वक्तृत्व (vaktrutva) एक प्रयत्नसाध्य कला.शालेय विद्यार्थ्यांसाठी.

मनोगत

वक्तृत्व (vaktrutva)- सध्याच्या गुंतागुंतीच्या जीवनात समर्थपणे आणि यशस्वीपणे जगण्यासाठी अंगी वक्तृत्वकला असणे आवश्यक आहे. वक्तृत्वाच्या जोरावर आपण आपल्या भावना इतरांना सांगू शकतो, विचार पटवून देऊ शकतो. वक्तृत्वकलेमुळे माणसाचे व्यक्तिमत्व आकर्षक बनते.

चांगले लिहावे कसे, चांगले वाचावे कसे याचबरोबर चांगले बोलावे कसे हेही विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वक्तृत्व कला ही प्रयत्न साध्य कला आहे. मनातले विचार मुद्देसूदपणे शब्दात मांडण्याची ही कला विद्यार्थ्यांना एखाद्या अक्षय शिदोरीसारखी आयुष्यभर पुरणारी आहे. ‌ याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावयास पाहिजे.

उत्कृष्ट वक्त्याला काही गुण जरी जन्मतःच लाभले असले, तरी इतरांना या प्रांतात काहीच वाव नाही हे समजणे चूक आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे वक्तृत्व कला ही प्रयत्न साध्य कला आहे. आपली छाप इतरांवर पाडण्यासाठी माणसाजवळ असलेला हुकमी एक्का म्हणजे वक्तृत्व होय. माणसाच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वात फार मोठा वाटा संभाषण चातुर्याचा म्हणजे वक्तृत्वाचा असतो.

वक्तृत्वासाठी (vaktrutva) आवश्यक गुण.

१) वाचन.

चौफेर वाचन हा उत्तम अभ्यासू वक्ता होण्यासाठी आवश्यक गुण आहे. उत्तम वक्ता होण्यासाठी, वक्तृत्व कला आत्मसात करण्यासाठी संभाषण, भाषण, श्रवण व वाचन ही मूलभूत कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असते. सततच्या वाचनामुळे तुमचे ज्ञान काळाच्या प्रवाहात टिकून राहते.

तुमची शब्द संपत्ती व भाषा समृद्ध होते. नवे विचार तुम्हाला कळतात. अर्थात वाचन, चौफेर असावं. इतिहास, संस्कृती, राजकारण, समाजकारण, विज्ञान, शिक्षण, विविध कला असा कोणताही विषय खऱ्या वाचकाला वर्ज्य नसावा. याचाच अर्थ असा की, चांगला वक्ता होण्यासाठी चौफेर वाचन आवश्यक असते.

वाचन हा वक्तृत्व कलेचा पाया आहे. मुलांना वाचनाची गोडी लागली पाहिजे. शिक्षकांनी त्यांना मधून मधून मोठ्याने वाचनाची संधी दिली पाहिजे. वाचनात मूक वाचन आणि प्रकट वाचन अशी प्रमुख अंगे असतात. विचाराने अनेक गोष्टी साधता येतात. नवीन ज्ञान मिळवता येते. वाचनाने अनेक गोष्टी साधता येतात.

नवीन ज्ञान मिळवता येते. विचारशक्तीला चालना मिळते. बुद्धीला धार येते आणि नाविन्याची गोडी लागते. बाह्य जगाचा कानोसा व मागोवा घेण्यासाठी आपल्याला ग्रंथांचा उपयोग होतो. मुलांनी काय वाचावे हे शिक्षकांनी त्यांना सांगावे. तसेच कसे वाचावे याचे ज्ञानही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावे. मुलांना उच्चार, भाषा- शुद्धता, आवाज याबद्दल त्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करावे.

भाषा प्रभुत्व :

चांगला वक्ता होण्यासाठी आपले वक्तृत्व प्रभावी ठरण्यासाठी वक्त्याचे भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.
चांगला वक्ता होण्यासाठी किमान मातृभाषेशिवाय हिंदी व इंग्रजी या दोन भाषा सुद्धा शिकल्या पाहिजेत. खरे तर बहुभाषिकत्व हा वक्तृत्व- शैलीसाठी आवश्यक गुण आहे हे लक्षात येते.

