Dr Sarvepalli Radhakrishnan information in Marathi ५ सप्टेंबर शिक्षक दिन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन असामान्य शिक्षक म्हणून देशाला व परदेशात विख्यात होते. त्यांचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिन भारतातील शाळांतून शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ५ सप्टेंबर १९६२ पासून ठरविले.
त्यादिवशी शाळांतून शिक्षकांचा सत्कार करावा अशी प्रथा सुरू केली व ती आजतागायत सुरू आहे. शिक्षकांचा आदर व सन्मान केला पाहिजे हा शिक्षक दिनाचा हेतू आहे. भारतात शिक्षक दिनाचे पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गुणवंत शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयीन शिक्षक यांना हे पुरस्कार प्रदान केले जातात.
डॉ. राधाकृष्णन प्रकांड पंडित व साधी राहणी व उच्च विचारसरणी, आचरणात आणणारे थोर विचारवंत होते. ज्ञानाने भरलेले समोरच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडणारे, अमोघ वक्तृत्व त्यांच्यापाशी होते. जगातल्या नामवंत वक्त्यांत डॉ. राधाकृष्णन
यांची गणना होते.
” समाजातील शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पारंपारिक ज्ञानाचे आणि तांत्रिक कौशल्याचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करण्याच्या प्रक्रियेतील तो मुख्य आधार आहे. तोच संस्कृतीचा नंदादीप प्रज्वलित ठेवतो. तो फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो असे नाही, तर तो राष्ट्राचे भवितव्य घडवतो. समाजातील आपली जबाबदारी शिक्षकांनी ओळखली पाहिजे.”
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.
डॉ. राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांचे लहानपण व शिक्षण
त्यांचा जन्म तिरुतानी या एका लहानशा खेडेगावात ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. हे गाव तिरुपती क्षेत्राजवळ आहे.
ते ज्या घरात जन्मले ते सुसंस्कृत व प्रकांड पंडितांचे होते. डॉ. राधाकृष्णन ज्या कुटुंबात जन्मले ते गरीब व सामान्य मध्यमवर्गीय होते. पण ते धार्मिक आचार विचाराने संपन्न होते. त्या कुटुंबाची देवावर व धर्मावर गाढ श्रद्धा होती. त्या घरात सतत देवाचे नामस्मरण, पूजापाठ, संस्कृत श्लोकांचे पठन चाले.
त्यांच्या जन्म गावापासून जवळच तिरुपतीला शाळा होती. या शाळेत राधाकृष्णन यांचे नाव घालण्यात आले. अशा रीतीने त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाली. आपल्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे ते शिक्षकांचे लाडके झाले. लहानपणापासूनच त्यांना वाचन, लेखन, मनन व चिंतन यांची आवड होती व त्यातच ते मग्न असायचे. बालाजीच्या मंदिरात चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना राधाकृष्णन आवर्जून उपस्थित असायचे.
त्यानंतर त्यांनी लुथरन मिशनरी माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. या शाळा मिशनरी चालवत. अशा शाळांमधून हिंदू धर्मावर टीका केली जात होती. त्यामुळेच राधाकृष्णन अधिक अंतर्मुख झाले, चिंतनशील झाले. याच काळात त्यांनी भगवदगीतेचा सखोल अभ्यास केला व इतर धर्मग्रंथांचाही. इंग्रजी व संस्कृत भाषांत विशेष प्राविण्य मिळवून वयाच्या पंधराव्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले.
(Dr Sarvepalli Radhakrishnan) कॉलेज शिक्षण.
व्हुरिस कॉलेजमध्ये अर्न व्हाईल यू लर्न सवलत असल्याने तेथे उच्च शिक्षणासाठी गेले. तीन वर्षाचा काळ तेथे काम करून पैसे मिळवून शिकण्यात घालवला. एक हुशार, मेहनती व कष्टाळू विद्यार्थी म्हणून तेथे प्रसिद्ध झाले.
पदवीच्या शेवटच्या वर्षी त्यांनी सुप्रसिद्ध ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पदवी परीक्षेसाठी त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय निवडला. अध्ययन, मनन, चिंतन व सृजन हे संशोधनाला आवश्यक असणारे गुण राधाकृष्णन यांच्या अंगी जन्मताच होते. बी.ए .ची परीक्षा ते तत्त्वज्ञान विषय घेऊन फर्स्ट क्लास फर्स्ट आले. त्यावेळी त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. इंग्रजी वर्तमानपत्रातूनही त्यांच्या यशाचे गुणगान करणारे लेख प्रसिद्ध झाले.
