीत पडला.

तुकाराम हा लहानपणापासून गोड गळ्याचा होता. मुंबईला त्याने मित्रांच्या वर्तुळात गाणी, वग, लावण्या, पोवाडे गायला सुरुवात केली. त्याला अनेक लोकगीते आणि लोककथा येत होत्या. त्याचा वापर तो आपल्या मित्रांच्या मनोरंजनासाठी करीत होता. याच वेळी मुंबईला त्याचा परिचय कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी झाला.

कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव त्याच्या जीवनावर पडला होता. याच कम्युनिस्ट चळवळीच्या कार्यात असताना तुकारामाचे रूपांतर अण्णाभाऊ मध्ये झाले.

त्यांनी हॉटेलमध्ये वेटर, हमाल काम, बुट पॉलिश, कोळसे आणि दगड वाहणारा, डोरकीपर, घरगडी, नोकर, खाण कामगार, रोजंदारीचा मजूर या आणि इतर यासारख्या अनेक प्रकारच्या कामातून अनुभव- सिद्ध जीवन बनविण्यास सुरुवात केली.

पुस्तके वाचण्याचा छंद.

त्यांना पुस्तके वाचण्याचा छंद लागला. अनेक पुस्तके आणून वाचण्यासाठी मिळवून घेऊन ते वाचत. हाती पडेल ते वाचणे हेच त्यांचे वाचनाचे सूत्र होते. त्यांनी विविध विषयांवरील पुस्तके वाचली. पुस्तके वाचून बऱ्याचदा ते आपल्या गिचमिड अक्षरात लिहू लागले. पुस्तकांशी तल्लीन झालेल्या अण्णाभाऊंसाठी तो काळ म्हणजे वाचनाचा सुवर्णकाळच होता असे म्हणावे लागेल.

तमाशामध्ये प्रवेश.

त्या काळात गावामध्ये चित्रपटांपेक्षा तमाशाचे प्राबल्य अधिक होते. आपल्या अंगी असलेल्या कलांचे प्रदर्शन करण्याची एक संधी सुद्धा या तमाशांद्वारे होत असे. अण्णाभाऊ सारख्या कलाकाराला यापेक्षा अजून काय हवे. त्यांनी तमाशामध्ये काम करण्याचे ठरविले. त्या भागात बापू साठेंचा फड खूप नावाजलेला होता.

अण्णाभाऊंकडे असलेल्या कलागुणांचा वापर याच ठिकाणी सुरू झाला. त्यांच्या उपजत गुणांमुळे ते तमाशात अतिशय लोकप्रिय झाले होते. त्यांचा आवाज अतिशय धारदार होता. तमाशामध्ये आवश्यक असलेल्या हजरजबाबी वाक्ये, प्रसंग, विनोद ते सहज करू शकत असत.

त्यांची पाठांतर करण्याची क्षमता प्रचंड होती. ते पेटी, तबला, बुलबुल, सारंगी, ढोलकी आणि इतर वाद्ये सहज वाजवीत असं. त्यांनी आपल्या प्रतिभेने तमाशात एक खास शैली तयार केली होती.

तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर अण्णाभाऊंनीच केले होते. तेच भविष्यातील तमाशाचे उद्धारकर्ते बनले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी त्यांनी जनजागृती करण्याचे मोलाचे काम केले होते.

विशेष संदर्भ.

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य.अण्णाभाऊंची साहित्यदृष्टी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकते. मी माझ्या माणसांसाठी लिहितो असे म्हणणाऱ्या अण्णाभाऊंनी जगातील अन्याय- पीडित, दारिद्र्यपीडित, मागासवर्गीय, कामगार यांना आपल्या साहित्यात केंद्रस्थानी ठेवून साहित्याचे बीज रुजवले.

अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबरी, कविता, नाटक, प्रवास वर्णन, शाहिरी अशा सर्व वाड्मय प्रकारात आपले आढळ स्थान निर्माण करून ठेवले आहे. माणूस वाईट नसतो.

वाईट असते ती गरिबी हे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून स्पष्ट केले आहे. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याची सुरुवात पोवाडे, लोकनाट्यापासून केलेली आहे. परंपरागत तमाशाला छेद देऊन लोकनाट्यात रूपांतर करणारे अण्णाभाऊ लोकनाट्याचे प्रवर्तक आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये जवळजवळ १४ लोकनाट्याचे लेखन आणि सादरीकरण केले आहे.