भाषण करीत असताना त्या विषयासंबंधी हिंदी, इंग्रजी, संस्कृत भाषेतील सुभाषिते, काही वाक्ये व विचार ओघाने सांगितले तर ते भाषण अधिक प्रभावी होत असते.

दुर्गाबाई भागवत, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी यांना दहा-बारा भाषा येत होत्या. भूदान चळवळीत विनोबा भावे भारतभर फिरले होते. ते ज्या ज्या भागात गेले, त्या त्या भागातील जनतेच्या भाषेत भाषण करून श्रोत्यांची मने जिंकून घेत असत.

२) लेखन.

चांगले बोलण्यासाठी चांगले लिहिता आले पाहिजे. तयारी न करता बेधडक भाषण ठोकायला स्टेजवर जाणे हास्यास्पद व धोकादायक असते. सिद्धहस्त वक्त्याशिवाय इतरांना ते अशक्य आहे. भाषणाचे टाचण, टिपण तयार करणे, मुद्देसूद विचार मांडणे, प्रारंभ, मध्य व समारोप यांचा सांगोपांग विचार करणे, भाषण करणाऱ्याला जरुरीचे असते.

पूर्वतयारीमुळे भाषणातला फाफटपसारा टाळता येतो. नेमके विचार मांडणे आणि सांगणे ही गोष्ट लेखनाने साधते.
लेखनाने कल्पकतेला वाव मिळतो. भावना प्रभावीपणे व्यक्त करण्याची हातोटी साधता येते.

वक्त्याचा आत्मविश्वास वाढतो. भाषण करताना अजिबात भीती वाटत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून साध्या सोप्या भाषेत अनेक निबंध लिहून घ्यावेत. वक्तृत्वाला लेखनाची जोड हवीच. लेखन केव्हा भाषण यात प्रारंभ, मध्य आणि समारोप या त्रिसूत्रींच्या आकर्षकतेला असाधारण महत्त्व आहे. प्रारंभ श्रोत्यांचे मन वेधून घेतो, मध्य त्यांच्या मनातल्या गाभ्यात प्रवेश करतो तर समारोप आपला कायमचा ठसा श्रोत्यांच्या मनावर उमटवतो.

३) पाठांतर

पाठांतराने आत्मविश्वास तर वाढतोच शिवाय स्मरणशक्तीही तीव्र बनत जाते. उत्तम भाषणाची गमके म्हणजे चांगले विचार, सुभाषिते, काव्यपंक्ती, उदाहरणे यांची वेचक व बेमालून केलेली पाखरण. पाठांतराचे अनेक फायदे असतात. भाषण कलेसाठी एकाग्रता, समय सूचकता, निर्भयता, आवेश, अस्सलित व गोड वाणी इत्यादी अनेक गुणांची आवश्यकता असते. पाठांतराने हे गुण वाढीस लागण्यास आपोआप मदत होते. समजून उमजून पाठांतर करणे अगत्याचे आहे.

त्यामुळे ज्ञान भंडारात मोलाची भर पडते, हे वेगळेच. मुलांकडून नियमितपणे, योजनापूर्वक पाठांतर करून घ्यावे. वेळ मारून नेण्यासाठी आणि श्रोत्यांवर आपल्या विद्वत्तेची छाप पाडण्यासाठीही पाठांतराचा उपयोग होतो. पाठांतरामुळे वाणीला धार येते

अन् भाषण आवेशपूर्ण व जोरदार होते, पाठांतरामध्ये चांगल्या वक्त्यांच्या गाजलेल्या भाषणातील काही उताऱ्यांचाही समावेश करावा.

४) ज्ञान.

श्रोत्यांनी एका कानाने ऐकूण दुसऱ्या कानाने भाषण सोडून देऊ नये, असे जर बोलणाऱ्याला खरोखर वाटत असेल तर त्याने आपल्या विषयाचे सखोल ज्ञान घेऊन व्यासपीठावर उभे राहावे. ज्ञानाचे कण गोळा करण्यासाठी तर श्रोते जमा होतात.

