यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan). ( १२ मार्च १९१३ ते २५ नोव्हेंबर १९८४)
जन्म व बालपण.
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि एक राष्ट्रीय नेते.त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात बारा मार्च 1913 रोजी झाला. यशवंतरावांच्या वडिलांचे नाव बळवंतराव व आईचे नाव विठाबाई होते.

यशवंतरावांच्या जन्माच्या वेळी विठाबाई खूप आजारी होत्या. गावात डॉक्टर नव्हते, दवाखान्याची सोय नव्हती. अखेर तिच्या आईने (यशवंतरावांच्या आजीने) गावातील देव सागरोबाला साकडे घातले. अपत्याला जगवण्यात यश दे, तुझी आठवण म्हणून मुलाचे नाव यशवंत ठेवू. सागरोबाने गा-हाणे ऐकले! आजीनेही आपल्या बोलण्याप्रमाणे केले. मुलाचे नाव यशवंत ठेवले गेले. यशवंतराव (Yashwantrao Chavan) अवघ्या पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे प्लेगच्या साथीने निधन झाले (१९१८).
यशवंतरावांचे ४ थी पर्यंतचे शिक्षण देवराष्ट्रे येथेच झाले. बालपणी यशवंत चे लाड आजीने व मामा, दाजी घाडगे यांनी पुरविले. आपल्या ह्या मुलाने खूप शिकावे असे त्यांच्या आईला वाटत होते. म्हणून त्या शिक्षणासाठी कराडला सर्व कुटुंबासह आल्या. कराडला त्यांच्या शिक्षणाची सोय झाली. तेथेच त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी कराडमधील टिळक हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. यशवंतच्या बालमनावर आईने उत्तम संस्कार केले. तो आईबरोबर कराड येथील मारुती बुवांच्या मठात जात असे. मठात रामायण, महाभारत व पुराणकथा सांगितल्या जात. त्या कथा यशवंत मन लावून ऐकत. यशवंत ने लहानपणी आईसोबत अनेक मंदिरे पाहिली. तसेच पंढरपूरची पायी वारीही आईबरोबर केली. ज्ञानेश्वरीचे वाचनही यशवंत कडून त्यांच्या आई करून घेत असत.
शिक्षण.
शालेय वयात यशवंतला वाचनाची आवड निर्माण झाली. मुंबई पुण्यावरून येणारी विविध वृत्तपत्रे तो नियमित वाचत असे. याच वयात यशवंतला सभासंमेलनाला उपस्थित राहणे व नेत्यांची भाषणे ऐकणे यांचा छंद जडला.
शालेय शिक्षण घेत असतानाच यशवंत स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाला. तो वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊ लागला. मित्रांना एकत्र करून बैठका घेणे व सभा आयोजित करणे अशी कामे तो करू लागला. शाळेच्या आवारातील लिंबाच्या झाडावर तिरंगा ध्वज यशवंतने लावला. मुलांसह तेथे ध्वजवंदन केले. वंदे मातरम म्हटले. ही बातमी इंग्रज अधिकाऱ्यांना कळली. त्याने यशवंत वर खटला भरला. या खटल्यात यशवंतला १८ महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली. शिक्षेसाठी यशवंतला पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठवण्यात आले. तुरुंगात त्यांना हे.रा. महाजनी, आचार्य भागवत,
वि.प. भुस्कुटे अशा व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांच्यामुळे यशवंत ची वैचारिक प्रगती झपाट्याने झाली.
१९३१ साली पुणे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत यशवंत ने भाग घेतला होता. ‘ ग्राम सुधारणा ‘ हा वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता.न.चि. केळकर आणि श्री.म. माटे असे दोन दिग्गज परीक्षक होते. स्पर्धेसाठी १० मि. वेळ ठरलेला होता. यशवंत च्या प्रभावी वक्तृत्वाने व अभ्यासपूर्ण भाषणांनी दोघे परीक्षक आश्चर्यचकित झाले. त्यांनी आणखी दहा मिनिटे वाढवून यशवंत यास दिली. साहजिकच त्यांचा त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. वर्गात एकदा शेणोलीकर नावाच्या शिक्षकांनी सर्व मुलांना प्रश्न विचारला ” तुम्हाला प्रत्येकाला काय व्हायचे आहे! “
या प्रश्नाचे उत्तर त्यांनी एका कागदावर लिहावयास मुलांना सांगितले. वर्गातील मुलांनी प्रसिद्ध व्यक्तींची नावे लिहिली.