अकलीची गोष्ट (१९४५), खापऱ्या चोर (१९४६), देशभक्त घोटाळे (१९४६), निवडणुकीतील घोटाळे (१९४६)
शेटजी चे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), माझी मुंबई (१९४८), मूक मिरवणूक (१९४९), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्याचा दौरा (१९५२), बिलंदर बुडवे (१९६३) कलंत्री, दुष्काळात तेरावा, पेंग्याचे लगीन इत्यादी.

अण्णाभाऊंच्या लोकनाट्य मध्ये ग्रामीण जीवनाचे यथार्थ चित्रण दिसून येते. सांगली, सातारा परिसरातील माणसांच्या अनेकविध वृत्ती-प्रवृत्तीवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. लोकजीवन, जीवन जगण्याची पद्धत, येथील चालत आलेले रितीरिवाज, परंपरा तसेच संघर्षपूर्ण व्यक्तीचे भाव विश्व त्यांनी लोकनाट्यात रेखाटले आहे.

ग्रामीण भागातील अनेकविध समस्या आणि निवडणुकीतील स्वार्थी उमेदवार यांचे चित्र अण्णाभाऊंनी लोकनाट्यात रंगविलेले आहे.

ग्रामीण जीवनाच्या रीतीरीवाजा बरोबर, राजकीय जीवनातील एकमेकांवरची कुरघोडी, सत्ताधीशांकडून होणारी पिळवणूक, भ्रष्टाचाराचे थैमान, आश्वासनांची होणारी खैरात अशा विविध राजकीय प्रवृत्तींवर प्रकाश टाकलेला आहे.

अण्णाभाऊ मागासलेल्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळे त्यांना जातीभेदाचे, अस्पृश्यतेचे, वर्णभेदाचे चटके जाणवत होते. अशा प्रकारच्या विषमतेचे चित्रण त्यांनी लोकनाट्याच्या द्वारे केलेले आहे.

पोवाडा.

१९४२ पासून अण्णाभाऊंच्या शाहिरी लेखनाला प्रारंभ झालेला होता.’ लाल बावटा ‘ कलापथकाच्या माध्यमातून कम्युनिस्ट पार्टीचे कार्य करण्यासाठी त्यांनी शाहिरी वाङ्मयाची निर्मिती केली. शाहीर द.ना. गव्हाणकर, शाहीर अमर शेख यांना सोबत घेऊन शाहिरी पताका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली.

कामगारांचे प्रश्न, वेदना, अन्याय, दुःख, अमानुषपणे होणारी मजुरांची पिळवणूक त्यांनी पोवाड्यातून मांडली. तसेच सामाजिक परिस्थिती, ऐतिहासिक घटनांचे वीर पराक्रम सुद्धा त्यांनी पोवाड्यात मांडले आहेत.१९४२ ते १९४९ या काळात ते कम्युनिस्ट पार्टीच्या प्रसारासाठी झटत होते. वैचारिक प्रबोधन करणे हा एवढाच हेतू त्यांच्या पोवाड्याच्या लेखनातून दिसून येतो. त्यांनी एकूण १२ पोवाडे रचले.

पानिपत चा पोवाडा, नानकीन नगरापुढे, स्टालिनग्राडचा पोवाडा, बर्लिनच पोवाडा, बंगालची हाक, पंजाब दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा,अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्या बाजाराचा पोवाडा, स्पेनचा पोवाडा.

लावणी.

त्यांनी लोकनाट्याच्या कथानकातील विषयाला अनुसरून लावण्या लिहिलेल्या आहेत. लावणी मध्ये अलौकिक प्रतिभेचा थाट, सामाजिक विषमता, भांडवलशाही, कामगार वर्ग असे विषय गुंफलेले आहेत. ‘ सुगी ‘. ‘ मुंबईची लावणी ‘ आणि सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ‘ माझी मैना गावावर राहिली ‘ अशा मोजक्याच लावणीचे लेखन त्यांनी केलेले आहे.