क्लिष्टता, बोजडपणा, दुर्बोधता, या गोष्टी चांगल्या भाषणास तारक न ठरता मारक ठरतात. आपल्या ज्ञानाचे वाक्या वाक्यातून प्रदर्शन करण्याचा मोह वक्त्याने टाळाला पाहिजे. साध्या विषयात श्रोत्यांना मोठा आशय देता आला पाहिजे.

५) भाषा

बोलणाऱ्याची भाषा शुद्ध असावी, स्पष्ट असावी. साधी, सरळ सोपी, सहज सुंदर भाषा वक्ता आणि श्रोता यामध्ये सुसंवाद राखते. भाषा रटाळ नसावी. या उलट ती रसाळ असावी. सूत्रमय भाषेत सांगता येणे म्हणजे 100% यशाची हमी असते. भाषेमध्ये मार्मिक कोटी असावी, गुदगुल्या करणारी मिश्किल विनोद बुद्धी दिसावी. तसेच भाषा अकृत्रिम असावी. नम्रता, कळकळ, आस्था शब्दाशब्दांमध्ये जाणवावी. भाषा ही मुलांना अनुभवातून शिकवली जाते.

६) अभिनय

भाषणातला आवेश चेहऱ्यावर दिसला पाहिजे. तुम्ही कसे उभे राहता, कसे बघता, हातवारे कसे करतात याला फार महत्त्व आहे. भाषणात हाव- भावांना फार महत्त्व असते. मात्र अति सर्वत्र वर्जयते याप्रमाणे येथेही अभिनयाचा अतिरेक टाळावा. नाहीतर वक्ता इतरांच्या टिंगलीचा विषय बनेल.

७) श्रवण

वक्त्याने बहुश्रुत असणे अगत्याचे असते. उत्तम वक्ता हा उत्तम श्रोता असावा लागतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे प्रत्येक वक्त्याची बोलण्याची धाटणी वेगळी, शैली वेगळी आणि पद्धतही वेगळी. उत्तमोत्तम भाषणे ऐकल्याने अनेक गोष्टी साधतात. वक्त्याच्या यशाचे गमक म्हणजे इतरांचे ऐकणे, बोलू देणे, त्यांच्या मतांचा आदर करता येणे, मित्रांमध्ये जे जे नवीन, अनुकरणीय आहे ते या श्रवणातून घेता येते. आपल्यातील उणिवांची अशावेळी जाणीव होते.

८) कथाकथन

गोष्ट सांगणे ही एक हातोटी आहे. मुलांना गोष्ट ऐकणे फार आवडते. गोष्ट ऐकण्याच्या नादात मुले तहानभूक विसरतात. एकाग्रतेने ती गोष्ट ऐकतात. कारण लहानपणी आपणाला आपल्या घरातील आजी, आजोबा, आई यांनी अनेक गोष्टी आपल्याला ऐकवलेल्या असतात. समय- सूचकता, चाणक्षपणा, मुद्देसूदपणा हे गुण गोष्टीतून कळतात. वायफळ, वर्णन पर गोष्ट जशी नसावी तसे भाषणही आटोपशील असावे हे मुलांना कळू लागते.

इतर काही महत्त्वाचे मुद्दे.

वक्तृत्व कला

भाषेच्या जन्माबरोबर वक्तृत्व कला जन्माला आली असावी. भाषा जन्माला आल्यावर माणसे बोलू लागली. भाषेद्वारे आपल्या भावना व्यक्त करू लागली. प्राचीन वक्तृत्व- कलेचा शोध घेत असताना सिसेरो या प्राचीन रोमन वक्त्याने इ.स. पूर्व ८६ मध्ये
हिस्टॉरिका ‘ नावाच्या वक्तृत्व शास्त्रावरील ग्रंथात प्रभावी वक्तृत्वासाठी पाच पायऱ्या प्रतिपादन केल्या आहेत.