एम .ए. साठी वेदांतातील नीतिशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी मद्रास विद्यापीठात आपले नाव नोंदविले. वेदांतातील नीतीशास्त्र या विषयावर प्रबंध सादर करून एम .ए. ची तत्त्वज्ञानाची पदवी सन्मानपूर्वक प्राप्त केली.
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक.
एम .ए. ची पदवी मिळाल्यानंतर ताबडतोब मद्रास विद्यापीठाने त्यांना सन्माननीय तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक दिली.
त्यांचे विद्वत्ता प्रचुर भाषण ऐकण्यास विद्यार्थी अतिशय उत्सुक असत. त्यांच्या व्याख्यानाची प्रसिद्धी इतकी वाढली की त्यांच्या तासाला विद्यार्थ्यांबरोबरच इतर प्राध्यापक/शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहू लागले. वर्गात बसायला जागा न मिळाल्याने असे विद्यार्थी उभे राहून राधाकृष्णन यांचे व्याख्यान ऐकत. भारतीय तत्त्वज्ञान श्रेष्ठ कसे आहे, हे ते जगातल्या इतर तत्त्वज्ञानाशी तुलना करून पटवून सांगत.
लवकरच त्यांची कीर्ती देशात सर्वत्र पसरली. त्यांना मोठमोठ्या विद्यापीठात व्याख्यानांसाठी आमंत्रणे येऊ लागली. याच काळात त्यांचे भारतीय तत्त्वज्ञान व संस्कृती या विषयावरचे लेख भारतातील व परदेशातील नियत कालिकात प्रसिद्ध झाले. रवींद्रनाथ टागोर व लोकमान्य टिळकांनी त्यांची याबद्दल प्रशंसा केली.
आशुतोष मुखर्जी यांनी डॉ. राधाकृष्णन यांना कलकत्ता विद्यापीठात सन्मानपूर्वक आमंत्रित केले. राधाकृष्णन कलकत्ता विद्यापीठात दाखल होताच, मुखर्जींनी त्यांच्याकडे पंचम जॉर्ज व्याख्यानमालेतील व्याख्यानांची जबाबदारी सोपवली. त्यात राधाकृष्णन यांच्या भाषणांची व्याख्यानमाला सुरू केली.
राधाकृष्णन यांच्या व्याख्यानांची इतकी प्रसिद्धी झाली की त्यांची दखल जगातील मोठमोठ्या वर्तमानपत्रांनी घेतली. त्यामुळे त्यांना अनेक देशांतून व्याख्यानांची निमंत्रणे मिळाली.
आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषद.
इंग्लंडमध्ये १९२६ मध्ये आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषद भरणार होती. कलकत्ता विद्यापीठाने राधाकृष्णन यांना हिंदुस्तानचे प्रतिनिधी म्हणून पाठवून दिले. तेथे राधाकृष्णन यांनी आपल्या अलौकिक वक्तृत्वाने जगातील सर्व तत्त्वज्ञ पंडितांना भारुन टाकले. या व्याख्यानातून राधाकृष्णन यांनी हिंदू धर्मातील अध्यात्माचे श्रेष्ठत्व व त्याची मानवी जीवनातील अनिवार्यता श्रोत्यांना पटवून दिली. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील ॲप्टन व्याख्यानमालेत “हिंदू धर्माचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन”या विषयावर राधाकृष्णन यांची व्याख्याने ठेवली गेली, ती खूपच लोकप्रिय झाली.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना तहयात प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले. पण राधाकृष्णन यांनी मात्र तीन वर्षांकरिता ते स्वीकारले.
तिथल्या वास्तव्यात त्यांनी जगातील अनेक धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करून या विषयावर अत्यंत सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना दिले. विद्यापीठा बाहेर त्यांना व्याख्यानाची मागणी येऊ लागली.
तीन वर्षाचा करार संपवून ऑक्सफर्ड विद्यापीठातून राधाकृष्ण भारतात परतले. आंध्र विद्यापीठातने राधाकृष्णन यांना निमंत्रण देऊन समारंभपूर्वक डॉक्टरेटची पदवी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू.
बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय हे होते. त्यांनी खास पत्र पाठवून डॉ. राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांना बनारसला बोलवून घेतले व विद्यापीठाचे कुलगुरू पद भूषवण्याची विनंती केली. डॉ. राधाकृष्णन यांनी ती विनंती आदरपूर्वक मान्य केली व कुलगुरू पद स्वीकारले.
१९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर भारत सरकारने त्यांची युनिव्हर्सिटी कमिशनचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. त्यानंतर रशियातील भारतीय राजदूत पदी त्यांची निवड झाली.
