संत नामदेव महाराज – जीवन परिचय व माहिती

संत नामदेव महाराजांची ओळख

संसारिक दुर्दशेवर मात करून आध्यात्मिक साधनेच्या जोरावर सामान्य माणूसही असामान्य संत होऊ शकतो, हे नामदेव महाराजांनी आपल्या जीवन साधनेतून लोकांना पटविलेले आहे.

मुक्ती सुखापेक्षाही भक्ती सुखाची थोरवी अधिक आहे आणि संन्यास आश्रमातील दुष्कर उग्र तपापेक्षा गृहस्थाश्रमातील सौम्य व सुखकर नामजपच सामान्य जीवांच्या जीवनाचे सार्थक करील याचा स्वानुभवसिद्ध साक्षात्कार नामदेवांनी भाविक- जनांना दाखविला आहे.

तत्कालीन धर्म मार्तंडांमध्ये अहंकार होता ‌. साक्षात्कार नव्हता, पांडित्य होते, पावित्र नव्हते, वेदाचा विचार होता भेदाचा विचार नव्हता, मायावाद होता पण भूतदयावाद म्हणून सामान्य जनता वंचित व पिडीतच राहिली. या चक्रव्युहाचा भेद ज्ञानदेव, संत नामदेव संतांनी केला.

संत नामदेव महाराजांचा जन्म

संत नामदेवांचा जन्म शके
११९२ रविवार २६ ऑक्टोबर
१२७० रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे दामाशेटी तर आईचे नाव गोणाई होते.

शिंपी कुळात जन्म: नामदेवांचा संतांविषयीचा भक्ती भाव व अनन्यप्रेम, त्याचबरोबर संतांविषयीचा अत्यंत नम्रभाव नामदेवांचे अंगी होता. नामदेवांची वृत्ती नम्र होती, वाणी मधुर, गोड, रसाळ, मृदू होती. नामदेव वाक् चतुर व प्रभावी वक्ते होते.
शिंपीकुळात जन्मलेल्या संत नामदेवांना आपल्याभक्तीबळावर विठ्ठल आपलासा केला आहे. नामदेवाने आपले जीवनच विठ्ठलमय केले आहे. नामदेवांनी भक्तिमार्गी संतांना बरोबर घेऊन वारकरी संप्रदायाचे संघटन केले आहे.

नामदेवांचे बालपण: संत नामदेव हे उपजतच बालभक्त होते. बाल भक्त प्रल्हादाप्रमाणे विठ्ठल नामाचा सांपत्तीक ठेवा घेऊनच त्यांनी अवतार घेतला होता. बालपणी शब्द उच्चारू लागतात ‘ विठ्ठल, विठ्ठल ‘ नामाचा उच्चार मुखी येऊ लागला. नामदेवांची बाल भक्ती स्वयंप्रेरित होती. ही नामदेवांची बाल भक्ती वयानुसार वाढत गेली. बालभक्तीतूनbनिपजलेला प्रेमाचा दीप अखंडित प्रकाशमयच राहिला.

संत नामदेव महाराज यांची माहिती

नैवेद्यग्रहण प्रसंग

वडिलांचा रोजचा श्री विठ्ठलास नैवेद्य दाखविण्याचा क्रम बाल नामदेवास घरातील निरीक्षणानुसार माहिती असला पाहिजे. एक दिवस कामकाजा निमित्त दामाशेठ बाहेरगावी गेले असता, नामदेवाचे आई गोणाईने रोजच्या प्रथेप्रमाणे नामदेवास विठ्ठल मंदिरात नैवेद्य घेऊन पाठविले. नामदेव विठ्ठलास वारंवार जेवण्याचा आग्रह करू लागला.

विठ्ठल आपले वडिलांचा नैवेद्य स्वीकारतो मग माझा का नाही स्वीकारित? तेव्हा नामदेवाने सोज्वळ मनाने विठ्ठलास निर्वाणीचे सांगून टाकले की आता जर तू नैवेद्य ग्रहण केला नाहीस तर मी जीव देईन. श्री विठ्ठल मूर्ती बोलते चालते व सचेतन आहे, असा नामदेवाचा दृढ समज म्हणून त्याने शेवटचा उपाय विठ्ठलास सांगितला.

केशवा माधवा गोविंदा गोपाळा ।
जेवी तू कृपाळा पांडुरंगा।
विठ्ठलाने जेवून वाटी नामदेवाचे हाती दिली.

विवाह व संसारजीवन

दामाशेटीस नामदेव हेच एकुलते एक सुपुत्र होते. त्यांनी नामदेवाचे विवाहाची तयारी सुरू केली. त्याकाळी बालविवाहाची पद्धत होती. नामदेवाचे वय ११ वर्षांचे असतानांच नामदेवाचा विवाह ठरला. गोविंदशेठ सदावर्ते यांच्या राजाई नावाच्या कन्येबरोबर नामदेवाचा विवाह झाला.