१) प्रथम आपणास कोणत्या विषयावर बोलावयाचे हे जाणून घ्यावे.
२) नंतर त्या विषयावर काय व कसे बोलायचे? हे निश्चित करावे.
३) त्यानंतर आपल्या वक्तृत्व शैलीचा विचार करावयाचा.
४) शैली व विषय निश्चित झाल्यावर आकर्षक प्रभावी व अर्थपूर्ण शब्दरचनेसह नियोजित भाषण पक्के करावे.
५) आपले भाषण, विषय, नियोजन शैली निश्चित झाल्यावर प्रत्यक्ष व्यासपीठावर भाषण करावे असे भाषण प्रभावी ठरते. त्याचा श्रोत्यांच्या मनावर दीर्घकाळ प्रभाव जाणवतो.
स्वामी विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले, सरोजिनी नायडू, म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, प्र.के. अत्रे, पु.ल. देशपांडे, अटल बिहारी वाजपेयी, शिवाजीराव भोसले हे उत्तुंग वक्तृत्व शैली असलेले राजकारणी व महान विचारवंत होते.

व्यासपीठावरील भाषणाचे तंत्र व कौशल्य.

१) आपले भाषण प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी वक्त्याने नेहमी आपण जो विषय दिलेला असेल त्याची अभ्यासपूर्ण तयारी करून बोलावयास पाहिजे.
२)स्वतःचे भाषण टेप करून ते परत ऐका. तुमच्यातील कमतरतांचे निरीक्षण करा. ती भाषणाची टेप तुमच्याजवळ नातेवाईकांना व मित्रांना ऐकवा आणि त्यांची मते व सूचना विचारा.
३)जेव्हा तुमच्याजवळ काही सांगण्यासारखे असते ते ठाम- पणे व योग्य पुराव्यांसह सांगा.
४)भाषणकर्त्याचा आवाज सुस्पष्ट व कणखर असला पाहिजे.
५)भाषणकर्त्याच्या आवाजात एकसुरीपणा असेल तर तो त्याने घालवावयास पाहिजे.
६)भाषण कर्त्यानी भरभर न बोलता आपल्या बोलण्याचा वेग प्रत्येक मिनिट १२० ते १८० शब्दांपर्यंत ठेवावा.
७)सावकाश बोलणे सुस्पष्ट असते. ते ऐकणाऱ्या श्रोत्यांनाही समजते.
८) बोलताना शब्दांवर होणारे आघात योग्य प्रकारे झाले पाहिजेत.
९)योग्य शब्दांची निवड करून भाषेवर प्रभुत्व निर्माण करा.
१०)भाषण करताना नीट शब्दोच्चार, योग्य शारीरिक हालचाली, आत्मविश्वास हा भाषण कर्त्याजवळ असावयास हवा.

वाचनाचे महत्त्व.

माणसाच्या जीवनात जसे भाषेला महत्त्व आहे. संदेश वाहनाचे भाषा हे उत्तम साधन आहे. त्याच भाषेत लिहिलेले वाचता आले तर ज्ञानग्रहणात माणसाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. भाषा शिकणे हा जसा माणसाच्या प्रगतीचा पहिला टप्पा आहे तसेच लिहिता व वाचता येणे हा माणसाच्या प्रगतीचा दुसरा टप्पा आहे.
१) वाचन ही ज्ञानाच्या कुलपाची चावी आहे.
२) वाचनामुळे माणसाला सर्व विषयांचे ज्ञान होते.
३) वाचनामुळे अनेक संधी चालून येतात.
४) वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
५) वाचनामुळे सत्य -असत्याची जाण येते.
६) रोजच्या वर्तमानपत्रांच्या वाचनाने जगातील घडामोडी समजतात.

देहबोली.

देहबोली म्हणजे अंगिक हालचालींतून संदेश जाणणे म्हणजे आपले व्यक्तिमत्व अधिक विकसित करणे.
देहबोली म्हणजे अंगीक हालचाली जाणण्यासाठी.
१) प्रथम नेत्रेंद्रिय सक्षम असणे आवश्यक आहे.
२) समोरची व्यक्ती अंगीक हालचालीतून संदेश देत असेल तर प्रकाश असणे आवश्यक आहे. अंधारात अंगिक हालचाली कशा दिसणार?
३) कार्यालय, बाजारपेठा, समूह आधी ठिकाणी जमणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण करीत राहणे.
४) डोळे, ओठ, खांदे, हात , हातांची बोटे, पाय, कंबर या अवयवांच्या सहाय्याने व्यक्तीत कसा संवाद साधला जातो. व्यक्तिपरत्वे त्यात भिन्नत्व जाणवते.