रशियातील भारतीय राजदूत म्हणून निवड.
या काळात त्यांनी रशियातील अनेक विद्वानांची, पंडितांची मने जिंकली. सर्वसामान्यांच्या मनात आपल्या भाषणाद्वारे, भारताची संस्कृती व अध्यात्म याविषयी आदर व आवड उत्पन्न केला. आपल्या वास्तव्यात त्यांनी रशियाचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांच्या मनावर इतका प्रभाव पडला की, रशिया भारताचा चांगला मित्र झाला. इतकेच नव्हे तर भारत व रशिया यांच्यातील २५ वर्षाच्या दीर्घकालीन मैत्रीचा करार घडवून आणला. भारतासारख्या नवोदित स्वतंत्र राष्ट्राच्या औद्योगिक व वैज्ञानिक जडणघडणीत रशियाने सहकार्य केले.
युनेस्को.
डॉ. राधाकृष्णन यांची भारताचे शांतिदूत म्हणून निवड केली. जगात शांतता नांदावी, जगाची सांस्कृतिक दृष्ट्या चांगली प्रगती व्हावी, आणि अखिल मानव जातीचे कल्याण व्हावे. यासाठी डॉ. राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांनी फार मोठी कामगिरी केली व त्याबद्दल युनोने त्यांचा खास गौरव केला. डॉ. राधाकृष्णन यांनी जागतिक शांतता व विश्वबंधुत्व, याचा आपल्या लेखातून व भाषणातून सतत प्रचार व प्रसार केला.१९५२ साली त्यांना युनोस्कोचे अध्यक्षपद देण्यात आले.
भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवड.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व पहिले उपराष्ट्रपती म्हणून डॉ. राधाकृष्ण यांची निवड झाली.
डॉ. राधाकृष्णन यांनी रशिया, अमेरिका, जर्मनी, पोलंड, बल्गेरिया, हंगेरी इत्यादी राष्ट्रांना १९५५ मध्ये भेटी देऊन भारताचे जागतिक शांततेची भूमिका पटवून दिली.होनोलुलू येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदेत त्यांनी भाग घेऊन भारताच्या शांतता धोरणाचे महत्त्व पटवून दिले.
१९६० पॅरिस मध्ये युनोस्कोच्या अधिवेशनात डॉ. राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांनी हजेरी लावली. त्याचवेळी इंग्लंड, फ्रान्स अमेरिका, जर्मनी या देशांना भेटी दिल्या. त्यावेळी जर्मनीने त्यांना आपल्या देशाचे सर्वश्रेष्ठ गुणवत्तेचे मानचिन्ह व शांतता पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.
अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठाने त्यांना मानाची पदवी दिली. मास्को विद्यापीठाने त्यांना आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय प्राध्यापक नियुक्त केले.
भारताचे राष्ट्रपती.
१२ जून १९५७ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ. राधाकृष्णन यांची निवड झाली. या काळात त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. हिंदू संस्कृती, वैदिक अध्यात्म, संस्कृत भाषा, जागतिक शांतता या विषयांवर त्यांनी आपल्या भाषणातून प्रबोधन केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जागतिक शांतता नांदावी म्हणून चालवलेल्या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा दिला.
जागतिक पातळीवर त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताबद्दल आदर व प्रेम उत्पन्न झाले. त्यांच्या या कार्याबद्दल १९५८ मध्ये डॉ. राधाकृष्णन यांना “भारतरत्न” सर्वोच्च नागरी सन्मान भारत सरकारने दिला.
१३ मे१९६२ रोजी डॉ. राधाकृष्ण राष्ट्रपती म्हणून दुसऱ्यांदा निवडले गेले. राधाकृष्णन थोर देशभक्त व महान द्रष्टे होते. संस्कृती, तत्त्वज्ञान, यांचा अभ्यास त्यांनी अत्यंत डोळसपणे केला होता.
१९६७ साली ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते मद्रासला स्थायिक झाले. तेथे त्यांनी अनेक विद्वत्तापूर्ण लेख लिहिले. त्यांचे लेख परराष्ट्रात प्रसिद्ध नियतकालिकातून प्रसिद्ध होत राहिले. २४एप्रिल १९७५ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले.
डॉ. राधाकृष्णन हे जागतिक कीर्तीचे प्रज्ञावंत होते. त्यांची पुस्तके व पुस्तकातील तत्त्वज्ञान सदैव जगाला मार्गदर्शन करीत राहील.
Best Narali Purnima नारळी पौर्णिमा & Raksha Bandhan रक्षा बंधन 2024