पण यशवंतने मी यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) होणार! असे उत्तर लिहिले. हायस्कूलमध्ये असतानाच त्यांना लेखनाची आवड निर्माण झाली होती. त्यांनी बाजी नावाची कथा लिहिली होती, ती प्रकाशित झाली. कराड येथील छत्रपती मेळ्याची गाणी यशवंतने लिहिली होती.
माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असताना ‘माझी जन्मठेप’हे सावरकरांचे पुस्तक त्यांनी वाचले. यशवंत वर या पुस्तकाचा फार मोठा प्रभाव पडला. सावरकरांचे स्वातंत्र्यप्रेम, देशाभिमान व क्रांतिकारी विचाराने यशवंत अधिकच प्रभावित झाला. त्यामुळे यशवंतने सावरकरांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. एका मित्राला सोबत घेऊन यशवंत कराडहून रत्नागिरीला पायी गेला. सावरकरांची भेट घेऊन त्यांच्याशी तेथे चर्चा केली.
मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशवंत १९३४ मध्ये पास झाला. उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी बी.ए. चे शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात त्यांना राजाराम कॉलेजमध्ये प्राचार्य बाळकृष्ण, प्रसिद्ध लेखक ना.सी. फडके व कवी माधव ज्युलियन यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यानंतर पुढील शिक्षणासाठी यशवंत पुण्याला आला. पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कायद्याचे शिक्षण घेऊन ते वकील झाले. आपल्या शिक्षणाचा लोकांना उपयोग व्हावा म्हणून त्यांनी कराडला एक वर्षभर वकिली केली. परंतु वकिलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या भावाला आपली पूर्वापार जमीन विकावी लागली होती.
यशवंतरावांचा विवाह.
२ जून १९४२ रोजी यशवंतरावांचा विवाह वेणूताई यांच्याशी झाला. वेणूताई या फलटण येथील मोरे घराण्यातील होत्या. या विवाह समारंभास सातारा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. स्वामी रामानंद भारती व अनेक व्यक्ती आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत्या. यशवंतराव (Yashwantrao Chavan) भूमिगत होते ते शरण यावेत म्हणून पोलिसांनी वेणूताईंना अटक केली. त्या तुरुंगात आजारी पडल्या. त्यांची प्रकृती खालावली. पुढेही त्याचा परिणाम कायम राहिला. त्यांना एक मूल झाले पण ते मृत जन्मले होते. डॉक्टरांनी त्यानंतर यशवंतरावांना सांगितले की, यानंतर तुम्हाला मुल हवे असेल तर वेणूताईंच्या प्रकृतीला धोका आहे.
यशवंतरावांनी वेणूताईंवर मनापासून प्रेम केले. वेनूताईंनीही त्यांना उत्तम साथ दिली.
वेणूताईंनी आपल्या दिराच्या मुलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ केला. सासूची सेवा व घरी आलेल्यांचा पाहुणचार त्या आनंदाने करीत. आपल्या आजाराचा ताण यशवंतरावांवर पडू नये यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
स्वातंत्र्याचा लढा.
१९४२ मध्ये ‘ चलेजाव ‘चळवळ जोरात सुरू होती. सर्व देशभक्त पुढार्यांना तुरुंगात टाकण्याचे धोरण इंग्रज सरकारने आखले होते. त्यामुळे अनेक राजकीय पुढारी भूमिगत होऊन चळवळ पुढे चालवत होते.१९४२ मध्ये कराड, वडूज, पाटण, वाळवे व तासगाव या ठिकाणच्या कचेऱ्यांवर मोर्चे काढण्यात आले. हे मोर्चे संघटित करण्यामध्ये व यशस्वी करण्यामध्ये यशवंतरावांचे योगदान मोठे होते. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीचे ‘ नेते ‘ म्हणून त्यांना पकडण्याचा पोलिसांनी निश्चय केला होता. त्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीसही ठेवले होते.