भाषण करताना हे टाळावे.

१) हास्यास्पद लकबी.
२) पुनरावृत्ती
३) स्पष्टवक्तेपणा
४) संदिग्धता
५) भाषेची क्लिष्टता.

वक्त्याने लक्षात ठेवायच्या गोष्टी.

१) विषयाची अचूक निवड.
२) नेमके विचार, मोजके शब्द, आकर्षक मांडणी.
३)ओघवती, रसाळ, सहज सुंदर भाषा वापरावी.
४) आवाजातील अपेक्षित चढ-उतार.
५) आत्मविश्वासाने बोलणे.
६) वेळेचे भान ठेवणे.
७) शब्दांवर अधिक भर न देता विचारांकडे अधिक लक्ष द्यावे.
८) विषयाला अनुसरून पूरक, पोषक मुद्दे मांडावेत.

वक्त्यांच्या वाईट खोडी.

१) अं अं करणे. बऱ्याच जणांना बोलताना अं अं करायची सवय असते. त्याचं कारण बोलायला आठवत नाही, भाषण तोंडात बसलेले नसतं. यासाठी तयारीचे सर्व उपाय अमलात आणावेत. भाषणाची तयारी करून घेणाऱ्यांनी यात लक्ष घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
२) आठवत नाही म्हणून बोलायचे थांबणे.
भाषण आठवत नाही म्हणून थांबणे आणि आठवायचा प्रयत्न करणे याचेही कारण भाषणाची मांडणी न करणे हे आहे. त्यासाठी दिलेल्या सूचना अमलात आणाव्यात.
३) चूक झाल्याचे कळू देणे.
भाषण करताना बऱ्याच वेळा चुकतं आणि चुकलं म्हणून पुन्हा बोलतात. त्यासाठी सभाधीटपणाने भाषण पुढे न्यावे.
४) खोकला, शिंक आल्यावर नाराज होणे.
५)खाकरणे. बोलताना खाकरणे ही एक वाईट खोड आहे.
६) दाढेत काही धरून ठेवून अथवा चघळत बोलणे.
७) श्रोत्यांकडे न बघता तिसरीकडे बघत व खाली वरती बघत बोलणे.
८) बोलताना चाळे करणे. बोटे मोडणे, मान झटकणे अशा चाळ्यांमुळे वक्त्याचे दुर्लक्ष होते, व श्रोत्यांच्याय लक्षात आल्यावर हसे होते.
९) तोच तो शब्द पुन्हा पुन्हा उच्चारणे.
१०) नाटकी हावभाव व आक्रस्ताळेपणा.
नाटक व वक्तृत्व, अभिनय आणि अभिनिवेश या भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे नाटकी अविर्भावामुळे वक्तृत्व हे वक्तृत्व न राहता, नाट्यछटा किंवा नाट्य प्रयोग ठरते.
११) पोपटपंची व एकसुरीपणा.
१२) पायांचा व इतर अवयवांचा वापर. बोलताना हात वापरले जातात, पण त्याचबरोबर वाकणे, उड्या मारणे वगैरे केले तर वक्तृत्वाचे नाटक होऊन हशा होईल तेव्हा हे टाळावे.
१३) शब्दबंबाळ भाषणे करणे
विनाकारण मोठमोठाले शब्द वापरणे किंवा नाटकातल्या- सारखे संवाद तयार करणे किंवा ट ला ट जोडून मुद्दाम अनुप्रास किंवा यमक निर्माण करण्याचा सोस, यामुळे भाषण शब्दबंबाळ होते.

Other Articles-

Savitribai Phule Nibandh in Marathi | स्त्री शिक्षणाची जननी

Leave a Comment