दामाशेटीने आपल्या मुलीचा विवाह मोठ्या थाटाने संपन्न केला.संसारात रमले नाहीत.

नामदेवांचे लग्न झाले तरी ते संसारात मग्न झाले नाहीत. त्यांनी त्यांच्या पारंपारिक व्यवसायात लक्ष घातले नाही.
विठ्ठल मंदिरात भजन करण्यात विठ्ठल नाम घोषणात त्यांचा दिनक्रम ठरून गेला. आई वडील व पत्नी यांनी नामदेवांना परोपरिने जनरितीप्रमाणे व्यवसायात लक्ष घालून घराण्याचे नाव राखावे या हेतूने समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी विठ्ठला साकडे घातले.

परंतु विठ्ठल रुक्मिणीने सांगितले की, आम्ही नामदेवास बांधले नाही, त्यानेच आम्हास बांधले आहे. तुम्ही नामदेवास घेऊन जा. नामदेवाला मुलेबाळे झाली पुढे सुना आल्या तरी नामदेवांचे संसाराकडे दुर्लक्ष झाले त्यात फरक पडला नाही. चंद्रभागेच्या वाळवंटात ते हरिकीर्तन करू लागले. नामदेवाने संसाराचा त्याग केला नाही, पण त्यात अडकून पडले नाहीत.

विसोबा खेचर यांना नामदेवाने गुरु मानले.

नामदेवाचे जसे विठ्ठलावर अपार प्रेम होते तसेच विठ्ठलाचेही नामदेवावर अपार प्रेम होते. पण या प्रेमाचा नामदेवांना फार अहंकार झाला. मीच एकटा विठ्ठलाचा लाडका आहे, असा समज नामदेवाचा झाला. अहंकाराला कुठेतरी पूर्णविराम मिळायला पाहिजे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी त्यांना विठ्ठलाची अनेक रूपे दाखविली.

ज्ञानेश्वरांनी नामदेवाचा अधिकार जाणला व गुरुचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेण्यास सांगितले. मुक्ताईने नामदेवास कच्चे मडके म्हटले. मुक्ताईने नामदेवांना विसोबा खेचराकडे पाठविले.

विसोबा खेचर हे सोपान देवांचे शिष्य होते. ते औंढा नागनाथ येथील श्रीमल्लिकार्जुनांच्या मंदिरात राहत होते. औंढ्या
नागनाथ येथे विसोबा खेचर व नामदेव यांची भेट झाली.

नामदेवाने त्यांना गुरु केले. विसोबा खेचऱ्यांनी त्यांना ज्ञान दिले. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास उपदेश दिला, तीच गुरूपरंपरा पुढे चालू राहिली होती.गैनीनाथाने निवृत्तीनाथांना,निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना, ज्ञानेश्वरांनी विसोबा खेचला व विसोबा खेचराने नामदेवाला त्याच मंत्रउपदेशाची माहिती दिली.

हिंदी काव्य व उत्तर भारत प्रवास

नामदेव महाराष्ट्रातून उत्तर हिंदुस्तानात गेल्यावर तेथे त्यांनी हिंदी व गुरुमुखी भाषा आत्मसात केली. तसेच तिकडील बोलीभाषा आत्मसात करून त्या भाषेतून कीर्तनाद्वारे येथील जनतेस मानवतावाद व ईश्वर नामस्मरणाची शिकवण दिली.
किर्तन माध्यमाला पोषक म्हणून हिंदी व गुरुमुखी भाषेतून काव्यरचना केली.

हिंदी काव्यात त्यांनी आपली जात, व्यवसाय,कुळ पंढरपूरवास, श्री विठ्ठल दैवत, जातिभेद वृत्तीचा निषेध, नामस्मरणाचे महत्त्व, निर्गुण भक्तीची कल्पना, आपले गुरूंचा वैशिष्ट्यपूर्वक उल्लेख, व समाजातील दांभिकपणाचा निषेध केला आहे.

पंजाबात वास्तव्य:

संत नामदेव उत्तर भारतात भागवत धर्माचे प्रचार कार्य करीत पंजाब मध्ये वीस वर्षे वास्तव्य करून राहिले. उत्तर भारतीयांचे बोली भाषेत साधकुडी भाषेत त्यांनी हिंदी काव्यरचना केली आहे. त्यातील 61 पदे शिखांच्या ग्रंथसाहिब ग्रंथात समाविष्ट झाली आहेत. मराठीतील आध्यात्मिक काव्यात विचारांचा सारखेपणा हिंदी काव्यातील रचनेत दिसून येतो.

नामदेवाचे व त्यांचे उत्तर हिंदुस्थानातील सहकारी संत त्रिलोचन व जयदेव यांचे काव्यात विठ्ठल या महाराष्ट्रीय दैवताचे नाव आले आहे. पंढरपूरचा वारकरी संप्रदाय व श्री विठ्ठल यांचे उत्तर हिंदुस्थानात प्रसिद्धी करणारे व त्यांची माहिती देणारे संत नामदेव हेच पहिले संत होते.