अण्णाभाऊंनी नव्या आशियाची, शृंगाराला स्थान न देता सामाजिक प्रबोधन व्हावे या हेतूने लावणीची निर्मिती केली होती.
अण्णाभाऊ साठे यांनी लोकनाट्य सादरीकरणासाठी गण लिहिले. ‘ गण ‘ यामध्ये ईश्वराची आराधना, ईश स्तवन असते. अण्णाभाऊंनी या पारंपरिक संकेताला छेद देऊन चाल तीच ठेवून नव्या रूपाने, नव्या आशयाने ‘ गण ‘ लोकांसमोर आणला.
अण्णाभाऊ यांनी म्हणणी, पोवाडे, गण आणि लावली बरोबर काही स्पुट रचना केलेली दिसून येते.

या स्पुट रचनेच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी मराठी लोकगीतांच्या परंपरेला वेगळे वळण देऊन आपली आगळी वेगळी छाप दाखवून दिलेली आहे. या लोकगीतांची वैशिष्ट्ये नेहमीसारखी पारंपारिक वळणाची ठेवून आपल्या विचाराच्या धर्तीवर त्यांनी नव्याने मांडणी केलेली आहे.

एकजुटीचा नेता, महाराष्ट्र देशा आमच्या, उठला मराठी देश, तू मराठमोळा, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून, बोलत कड कपारी, पूर्वेला जाग आली, रवी आला लावुनी तुरा, शिवारी चला, भाग्याची माऊली, दुनियेची दौलत सारी, दिवा, लवादाचा ऐका, साताऱ्याची त-हा, जागरणाला या, चिनी जनांची मुक्ती, लेनिन शुभ नामाचे, भारताची पहिली दीपावली, शाहिरांनो, अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रसंगानुसार लोकनाट्य मध्ये सादर करता येणारी गीते त्यांनी अक्षरबद्ध केली.

इनामदार, पेंग्याचे लगीन, सुलतान या तीन नाटकांचेही अण्णाभाऊंनी लेखन केले आहे.अण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या कथा/कथासंग्रह.

अण्णाभाऊ साठे हे उत्कृष्ट कथाकार होते. त्यांनी जवळजवळ अडीचशे कथा लिहिल्या. अण्णाभाऊंच्या कथा हिंदी, मल्याळी, बंगाली, सिंधी या भारतीय भाषेत भाषांतरित झाल्या.

जर्मन ,झेक ,इंग्रजी, पोलीश, रशियन या परदेशी भाषेतही त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. अण्णाभाऊंनी आपल्या कथांमधून वर्णव्यवस्थेमुळे निर्माण होणारी अमानुषता लेखणीबध्द केलेली आहे.

अण्णाभाऊंच्या काळापर्यंत उपेक्षित समाजातील माणूस कथाकादंबऱ्यांमध्ये सांगकाम्या, घरगडी, सालगडी, नोकर किंवा टिंगलटवाळीचा विषय तसेच हिणकस दर्जाचा माणूस म्हणून चित्रण यायचे.

अण्णाभाऊंनी मात्र याच माणसाला कथेचा केंद्रबिंदू केले. कथेचा आशय त्याच्याभोवती फिरू लागला. समाजात उपेक्षित राहिलेल्या माणसांना पांढऱपेशा साहित्यिकांनी साहित्यातही उपेक्षित ठेवलेले होते.

अण्णाभाऊंनी ही कोंडी फोडली. गावकुसा बाहेरच्या माणसाला नायक बनवलं. स्त्रियांना नायिका बनवलं. ही अण्णाभाऊंच्या लेखन कौशल्याची आणि सामाजिक दृष्टिकोनाची खरी ताकद आहे.१९६० साली प्रकाशित झालेल्या ‘ बरबाद्या कंजारी ‘ या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ म्हणतात, ” माझी जीवनावर फार निष्ठा असून, मला माणसं फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे. ती जगतात व जगाला जगवतात.

त्यांच्या बळावर हे जग चालत. त्यांची झुंज आणि त्यांचे यश यावर माझा विश्वास आहे. त्यांना विद्रुप करणे मला आवडत नाही. नव्हे मला भीती वाटते….. माणसांना वैफल्याच्या नावाखाली विद्रुप करू नये, असं माझं मत आहे.

मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो.” अण्णाभाऊंच्या कथेतील सर्व पात्रे झोपडपट्टीतील, फुटपाथ- वरील तसेच सांगली सातारा परिसरातील माणसे आहेत. याच लोकांची दुःखे, त्यांच्या मुक- वेदना त्यांनी साहित्याच्या दरबारातून जनतेसमोर आणल्या आहेत.