याच दरम्यान वेणूताई आजारी पडल्या. त्यांची प्रकृती अधिकच खालावली .त्यामुळे आजारी असलेल्या वेणूताईंना भेटण्यासाठी यशवंतराव (Yashwantrao Chavan) फलटणला आले. तेव्हा कोणीतरी फितुरी केली. इंग्रजांना याबद्दल माहिती दिली. त्यामुळे यशवंतरावांना पुन्हा अटक झाली. त्यांना दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली.
राजकारणातून राज्यकारभाराकडे.
१९४५ साली तुरुंगातून सुटल्यावर, यशवंतरावांनी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न केले.१९४६ च्या निवडणुकीत यशवंतराव (Yashwantrao Chavan) विजयी झाले. बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळात गृह खात्याच्या उपमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.१९४७ साली देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेसची बाजू सांभाळण्याचे काम यशवंतरावांनी केले. काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केले.१९५० साली नाशिक येथे काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. त्याचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. अधिवेशनाच्या आयोजनात यशवंतरावांचा मोठा वाटा होता.१९५२ साली स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत यशवंतरावांनी संपूर्ण मुंबई राज्याचा दौरा केला. काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला व काँग्रेसला यशवंतरावांनी यश मिळवून दिले. ते स्वतः कराड मतदार संघातून निवडून आले. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात त्यांना नागरी पुरवठा, समाज कल्याण खाते मिळाले.१ नोव्हेंबर १९५६ रोजी विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतरावांना मिळाला.
१९६० मध्ये मुंबई सह महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली. १ मे १९६० रोजी नवीन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतरावांना मिळाला.
१९६२ साली भारतावर अचानक चिनने आक्रमण केले. तेव्हा नेहरूंनी यशवंतरावांना दिल्लीला बोलावून घेतले.२१ नोव्हेंबर १९६२ रोजी त्यांनी संरक्षण मंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यशवंतरावांनी संरक्षण दलाची पुनर्रचना केली. इतर राष्ट्रांकडून आधुनिक शस्त्रास्त्रे मिळविण्याचा प्रयत्न केला. लष्करातील हवाई दल, पायदल व नाविक दल या तीनही दलात एकसूत्रीपणा आणला. लष्करामध्ये नवचैतन्य व आत्मविश्वास निर्माण केला.
नोव्हेंबर १९६६ मध्ये यशवंतराव (Yashwantrao Chavan) भारताचे गृहमंत्री झाले.१९६७ साली सार्वजनिक निवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेसला केंद्रात निसटते बहुमत मिळाले. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. यशवंतराव (Yashwantrao Chavan) पुन्हा गृहमंत्री झाले. जून १९७० मध्ये यशवंतरावांकडे अर्थ खाते देण्यात आले. या काळात बांगलादेशाचे युद्ध व दुष्काळ यामुळे देशाचे आर्थिक स्थिती खालावली होती. ती सावरण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, नियोजन बाह्य खर्च कमी करणे, चलनवाढीला आळा घालणे व उत्पादन वाढीला प्रोत्साहन देणे अशा गोष्टींना महत्त्व देऊन कारभार केला.
१९७१ मध्ये इंदिरा गांधींनी मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. त्यामध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली ४३ जागा मिळाल्या.१९७४ मध्ये यशवंतरावांकडे परराष्ट्र खाते दिले गेले. परराष्ट्र मंत्री पदाच्या काळात त्यांनी अनेक देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले.
२६ जून१९७६ रोजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्यासह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. यशवंतराव (Yashwantrao Chavan) मात्र सातारा मतदारसंघातून निवडून आले. केंद्रात जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. काँग्रेस हा विरोधी पक्ष ठरला. काँग्रेस पक्षाचे संसदेत यशवंतरावांनी नेतृत्व केले. त्यांची विरोधी पक्षनेते पदावर निवड झाली.
याच काळात इंदिरा गांधींनी वेगळा पक्ष स्थापन केला. इंदिरा काँग्रेसची स्थापना केली. यशवंतराव मूळ काँग्रेसमध्येच राहिले. जनता पक्ष दोन वर्षे सत्तेत राहिला. परंतु पक्षांतर्गत मतभेदामुळे जनता पक्ष फुटला व त्यामुळे अल्पमतातील सरकार पडले गेले.
