पद्मश्री श्रीनिवासराव कोटा. (Kota Srinivasa Rao)
( १० जुलै १९४२ — १३ जुलै २०२५)
यांच्या निधनाने तेलगू, तमिळ, हिंदी, कन्नड या भाषेतील एक ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. त्याचबरोबर वरील भाषेतील चित्रपट सृष्टीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांनी आतापर्यंत ७५० हून अधिक चित्रपटांत काम केले होते.

Kota Srinivasa Rao
श्रीनिवास राव यांनी खलनायक, अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता अशा विविध श्रेणीमध्ये नऊ राज्य नंदी पुरस्कार जिंकले होते.२०१२ मध्ये त्यांना कृष्णम वंदे जगद्गुरु मधील अभिनयासाठी SIIMA Awards पुरस्कार मिळाला होता.
१९९९ ते २००४ पर्यंत त्यांनी आंध्र प्रदेशातील विजयवाडा चे आमदार म्हणून काम केले होते. भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी त्यांना पद्मश्री (२०१५) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दक्षिण भारतातील राजकारणी असो, गँगस्टर या भूमिकांसाठी एकच नाव येते ते म्हणजे श्रीनिवास राव कोटा यांचे. रविवार दि.१३ जुलै २०२५ रोजी हैदराबाद मध्ये त्यांचे निधन झाले.
श्रीनिवास राव कोटा यांचा जन्म १० जुलै १९४२ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कंकीपाडू या ठिकाणी झाला. त्यांनी १९७८ मध्ये ‘ प्राणम् खारीदू ‘ या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.
राव यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका विशेष गाजल्या. खलनायकाच्या भूमिकेच्या अभिनय सामर्थ्यामुळे ते खलनायक म्हणून खूपच लोकप्रिय झाले होते. व्यक्तिगत आयुष्यात देखील ते तसेच असावेत असा अनेक लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला होता. खरंतर ही त्यांच्या अभिनयाला मिळालेली दाद होती. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ नायक ‘ या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती
‘ सत्रवु ‘ ‘ अहा ‘ ना पेलंता ‘ ‘ हॅलो ब्रदर ‘ ‘ मनी ‘ दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा ‘ शिवा ‘ आणि ‘ गयाम ‘ यासारख्या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियतेच्या कळसावर बसविले होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री एरेवंत रेड्डी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्र बाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, केंद्रीय खाण व कोळसा मंत्री किशन रेड्डी इत्यादींनी श्रीनिवास राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच चिरंजीवी, ज्युनियर एनटीआर, प्रमुख निर्माता डी सुरेश बाबू, अभिनेता मुरली मोहन यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी श्रीनिवास राव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
भारताचे पूर्व उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू, तेलंगणाचे एकाआईचे अध्यक्ष एन रामचंद्र राव, भाजपचे आंध्र प्रदेशचे अध्यक्ष पीवीएन माधव यांनी राव यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
बॉलीवूड मधील श्रीनिवास राव यांचे योगदान.
अमिताभ बच्चन पासून टायगर श्रॉफ पर्यंत त्यांनी अनेक बॉलीवूड अभिनेत्यांबरोबर चित्रपटात काम केले होते. प्रतिघात दिग्दर्शक एन. चंद्रा. ‘सरकार ‘दिग्दर्शक राम गोपाल वर्मा. ‘ डार्लिंग’ निर्देशक राम गोपाल वर्मा, ‘ लक ‘ , ‘ रक्त चरित्र ‘, ‘बागी’ दिग्दर्शक शब्बीर खान. इत्यादी बॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये श्रीनिवास राव यांनी काम केले होते.