नामदेवावरील गाढ श्रद्धेच्या खुणा आजही पंजाबात, राजस्थानात, उत्तर भारतात पहावयास मिळतात. राजस्थानात नामदेवांची २०२ मंदिरे आहेत. पंजाबात घुमान शिवाय इतरत्रही नामदेवांची मंदिरे आहेत. नरसी मेहता, मिराबाई, सूरदास, तुळशीदास हे उत्तर भारतीय संत नामदेव महाराजांच्या भक्ती गंगेत न्हावून जीवन मुक्त झाले.

ज्ञानेश्वर महाराज व नामदेव यांची भेट.

पंढरपुरात नामदेवांचे मोठे नाव झाले होते. त्यांची भेट घेण्यास ज्ञानेश्वर पंढरपुरास आले. नामदेवांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवले, तेव्हा ज्ञानेश्वरांनी नामदेवास सांगितले की, तुला बरोबर घेऊन तीर्थयात्रेला जाण्याचा हेतू धरून तुझ्या भेटीसाठी आलो आहे. पंढरीनाथांची परवानगी घेऊन ते दोघे तीर्थयात्रेस उत्तर हिंदुस्थानात गेले. हस्तीनापुरास ते येऊन पोहोचले. तेथे नामदेवांनी कीर्तन केले. नंतर काशी, इत्यादी अनेक तीर्थे करून ते मारवाड देशात गेले ‌ येथून ते औंढ्या नागनाथास आले.

देवळाने दिशा फिरवली एक चमत्कार.

औंढय नागनाथ हे ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे. ज्ञानेश्वर नामदेव यांनी श्रीशिव- शंकराचे दर्शन घेतले. नंतर नामदेवांनी तिथे कीर्तन करण्यास आरंभ केला. त्यांच्या कीर्तनास लोकांची फारच गर्दी झाली. तिथल्या ब्राह्मणांनी नामदेवास सांगितले की, ‘ तुमच्या भजन कीर्तनाची प्रौढी पंढरपुरास, येथे नागनाथास त्याचे महात्म्य नाही.

पंढरपुरास जा व तिथे कीर्तन करा.’ यावर श्रोत्यांनी आक्षेप घेतला. श्रोते म्हणाले शंकरा समोर कीर्तन करू नये असे कोठे सांगितले आहे. त्यावेळी ब्राह्मणांनी नामदेवास सांगितले की लोक पूजे करता खोळंबले आहेत. तुम्ही देवळाच्या मागे जाऊन कीर्तन करा. ब्राह्मणांचे विनंतीला मान देऊन नामदेव देवळामागे कीर्तन करण्यास गेले.

लोक देवळामागे जाऊन कीर्तन ऐकण्यास बसले. नामदेव कीर्तनास उभे राहिले. त्यांनी पांडुरंगाचा धावा केला. ते देऊळ जे पूर्वाभिमुख होते ते फिरून नामदेवांच्या समोर त्याचे तोंड आले. या चमत्काराने सर्वांना नवल वाटले. नामदेवांचे कीर्तन मोठ्या रंगात आले होते, शंकराची पूजा आटपून ब्राह्मण बाहेर आले. त्यांनी देऊळ ठरल्याचे पाहिले ब्राह्मण नामदेवांना शरण गेले. ते फिरलेले देऊळ अद्यापही तसेच आहे. नंतर ज्ञानेश्वर व नामदेव पंढरपुरास आले.

संत नामदेव महाराजांचे कार्य

  • वारकरी संप्रदायाची मजबुती
  • निर्गुण भक्तीची शिकवण
  • जातिभेद व दांभिकतेचा निषेध
  • भक्तीमार्ग लोकसुलभ करणे

नामदेवांची संजीवनी समाधी.

संत नामदेव शके १२५२ मध्ये उत्तर भारतात द्वारका, मथुरा, हरिद्वाराहून पंजाबात २० वर्षे गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे वास्तव्य करून राहिले होते. नामदेवांचे कार्याची फलश्रुती झाल्यावर नामदेवास अंतर्यामी जाणीव झाली की, आपली
इहयात्रा संपत आली आहे. तेव्हा आपले जन्मभूमीत देह ठेवणे योग्य समजून ते पंढरपूरला आले.

संत नामदेवांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे पायरीशी संजीवनी समाधी आषाढ शुद्ध त्रयोदशीला शके १२७२ ता .५ ऑगस्ट १३५० इ.स. या दिवशी घेतली. आजही ही पायरी नामदेवाची पायरी म्हणून ओळखली जाते.

Other Articles

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती 

Best Lokmanya Tilak Information in Marathi

Follow us on YouTube- Marathi Antarang

Leave a Comment