गाजलेले कथासंग्रह.

खुलंवाडी, चिरागनची भूतं, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, पिसाळलेला माणूस, गजाआड, भानामती, नवती, बारबांध्या कंजारी, निखारा, लाडी, ठासलेल्या बंदुका, जिवंत काडतूस, केवड्याचे कणीस, गुऱ्हाळ, आबी, अमृत, डोळे, मरीआईचा गाडा, इत्यादी अण्णाभाऊंचे गाजलेले कथासंग्रह आहेत.

कादंबरीकार अण्णाभाऊ.

कल्पनेच्या जगात वावरणारी लेखक मंडळी, त्याकाळी केवळ मनोरंजनाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून, कादंबरीचे लेखन करीत होते.

‘ कलावादी जीवनवादी ‘ नावाच्या वादात वाचक वर्गाला गुंतवून ठेवत होते. अशा काळात दलित समाजाचे चित्रण, दलित समाजाच्या वेदना, दलित नायक, दलित नाईका, वर्णव्यवस्थेविरुद्धची चीड, विद्रोहाची आग, भांडवलशाहीला विरोध, अंधश्रद्धेला विरोध, ग्रामीण भागातील माणूस, मुंबईच्या फुटपाथ वर झोपणारा राबणारा माणूस, दारिद्र्याने गंजलेल्या आणि गलिच्छ झोपडपट्टीतला माणूस आपल्या लेखणीत उतरवून अण्णाभाऊंनी कादंबरीची निर्मिती केली.

त्यांची प्रत्येक कादंबरी ही मराठी साहित्य विश्वाला नवा विचार देणारी ठरते. त्यांनी वीस वर्षाच्या कादंबरी लेखनाच्या प्रवासात ३३ कादंबऱ्या लिहिल्या . अण्णाभाऊंची सर्वश्रेष्ठ कादंबरी ‘ फकीरा ‘ होय.

कादंबऱ्या.

चित्रा ,वारणेच्या खोऱ्यात ,फकीरा, वैर ,वैजयंता ,चंदन, धुंद, तारा ,रूपा, आवडी ,संघर्ष ,आग ,माकडीचा मळा कुरूप, पाझर ,लाडी, टिळा ,मूर्ती, रानगंगा अलगुज ,अहंकार ,गुलाम, फुलपाखरू ,मास्तर ,वारणेचा वाघ, रानबोका, सरनोबत, आघात, चिखलातील कमळ, ठासलेल्या बंदुका, मयुरा, रत्ना ,अग्निदिव्य.

अण्णाभाऊंनी आपल्या अल्प आयुष्यात विपुल आणि सरस कादंबऱ्यांचे लेखन केले.

अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट.

अण्णाभाऊंच्या एकूण सात कादंबऱ्यांवर सुप्रसिद्ध असे सात सामाजिक चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत.
फकीरा (१९६२) वैजयंता (१९६९) आवडी ( टिळा लावते रक्ताचा १९६९) माकडीचा माळ
(डोंगरची मैना १९६९), चिखलातील कमळ (मुरळी मल्हारी रायाची १९६९) वारणेचा वाघ (वारणेचा वाघ १९७०)
अलगुज (अशी ही साताऱ्याची त-हा १९७४)
पुरस्कार प्राप्त चित्रपट.
१) वैजयंता सर्टिफिकेट ऑफ मेरिट उत्कृष्ट चित्रपट १९६१-६२.
२) वारणेचा वाघ महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट मराठी चित्रपट १९७०-७१
३) अशी ही साताऱ्याची त-हा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट मराठी चित्रपट १९७३-७४.

समारोप.

शेवटी शेवटी एकटे पडलेल्या अण्णाभाऊंना शासनाने फ्लॅट आणि मासिक मानधन देऊ केले. अण्णाभाऊंचा आजार वाढला होता. त्यांना वाटेगावला आणले १८ जुलै १९६९ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या नावाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना पुरस्कार देण्यात येतो. ही योजना दि.१९ जुलै १९९७ पासून कार्यान्वित आहे.

Other Articles

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती 2025

Best Lokmanya Tilak Information in Marathi | लोकमान्य टिळक

Inspirational (Ahilyabai Holkar) 
Follow us on YouTube – Marathi Antarang

Leave a Comment