What is Mahashivratri in Marathi

महाशिवरात्री.
हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण शिवपार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो. या प्रसंगी शिव त्यांचे दैवी तांडव नृत्य करतात. या दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. भाविक रात्रभर जागरण करतात. या सणाची उत्पत्ती पाचव्या शतकात झाली असे मानले जाते.
प्राचीनता आणि महत्व.
संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.


पूजा पद्धती.
महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. दूध, दही, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे.
उपवास.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात. प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात. खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात. शिवरात्रीच्या रात्री काही भागात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतही आहे. याला थंडाई असे म्हणतात.
अख्यायिका.
एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत होता. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाचे पाने त्याच्या नकळत शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोच हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो.
त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तेथे आले आणि सगळेच जण म्हणू लागले, ” मला मार पण इतरांना सोडून दे ” हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला.
त्या हरणांचे बोलणे ऐकून त्या शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने धनुष्यबाण फेकून दिला. तो त्यांच्या पाया पडून म्हणाला. आज तुमच्यामुळे मी धन्य झालो. पापमुक्त झालो. असे तो शिकारी म्हणत असतानाच कैलासाहून दिव्य विमान तेथे आले. स्वर्गातून देवगन पुष्पवृष्टी करीत होते.
त्याच क्षणी त्या शिकार्याला व हरणांना दिव्य देह प्राप्त झाला. शिव गणांनी त्या सर्वांना विमानातून शिवलोकात नेले. त्या व्याधाला शिवपद प्राप्त झाले. आजही आकाशात त्या व्याधाचा तारा आपल्याला पहावयास मिळतो. महाशिवरात्री मानवाला शिव बनण्याची प्रेरणा देते. शिव बनून शिवाची उपासना केली पाहिजे याची शिकवण देते. मनुष्याने मनात आणले तर एकाच रात्रीत मानव शिवत्व प्राप्त करू शकतो हे आश्वासन महाशिवरात्री देते. यावर्षी महाशिवरात्र फेब्रुवारी महिन्यात २६-२-२०२५ रोजी आहे.