याच वेळी चौधरी चरण सिंग यांनी पुढाकार घेऊन सरकार बनवले. यशवंतरावांनी त्या सरकारला मदत केली. चरणसिंग पंतप्रधान तर यशवंतराव उपपंतप्रधान झाले. पण हे सरकार थोडे दिवस टिकले.
अखेरचे पर्व.
१९८० च्या निवडणुका इंदिरा गांधींनी अत्यंत धाडसाने लढविल्या. काँग्रेस पक्ष सत्तेत आला. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. यशवंतराव मूळ काँग्रेसमध्ये होते. ते सातारा मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु ते सत्तेपासून दूर राहिले.१९८२ साली यशवंतरावांची अर्थ आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव व अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळल्यामुळे आलेल्या अनुभवांचा उपयोग त्यांनी अर्थ आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना केला. १ जून १९८३ रोजी वेणूताईंचे निधन झाले. त्यामुळे यशवंतराव (Yashwantrao Chavan) एकाकी पडले.२५
नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांचे दिल्लीत निधन झाले.
यशवंतरावांचे साहित्य.
आपले नवी मुंबई राज्य. (१९५७), ऋणानुबंध (ललित लेख) १९७५, कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ ला खंड) १९८४.
भूमिका १९७९, विदेश दर्शन,
सह्याद्रीचे वारे ( १९६२) भाषण संग्रह, सामर्थ्य शब्दांचे. यशवंतरावांच्या लेखनाविषयी प्रसिद्ध कादंबरीकार ना.सी. फडके यांनी म्हटले आहे, ” भावनेने ओथंबलेलं व भाषा सौंदर्याने नटलेले लेखन जी लेखणी करू शकते ती साधीसुधी लेखणी नाही. श्रेष्ठ दर्जाच्या अस्सल साहित्यिकाच्या हातात शोभावी अशीच आहे. “
महाराष्ट्राच्या विकासाचे कार्य.
यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी पक्ष संघटने कडे जातीने लक्ष दिले. पक्षामध्ये सुसूत्रता आणली. तरुणांना संधी देऊन काँग्रेस पक्ष पुन्हा संघटित केला. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या. त्यांनी बहुजन वर्गातील मुलांच्या मोफत शिक्षणाची सोय केली. उच्च शिक्षणासाठी मराठवाडा विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ सुरू केले. सातारा येथे सैनिक शाळा सुरू केली. आदिवासी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.
१८ सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात सुरू केले. कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचा त्यांच्या काळात प्रारंभ झाला. ‘ कसेल त्याची जमीन ‘ असा कायदा केला व कष्टकरी शेतकऱ्यांना दिलासा दिला
लोकशाहीचे विकेंद्रीकरण केले. ग्रामीण भागाच्या विकासातून राज्याचे व देशाची प्रगती होईल यावर त्यांचा ठाम विश्वास होता. यासाठी त्यांनी ‘पंचायत राज्य ‘योजना सुरू केली.
नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. त्याच्या अध्यक्षस्थानी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची निवड केली. मराठी भाषेत विश्वकोश निर्माण करण्यासाठी विश्वकोश मंडळाची स्थापना केली.
यशवंतरावांनी मागासवर्गीय समाजाच्या उद्धारासाठी नव बौद्धांना सवलती देणे व महार वतन नष्ट करणे अशी अनेक कामे केली.
रॉय यांची विचारसरणी व महात्मा गांधींची आंदोलने यांच्याकडे यशवंतराव आकर्षित झाले, तरी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आचार विचारांचा त्यांच्यावर खोल ठसा उमटला होता. नेहरूंनप्रमाणे डावीकडे झुकलेले मध्यम मार्ग नेता, असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांच्या शासकीय तसेच प्रशासकीय कौशल्याचा व लोक नेतृत्वाचा उदय द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आले, तेव्हा आला. त्यांनी अल्पसंख्यांक बिगर मराठी समाजाचा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास आपल्या कर्तबगारिने, कार्यक्षम कारभाराने संपादन केला.
कार्यक्षम मंत्री, यशस्वी संसद पटू आणि जनसामान्यात ज्याची मुळे रुजली असा उदारमतवादी नेता असे यशवंतरावांचे थोडक्यात वर्णन करता येईल.
Read Other Articles